netaji subhashchandra bose sakal
सप्तरंग

नेताजींचं महानिर्वाण ऐतिहासिक सत्य आणि बाजारू कथा!

एका लष्करी इस्पितळात उपचार घेताना नेताजी सुभाषचंद्र नामक आझादीच्या महासंग्रामातील एक आघाडीचा तारा निखळून पडला. त्या घटनेनं देशवासीयांना जबरदस्त धक्का बसला.

सकाळ वृत्तसेवा

- विश्वास पाटील, authorvishwaspatil@gmail.com

दुःखद आणि दुर्दैवी अशा त्या प्रसंगाला आता ७९ वर्षे उलटून गेली. देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विमानाला १९४५ मध्ये १८ ऑगस्ट रोजी फार्मोसा बेटावरील ताईहोकू (आजचे ताईपेई) इथं मुत्सुयामा विमानतळावर दुपारी अडीचच्या सुमारास भीषण अपघात झाला.

त्याच दिवशी एका लष्करी इस्पितळात उपचार घेताना नेताजी सुभाषचंद्र नामक आझादीच्या महासंग्रामातील एक आघाडीचा तारा निखळून पडला. त्या घटनेनं देशवासीयांना जबरदस्त धक्का बसला. आता नुकतेच नेताजींचे नातू चंद्रा बोस यांनी सुभाषचंद्रांच्या जपानमध्ये ठेवलेल्या अस्थी सन्मानानं भारतात आणावयाची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

‘महानायक’ कादंबरीच्या निमित्तानं मी सलग सात वर्षे अहोरात्र केलेला अभ्यास, जगभरातील अनेक देशांना दिलेल्या भेटी, नेताजींच्या मंत्रिमंडळातील जवळपास अर्ध्या मंत्रिमंडळास भेटण्याचं मला लाभलेलं भाग्य, या साऱ्या अभ्यासाच्या निमित्तानं माझी निश्चित काही मते बनलेली आहेत.

आजवर काश्मीरपासून रामेश्वरापर्यंत फक्त एकदोन बाबा-बुवांनी नव्हे तर एकूण ५२ हून अधिक साधू व बैराग्यांनी आपणच सुभाषचंद्र असल्याचा वेळोवेळी ‘क्लेम’ केलेला आहे. पण नेताजींच्या व्यक्तिमत्त्वाच्या सखोल अभ्यासाअंती मला निश्चितच असे वाटते, की सुभाषचंद्र हे जन्मजात अग्निपुत्र होते!

अखंड संघर्ष हा त्यांचा स्थायिभाव. त्यामुळंच ते काँग्रेस अंतर्गत गांधी-नेहरूंशीही भांडले. ब्रिटिश साम्राज्याशी तर त्यांचे असे कडवे वैर होते, की अनेक इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांची नोंद ‘आमच्या साम्राज्याचा एक नंबरचा शत्रू’ अशी केलेली आहे.

आपल्या देशातील दुःख, दैन्य आणि मागासलेपण पाहून नेताजींचं सर्वांग पेटून उठायचं. त्यामुळंच समजा ते जिवंत असते अन् या देशात त्यांनी पदार्पण केलं असतं, तर इथलं दुःख आणि विषमता पाहून ते एक क्षणभरही स्वस्थ बसले नसते. कोणा ‘गुमनामी साधू’च्या जीर्ण कफनीमध्ये वर्षानुवर्ष स्वस्थ बसून राहणं ही गोष्ट तर त्यांच्या बाबत घडूच शकत नाही.

आरंभी सुभाषचंद्रांच्या अपघाती निधनावर महात्मा गांधीजींचा सुद्धा विश्वास नव्हता. परंतु नेताजींच्या विमानात त्यांच्या सोबत प्रवास करणारे त्यांचे निकटतम सहकारी कर्नल हबिबुर रेहमान हे गांधीजींना दिल्लीमध्ये भेटले. त्यांच्याशी झालेल्या सखोल चर्चेनंतर गांधीजींची सुद्धा नेताजींच्या मृत्यूबाबत खात्री झाली होती.

नेताजी सुभाषचंद्रांचं जीवन हीच मुळी एक अमर कथा. ‘आय.सी.एस’चा त्याग करून विशी-बाविशीतच स्वतःला राष्ट्रीय चळवळीत झोकून देणारा त्यागी नेता. दोन वेळा काँग्रेसचं अध्यक्षपद, गांधीजींशी संघर्ष, त्यातून महात्माजींनीच त्यांची पक्षातून हकालपट्टी करणं, दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांच्या हातावर तुरी देऊन त्यांनी जर्मनीकडं केलेलं पलायन, हिटलरशी समेटाचा त्यांचा प्रयत्न, त्यानंतर पाणबुडीतून पूर्वेकडे केलेला साठ-सत्तर दिवसांचा जीवघेणा प्रवास, जपानसारख्या राष्ट्रानं त्यांना केलेली प्रचंड मदत व आझाद हिंद फौज आणि दुसऱ्या महायुद्धातला त्यांचा सहभाग, एखाद्या कादंबरीच्या धीरोदात्त महानायकाला शोभेल असाच त्यांच्या विराट संघर्षमय जीवनाचा तो एक लखलखता आराखडा होता.

या वादग्रस्त विमान अपघातामागची खरी कथा तरी काय ? मे-जून १९४४ मध्ये इम्फाळ आणि कोहिमाच्या लढाईत जपानी फौजेचा आणि त्यांच्या सोबत आझाद हिंद फौजेचा दारुण पराभव झाला होता. जपाननं नेताजींच्या आग्रहाला बळी पडून त्यांच्या ‘इम्पारू’ (इम्फाळ) मोहिमेत तीन डिव्हिजन म्हणजेच साठ हजारांचं लष्कर उतरवलं होतं.

युद्धाची धुमश्चक्री, नेहमीपेक्षा एक महिना आधी ओढवलेला पावसाळा, ब्रह्मदेशमार्गे घेतलेली माघार, त्यामध्ये सुमारे पस्तीस हजार जपानी सैनिक मृत्युमुखी पडले होते. एका अर्थी निसर्गानं आणि दैवगतीनंच त्यांच्या महान कार्याला खोडा घातला होता.

१९४५ च्या ऑगस्ट या एकाच महिन्यात झपाट्यानं बदलेली युद्धाची परिस्थिती. ६ ऑगस्ट १९४५ ला अमेरिकेनं बी-२९ विमानातून हिरोशिमावर अणुबॉम्ब फेकला. ज्यामुळं १३ चौरस मीटरचा परिसर भाजून काढला गेला. पाठोपाठ आणखी एका अणुबॉम्बनं नागासाकी विभाग जवळपास बेचिराख केला. तो प्रचंड आणीबाणीचा काळोखी कालखंड होता.

१५ ऑगस्ट १९४५ हा दिवस जपानसाठी सर्वांत काळाकुट्ट दिवस ! त्या दिवशी जपाननं अमेरिकन फौजांपुढे शरणागती पत्करली. जेव्हा जपान शरण आल्याची बातमी कोणीतरी धावत येऊन नेताजींना सांगितली, तेव्हा ‘‘जपाननं स्वीकारली असेल शरणागती मी नाही. दिल्लीस जाणारे हजार रस्ते आहेत.’’ असं बाणेदार उत्तर नेताजींनी त्या दारुण परिस्थितीतही दिलं होतं. लवकरच नेताजींना युद्धगुन्हेगार म्हणून शत्रुराष्ट्रांकडून अटक होण्याची शक्यता होती.

१६ ऑगस्टला सिंगापूरहून दोन विमानांनी नेताजी व त्यांचे सहकारी बँकॉककडं जाऊन पोचले. जवळच दालत येथे जपानी इम्पेरियल आर्मीचा तळ होता. त्याचे प्रमुख फिल्डमार्शल तेराउची ही बडी आसामी नेताजींची निकटतम मित्र होती. तिथंच जपानची संपूर्ण हवाई यंत्रणा शत्रूच्या ताब्यात गेल्याची दुर्दैवी खबर नेताजींना मिळाली. त्यांच्या पुढील प्रवासासाठी सायगावच्या विमानतळावर एकही बॉम्बर विमान शिल्लक नव्हतं.

सुदैवाने त्याच दिवशी सायंकाळी जनरल शिडेई यांना घेऊन एक बॉम्बर विमान मांचुरियाला जाणार होतं. तिथं डेरेन इथं शिडेई जपान सरकार मार्फत रशियन फौजांपुढं शरणागतीच्या कागदपत्रांवर सह्या करणार होते. ते इंग्रजी आणि रशियन उत्तम जाणत होते. शरणागती वेळी ते नेताजींचा रशियन अधिकाऱ्यांशी परिचय करून देऊन त्यांना अधिक मदत करू शकतील असे तेराउचींना वाटलं.

त्या धगधगत्या युद्धकालीन प्रवासात त्या दिवशी नेताजींच्या पोटात दिवसभरात फक्त एक पेला दूध गेलं होतं. जेवायलाही उसंत नव्हती. १७ ऑगस्टला सायगावहून ते ९७-२ सॅली बॉम्बर जातीचं विमान निघालं. ज्यामध्ये १४ प्रवासी होते. विमानात अधिक जागा नसल्यानं नेताजींचे सहकारी हबीबुर रहेमानांसाठी कशीबशी एक जागा उपलब्ध करण्यात आली.

मिस्तुबिशी या जगप्रसिद्ध जपानी कंपनीनं बनविलेले ते दोन इंजिनांचे बॉम्बर विमान होते. नाकाडापासून ते शेपटीपर्यंत त्याची लांबी सोळा मीटर होती. जपान्यांनी या आधी दुसऱ्या महायुद्धाच्या धुमश्चक्रीत अनेकदा वापरलेले ते उत्तम प्रतीचं विमान समजलं जात होतं. दुर्दैवाने तीनच दिवसांपूर्वी सिंगापूरला विमानाचा एक पंखा निखळून पडला होता. तो बदलणं आवश्यक होतं. परंतु घाईमध्ये तो फक्त ठोकून बसवलेला होता.

मांचुरियापर्यंतच्या त्या दीर्घ हवाई प्रवासात १७ ऑगस्टच्या रात्री टुरेन नावाच्या छोट्या विमानतळावर मुक्काम करायचं ठरलं. नेताजींनी कशीबशी फक्त दोन तासांची झोप घेतली. १८ ऑगस्टला भल्या पहाटे उठून त्यांनी गीतापठण केले. विमानतळावर बॉम्बरच्या टायरला किंचित बाक आल्यासारखे वाटले.

त्यामुळे विमानातील बारा मशिनगन्स, दारूगोळा आणि काडतुसांचे पट्टे उतरवून बॉम्बरवरचा भार थोडा हलका करण्यात आला. इंधन कमी पडू नये म्हणून गॅसोलिननं भरलेले दोन फुगे आत प्रवाशांजवळच टांगून ठेवलेले होते.

बॉम्बर विमान चार हजार मीटर उंचीवरून चालल्याने आत खूप थंडी वाजत होती. रेडिओवर रशियन फौजा डेरेनकडे सरकत असल्याच्या बातम्या ऐकायला मिळाल्या. ताईपेईत पोचायला दुपारचे दीड वाजून गेले होते. इथे टर्मिनल म्हणून तात्पुरत्या उभारलेल्या तंबूत नेताजींनी फक्त दोन केळी खाल्ली. विमानात थंडी वाजत असल्यानं हबीबुरकडून आपल्या सामानातील जांभळे स्पंजचे जाकिट मागून घेतले. त्याच्यावर चामड्याचा पट्टा घट्ट बांधून घेतला.

या चौदा प्रवाशांपैकी दोघांना मी जपानमध्ये १९९६ मध्ये भेटलो आहे. विविध डॉक्युमेंट्स, मुलाखती आणि पुराव्यातूनही अनेक गोष्टी सिद्ध होतात. १८ ऑगस्टला दुपारी २.३० वाजता या विमानानं ताईपेईच्या धावपट्टीवरून अवकाशाकडं झेप घेतली. साधारण वीस ते पंचवीस मीटर उंच अंतरावर विमान झेपावले असेल नसेल तोच पाण्याच्या प्रचंड लाटेवरून एखादी बोट पुढे सरकत डळमळावी असा भास झाला. पाठोपाठ कानठळ्या बसवणारा स्फोटासारखा आवाज आला. सारे जण नखशिखांत गोठून गेले.

पाचशे किलो वजनाचे एक इंजिन पाठोपाठ स्वतःभोवती गरगरत खाली कोसळले. विमानानं हवेतच पेट घेतला. ते नाकाडावर कोलमडून पडलं. लागलीच विमानाभोवती चौफेर आग भडकली. आत टांगून ठेवलेले ते गॅसोलिनचे फुगे फुटले. नेताजींच्या स्पंजच्या जाकिटनं तर खूप इंधन शोषून घेतलं. वस्त्रांनी पेट घेतल्याच्या स्थितीत नेताजींनी पाठीमागचा दरवाजा उघडायचा प्रयत्न केला.

पण तो जाम झाल्यानं त्यांना पुढच्या दरवाजानं हवेतच धैर्याने उडी टाकावी लागली. तेव्हा त्यांचे सर्वांग व विशेषतः छातीचा भाग स्पंजच्या जाकिटामुळं खूप भाजून निघाला. त्या सायंकाळी व रात्री जवळच्या नॉनमोन लष्करी इस्पितळात डॉ. योशिमी, डॉ. इशी आणि डॉ. स्तुरुता यांनी नेताजींना वाचवायचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवानं त्याच रात्री त्यांचं महानिर्वाण झालं. अनेकांच्या आयुष्याला सोन्याचा मुलामा देणारा ''महानायक'' काळानं हिरावून नेला.

त्या विमान अपघातात नेताजी खरेच ठार झाले किंवा कसे, या विषयाची आपल्या देशात मागणी होण्याआधीच आपल्या शत्रूंनी त्याबाबत सखोल तपास केल्याचं ऐतिहासिक दस्तऐवजावरून आढळून येतं. ब्रिटिश सरकारमार्फत लॉर्ड माउंटबॅटननं सुप्रिम कमांडर साउथ ईस्ट एशिया असताना एक गुप्त कमिशन नेमून खातरजमा केली होती. नेताजी सुभाषचंद्रांच्या अस्तित्वाच्या कल्पनेनं तेव्हाच्या अमेरिकन सेनानी मॅकार्थरलाही पछाडलं होतं. त्यानंही टोकियोचा ताबा घेतानाच या प्रकरणाचा कसून शोध घेतला होता.

नेताजींचा मृत्यू हा या देशात वादाचा मुद्दा बनण्यापूर्वीच १९५०-५१ मध्ये स्वतः पंडित नेहरूंनी सुद्धा या प्रकरणाची खूप बारकाईनं गुप्त चौकशी केली होती. नेताजींच्या आझाद हिंद सरकारमधील प्रचारमंत्री एस. ए. अय्यर यांना पूर्व आशियामध्ये चौकशीच्या खास कामगिरीवर पाठवून दिलं होतं. त्यांनीही काही महिने पूर्व आशियात राहून आपला एक गुप्त अहवाल नेहरू यांना सादर केला होता. त्यामध्ये सुद्धा नेताजी विमान अपघातात मृत पावल्याचं अनुमान काढलं गेलं होतं. या अहवालाची प्रत मी दिल्लीच्या तीन मूर्ती भवनमधील ग्रंथालयात स्वतः अभ्यासली आहे.

पहिला १९५५ च्या दरम्यानचा शाहनवाज खान आयोग, १९७० मध्ये नेमलेले निवृत्त न्यायाधीश जी. डी. खोसला यांचं कमिशन तर २००५ मध्ये माजी न्यायमूर्ती मुखर्जी या तिन्ही आयोगांनी विविध अंगांनी या प्रकरणाची चौकशी केली होती. मुखर्जी आयोगानं तर जपानच्या रेंकोजी मंदिरात ठेवलेल्या रक्षेची डीएनए चाचणी करायची शिफारस केली होती.

त्यांच्या विमान अपघाता वेळेचा महत्त्वाचा कळीचा मुद्दा म्हणजे सुभाषचंद्रांच्या नावे मृत्यूचा दाखला दिला गेला नव्हता. तो दाखला इचिरो ओकुरा या जपानी सैनिकाच्या नावं दिलेला आहे.

वास्तविक पाहता ही घटना कोणत्या दुर्दैवी कालखंडात घडली होती, याची लोक दखलच घेत नाहीत. अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी या जपानच्या दोन मोठ्या शहरांवर अणुबॉम्ब टाकल्याच्या घटनेला दहा दिवसही उलटले नव्हते. टोकिओतले प्रशासन तेव्हा पूर्णतः कोलमडून पडले होते. आता त्या घटनेचा फायदा घेऊन मसालेदार, खपाऊ, बेस्ट सेलर लिहिणारी मंडळी तो मृतदेह कोणा इचिरो ओकुराचाच होता, या मतापर्यंत वाचकांना हट्टाने नेऊ पाहतात.

पण खूप आधी म्हणजे २४ जुलै १९५६ च्या पत्रानं जपानी गायमुशोने (परराष्ट्र मंत्रालयाने) भारताच्या जपानमधील दूतावासाला लिहिलेल्या पत्रात, ऑगस्ट १९४५ मध्ये नेताजींचा दुर्दैवी अंत झाला होता. तसेच गोपनीयतेच्या दृष्टीने तेव्हा बोस यांच्या मृत्यूचा दाखला इचिरो ओकुरा या बनावट नावानं मुद्दाम दिला असल्याचं स्पष्ट केलं आहे. बरं इचिरो ओकुरा हे नाव १९५६ मध्ये अचानक आले का?

आता भारत सरकारच्या उपलब्ध कागदपत्रानुसार या बाबत खुद्द पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेलं एक इंग्रजी टिपण खूप महत्त्वाचे ठरते. त्याची तारीख २६ /०९ /१९५१ असून त्या इंग्रजी टंकलिखित नोटवर नेहरूंची स्वाक्षरी सुद्धा आहे. त्या नुसार एस. ए. अय्यर यांनी नेहरूंना भेटून अपघातात सुभाषचंद्रांचा निःसंशय मृत्यू झाल्याची माहिती दिली होती.

'I am inclined to think that it would be desirable to issue some statement or to make it in parliament. On the other hand, this may lead to some controversy, possibly even with Subhas Chandra Bose''s family' म्हणजे सदरची गोष्ट १९५१ मध्येच संसदेसमोर मांडून तिची कल्पना सुभाषबाबूंच्या कुटुंबीयांना द्यावी, अन्यथा याबाबत भविष्यात वादंग निर्माण होऊ शकतो, अशी भीती स्वतः नेहरूंनी लेखी स्वरूपात व्यक्त केली होती.

मात्र त्यांच्या कार्यालयातील एस. दत्त या अधिकाऱ्याने त्याच कागदावर एक तळटीप लिहिली अन् नेताजींचे अंत्यसंस्कार २० ऑगस्ट १९४५ ला, की २२ ऑगस्टला असा दोन दिवसांच्या तफावतीचा कारकुनी मुद्दा उपस्थित करून सुभाषबाबूंच्या मृत्यूबाबत जाहीर प्रगटन देशापुढं करावं, या नेहरूंच्या विचाराला बगल दिली.

तेव्हा म्हणजे १९५१ मध्ये नेताजींचा मृत्यू हा वादाचा मुद्दा बनला नव्हता. किंवा त्याबाबत एखादा चौकशी अहवालही नेमला गेला नव्हता. नेहरूंनी त्याचवेळी व्यक्त केलेल्या मतानुसार तेव्हाच साऱ्या गोष्टी संसदेच्या पटलावर मांडल्या असत्या, तर पुढचे सारे वादंग टळले असते.

आरंभी नेताजींचा अपघाती मृत्यू त्यांच्या पत्नीला, एमिली शंकेलना मान्य नव्हता. ही गोष्ट खरी. परंतु नेताजींच्या मृत्यूबाबत पुढं नवे पुरावे मिळत गेल्यावर त्यांचंही मत बदललं. युद्धकालीन गोंधळामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा घ्यायचा. तो विमान अपघात झालाच नाही असं चित्र निर्माण करायचं. कोणा गुमनामी बाबाच्या जागी नेताजींना धरायचं आणि आपली पुस्तकं बेस्ट सेलर बनवण्याचा अलिकडं उद्योगच बनला आहे. हा नेताजींच्या द्रोहाचाच प्रकार असल्याचे नेताजींच्या खऱ्या चाहत्यांना वाटते.

नेताजींच्या कन्या अनिता पाफ यांच्या हस्ते २००१ मध्ये माझ्या ''महानायक'' च्या गुजराती आवृत्तीचे प्रकाशन झाले. त्यांनी तेव्हाही आपल्या पित्याचं त्या विमान अपघातात दुर्दैवाने निधन झाल्याचे मुंबईत अनेकांना सांगितले होते.

१९९६ मध्ये मी व तेव्हाचे जपानमधील उपउच्चायुक्त ज्ञानेश्वर मुळे आम्ही दोघांनीही रेंकोजी मंदिराला भेट दिली होती.

मुखर्जी कमिशननं दुर्दैवाने चौकशीच्या निमित्तानं अनेक बुवा आणि बाबांनाही महत्त्व दिले. उत्तर भारतात अयोध्या-फैजाबादकडे वावरणारे गुमनामी बाबा हे जात्याच हुशार आणि बनेल गृहस्थ असावेत. त्यांनी या आधी नेताजींबाबत जेवढी पुस्तके, लेख प्रकाशित झाले होते. तेवढे खूप बारकाईने वाचून अंगात मुरवलेही होते. त्यामुळेच आपण सुभाषबाबूच असल्याचा ते धमाल देखावा निर्माण करत.

हिटलरला व्हायोलिन वाजवण्यात स्वारस्य होते, अशी लोणकढी थाप ते मारत. वास्तविक तेराचौदा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नेताजींची हिटलरशी २८ मे १९४२ या दिवशी रास्तेनबर्ग जवळच्या लष्करी ठाण्यावर भेट घडून आली होती. तीही कशीबशी तासभर. त्या पार्श्वभूमीवर गुमनामी बाबांच्या हिटलरबाबतच्या थापा या मनोरंजकच समजायला हव्यात.

नव्या मुखर्जी कमिशननेही काहीही साधलं नाही. उलट गुमनामी बाबांचं भूत अधिक सामर्थ्यवान बनवायचा प्रयत्न केला. नेताजींना न्याय मिळालाच नाही. जपानच्या रेंकोजी मंदिरात गेली अनेक दशके जपानी व हिंदी बांधवांनी नेताजींच्या अस्थींचे जिवापाड रक्षण केले आहे.

अलिकडेच टोकिओतील बाळासाहेब देशमुख या भारतमित्राचं निधन झाले. (उस्मानाबादकडचे हे बाळासाहेब १९६७ मध्ये जनसंघाच्या तिकिटावर निवडणूक लढले. पडले. कर्जबाजारी होऊन बुवा बनून हिमालयात गेले. तेथे जपानी भिक्षूंच्या मेळ्यातून टोकिओत गेले. तिकडे प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक बनले.

त्यांच्याकडे अटलबिहारी यांच्यापासून सुधीर फडकेंपर्यंत अनेक जण मुक्कामी जात.) टोकिओच्या रेंकोजी मंदिरातील नेताजींची रक्षा सन्मानानं भारतात घेऊन यायचं याच बाळासाहेबांचं स्वप्न आता मात्र अधुरंच राहिलं आहे. काळ पुढं चालला आहे अन् आपल्या इतिहासातील एका श्रेष्ठ सेनानीची रक्षा मात्र दूर देशी तशीच पडून आहे.

हवी तर भारत सरकारने त्या अस्थींची डीएनए चाचणी जरूर करावी. नेताजींची कन्या अनिता दीदी, तसेच पुतणे चंद्रा बोस व सूर्या बोस यांच्यासह असंख्य नेताजी भक्तांच्या विनंतीचा आदर करावा. आमच्या नेताजी बोस यांच्यासारख्या महान राष्ट्रीय पुरुषाची रक्षा त्यांच्या मंगल भूमीमध्ये सन्मानपूर्वक लवकरात लवकर आणावी. बाजारू दंतकथा, नेताजींच्या युद्धोत्तर अस्तित्वाच्या बिनबुडाच्या कहाण्या आणि बेस्ट सेलरचा टॅग लागण्यासाठी लिहिले गेलेले बाजारू ग्रंथ या सर्व अघोरी प्रकारांना फाटा द्यावा.

नेताजींसारख्या महायोद्ध्याचे पवित्र अवशेष त्यांच्याच महन्मंगल भूमीमध्ये विसावले जावेत, असंच मला मनोमन वाटतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT