Language Communication esakal
सप्तरंग

भाषा संवाद : काय वाचावे, कसे वाचावे...

Latest Marathi Article : वाचन ही भाषासंवादाची सुरुवात आहे. वाचता-वाचता मनात भाषासंवाद आपसूक सुरू होतो. हा संवाद प्रवाही करण्याची एक युक्ती म्हणजे योग्य आवाजाचा वापर करून विरामचिन्हे वाचणे.

सकाळ वृत्तसेवा

''कुटुंबातील प्रत्येकाने काहीतरी मोठ्याने वाचून दाखवायचे. व्यक्ती वेगवेगळ्या असल्या, तरी वाचनाचे सूत्र एकच ठेवायचे. समजा कुटुंबात चार व्यक्ती असतील, तर प्रत्येकाने एकच कविता किंवा एकच उतारा वाचायचा. बाकीच्यांनी ते फक्त ऐकायचे. प्रत्येक जण विरामचिन्हे कशी वाचतो आहे, आवाज कसा वापरतो आहे याचा अभ्यास करायचा. आपल्यावर वाचनाची वेळ आली की आपण मागच्याने केलेली चूक सुधारायची. असे करीत-करीत मोठ्याने वाचता-वाचता वाचनाची आणि आवाजाची लय सापडू लागेल.''- तृप्ती चावरे-तिजारे

(nashik saptarang latest article on Language Communication )

वाचन ही भाषासंवादाची सुरुवात आहे. वाचता-वाचता मनात भाषासंवाद आपसूक सुरू होतो. हा संवाद प्रवाही करण्याची एक युक्ती म्हणजे योग्य आवाजाचा वापर करून विरामचिन्हे वाचणे. हल्लीची पिढी हातात पुस्तक दिले रे दिले, की एकाच आवाजात रेल काढून सुसाट वाचत सुटते. ते वाचन एकसुरी व कोरडे वाटते. विरामचिन्हे वाचकाला संयम आणि ओलावा शिकवत असतात. भाषेत संयम आणि ओलावा समजला तर तो आयुष्यातही समजेल. अर्थातच, सुरुवात स्वतःपासून आणि मग कुटुंबापासून.

वाचनाची कला विकसित करायची असेल तर ‘अर्धा तास एकसूत्र’ या पद्धतीने ठरविले तर प्रत्येक कुटुंबात छान अभ्यास होऊ शकतो. कुटुंबातील प्रत्येकाने काहीतरी मोठ्याने वाचून दाखवायचे. व्यक्ती वेगवेगळ्या असल्या, तरी वाचनाचे सूत्र एकच ठेवायचे. म्हणजे, समजा कुटुंबात चार व्यक्ती असतील, तर प्रत्येकाने एकच कविता किंवा एकच उतारा वाचायचा. बाकीच्यांनी ते फक्त ऐकायचे. प्रत्येक जण विरामचिन्हे कशी वाचतो आहे, आवाज कसा वापरतो आहे याचा अभ्यास करायचा. आपल्यावर वाचनाची वेळ आली की आपण मागच्याने केलेली चूक सुधारायची.

असे करीत-करीत मोठ्याने वाचता-वाचता वाचनाची आणि आवाजाची लय सापडू लागेल. अगदी याच लयीत भाषासंवादाची आणि व्यक्तिमत्त्वाचीही लय लपलेली असते, हे आपल्या अनुभवांती लक्षात येईल. हा अनुभव घेण्यासाठी अगदी सोपा उपाय म्हणजे कौटुंबिक पातळीवर भाषा वाचनाचा उपक्रम सुरू करणे... आज आपल्या आजूबाजूला कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी नवी पिढी तीन कारणांनी मराठी भाषा वाचत आणि बोलत असते. आजूबाजूच्यांना कळावे म्हणून; शाळेच्या गरजेपोटी; किंवा आई-बाबांच्या आग्रहाखातर फक्त हौस म्हणून, आणि तीही थोडीफार... मातृभाषेच्या ऐकण्या-बोलण्यातून संस्कार व सभ्यता रुजत असते.

निदान, या स्वार्थासाठी तरी चांगले वाचले, ऐकले व बोलले पाहिजे. कळत-नकळत भाषेची ‘गोडी’ लागण्याऐवजी ‘गाडी’ वेगळ्याच वळणावर जाऊ लागते, असे आजकालचे चित्र आहे. याला कुठेतरी पालक आणि संस्कार रुजविणारे जबाबदार घटक म्हणून आपणही जबाबदार असतो. मुलांना नेटके मराठी वाचता येत नाही, याकडे आपण गांभीर्याने लक्षच देत नाही. कारण, मराठीवाचून कुणाचे काही अडून राहत नाही. शाळांमधूनही हा विषय फारसा गांभीर्याने घेतला जात नाही. (latest marathi news)

पण, संस्कार रुजवू पाहणाऱ्या सर्व घटकांनी हे लक्षात घेतले पाहिजे, की मातृभाषा हे भावभावनांचा ओलावा, प्रेम, आदर, श्रद्धा आणि सद्‌भावना ही मूल्ये जिवंत ठेवणारे एक महत्त्वाचे माध्यम आहे. आपल्या स्वतःच्या मातृभाषेबद्दल आपली स्वतःची भावना जर प्रेमाची असेल तरच ती नवीन पिढीतही रुजेल. मातृभाषेविषयी आणि ती व्यक्त करणाऱ्या आवाजाविषयी आस्था नसलेल्या कुटुंबांमध्ये सभ्यता-सुसंवादाचा अभाव आणि अरेरावी, उलट उत्तरांचा सुकाळ दिसून येतो.

प्रत्येकाला प्रत्येकाशी बोलायचेच असेल, तर ते मृदू आवाजात आणि नम्र भाषेत का असू नये? आपल्या भारतात सर्वत्र हिंदी भाषा बोलली जाते; परंतु ‘लखनवी अदब’ ही जगात प्रसिद्ध आहे. याचे कारण म्हणजे ते लोक परस्पर आदर तर जपतातच; परंतु आवाजातील ‘अदब’ही जपतात, हे लक्षात घेण्यासारखे आहे. यासाठी त्यांच्या कुटुंबातच बालपणापासूनच अदबीला धरून संस्कार असतात. ते केवळ बोलायचे म्हणून बोलत नाहीत, तर एकमेकांची भाषा घडविण्यासाठी बोलतात. आपल्या महाराष्ट्र प्रांतातही काही विचारसंपन्न कुटुंबे असा प्रयत्न नक्कीच करीत असतील.

असाच जाणीवपूर्वक प्रयत्न प्रत्येक मराठी कुटुंबातून झाला तर आपल्या भाषेचीही संस्कार, सभ्यता व अदब ही वेगळी ओळख आपल्याला अनुभवायला मिळेल. यासाठी दैनंदिन कामे करता-करता घरच्या घरी भाषेचा अर्धा तास रोज भरवता येईल. एकमेकांची भाषा बिघडताना दिसली रे दिसली की ती सुधारायची आणि घडवायची यासाठी प्रयत्न करायचे. मराठी वाचन प्रसाराचे जादुगार नाशिकचे विनायक रानडे यांच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाने मराठी वाचन जगभरात रुजविले व जगातील मराठी घराघरांत पुस्तक वाचले जाऊ लागले.

आवडीनिवडीच्या पलीकडे जाऊन, वाचनाची ‘सवय’ लावावी लागते, तीही अशी. आता याच धर्तीवर ‘चांगल्या आवाजात बोलणारे घर’, ‘कवितांचे घर’, ‘वाचणारे घर’ किंवा ‘घरातली मराठी शाळा’ असे काही उपक्रमही नक्कीच राबविता येतील की नाही? घरातील आबालवृद्धांपासून प्रत्येकाला एकाच इयत्तेत बसून अभ्यास करता येईल. कुणी कविता वाचेल, कुणी नाट्य उतारा वाचेल, कुणी संवाद वाचेल, कुणी परिच्छेद वाचेल, कुणी कथा वाचेल, कुणी अभंग वाचेल, कुणी बडबड गीते वाचेल, कुणी नाटक वाचेल... छानच चालेल अशी घरची शाळा. (latest marathi news)

पण, अट एकच. वर्ग कमी वेळाचा आणि प्रत्येकाने सहभाग घ्यायचा. भाषेचा छान खेळ खेळायचा. एकमेकांच्या चुका काढायच्या आणि एकमेकांना शाबासकीही द्यायची. कुणीतरी असं म्हटलंच आहे, की ‘वाचाल तर वाचाल’. पण, निदान स्वतःच्या घरातच याचा आपल्याला विसर पडतो. आपण सगळे मिळून एकत्र टीव्ही बघू शकतो; तर चांगल्या आवाजात बोलू का नाही शकणार? एखादी छानशी कथा का नाही वाचू शकणार? आवाजात संयम पाळून चर्चात्मक वादविवाद का नाही करू शकणार?

हल्ली घराघरांत इंग्रजी बोलण्याचे प्रस्थ फार वाढते आहे, ग्लोबल स्मार्टनेसच्या नावाखाली आपण कुठेतरी आपली मातृभाषाच तर रिप्लेस करीत नाही ना, हेही पाहिले पाहिजे. इंग्रजी ही भाषा बोलायला सोपी आहे आणि पटकन आत्मसात करता येते. मराठीवर मात्र त्या मानाने बरेच कष्ट घ्यावे लागतात. चांगली मराठी बोलायला जरा वेळ आणि विचारही लागतो. केवळ जीन्स घालून बाहेर पडणारी स्त्री पटकन तयार होऊ शकते; पण भरजरी कपडे परिधान करून, सर्व दागदागिने घालून बाहेर पडणारी स्त्री तयारीला जरा जास्त वेळ घेणारच. भाषेच्या बाबतीतही आपली मराठी भाषा रचना आणि मांडणीची भरजरी वस्त्रे परिधान करून, तसेच काना, मात्रा, वेलांट्या, उकार यांचे दागदागिने लेऊन समोर येते.

मराठी भाषासुंदरी

अनुस्वारी शुभकुंकुम ते

भाळी सौदामिनी |

प्रश्नचिन्ह ते डुलते झुमके

सुंदर तव कानी |

नाकावरती स्वल्पविरामी

शोभे तव नथनी |

काना-काना गुंफुनी माला

खुलवी तुज मानिनी |

वेलांटीचा पदर शोभतो

तुझीया माथ्याला |

मात्रांचा अन् सुवर्णचाफा

वेणीवर झळकला |

उद्‌गारांचा अवखळ छल्ला

लटके कमरेला |

अवतरणांच्या बटा मनोहर

रुळती गालाला |

उकार शोभे पैंजण झुमझुम

पदकमलांच्या वरी |

पूर्णविरामी तिलोत्तमा ही

बसली मनमंदिरी ॥

ही ‘मराठी भाषासुंदरी’ कविता डोळ्यांसमोर ठेवून काहीही वाचावे, कसेही वाचावे, कितीही वाचावे... ते सुंदरच असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT