NEET Exam esakal
सप्तरंग

NEET Exam : नीट परीक्षा आणि पारदर्शकता

सकाळ वृत्तसेवा

वैद्यकीय प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेत त्रुटी, गैरकारभार आणि निकष डावलून दहावी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा देण्याची मुभा आदी बाबी समोर येणे हे अतिशय धक्कादायक आहे. हे सर्व का आणि कसे घडले? याची मीमांसा होईल; पण तोवर विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीलाच आहे. यापुढे असे प्रकार होऊ नये. यासाठी विशेष खबरदारी आवश्यक आहे. या साऱ्यांचा ऊहापोह... - प्रा. भालचंद्र पाटील, (प्रा. भालचंद्र यशवंतराव पाटील, प्राचार्य व संचालक, यशवंत क्लासेस; सरचिटणीस, नाशिक शहर काँग्रेस.)

(saptarang latest article on NEET Exam)

देशभरातील वैद्यकीय क्षेत्राच्या शैक्षणिक प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात ‘एनटीए’कडून नीट परीक्षा घेतली जाते. यंदा ही परीक्षा झाली आणि ४ जूनला निकाल लागला. काही विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्याचे उघडकीस आले. या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग (उत्तर चुकलं तर गुण कमी होणे) असतानाही पैकीच्या पैकी गुण विद्यार्थ्यांना कसे मिळाले? ‘नीट’ची परीक्षा एकूण ७२० गुणांची असते.

अचूक उत्तरासाठी चार गुण दिले जातात. उत्तर चुकलं तर उत्तरामागे एक गुण कापला जातो. या परीक्षेचा निकाल १४ जूनला लागेल, असं सांगितलं जात असतानाच १० दिवस आधीच म्हणजे ४ जूनला जाहीर झाला. यामुळे निकालात घोळ असावा, असा संशय विद्यार्थी व पालकांना वाटतो.

२०२२ आणि २०२३ चे नीट परीक्षा निकाल पाहिल्यास असे लक्षात येते, की पैकीच्या पैकी गुण मिळविणारे फक्त दोनच विद्यार्थी होते. यंदा पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही तब्बल ६७ एवढी आहे. यातले सहा विद्यार्थी हे हरियानातील झझ्झरच्या एकाच परीक्षा केंद्रावरील आहेत. त्यामुळेच संशय अधिक बळावतो.

‘एनटीए’चा तकलादू दावा

इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळणं हे अशक्य आहे. सर्व प्रश्न सोडविल्यानंतर एक उत्तर जरी चुकले तरी त्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त ७१५ गुण मिळतात. यासंदर्भात ‘एनटीए’ने स्पष्टीकरण दिले, की ज्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वेळेवर देता आली नाही, त्यांचा वेळ वाया गेल्याबद्दल त्यांना ग्रेस गुण देण्यात आले होते.

परीक्षेत कोणताही घोटाळा झालेला नाही, प्रश्नपत्रिकाही फुटलेली नाही असा दावाही ‘एनटीए’ने केला. हा सर्व संशयास्पद कारभार अखेर थेट सर्वोच्च न्यायालयात गेला. परीक्षा रद्द झाली नसली, तरी कठोर निर्णय झाले आहेत. केंद्र सरकारनेही सीबीआय चौकशी करण्याचे जाहीर केले. त्यानुसार, अनेक परीक्षा केंद्रांवर गैरव्यवहार झाल्याचे समोर येत आहे. शिवाय, लाखोंचे आर्थिक व्यवहार झाल्याचेही पुढे येत आहे. यातूनच अनेकांची धरपकड सुरू आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे.

कोणत्याही केंद्राची मुभा संशयास्पद

नीट परीक्षेचे अर्ज हे ऑनलाइन भरले जातात. यंदा मुदतवाढ देऊन हे अर्ज भरण्यास सांगितले गेले. या वाढीव मुदतीमुळे दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी देशभरातून अर्ज केले. विशेष म्हणजे, या परीक्षेसाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे किंवा इयत्ता बारावीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येण्याची अट नव्हती. त्यामुळे दहावी, अकरावी किंवा बारावी अशा कुठल्याही इयत्तेतील विद्यार्थी अर्ज करू शकत होता.

केवळ आधारकार्डचा पुरावा दाखवून हा अर्ज भरला गेला. धक्कादायक बाब म्हणजे, या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना देशभरातील कुठलेही परीक्षा केंद्र निवडता येत होते. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी गुजरात, तर काहींनी चक्क बिहारचे केंद्र निवडले. वास्तविक, विद्यार्थी ज्या शहर किंवा गावाचा रहिवासी आहे, तेथील किंवा त्याच्या जवळपासचे परीक्षा केंद्र देणे आवश्यक होते. मात्र, तसे घडले नाही. अशा प्रकारची ही हलगर्जी जाणूनबुजून केल्याची शंका दाट आहे. (latest marathi news)

पालक, विद्यार्थीही प्रचंड त्रस्त

सीबीआय चौकशी किंवा न्यायालयीन प्रक्रिया हे सारे सुरूच राहील. पण, अजूनही वैद्यकीय प्रवेश सुरू झालेले नाहीत. यामुळे कठोर मेहनतीने आणि प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. यातून हे विद्यार्थी नैराश्येत जाण्याचा मोठा धोका आहे.

या विद्यार्थ्यांचे पालकही प्रचंड त्रस्त आहेत. काही पालक किंवा विद्यार्थी प्रत्यक्ष येऊन किंवा फोनवर जेव्हा माझ्याशी चर्चा करतात, तेव्हा त्यांना कसा धीर द्यावा, असा यक्ष प्रश्न माझ्यासमोर उभा राहतो. परिस्थितीच अशी निर्माण झाली आहे, की वैद्यकीय प्रवेश आणि पुढील नियोजन हे सारेच धूसर दिसते.

सुधारणेला वाव भरपूर; पण

परीक्षेत सुधारणेला आणि पारदर्शकतेला खूप वाव आहे. बारावी इयत्तेत असलेल्या किंवा बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच ही परीक्षा देता येणे सक्तीचे करावे. जेणेकरून पात्र नसलेले विद्यार्थी ही परीक्षा देणार नाहीत. यातून परीक्षार्थींचा फुगवटाही निर्माण होणार नाही आणि विनाकारण स्पर्धाही.

परीक्षार्थी ज्या ठिकाणी राहतो किंवा शिक्षण घेतो, त्याच्या आसपासचे परीक्षा केंद्रच त्याला मिळावे. परराज्यातील परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांना मिळणार नाही, अशी तजवीज करावी. ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेतली तर परीक्षा आटोपल्यावर विद्यार्थ्याला ओएमआर शीट किंवा उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी द्यायला हवी. जेणेकरून विद्यार्थी स्वतःच त्यांच्या उत्तरांचे मूल्यांकन करू शकतील. तसेच, काही प्रश्नांबाबत परीक्षा आयोजकांपुढे विविध बाबी मांडू शकतील.

ऑनलाइनचा गांभीर्याने विचार व्हावा

ऑनलाइन पद्धती (सीबीटी फॉरमॅट)मध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका एनक्रिप्ट केल्या जातात आणि स्वतंत्रपणे जतन केल्या जातात. प्रश्नपत्रिका तयार करणे स्वयंचलित आहे. एक विशाल प्रश्न बँकेचा वापर करून काळजीपूर्वक विकसित आणि कालांतराने वर्गीकरण केले जाते.

एनक्रिप्टेड प्रश्नपत्रिका प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोहोचते आणि जेव्हा उमेदवार त्यावर क्लिक करतो, तेव्हाच ती डिक्रिप्ट केली जाते. म्हणजे या प्रक्रियेत कमालीची पारदर्शकता असल्याचे दिसते. तज्ज्ञही त्याचे समर्थन करतात. त्यामुळे ऑनलाइन परीक्षेबाबतही गांभीर्याने विचार व्हायला हवा. (latest marathi news)

परदेशात जाणारे वाढतील...

मुळात वैद्यकीय शिक्षण हे अत्यंत महागडे झाले आहे. ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी सर्वोत्तम रँकिंग मिळवून सरकारी जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. अनेकाना त्यात यश येते. तर, बहुसंख्य विद्यार्थी हे खासगी कोचिंग, अत्यंत महागडी पुस्तके यांचा आधार घेतात.

बऱ्याचदा आपले शहर सोडून अन्य शहरांत किंवा परराज्यांत हे विद्यार्थी जातात. त्यामुळे या परीक्षेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. केवळ विद्यार्थीच या परीक्षेत गृहित धरून चालत नाही, तर त्यानिमित्त निर्माण झालेले समाजकारण, अर्थकारण हे सारेच समजून घेणे आवश्यक आहे.

म्हणूनच नीट परीक्षेत पारदर्शकता येणे आणि यापुढे अशा प्रकारची हलगर्जी किंवा गैरकारभार होऊ नये, याची खबरदारी संबंधित यंत्रणांनी घेणे अगत्याचे आहे. तसे झाले नाही, तर असेही वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे प्रमाण मोठे आहे.

कायदे होतील, अंमलबजावणीचे काय?

युक्रेन युद्ध सुरू झाले, तेव्हा शेकडो विद्यार्थी तेथून मायदेशी परतले. त्यानिमित्त भारतीय विद्यार्थी परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी का जातात, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. आता परीक्षा आयोजनातच गंभीर त्रुटी समोर आल्याने अनेक विद्यार्थी परदेशाचा विचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच, विद्यार्थ्यांचे भवितव्य गुंतलेला विषय आणि प्रश्नांमध्ये राजकारण करणे योग्य नाही. मात्र, दुर्दैवाने तेही होत असल्याचे सर्वसामान्यांचे मत आहे. ही बाब देशाच्या विकासाला बाधा पोहोचविणारी आहे. परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा करण्याचे बोलले जात आहे. अशा कायद्यांचे स्वागतच आहे.

पण, त्याच्या अंमलबजावणीचे काय? तसेच, कायद्यांचा धाक बाळगून गुन्हे कमी घडतात का? या साऱ्याच बाबींचा सारासार आणि सर्वंकष विचार करणे गरजेचे आहे. केवळ शिक्षण क्षेत्र किंवा परीक्षा एवढ्यापुरता विचार करून काहीच होणार नाही. साकल्याने विचार केला तरच आपल्या हाती काही लागेल आणि पारदर्शकता जपली जाईल. याद्वारेच आपण युवा पिढी संपन्न घडवू शकू, अन्यथा आहेच ‘ये रे माझ्या मागल्या...’ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT