Rani Ki Vav... Patan. esakal
सप्तरंग

राजवंश भारती : सोळंकी राजवंश

Solanki Dynasty : वसिष्ठ ऋषींनी अबू पर्वतावर प्रज्वलित केलेल्या अग्निकुंडातून चार वंश उत्पन्न झाले, अशी लोककथा आहे.

सकाळ वृत्तसेवा

लेखक : ॲड. सुशील अत्रे

वसिष्ठ ऋषींनी अबू पर्वतावर प्रज्वलित केलेल्या अग्निकुंडातून चार वंश उत्पन्न झाले, अशी लोककथा आहे. हे चार वंश ‘राजपूत अग्निकुल’ मानले जातात. यांच्यापैकी एक वंश ‘चौलुक्य’ या नावाचा आहे (चालुक्य नव्हे). प्रचलित बोलीभाषेत त्यांनाच ‘सोळंकी’ किंवा ‘सोलंकी’ म्हणून ओळखतात. आजचे गुजरात राज्य, हा त्यांचा मुख्य राज्य प्रदेश होता. अनहिलवाड म्हणजे आजचे ‘पाटण’ ही त्यांची राजधानी. ( latest article on Solanki Dynasty )

‘चावडा’ या वंशातील एक राजा सामंतसिंह याचा भाचा आणि सेनापती असलेला ‘मूलराज’ हा सोळंकी राजघराण्याचा संस्थापक आहे. त्याने इ. स. ९४० मध्ये स्वतंत्र राज्य स्थापन केले. त्याचा मुलगा चामुण्डराज याचा ‘वडासमा’ या गावात सापडलेला ताम्रपट असे दर्शवितो की मूलराज हा ‘व्याळकांची प्रभू’ या पौराणिक राजाचा वंशज आहे. १४ व्या शतकातील विद्वान जयसिंह सूरी याच्या ‘कुमारपाल भूपाल चरित्र महाकाव्यम्’ या ग्रंथातही सोळंकी वंशाचे पौराणिक लागेबांधे वर्णन केले आहेत.

त्यानुसार तेव्हाचे छोटे राज्य ‘मधुपद्म’ या ठिकाणी होते. वा. वि. मिराशींच्या मते हे ठिकाण बेतवा नदीची उपनदी महुअरच्या किनारी असावे. या चामुण्डराजाचा नातू, पहिला भीमदेव, सन १०२२ मध्ये गादीवर आला. त्याची कारकीर्द जवळजवळ ४० वर्षांची आहे. त्याच्या कारकीर्दीतील सर्वांत महत्त्वाची (पण दुर्दैवी) घटना म्हणजे गझनीच्या महमूदाचे सोमनाथ मंदिरावर आक्रमण! सन १०२४ मध्ये त्याने सौराष्ट्रावर आक्रमण सुरू केले आणि १०२६ च्या जानेवारीत महमूदने सोमनाथ मंदिर लुटले, तोडले.

खेदाची गोष्ट म्हणजे महमूद चालून येतोय, हे समजल्यावर भीमदेव राजधानी वाऱ्यावर सोडून पळून गेला, आणि त्याने कंठकोट या ठिकाणी आश्रय घेतला. महमूद मनसोक्त लूटमार करून परत गेला, त्यानंतरच भीम राजधानीत परतला. नंतर त्याने भारतातील इतर काही राजांशी लढाया केल्या; पण मूर्तिभंजक महमूदाला तोंड देण्याची, धडा शिकवण्याची हिंमत कधीच दाखवली नाही. ही झाली त्याची नकारात्मक बाजू. त्या जोडीने त्याच्या कारकीर्दीत झालेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतातील तीन ऐतिहासिक वास्तूंची उभारणी.

उद्‌ध्वस्त सोमनाथ मंदिर... दीडशे वर्षांपूर्वीचे छायाचित्र.

महमूद परतल्यावर काही दिवसांतच भीमाने मोढेरा या ठिकाणी भव्य सूर्यमंदिर बांधले. तसेच, भीमाचा मंत्री विमल शाह याने देलवाडा या ठिकाणी जैन मंदिरे बांधली. हे जैन मंदिर संकुल तसे खूपच मोठे आहे. त्याचे काम पुढे अनेक वर्षे चालले. पण, त्यातील आद्य मंदिरे भीमाच्या कारकीर्दीत उभारली आहेत. तिसरी वास्तू ही भीमदेवाची राणी उदयमती हिने उभारली. तिला ‘रानी की वाव’ अर्थात राणीची विहीर म्हणतात. ती बांधून पूर्ण झाली, तोपर्यंत भीमदेवाचा मृत्यू झाला होता. जैन मुनी मेरुतुंगाच्या ‘प्रबंध चिंतामणी’ या सन १३०४ मधील ग्रंथात या पायरी-विहिरीचा सविस्तर उल्लेख आहे.

अकराव्या शतकातील या तिन्ही वास्तू आजही उभ्या आहेत आणि प्राचीन भारताच्या अजोड वास्तुकलेचा वारसा जगाला दर्शवितात. या वंशातील जयसिंह सिद्धराज याने सोळंकी घराण्याचे नाव उज्ज्वल केले. तो बालवयातच गादीवर बसला. त्याची आई मयनल्लादेवी ही त्याची मुखत्यार म्हणून काही वर्षे राज्यकारभार करीत होती. नंतर सज्ञान झाल्यावर त्याने कारभार स्वत:कडे घेतला. त्याने ‘सिद्धराज’ ही पदवी आपल्या नावापुढे लावली. जयसिंह हा परमार भोजाप्रमाणेच शूर, रसज्ञ, विद्वान असा राजा होता. प्रसिद्ध जैन तत्त्वज्ञ, विद्वान हेमचंद्र हा जयसिंहाच्या दरबारात होता.

त्याचा उत्तराधिकारी, कुमारपाल हा एक दासीपुत्र होता. तो राजा होणार, असे दैवी भाकित होते म्हणतात. त्यामुळे जयसिंह त्याचा द्वेष करीत होता. त्या धास्तीने कुमारपाल बरीच वर्षे विजनवासात लपून राहिला‌. जयसिंहचे निधन झाल्यार तो मातब्बर जैन श्रेष्ठींच्या आणि जैन मुनींच्या मदतीने गादीवर आला. हेमचंद्र पंडितही त्याचा सहाय्यकर्ता होता. हेमचंद्र कुमारपालाच्याही दरबारी होता. तेव्हा तर तो ‘राजगुरू’च्याच भूमिकेत होता. कुमारपालाने उत्तर आयुष्यात हेमचंद्राकडून जैन धर्माची दीक्षा घेतली. त्या प्रभावामुळे त्याने आपल्या राज्यात पशुहत्येला बंदी घातली होती. (latest marathi news)

सन ११७६ मध्ये अनहिलवाडच्या गादीवर मूलराज-२ किंवा ‘बाल मूलराज’ हा अज्ञान मुलगा बसला. त्याची आई, कदंब घराण्यातील ‘नायकीदेवी’ ही त्याच्या वतीने कारभार करीत होती. याच सुमारास महंमद घोरीने सौराष्ट्रावर आक्रमण केले. त्या वेळी सोळंकी सेनेचे नेतृत्व नायकीदेवीने केले, आणि अबू पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गदरघट्ट (कासाहराड)च्या लढाईत महंमद घोरीला अक्षरश: पळता भुई थोडी केली. तो जखमी अवस्थेत कसाबसा गझनीला परत गेला. बाल मूलराज फारच अल्पवयात मृत्युमुखी पडला.

त्याचा भाऊ भीम-२ सन ११७८ मध्ये राजपदावर आला. त्याची कारकीर्द बंडाळ्या मोडण्यातच गेली. भीमाचा सेनापती लवणप्रसाद आणि त्याचा मुलगा वीरधवल या दोघांवरच त्याची सारी मदार होती. सन ११९७ मध्ये महंमद घोरीचा गुलाम सेनापती कुतुबुद्दिन ऐबक याने अबू पर्वताच्या पायथ्याशी, त्याच ठिकाणी सोळंकी राजवटीचा धुव्वा उडविला. राजधानी अनहिलवाड बेचिराख केली आणि आपल्या मालकाच्या पराभवाचा सूड घेतला.

तो परत गेल्यावरही भीम-२ गादीवर होता; पण सोळंकी वंशाचा दबदबा संपला होता. लवणप्रसाद आणि वीरधवल यांनीच खरी सत्ता ताब्यात घेतली. त्यांनी स्वत:च्या ‘वाघेल’ घराण्याची राजवट सुरू केली. भीमानंतर त्याचा भाऊ त्रिभुवनपाल काही वर्षे नामधारी राजा होता. तो सोळंकी घराण्याचा अखेरचा राजा. सन १२४४ मध्ये त्याच्या मृत्यूनंतर चौलुक्य वंश संपला. त्याची जागा वाघेल वंशाने घेतली.(latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT