Forest Sakal
सप्तरंग

जंगल कुणाचं?

राती जेवणं खावन झाली की बबी म्हतारीच्या घरी आम्ही सगळ्याजनी जमलो...हिराबाई, जनी, वयशी, दिपी सगळ्या बोलत हुत्या आम्ही आपलं हो ला हो म्हणत हुतो...

नितीन पवार koripati.production@gmail.com

राती जेवणं खावन झाली की बबी म्हतारीच्या घरी आम्ही सगळ्याजनी जमलो...हिराबाई, जनी, वयशी, दिपी सगळ्या बोलत हुत्या आम्ही आपलं हो ला हो म्हणत हुतो... जनीला वायच आनुभव जास्त हाय..सगळ्यास्नी गप्प करत जनीनं सुरु केल "कस हाय सकाळीबी आजकाल फारिस्ट येतुय... त्येज्यामुळं अंधार आसतानाच आपल्याला बाहेर पडलं पायजेल... चार जनी लाकडं तोडत्याल दोघीजनी भारं बांधत्याल..दोगीनी डोंगराच्या कड्यावर उभ राहून पहारा द्याचा.. वायच जरी चाहूल लागली तरी इशारा द्याचा...इशारा आला की सगळ्यात आधी पाळा दडवायचा... आन तोडल्याली लाकडं डबऱ्यात टाकून द्याची...कळलं का..? "

आसं म्हणल्यावर समद्यानी माना डोलावल्या.. तेवढ्यात मला संगी दिसली हिच्या घरी नवा फुकटचा गॅस आला हुता तरिबी हिला लाकडाला याच हुत.. म्हणून मीच म्हणले.. "हाय कनाय बया संगे ... चांगला फुकटचा गॅस दिलाय सरकारन तरीबी कशाला लाकडाला हात लावतीस ग.. आमची एक मजबुरी हाय तू कशाला पापात भागीदारीन हुतीस.."

तवा संगी म्हणली "बया गॅस दिला सिलेंडर कोण द्याचं....एकाची किंमत हाजाराकडं जात्या आपल्यास्नी कस झेपायच..." आस म्हणून सगळ्यांनी सरकारला चांगल्या चार शिव्या हसडल्या आन घरची वाट धरली...

पहाट चार वाजता पारी म्हातारीचा कोंबडा आरवला तशी सगळी जागी झाली... बिगी बिगी रानाच्या वाटला लागली... दुगी यीरपडुलीतनं... दुगी केळपेढ्यावरनं तर चवघी इनामातनं आल्या... समद्यानी संग आल्यावर नजरला पडतंय यामुळ यगयगळ्या वाटनं याच ठरल हुत.. खरतर फारिस्टला खबरी देणार गावातलच कुणीतरी आसत त्यामुळं गावात सुदा बोबाटा हु नं देता आम्ही सगळ्या डोंगराला लागलो हुतो... अंधारातन वाट काढत सगळ्या जनी एका जागी जमलो... दुगी वर टेकाडावर जाऊन उब्या राहिल्या... समद्यानी पटापट लाकडं तोडायला सुरवात केली... नुसता पाल्याचा आन पाळ्याचा आवाज शिवारात घुमायला लागला... सगळ्यांचं अर्ध ध्यान फारिस्टाकडं हुत... आज घावलो तर काय गत नव्हती... तासाभरात पटापट लाकडं सगळ्या शिवारात पडली...आणल्याला भाकरीचा एक एक घास खाऊन पुन्हा कामाला लागलो.. आज जमलं तितकं कामं उरकायचं हुत... सगळ्या मोळ्या दडवून शिवरातल्या जोंधळयात निवून टाकायचं हुत्या... आन तिथंच वाळलं की एकदा बैलगाडी करून सगळी लाकडं घरी आणून रचायची आस दर वर्षाला ठरल्याल आसयच...!

खाऊन झालं कि पुन्हा कामाला लागलो.. आज बरच कामं उरकलं हुत... आता सूर्य नजरला पडायला सुरवात झाली हुती.. मोळ्या बांधायला सुरवात झाली तशी टीकडीवरच्या बायकांनी हाका मारायला सुरवात किली..." फारिस्ट आला फारिस्ट..." तशी समद्याची तारांबळ उडाली... सगळी हिकडं तिकडं पळायला लागली... पटापट लाकडं दडवायला लागली... पाळ सगळ जमा करून झाड्याच्या बुंदयात दडीवलं...सगळ्या येगयेगळ्या वाटला लागल्या... फारिस्ट सुद्धा दोघ तिघ डोंगर घेरायला लागलं... वड्यातन पळताना माझा पाय दगडावर पडला आन मी पाण्यात पडले... वल्या आंगान मला पळायला येईना... संगी माझ्याबरूर थांबली आन आम्ही दुगी फारिष्टच्या पुढ्यात आलो... हातात काय नसल्यामुळ आम्ही काय केल न्हाय म्हणलो.. पण एवढ्या सकाळी कशाला आला हुता हित आस म्हणत चवकीला यायला लागलं आस म्हणाले... बाकी दोघांनी लाकडं आन पाळ शुधून काढलं.....

ह्ये जंगल आमचं हाय... आम्ही एवडूस हुतो तवापसन ह्ये वापरत आलूय पण आता मात्र सरकार झाडाला हात लावू दीना... आमचीच लाकडं तुडली म्हणून आम्हास्नी धरायला लागलं.. शिक्षा करायला लागलंय... आम्ही त्येंच्या चवकीला गेलो... गड्या माणसानी इवून पैसे भरलं... आम्हासनी सोडवून नेलं.. पण मी लय भेले हुते... त्या माणसात... त्या जंगलात आम्ही दुघीच हुतो... कवा काय हुईल कोण काय करील म्हायत नव्ह्त. तरिबी रोज चार दिसांनं पुन्हा डोंगरात जायाचो... जीवावर उदार हुयाचो... ती माणसं म्हणायची आम्ही ड्युटी करतूय.. मग भाकरीची सोय करणं आमचीबी ड्युटीच न्हाय का ? जंगल कमी हुत्यात म्हणून लाकूड तोडायचं न्हाय पण लाकूड तोडायचं न्हाय म्हणून चूल पेटवायची न्हाय का...? अन चूल न्हाय पेटली तर आम्ही रागानं जंगल पेटवलं तर काय बिघडलं... वणवा लागला म्हणून आमची माणसं तुडवली, त्येंच्या पेकाटात लाथा घातल्या...लाथ घालताना तरी खपाटीला गेल्यालं पॉट एकदा उघड्या डोळ्यांनी बघा म्हणावं... आम्ही आदिवाशी आन तुम्ही सरकारी, मग जंगल नेमकं कुणाचं..? आम्ही त्यला बापावानी जीव लावतो वायच पोटापाण्याचा मागतो...! तुम्ही त्यला नुकरी म्हणून जपता, कारण शेरात जगायची हवा कमी पडत्या म्हण..! मग त्येंच्या हवेची तशीच आन आमच्या पोटापाण्याची सोय बी करा म्हणावं..!

(सदराचे लेखक ‘गावाकडच्या गोष्टी’ या ‘यू ट्यूब’ वरील वेबमालिकेचे लेखक-दिग्दर्शक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT