Israel Attack sakal
सप्तरंग

सारा, खेळ राजकारणाचा

गाझातील हमासनं सात ऑक्टोबरला इस्राईलवर हल्ला केला. तीन ते पाच हजार रॉकेटं काही तासांत सोडली. हमासचे हजारपेक्षा जास्त सैनिक इस्राईलमध्ये घुसले.

निळू दामले

गाझातील हमासनं सात ऑक्टोबरला इस्राईलवर हल्ला केला. तीन ते पाच हजार रॉकेटं काही तासांत सोडली. हमासचे हजारपेक्षा जास्त सैनिक इस्राईलमध्ये घुसले. दोन्ही वाटांनी झालेल्या हल्ल्यात इस्राईलची दोनेक हजार माणसं (सैनिक, नागरिक) दगावली.

इस्राईलनं गाझाशी युद्ध घोषित केलं. गाझावर हवाई हल्ले केले. त्यात गाझाची दोन हजारच्या आसपास माणसं गेली. मृतांची संख्या सोडा, बहुधा पूर्ण गाझाच जमीनदोस्त होतंय, झालंय. हमासनं केलेला हल्ला आणि त्यातून इस्राईलचं झालेलं नुकसान अभूतपूर्व आहे. हमासची हालचाल आधीच ओळखून ती रोखण्याची लष्करी, हेरगिरी यंत्रणा इस्राईलजवळ आहे. जगात ती यंत्रणा एक नंबरची मानली जाते.

इस्राईलकडे पाच लाखांचं खडं सैन्य आहे, २४१ अत्याधुनिक अमेरिकन फायटर जेट विमानं आणि ४८ अटॅक हेलिकॉप्टर आहेत; तसंच आधुनिक २२०० रणगाडे आणि सात पाणबुडी युद्धनौका आहेत. शिवाय सुमारे ८० अणुबाँब आणि २०० अण्वस्त्रं आहेत. इस्राईल दरवर्षी २४ अब्ज डॉलर सैन्यावर खर्च करतं.

शिवाय, अमेरिकेकडून दरवर्षी पैसे आणि शस्त्रं मिळून सुमारे पाच अब्ज डॉलर वापरले जातात. देशातल्या आणि जगातल्या हालचालींवर लक्ष ठेवणारी ‘मोसाद’ नावाची जगातली अव्वल क्रमांकाची यंत्रणा इस्राईलजवळ आहे.

हमासजवळ काय आहे?

हमास ही संघटना गाझा या प्रदेशातलं सरकार चालवते; पण हे सरकार म्हणजे जिल्हा परिषद असावी तसं आहे. ते पूर्णपणे इस्राईलच्या मेहेरबानीवर चालतं. इस्राईलचा गाझाला पूर्ण वेढा आहे. गाझामध्ये येणारी प्रत्येक वस्तू, माणसं, इस्राईलची परवानगी घेऊनच प्रवेश करतात. गाझाला स्वतःचं लष्कर नाही, केवळ एक पोलिस यंत्रणा आहे. गाझा हा एक दात-नखं नसलेला, कोणीतरी मेहेरबानीनं टाकलेल्या अन्नावर जगणारा प्राणी आहे.

बलाढ्य, अण्वस्त्रानं सज्ज आणि हेरगिरीत अव्वल असणाऱ्या इस्राईलवर हमासनं हल्ला कसा केला? हल्ल्याचा थोडा प्रयत्न केला, तरी इस्राईल प्रचंड विध्वंस करतं; हे माहीत असताना इस्राईलमध्ये जाऊन दोन हजार माणसं मारण्याचं धाडस हमासनं का केलं? हमासचं धाडस आणि इस्राईलचं अपयश हे दोन्ही प्रश्न जगाला बुचकळ्यात टाकतात. हमासनं केलेल्या हल्ल्याचं एक कारण हमासनं वेळोवेळी केलेले उद्योग आणि वक्तव्यं यातून समजतं. गाझा विभाग, वेस्ट बँक म्हणजेच पॅलेस्टाईनची हताशा.

१९४८ मध्ये इस्राईलची स्थापनाच स्थानिक पॅलेस्टिनी लोकांवर अनन्वित अत्याचार करून झाली. इस्राईली लोक शस्त्रं घेऊन पॅलेस्टिनी गावांत घुसत. गावातल्या लोकांना सांगत, चालते व्हा. ऐकलं नाही तर गोळ्या घालत. पॅलेस्टिनी बेघर होत, परागंदा होत. तिथं इस्राईलचं ‘किबुत्झ’ स्थापन होई. इस्राईलची स्थापना अमेरिकेसह दोस्त राष्ट्रांनी केली. ज्यूंच्या मते पॅलेस्टाईन ही त्यांच्या पूर्वजांची भूमी होती.

तसं असेल किंवा नसेल पण तिथं ज्यू लोक पोहोचण्याआधी दोन हजार वर्षं स्थानिक पॅलेस्टिनी वसलेले होते. त्यांचं काय करायचं याचा विचार अमेरिका आणि ज्यूंनी केला नाही. स्थानिकांनी विरोध केला. चकमकी आणि लढाया झाल्या. पण स्थानिकांची ताकद अमेरिका आणि दोस्तांच्या ताकदीच्या तुलनेत अगदीच नसल्यागत होती.

स्थानिकांचा अर्थातच कडवा विरोध होता. त्यांच्या जागी एक नवं सार्वभौम राष्ट्र तयार व्हायचं होतं. वाटाघाटी करून वाट निघू शकली असती. अमेरिकेतली काही राज्यं अमेरिकेनं शेजारच्या देशांना पैसे मोजून विकत घेतली आहेत. पैशांचे व्यवहार कसे करायचे असतात, याचं उपजत ज्ञान ज्यूंनाही आहे. पण या वाटेनं न जाता दादागिरी करत ज्यू पुढं सरकले.

त्यांचं म्हणणं होतं, की ख्रिस्ताच्या खुनाचं खापर ज्यूंवर फोडून ख्रिस्ती जगानं त्यांची ससेहोलपट केली. पहिल्या शतकापासून ते थेट विसाव्या शतकापर्यंत. शेवटचा प्रसंग म्हणजे हिटलरनं केलेला लाखो ज्यूंचा संहार. तेव्हा आम्हाला पाय ठेवायला भूमी हवीय अशी ज्यूंची मागणी. ज्यू समाज बुद्धिमान होता. भरपूर पैसे राखून होता.

अमेरिका, ब्रिटन यांना महायुद्ध जिंकायला ज्यूंचा पैसा उपयोगी पडला होता. तो दबाव त्यांनी वापरला. मागणी गैर नव्हती. पण एका नव्या भूमीची मालकी मिळवायची होती. तिथल्या स्थानिकांची भावना आणि मालकी हाही मुद्दा होताच.

ज्यूंनी दादागिरी केली. पॅलेस्टाईन बळकावलं. ही १९४८ मधली गोष्ट. त्यानंतर स्थानिक लोक, त्यांच्या मागे उभे असलेले अरब देश आणि इस्राईल यांच्यात संघर्ष झाले, लढाया झाल्या. अमेरिकेला मध्य-पूर्वेतल्या अरब-मुस्लिम जगात पाऊल ठेवायला इस्राईल ही जागा होती. अमेरिकेनं पैसा, शस्त्रं इस्राईलमध्ये ओतली.

अरबांचा वेळोवेळी पराभव केला. सुरुवातीला जेमतेम टकाभर जमीन इस्राईलच्या हाती होती. इस्राईल स्थानिकांना बेघर करत करत जमीन बळकावत राहिलं. आज इस्राईलनं पॅलेस्टाईनची ८० टक्क्यांच्या आसपास जमीन बळकावली आहे. मामला इथं संपत नाही.

इस्राईलची भूमिका अशी, की भूमध्य सागर ते जॉर्डन नदी यामधला सर्व प्रदेश त्यांना हवाय. पूर्ण प्रदेश ताब्यात आल्याशिवाय, पॅलेस्टिनी लोकांची पूर्ण हकालपट्टी झाल्याशिवाय त्यांना सुरक्षितता लाभणार नाही, असं ज्यूंचं मत आहे. इस्राईलच्या प्रत्येक पंतप्रधानाचं, गोल्डा मेयरसह, हे पक्कं मत आहे. वरवर ते पॅलेस्टिनींना देश वगैरे देऊ म्हणतात; पण त्यांचे खायचे दात वेगळे आहेत.

अनेक युद्धं झाल्यानंतर जगभरच्या दबावाखाली इस्राईलनं पॅलेस्टाईन एक सार्वभौम देश करायची तयारी दाखवली. पॅलेस्टाईन आणि इस्राईल हे दोन सार्वभौम देश तयार होतील, असं १९९३ मध्ये ऑस्लो करारात ठरलं. या दिशेनं जाण्याचं पहिलं पाऊल म्हणून गाझा आणि वेस्ट बँक या प्रदेशांना कारभाराची स्वायत्तता देण्यात आली.

म्हणजे, तिथलं स्थानिक सरकार पॅलेस्टिनींनी चालवायचं; पण त्यांना स्वतःचं लष्कर असणार नाही आणि स्वतःचं आंतरराष्ट्रीय धोरणही ठरवता येणार नाही. सार्वभौम देशाची ही ठळक वैशिष्ट्यं नंतर कधी तरी दिली जाणार होती.

परंतु, १९९३ नंतर इस्राईल दादागिरी करतच राहिलं, पॅलेस्टिनी गावं बळकावत, त्या जागी आपल्या वस्त्या करत पसरत राहिलं. वेळोवेळी ‘युनायटेड नेशन्स’नं आणि जगातल्या अनेक देशांनी निषेध नोंदवला, ठराव पास केले; पण इस्राईलनं जुमानलं नाही. लष्करी बळ आणि अमेरिकेचा पाठिंबा याच्या आधारे इस्राईल दादागिरी करतच राहिला.

पॅलेस्टाईनच्या हताशेचा दुसरा टप्पा २००५ नंतर सुरू झाला. निवडणुका झाल्या. वेस्ट बँकमध्ये ‘फता’ या संघटनेला बहुमत मिळालं. गाझामध्ये फता या संघटनेच्या भ्रष्टाचारी राजवटीला कंटाळून जनतेनं हमासला निवडून दिलं. हमास ही हिंसाचारावर विश्वास असणारी संघटना ‘मुस्लिम ब्रदरहूड’ या इस्लामी संघटनेचाच एक फुटवा आहे.

इस्राईलच्या ताटाखालीच वावरावं लागत असल्यानं गाझातली जनता कंटाळली होती. हमासबद्दल तसं लोकांना प्रेम असायचं कारण नव्हतं; पण नेमस्त फता भ्रष्ट असल्यानं नाईलाजानं हमासला लोकांनी मतं दिली. जगभरचा असाच अनुभव आहे, की सज्जन माणसं कारभार करू शकत नाहीत म्हटल्यावर लोक गुंडांना मत द्यायला तयार होतात. गाझातही तेच झालं.

हमासनं पहिल्या दिवसापासून अतिरेकी भूमिका घ्यायला सुरुवात केली. तिकडं इस्राईलची दादागिरी वाढतच चालली होती. जेरुसलेममध्ये पिढ्यानपिढ्या घरं असलेल्या पॅलेस्टिनी अरबांना इस्राईल हुसकून लावू लागलं. चक्क गुंडगिरी करत त्यांची घरं बळकावत. त्यांनी नकार दिला, तर त्यांच्या घराभोवती कुंपण लावून त्यांची कोंडी करत. वेस्ट बँकमध्येही पॅलेस्टिनी लोकांचं गाव बळकावत. गावकरी बेघर होत. गावाबाहेर तंबू लावून राहत.

बळकावलेल्या जागी इस्राईलींची अद्ययावत घरं होत. प्रत्येक इस्राईली घरात स्वीमिंग पूल. काही अंतरावर वसलेल्या पॅलेस्टिनी घरात प्यायला पाणीही नाही, अशी परिस्थिती होत. आवाज केला तर लष्कर हल्ला करणार आणि त्याही ठिकाणहून हाकलणार.

गाझातील हमास आक्रमक

वेस्ट बँकवाले सहनशील. गाझातले हमासवाले मात्र आक्रमक आणि अतिरेकी. त्यांनी लष्करी मार्ग पत्करला. भूमिगत रीतीनं रॉकेटं मिळवली, इस्राईलवर सोडली. इस्राईलनं गाझावर हल्ले केले, गाझाची कोंडी केली. २००७ पासून गाझाची पूर्ण नाकेबंदी आहे. तिथली माणसं बाहेर जाऊ शकत नाहीत.

दररोज सुमारे १७ हजार माणसं इस्राईलमध्ये रोजगारासाठी ये-जा करत; पण लष्कराच्या मेहेरबानीनंतर. गाझाला मिळणारं पाणी, वीज, औषधं, पेट्रोल, धान्य सारं सारं इस्राईलच्या मेहेरबानीवर होतं.

हमासनं हल्ला केला, की जगभर त्याच्या बातम्या पसरत. वाहिन्या ती चित्रं दाखवत. वेस्ट बँक आणि गाझामध्ये इस्राईल करत असलेले अत्याचार माध्यमांनी दाखवले नाहीत. हमासनं सहा ऑक्टोबरला केलेले उद्योग दहशतवाद होता, की काय होतं हा स्वतंत्र मुद्दा आहे.

इस्राईलनं केलेले उद्योग हे इस्राईली लोकांच्या दृष्टीनं देशप्रेम असतं पण पॅलेस्टिनींच्या दृष्टीनं दहशतवाद असतो. तसंच पॅलेस्टाईनचं. हमासनं केलेले उद्योग हे पॅलेस्टाईनच्या दृष्टीनं देशभक्ती होतात आणि इस्राईलच्या दृष्टीनं दहशतवाद होतो.

१९४८ ते २०२३ पर्यंत इस्राईलचं आक्रमक धोरण मंजूर नसलेले अनेक इस्राईली नेते आणि पक्ष होते. इस्राईलनं अरबांशी जुळवून घेतलं पाहिजे, त्यांच्याशी माणसासारखा व्यवहार केला पाहिजे असं अनेकांचं मत होतं.

पॅलेस्टाईनमध्येही, हमास आणि त्या आधी यास्सर अराफत यांचं इस्राईलद्वेषाचं धोरण नामंजूर असलेले, सामोपचारानं इस्राईल हा एक स्वतंत्र सार्वभौम देश मानून, त्यांच्याबरोबर सुखानं जगावं असं मानणारे लोक होते.

दुर्दैवानं अमेरिकेच्या आणि अरब देशांच्या दबावामुळं दोन्ही ठिकाणचे समंजस लोक मागं पडले. अमेरिका आणि अरब देशांनी अतिरेकी पुढाऱ्यांच्या बाजूनं आपलं बळ वापरलं. पॅलेस्टाईनमध्ये हमासला बहुमत नाही तसंच इस्राईलमध्येही नेतान्याहू यांना बहुमत नाही; पण दोघंही युद्धबिद्ध भानगडी काढून लोकांच्या भावनांशी खेळतात, सत्ता मिळवतात आणि हिंसा सुरू ठेवतात.

सारा खेळ राजकारणाचा, देशांतर्गत सत्तेच्या राजकारणाचा आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर इस्राईल आणि पॅलेस्टाईन या दोन प्याद्यांचा वापर करून अमेरिका व अमेरिकाविरोधी गट खेळ करत आहेत. मधल्यामध्ये जनता भरडली जातेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT