Idols of Shri Vishnu, Lakshmi and Saraswati in Pala style. esakal
सप्तरंग

राजवंश भारती : पाल राजवंश

Marathi Article : गौड वंशाच्या पतनानंतर वंग प्रदेशात जी परिस्थिती निर्माण झाली होती, तिचं वर्णन तत्कालीन साहित्यात ‘मत्स्य न्याय’ असं केलं आहे.

सकाळ वृत्तसेवा

लेखक : ॲड. सुशील अत्रे

गौड वंशाच्या पतनानंतर वंग प्रदेशात जी परिस्थिती निर्माण झाली होती, तिचं वर्णन तत्कालीन साहित्यात ‘मत्स्य न्याय’ असं केलं आहे. मोठा मासा लहान माशाला खातो, तो मत्स्य न्याय. थोडक्यात, बळी तो कान पिळी! अशा वेळी एक अभूतपूर्व गोष्ट घडली. वंगातील काही सुबुद्ध लोकांनी एकत्र येऊन इ. स. ७५० च्या सुमारास ‘गोपाल’ नावाच्या एका कर्तबगार माणसाची राजा म्हणून निवड केली. हा गोपाल कोण, कुठला, त्याचं घराणं कोणतं याची खात्रीलायक माहिती मिळत नाही. (nashik latest article on Pala Dynasty)

गौड राजांच्या पदरी तो होता का, हेही नक्की सांगता येत नाही. पण, ज्या अर्थी एकमेकांशी स्पर्धा करण्याच्या, अंदाधुंदीच्या काळात लोकांनीच त्याला निवडले, त्या अर्थी तो चांगलाच लोकप्रिय असला पाहिजे. गो पालाच्या नावातील ‘पाल’ या शब्दावरून त्याचे घराणे ‘पाल घराणे’ म्हणून ओळखले गेले. पुढे तीच एकप्रकारे उपाधी म्हणून प्रत्येक राजाने वापरली. अशा प्रकारे इ. स. ७५० पासून वंग प्रदेशात पाल राजवटीला सुरवात झाली.

पुढचे दोन राजे, धर्मपाल आणि देवपाल हे पाल घराण्यातील श्रेष्ठ राज्यकर्ते होते. त्यांच्या काळात पाल साम्राज्य बरेच विस्तारले. अविभाजित बृहद् बंगाल, बिहारचा, आसामचा आणि नेपाळचा काही भाग एवढ्या भूप्रदेशावर पाल राजांची सत्ता होती. धर्मपाल आणि देवपाल यांचे समकालीन प्रतिस्पर्धी म्हणजे गुर्जर प्रतिहार आणि राष्ट्रकूट राजे. या तीन सत्तांमधे सतत लढाया सुरू होत्या.

पण, एकूण उत्तर भारतावर पाल वंशाचे वर्चस्व कायम होते. धर्मपालाने कन्नोजचे राज्य ताब्यात घेऊन आपला प्रतिनिधी म्हणून ‘चक्रायुध’ याला गादीवर बसवले. तसा उल्लेख खालिमपूरच्या ताम्रपटावर केलेला आहे. नंतर ८७०-७२ च्या आसपास एकाच वर्षात लागोपाठ तीन राजे झाले. त्यातला ‘विग्रहपाल पहिला' हा राजा झाला खरा; पण त्याने लगेच राजपद सोडून संन्यास घेतला. तेव्हापासून पाल साम्राज्याला उतरती कळा लागली.

विग्रहपालाचा मुलगा नारायणपाल चांगली ५५ वर्षे गादीवर होता. पण तो अगदी दुर्बल राजा होता. तसेच पुढचे काही राजे होते. ही परिस्थिती सुमारे १०० वर्षे तशीच होती. इ. स. ९७७ च्या सुमारास ‘महिपाल’ गादीवर आला. त्याने पाल वंशाला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून दिली. बलाढ्य चोल साम्राज्याच्या राजेंद्र चोलाच्या आक्रमणाला महिपालाने समर्थपणे तोंड दिले. थेट काशीपर्यंत त्याने आपला अंमल बसवला होता. (latest marathi news)

सोमपूर बुद्धविहार, पहाडपूर

त्याच्यानंतर साम्राज्याला पुन्हा वाईट दिवस आले. दुसऱ्या महिपालाच्या कारकीर्दीत वरेंद्र या प्रदेशात सम्राटाविरुद्ध मोठे बंड झाले. तिथला कैवर्त समाजाचा एक नायक दिव्यक याने या बंडाचे नेतृत्व केले. ते यशस्वीही झाले. सुमारे ५० वर्षे वरेंद्र स्वतंत्र होते. नंतर इ. स. १०७५ च्या आसपास ‘रामपाल’ या राजाने हे बंड मोडून काढले आणि राज्य पुन्हा सावरले.

ही बंडाची कहाणी आपल्याला कळते, ती एका काव्यातून. रामपालाच्या दरबारात संध्याकर नंदी या नावाचा एक कवी होता. त्याने ‘रामचरितम्’ नावाचे मोठे काव्य रचले. त्याची गंमत अशी, की भगवान श्रीरामाचे चरित्र सांगण्याच्या मिषाने त्याने रूपकात्मक पद्धतीने आपला राजा रामपाल याचे चरित्र सांगितले आहे. या काव्यात कैवर्त बंडाची सगळी हकिगत दिलेली आहे. रामपाल हा पाल वंशातला अखेरचा कर्तृत्ववान राजा.

त्याच्यानंतरचे राजे अगदीच नामधारी होते. पाल वंशात एकूण २२ राजे होऊन गेले. (एका राजाचे नाव चक्क ‘राज्यपाल’ होते!) अखेरचा राजा ‘पालपाल’ होता. काही अभ्यासकांच्या मते २१ वा गोविंदपाल हाच शेवटचा राजा होता. ते मत गृहित धरले, तर पाल वंश सन ११६०-६१ च्या सुमारासच संपला. पालपालाला वंशात धरले, तर सन ११९९-१२०० पर्यंत पाल वंश सुरू होता.

पाल राजे प्रामुख्याने महायान बौद्ध मतवादी होते. सम्राट अशोकानंतर उतरती कळा लागलेल्या बौद्ध धर्माला पाल राजांनी राजाश्रय दिला. अनेक बुद्धविहार त्यांच्या काळात उभे राहिले. नालंदा विद्यापीठाला पाल राजांनी भरघोस देणग्या दिल्या. तेवढेच नव्हे, तर धर्मपालाने, नालंदाची गुणवत्ता घसरते आहे असे बघून विक्रमशिला इथे नवे विद्यापीठ उभारले.

अनेक बौद्ध भिक्ख्खूंना विद्यावृत्ती देऊन थेट तिबेटमधे धर्मप्रसारासाठी पाठवले. पहाडपूर (सध्या बांगलादेशात) इथे उत्खननात सापडलेला ‘सोमपूर बुद्धविहार’ हा पण धर्मपालानेच उभारला होता. पण, या जोडीने पाल राजांनी हिंदू धर्मालाही आश्रय दिला होता. नारायणपाल याचा भागलपूरचा शिलालेख दर्शवतो, की त्याने अनेक शिवमंदिरे बांधली.

सारनाथच्या एका बुद्धविहाराचे नूतनीकरण करताना पाल राजांनी कोरलेला लेख सांगतो, की शंकर व इतर देवतांची शेकडो मंदिरे महिपालाने वाराणशीमध्ये बांधली आहेत. भगवान विष्णू, देवी यांच्या अनेक अप्रतिम मूर्ती पाल राजवटीत घडवल्या गेल्या आहेत. जवळजवळ ४००-४५० वर्षांचा कालखंड गाजवणाऱ्या पाल वंशाची जागा नंतरच्या ‘सेन’ वंशाने घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

वर्तुळ पूर्ण! Tim Southee ची कसोटी मधून निवृत्ती; ज्या संघाविरुद्ध पदार्पण, त्यांच्याविरुद्धच शेवटचा सामना

Latest Maharashtra News Updates : पवारांसोबत जाण्याची वेळ येणार नाही, महायुतीला बहुमत मिळेल-एकनाथ शिंदे

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

SCROLL FOR NEXT