Crypto Currency sakal
सप्तरंग

क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीचा नवा आयाम

क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीबाबत विस्तृत मांडणी मुकेश जिंदाल यांच्या पुस्तकात वाचायला मिळते.

अवतरण टीम

- विशाखा बाग

क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीबाबत विस्तृत मांडणी मुकेश जिंदाल यांच्या पुस्तकात वाचायला मिळते. गुंतवणूकदारांपर्यंत नवीन पैशाच्या स्वरूपाबद्दल खरी माहिती पोहोचावी, म्हणूनच लेखकाने पुस्तकाचा खटाटोप केला आहे.

देश जेव्हा आर्थिकदृष्ट्या अधिकाधिक संपन्न होण्याच्या मार्गाकडे वाटचाल करत असतो तेव्हा त्याचे नागरिकही थोड्याफार फरकाने तेच करत असतात. आर्थिक सुबत्तेकडे त्यांचीही वाटचाल सुरू असते. अर्थजगताचा हा नियम अर्थातच सर्व देशांना लागू आहे आणि त्याला भारतही अपवाद नाही. भारताची गरिबीही काही प्रमाणात नक्कीच दूर झालेली आहे.

नीती आयोग आणि युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम तसेच विविध संस्थांमार्फत नुकताच नॅशनल पॉवर्टी इंडेक्स जाहीर करण्यात आला, ज्यामध्ये विविध १२ मुद्द्यांवर सर्व्हे करण्यात आला. भारताची गरिबी २०१५-१६ या वर्षात २५ टक्के होती. २०२२-२३ मध्ये ती १४ टक्क्यांवर आली आहे.

हे सर्व सांगायचे कारण की, आर्थिक निकषांवर आधारित जेव्हा आपण भारतीयांचा विचार करतो तेव्हा ते नक्कीच पैसा कमावण्याचे आणि तो गुंतवण्याचे विविध मार्ग शोधत आहेत अन् त्यात त्यांना यशही येत आहे. असेच आर्थिक गुंतवणुकीचे एक नवीन साधन भारतात नावारूपास येत आहे आणि त्याबद्दलची सर्वंकष माहिती ‘क्रिप्टो द डिसरप्टर ः द राईज ऑफ मनी फ्रॉम बार्टर टू बिटकॉईन’ या नवीन पुस्तकात लेखक मुकेश जिंदाल यांनी करून दिली आहे.

मुकेश जिंदाल यांचे हे तिसरे पुस्तक आहे. फायनान्स, इन्व्हेस्टमेंट आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट या क्षेत्रातील त्यांचा अनुभव अतिशय दांडगा आहे. इंजिनिअरिंग केल्यानंतर फायनान्समधील उच्च शिक्षण आणि त्याचबरोबर याच क्षेत्रात दिल्ली युनिव्हर्सिटीकडून पीएच. डी.सुद्धा त्यांनी मिळवली आहे. सिटी वेल्थ लंडन यांच्याकडून ग्लोबल फिनान्शियल ॲडव्हायझर म्हणूनही त्यांना गौरविण्यात आलेले आहे.

या आधीची त्यांची दोन पुस्तकेही फायनान्स, इकॉनॉमिक्स आणि इन्व्हेस्टमेंटवरच आधारित आहेत. या पुस्तकात प्रामुख्याने त्यांनी भारतात मागील साधारण सात-आठ वर्षांपासून जोर धरत असलेली क्रिप्टो करन्सी म्हणजेच गुंतवणुकीच्या एका अतिशय नवीन साधनाबद्दलची विस्तृत आणि सखोल माहिती दिली आहे.

क्रिप्टो करन्सी अतिशय गुंतागुंतीची आहे हे नक्की. भारतातील सर्वसामान्य गुंतवणूकदार अजूनही जिथे भारतीय भांडवली बाजारापासून म्हणजेच स्टॉक मार्केटपासून दूर आहे, ज्याची त्याला अजूनही भीती वाटते आणि ज्याबद्दल त्याला अजूनही संपूर्ण माहिती किंवा ज्ञान उपलब्ध नाहीय त्यांच्यासाठी क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूक म्हणजे तर कोणत्या तरी दुसऱ्या ग्रहावर जाऊन राहण्यासारखीच गोष्ट आहे; परंतु दुसरीकडे भारतातील तरुण पिढी आणि क्रिप्टोच्या जगात ज्ञान असलेले गुंतवणूकदार मात्र क्रिप्टो करन्सीच्या प्रेमात आहेत. इतके की त्यांनी मागील सात-आठ वर्षांत प्रचंड प्रमाणात नफाही कमावला आहे.

अशा परिस्थितीत सर्वसामान्य गुंतवणूकदारांपर्यंत अशा नवीन पैशाचे स्वरूप आणि गुंतवणुकीबद्दल जास्तीत जास्त खरी माहिती योग्यप्रकारे पोहोचावी यासाठीच लेखकाने ‘क्रिप्टो द डिसरप्टर’ पुस्तकाचा खटाटोप केला आहे आणि तो अतिशय योग्य, चांगली माहिती देणारा आणि त्याचबरोबर विश्वासदर्शकही ठरला आहे.

हे पुस्तक म्हणजे अर्थ, वित्त, संगणकीय अभ्यासक्रम, बँकिंग, इन्शुरन्स इत्यादींबद्दल ज्यांना आवड आहे त्यांच्यापासून ते अगदी सर्वसामान्य नागरिकापर्यंत सर्वांसाठीच वाचनीय आहे. लेखकाची या विषयातील आवड आणि त्याला असलेले ज्ञान अन् माहिती याचा अगदी परिपूर्णरीत्या वापर इथे केला आहे. अतिशय मेहनत घेऊन लेखकाने हे पुस्तक पूर्ण केले आहे हे मात्र नक्की. अर्थ आणि वित्त क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी तर ते माहितीचा महासागर आहे.

नियमित अभ्यासक्रमात जे शिकवले जात नाही ते सर्व तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल. आर्थिक विश्वात घडत गेलेल्या ऐतिहासिक बदलांपासून ते जागतिक अर्थविश्वात घडून गेलेल्या आणि मैलाचा दगड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनेक ठळक अन् महत्त्वाच्या घटना लेखकाने पुस्तकात सांगितल्या आहेत.

मुकेश जिंदाल यांचे पुस्तक आठ वेगवेगळ्या शीर्षकांखाली विभागण्यात आलेले आहे. आठही भाग संपूर्णपणे वाचण्यासारखेच आहेत. त्यामध्ये अगदी बार्टर सिस्टीमपासून वेगवेगळ्या प्रकारे पैशांचे स्वरूप कसे बदलत गेले इथपासून ते क्रिप्टो करन्सी म्हणजे नक्की काय, त्यामागचं तंत्रज्ञान काय आहे, कशा रीतीने इथे व्यवहार चालतात आणि भारतात सर्वसामान्याला त्यात गुंतवणूक करायची असेल तर कोणती काळजी घ्यावी, गुंतवणूक कशी करायची, त्यासाठी काय काय लागतं आणि ती केल्यानंतर सरकारदरबारी कोणते नियम आपल्याला लागू होतात आणि कोणता कर आपल्याला लागू होतो इथपर्यंत सर्वांची परिपूर्ण माहिती मांडलेली आहे.

जागतिकस्तरावर घडलेल्या आर्थिक विश्वातील घटना असो की राजकीय, त्यांची विस्तृत मांडणी पुस्तकात आहे. ज्या घटनांद्वारे जगावर चांगले किंवा वाईट परिणाम झाले आहेत आणि त्यातून जगात बदलसुद्धा घडला आहे त्या सर्व लेखकाने सोप्या भाषेत सगळ्यांना समजतील, अशा मांडून दिलेल्या आहेत. पुस्तकाचे सर्व आठही भाग अतिशय वाचनीय आहेत.

अमेरिकेत २००८ मध्ये सबप्राईम लेंडिंग या गोष्टीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीचे चक्र सुरू झाले आणि जे नंतर जगभर पसरले ते नेमके कसे आणि कुणामुळे झाले, याबद्दल असलेला भागसुद्धा खूप वाचनीय आणि माहितीपूर्ण आहे.

पुस्तकात बऱ्याच गोष्टी तांत्रिक स्वरूपातही दिलेल्या आहेत. म्हणजे कोणतेही गणित मांडलेले नाहीय. क्रिप्टो करन्सी हीच मुळात संगणकावर अवलंबून असलेली प्रणाली आहे आणि त्यामुळे काही भाग जरी तांत्रिक असला तरीही ज्यांना आवड आहे त्यांनी लक्ष देऊन पुस्तक वाचले तर त्यांच्यासाठी ते क्रिप्टो करन्सीच्या गुंतवणुकीसाठीच्या मार्गावर टाकलेले पहिले पाऊलच आहे. संगणक विश्वाची ज्यांना आवड आहे, संगणक प्रणाली ज्यांना समजून घेता येते आणि ज्यांचे या विषयावरील ज्ञान आहे त्या सर्वांसाठीसुद्धा हे पुस्तक खूप वाचनीय आहे.

जागतिकस्तरावर आणि भारतातसुद्धा कोणकोणत्या क्रिप्टो करन्सी आहेत, कोणत्या चांगल्याप्रकारे नफा मिळवून देतात, त्यात होत असलेले बदल आणि या एकंदरीतच संगणकीय प्रणालीमध्येसुद्धा हॅकर्सनी घातलेला धुमाकूळ, यामध्येसुद्धा कशी फसवणूक होते हे सर्व काही लेखकाने प्रामाणिकरीत्या इथे सांगितलेले आहे.

अर्थातच पैशाचा जन्म झाला तेव्हापासूनच फसवणूकही जन्माला आली आणि त्यामुळेच ही करन्सी जरी कोणाच्याही दबावाखाली, कोणाच्याही अखत्यारीत येत नसली तरीही म्हणजेच डी-सेंट्रलाईज्ड असली तरीही, इथेसुद्धा फसवणुकीचे अनेक प्रकार सुरू झालेलेच आहेत. लेखकाने या मधल्या सर्व धोक्यांचीही जाणीव करून दिलेली आहे.

भारत सरकारने नागरिकांनी कमीत कमी क्रिप्टो करन्सी गुंतवणूक करावी आणि त्यापासून दूरच राहावे, यासाठी अनेक प्रकारचे कर लावलेले आहेत. त्यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने स्वतःच्या डिजिटल करन्सीचा पर्यायसुद्धा नागरिकांना उपलब्ध करून दिलेला आहे. अर्थातच, ज्या गुंतवणूकदारांना हे सर्व धोके पत्करून थोड्या फार स्वरूपात का होईना क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांनी हे पुस्तक वाचायलाच हवे.

भारतात तरी ज्यांच्याकडे जास्तीचा पैसा बाजूला आहे, असे मोठमोठे उद्योजक, गुंतवणूकदार आणि वेगवेगळ्या स्तरावरील खासगी अन् सरकारी संस्थांतील अधिकारी आणि युवा वर्ग क्रिप्टो करन्सीच्या नक्कीच प्रेमात आहेत आणि म्हणूनच भारतातही तिची गुंतवणूक दरवर्षी वाढतच चाललेली आहे.

gauribag7@gmail.com

(लेखिका वित्त सल्लागार आणि कॉर्पोरेट ट्रेनर आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT