Vithu Mauli & Warkari esakal
सप्तरंग

भाषा संवाद : पंढरीच्या राया तुला दृष्ट जाहली।

Language Communication : भाषेमुळे जीवनाशी निगडित असलेला संस्कार जिवंत राहत असतो. माणूस आतून घडत असतो, जेव्हा तो नवी पिढी घडवीत असतो.

सकाळ वृत्तसेवा

लेखिका : तृप्ती चावरे- तिजारे

श्रद्धा, अंधश्रद्धा आणि विज्ञान यांच्या पलीकडे जाऊन मानसशास्त्राचा एक अज्ञात प्रांतही असतो आणि हा प्रांत कवेत घेण्याची ताकद संत साहित्यात नक्कीच आहे. संतांच्या विविध पदातील शब्द म्हणजे केवळ अंधश्रद्धा, असाही काही विज्ञानवादी वाचकांचा ग्रह होऊ शकतो.

त्यांचा ग्रह बदलावा, असा माझा आग्रह नाही. पण, या पदातील अशा अनाकलनीय व गूढ शब्दांच्या खऱ्या अर्थापर्यंत जायची इच्छा असेल तर प्रत्यक्ष त्या परंपरेत जाऊन याचा अनुभव घेणे उचित ठरेल. संत साहित्यातील निष्पाप भाव दाखविणे इतकाच या लेखनामागचा हेतू आहे. (saptarang latest article on Language communication vitthal)

भाषेमुळे जीवनाशी निगडित असलेला संस्कार जिवंत राहत असतो. माणूस आतून घडत असतो, जेव्हा तो नवी पिढी घडवीत असतो. ज्या भाषेमुळे मनातील योग्य- अयोग्य श्रद्धा आकार घेतात, त्याच भाषेमुळे आणि वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सामाजिक विचारसरणीही घडत जाते.

आजही अनेक पुढारलेल्या घरातून लहान बाळाला दृष्ट किंवा नजर लागू नये यासाठी काय करतात? तर बाळाला काजळ किंवा काळी तीट लावतात. आता ही श्रद्धा योग्य की अयोग्य हा इथे प्रश्न नाही; पण पूर्वापर चालत आलेली ती एक कौटुंबिक किंवा वैयक्तिक धारणा आहे, ज्याला आपण ‘बिलीफ सिस्टीम’ असं म्हणतो. काहींना ती पटते, काहींना नाही पटत.

पण, आपल्या बाळाचे निगेटिव्ह एनर्जीपासून रक्षण व्हावे, हे तर प्रत्येक मातेला वाटतेच ना? या वाटण्यातूनच ‘दृष्ट’ या शब्दाला किंवा त्या शब्दमागच्या विचाराला कळत-नकळत महत्त्व दिले जाते, ही भाषेचीच करामत नव्हे का? एखादी गोष्ट श्रद्धा किंवा अंधश्रद्धा यांच्या पलीकडे जाऊन आपण का करतो? हे कोडं न सुटणारं आहे.

नजर लागणे, दृष्ट होणे हेही असंच कोडं... हे कोडं आपण लहानपणापासून ऐकतो आहोत. त्यातलं भलं-बुरं, खरं-खोटं, श्रद्धा, थोतांड हे सगळं तपासात बसण्यापेक्षा त्याकडे आपल्या संत मंडळींनी आपल्या भाषा साहित्याच्या खिडकीतून कसे पाहिले, त्याकडे काही पदांच्या आधारे पाहूया.

पंढरपूरच्या विठोबाची दृष्ट काढण्याची कल्पनाच किती सुंदर आहे, ती साकारताना संत रखमाबाई म्हणतात,

पंढरीच्या राया तुला दृष्ट जाहली ।

ओवाळीते तुला रे देवा संतमंडळी ॥धृ॥

यावरून कळते, की भक्तांच्या उद्धारासाठी साक्षात वैकुंठीचा राणा सगुण साकार रूपाने प्रगट झाला आणि त्याने भक्तांच्या मार्गातील अडथळे दूर केले. म्हणूनच संत रखमाबाईला असे वाटते, की हे सगळे करीत असताना त्या सावळ्या परब्रह्माला मानव देह समजून कुणाची दृष्ट तर झाली नसेल ना? मग ती दृष्ट कुणी काढावी? तर संतांनी.

कारण त्यांचं आणि विठूमाउलीचं नातं जिव्हाळ्याचं ! वास्तविक, तो सावळा आहे, त्याला दृष्ट कशी व्हावी? पण, हीच तर सगुण भक्तीची गंमत आहे. या विठूमाउलीच्या गुणांचा पसाराच इतका अफाट आहे, तिथे रूप, रंग गौण ठरते. जरी तो सावळा असला, तरी त्याला दृष्ट ही होतेच.

ही किती सुंदर कल्पना या पदात केली आहे. समोरचं माणूस जर जिव्हाळ्याचं असेल तर त्याला कुणाची तरी दृष्ट झाली असेल, अशी भावना सहजच कुणाच्याही मनात येऊ शकते. मग ते मातृ हृदय असेल तर आपल्या बाळाच्या रूपात विठूमाउलीचं रूप दिसू लागेल, अशी या पदात भाषेची गंमत आहे. (latest marathi news)

दत्त संप्रदायात कीर्तनकाराचे कीर्तन झाले, की शेवटी त्याची दृष्ट काढण्याची पद्धत आहे. कारण तो कीर्तनकार म्हणजे सद्‍गुरूचेच रूप असते. कथा, कीर्तन करीत असताना त्यालाही श्रम होत असतात, त्या सगुण साकाराला दृष्ट लागू नये, ही शुद्ध आणि सात्त्विक भक्ती-भावना व्यक्त करताना संतश्रेष्ठ भागीरथी आईंच्या शिष्या संत गोदूताई म्हणतात,

दृष्ट उतरा गे तुम्ही साजणी,

सद्‌गुरूसखा पाहूं गे नयनीं ।॥ धृ. ।।

निर्गुण असतां सगुणची झाला,

सर्व जणांचा उद्धार केला ।

भक्तास्तव बहुतची श्रमला,

काय सांगू याची अघटित करणी ।।१।।

अहंकार रावण याने मारिला,

षडरिपूंचा फंदा सोडविला,

काय सांगू सखे तेथे दृष्टावला,

जीवाशिवाची केली हो मिळणी ॥२॥

दया क्षमा शांती, दृष्ट उतरती,

गुरुनामाचा जयजयकार करिती ।

गोदू दासी लोळे भागीरथी चरणी ॥३॥

आपल्यातल्या अहंकाराचा रावण मारून जीवाभावाचा उद्धार करणाऱ्या सद्‍गुरूलाही दृष्ट होऊ शकते आणि ती आपण उतरविली पाहिजे, हा भक्तिभाव किती सुंदर आणि श्रेष्ठ आहे ! दत्त परंपरेत साक्षात सगुण सद्‍गुरू भक्तांना श्रवण घडविण्यासाठी जेव्हा गादीवरून कथा करतात, तेव्हा कथा झाल्यावर शिष्य मंडळी त्यांचीही दृष्ट काढतात. त्या वेळी मी ऐकलेले एक पद येथे लिहावेसे वाटते,

करूनी अकर्ता भासे,

करी भक्तकाज गुरू हा,

दृष्टावला आज गुरू हा, दृष्टावला आज ॥

पंचभूत त्रिगुणांचा केवढा पसारा,

चैतन्याच्या सत्तेवरती, चालविशी सारा,

रोस आणि राज, दृष्टावला आज गुरू हा,

दृष्टावला आज ॥

याच दत्त परंपरेतील एक अतिशय मजेशीर आणि मुखावर हसू आणणारे आणखी एक दृष्ट काढण्याचे पद पाहा,

काढू दे दृष्ट गोविंदा ।

सावळ्या थांब एक क्षण ।

उतरू दे मला लिंबलोण ।।

गोकुळी पार न आनंदा, काढू दे दृष्ट गोविंदा ।

रविशशी टकमक तूज पाहती। सुंदरा बघुनी तूज दीपती ।

हाससी किती मंद-मंद, काढू दे दृष्ट गोविंदा ।।

आपल्या घरातला गोविंद जेव्हा आजाराने कोमेजून जातो, तेव्हा जर वरील पद म्हणून त्याची दृष्ट काढली तर त्याच्या आणि आपल्याही मलूल चेहऱ्यावर नकळत हास्य उमटते की नाही, ते पाहा. खोड्या करणारी लहान मुले अचानक गुमसुम होतात, तेव्हा सगळ्या घराचा उत्साह खाली येतो.

कारण त्या घरातल्या चैतन्यालाच दृष्ट होत असते जणू. मग अशावेळी चूक की बरोबर या वादात पडायचेही भान राहत नाही आणि आईच्या हातात नकळत मीठ-मोहरी येते. अशावेळी आपल्या बाळाप्रती तिच्या मनात काय भाव असतो ते पाहा :

दृष्टावला हा कान्हा || मनमोहन राजस राणा ।।

बाई हासेना बोलेना । कुणी बाई चेटूक केले ।

मुख हे असे का सुकले । ही नजर कुणी उतराना ।।

द्वारी बागुलबुवा बघुनी, भ्याला असे हा यदुराणा ।

वनी जाईना खेळाया । का झपाटला हा कान्हा ॥

किती सुंदर गोजिरवाणा । त्या पाहता दृष्टी पुरेना ।

ओवाळू पंचप्राणा । नच तुलना रूप गुणाला ।।

आता अशा पदातील शब्द म्हणजे केवळ अंधश्रद्धा, असाही काही विज्ञानवादी वाचकांचा ग्रह होऊ शकतो. त्यांचा ग्रह बदलावा, असा माझा आग्रह मुळीच नाही. पण, या पदातील अशा अनाकलनीय व गूढ शब्दांच्या खऱ्या अर्थापर्यंत जायची इच्छा असेल तर प्रत्यक्ष त्या परंपरेत जाऊन याचा अनुभव घेणे उचित ठरेल.

संत साहित्यातील निष्पाप भाव दाखविणे इतकाच आजच्या या लेखनामागचा हेतू आहे. कारण माझी अशी भावना आहे, की श्रद्धा, अंधश्रद्धा आणि विज्ञान यांच्या पलीकडे जाऊन मानसशास्त्राचा एक अज्ञात प्रांतही असतो; आणि हा प्रांत कवेत घेण्याची ताकद संत साहित्यात नक्कीच आहे.

(क्रमशः) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT