Majhya Mamach Patra Haravla esakal
सप्तरंग

भाषा संवाद : माझ्या मामाचं पत्र हरवलं...

Latest Marathi Article : लहानपणी हा खेळ खेळताना मामाचं ते पत्र आणि त्या पत्रावर कधीही न लिहिलेला ‘निष्पाप पत्ता’ आपल्या आयुष्यातून इतक्या लवकर हरवून जाईल, असं कधीच वाटलं नव्हतं...

सकाळ वृत्तसेवा

लेखिका : तृप्ती तिजारे-चावरे

रमी म्हणजे पत्त्यांचा जुगार, असं मी लहानपणापासून ऐकत आले आहे. आजकाल मात्र जाहिरात देवीच्या कृपेने ‘रमी सर्कल’ आणि ‘तीन पत्ती’ हे ऑनलाइन पत्त्यांचे डिजिटल गेम नव्या निष्पाप मनाच्या पिढीच्या सवयीचा भाग होत चालले आहेत. यावरून मला माझ्या लहानपणीचा एक सुंदर खेळ आठवला.

या खेळातही एक ‘सर्कल’ होतं, ज्याला मित्र-मैत्रिणींचं ‘कोंडाळं’ असं म्हणायचे. हे कोंडाळं मैदानात गोलाकार बसायचं आणि खेळ सुरू व्हायचा, ‘माझ्या मामाचं पत्र हरवलं, ते कुणाला सापडलं’. लहानपणी हा खेळ खेळताना मामाचं ते पत्र आणि त्या पत्रावर कधीही न लिहिलेला ‘निष्पाप पत्ता’ आपल्या आयुष्यातून इतक्या लवकर हरवून जाईल, असं कधीच वाटलं नव्हतं... (saptarang latest article on majhya mamacha patra haravla)

पत्र... स्वतःच्या हातानं लिहिलेला आदर, आशय आणि जिव्हाळ्याचा शब्द. पत्र... आपल्या मनातील भावना, प्रेम आणि संवेदना दुसऱ्याच्या मनापर्यंत पोहोचविण्याचं एक प्रभावी आणि आर्जवी माध्यम! तुम्हाला माहिती आहे का, हे ‘पत्र’ माध्यम सर्वप्रथम कुणी आणि कुणासाठी लिहिलं? पहिलं प्रेमपत्र हे एका स्त्रीने लिहिलेलं असून, त्याचा उल्लेख द्वापारयुगात थेट महाभारतात सापडतो.

राजकन्या रुक्मिणीचा विवाह तिच्या इच्छेविरुद्ध शिशुपालाशी लावण्याचा जेव्हा प्रयत्न केला जातो, तेव्हा रुक्मिणी आपल्या प्रियकराला, म्हणजे कृष्णसख्याला अगदी दोनच ओळींचं पत्र लिहिते... त्या पत्रातील मायना अगदी थोडा; पण त्यातील आशय किती नेमकेपणाने व्यक्त झाला आहे, पाहा :

शिशुपाल नवरा मी ‘न’वरी श्रीकृष्ण नवरा मी ‘नवरी’

चातुर्याने लिहिलेला हा ‘श्‍लेष’ वाचून श्रीकृष्ण रुक्मिणीला पळवून नेतो आणि रुक्मिणी स्वयंवर पूर्ण होते. एका पत्राची काय ताकद असते, हे पौराणिक काळापासून आजवर अनेक महान व्यक्तिमत्त्वांनी सिद्ध करून दाखविले आहे. नल-दमयंती या आख्यानात आजारी पडलेली व मरणासन्न झालेली दमयंती, ‘औषध ‘नल’गे मजला’ असा दुहेरी अर्थाचा श्लेष वापरून नल राजाला पत्र पाठवीत असे.

त्या काळातल्या साहित्य क्षेत्रात धमाल उडवून दिलेली आहे. शिवकालीन पत्रव्यवहारात समर्थ रामदासांच्या पत्रांनी शिवबांच्या मनात स्वराज्याचा जागर फुंकला. ब्रिटिश काळात अनेक भूमिगत कार्यकर्त्यांनी गुप्त पत्रव्यवहाराद्वारे स्वातंत्र्य चळवळ उभी केली. अनेकांनी, अनेकांना अनेक प्रकारची पत्रं लिहिली.

त्या पत्रातील आशय, विचार आणि मसुदा अनेकांसाठी ध्येयप्रेरित आणि जीवनदर्शक ठरला. नीतिमत्ता, सदाचार आणि सद्‍भावना अशी संस्कारमूल्ये रुजली, ती या पत्रांमधील सत्य, शुद्ध, पवित्र आणि जाज्वल्य भाषेतून. ध्येयनिष्ठ विचारांनी आणि दर्जेदार भाषेने भारलेली ही सगळी शब्दसंपदा आज धूसर होताना दिसते आहे. कारण, ‘पत्र’ हा शब्द, ‘पत्र’ ही घटना आणि पत्राचे भौतिक अस्तित्व काळाच्या पडद्याआड जाऊ लागले आहे. (latest marathi news)

आपला महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी. संतकालीन साहित्यात चांगदेवाने संत ज्ञानदेवांना एक कोरं म्हणजे काहीही न लिहिलेले पत्र पाठवलं होतं. पण, माउलींचा अधिकार किती थोर ! त्यांनी ते कोरं पत्रंही वाचलं, आणि त्याचं उत्तर म्हणजेच ‘चांगदेव पासष्टी’ हा ग्रंथ. तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतून त्यांनीही गया, काशी विश्वनाथ व गंगेला लिहिलेली अशीच काही पत्रे आढळतात.

छत्रपती शिवरायांनी आपले अनेक महत्त्वाचे गुप्त संदेश आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना पत्राद्वारेच पाठविले. लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, साने गुरुजी यांसारख्या विचारवंतांनी आपल्या अनुयायी मंडळींना केलेले वैचारिक मार्गदर्शन हे पत्राद्वारेच संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचले आहे.

कित्येक घडामोडींमध्ये ‘पत्रा’ची भूमिका ही अनेकदा महत्त्वाची ठरली आहे. अब्राहम लिंकनचे ‘हेडमास्तरांस पत्र’ आजही शाळा-शाळांमधून भिंतीवर वाचायला मिळते; तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमानच्या जेलमधून ब्रिटिश सरकारला लिहिलेल्या पत्रांनी ब्रिटिश सरकार हादरले आणि एक वेगळाच चमत्कार घडून आला.

या युगपुरुषांप्रमाणे सामान्य माणसांच्या जीवनातही पत्राचे स्थान तितकेच महत्त्वाचे राहिलेले आहे. पूर्वी प्रत्येकाच्या घरात एका लोखंडी तारेत छिद्र पाडून कित्येक जुनीपुराणी पत्रे जतन केली जायची. प्रसंगानुरूप पोस्टकार्ड, अंतर्देशीय पत्र, पाकीट, तार असे वेगवेगळे प्रकार वापरले जायचे. आज मात्र परिस्थिती बदलली.

आपल्या संस्कृतीत आणि जीवनशैलीत बदल होऊ लागले. संस्कृतीने चालत आलेल्या अनेक वस्तूंची जागा आजच्या जीवनशैलीत आधुनिक तंत्रज्ञानाने घेतली. याला एकीकडे प्रगती झाली असे म्हणावे; तर दुसरीकडे त्या वस्तूंची नावे, त्यांच्याशी जोडले गेलेले शब्द, भाषा आणि त्या मागच्या भावना आमच्या भाषासंग्रहातून कमी होत गेल्या, असे दिसून येते.

याचे अगदी आपल्यासमोर दिसणारे उदाहरण म्हणजे पत्र, पोस्टमन आणि पत्रपेटी. तंत्रज्ञानाने केलेल्या अफाट प्रगतीमुळे पत्राची जागा अन्य संपर्क माध्यमांनी घेतली. ही संपर्क साधने कितीही प्रगत झाली असली, तरी पत्राद्वारे मिळणारा आनंद त्यांत सापडत नाही. (latest marathi news)

शेवटी शब्द हे ‘व्यक्त’ होण्याचे माध्यम आहे; तर पत्र म्हणजे त्या माध्यमाचा खरा गाभा. तासाभरचा व्हिडिओ कॉल हा शब्दातून व्यक्त होण्याचे समाधान देतो का? या प्रश्नाचे उत्तर नक्कीच ‘नाही’ असे आहे. ‘सकाळ’मधून माझी पहिली कलाविषयक लेखमाला पूर्ण झाली, तेव्हा माझ्या बाबांना माझं खूप कौतुक वाटलं.

पण, ते कौतुक नुसतं फोनवर बोलण्यापुरतं मर्यादित न ठेवता, त्यांनी मला एक सुंदर आणि मार्मिक असं पत्र लिहिलं. ते पत्र म्हणजे आमच्यातला मूक भावसंवाद तर आहेच; पण त्यांच्या अनुभवाने सिद्ध झालेल्या प्रत्येक शब्दाशब्दांतून मला जी ऊर्जा, दिशा आणि प्रेरणा मिळाली, ती माझं जीवन उजळून टाकणारी आहे.

‘शुभ आशीर्वाद’, ‘सप्रेम नमस्कार', ‘साष्टांग दंडवत’ असा पत्रमायना, किंवा समारोपाला ‘कळावे, लोभ असावा, ही विनंती’ ही पत्रलेखनातील औपचारिकता किती हृदयस्पर्शी असते‌! माझ्या लहानपणी मुलांना लिहिता-वाचता येऊ लागले, की कोणातरी नातेवाइकाला आवर्जून पत्र लिहायला सांगत. थोरामोठ्यांची पत्रे वाचायला देत असत.

त्यातून हस्ताक्षर, शब्दयोजना, रचना, मांडणी, विस्तार, सारांश आदी भाषा प्रमाणांचा बौद्धिक विकास होत असे. आजच्या शाळकरी मुलांना फक्त भाषेच्या प्रश्नपत्रिकेत चार गुण मिळविण्यापलीकडे पत्रलेखनाची उपयोजिताच ठाऊक नाही. अशाने त्यांच्या मनात शब्दसंग्रह, भाषाप्रमाणे, रचना, मांडणी, भावभावना, सामाजिक संवेदना आणि विचारांची परिपक्वता आकार कशी घेणार?

मनातील भावना आणि विचार हे शब्दातून ‘व्यक्त’ होत नाहीत, तोवर बुद्धीला धार लागत नाही, म्हणून आपल्यातले उत्तम ‘व्यक्ति’मत्त्व घडविण्यासाठी वा फुलविण्यासाठी हातात लेखणी घेऊन लिहिणे हे प्रत्येकासाठीच आवश्यक आहे. मग याच लेखणीने पत्ररूप धारण करायला काय हरकत आहे? दररोज शेकडो ई-मेल्सने ओसंडून वाहणारा आपला ई-मेल बॉक्स भावनांच्या कप्प्यासाठी बंद झाला आहे की काय, असा मला प्रश्न पडतो.

कारण, आज पत्र लिहिणारा मामा राहिलेला नाही, ते पत्र वाचणारे भाचेही राहिलेले नाहीत, खेळही हरवला, पत्रही हरवलं, आणि ते कुणाला सापडण्याची शक्यताही हरवली. तरीही मी आशावादी आहे. कारण जोवर व्यक्ती आहे, तोवर व्यक्तिमत्त्वही आहे आणि व्यक्तिमत्त्वाला ‘व्यक्त’ होणे तर आहेच आहे. चला तर, तुम्हीही घ्या एक पत्र लिहायला, आणि व्हा व्यक्त... 

(क्रमशः)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT