साधारणतः सप्टेंबरमधी गणपती यत्यात..! आठ दिवस काय, महिनाभर आधीपासन तयारी आसायची.. आधी मंडळाची तयारी झाली की घरच्या गणपतीची आरास करायला घ्याचो...
साधारणतः सप्टेंबरमधी गणपती यत्यात..! आठ दिवस काय, महिनाभर आधीपासन तयारी आसायची.. आधी मंडळाची तयारी झाली की घरच्या गणपतीची आरास करायला घ्याचो... दोन लाकडी खांडांवर आयचं एकादं ठिवणीतलं पाताळ दुनी बाजूनं समान सोडायचं... मधी एकादा लोखंडी टीप ठिवून त्यज्यावर गणपती बसवायचा.. धाच्या धा दिवस सगळी पोर जमून आरती करायचो... सगळ्यास्नी साखर देणार आसाल तर तुमची पयली आरती करू असं म्हणायचो... मग आर्धी आरती पाठ आन पुढची सपाट असायची... पण एकमेकांच्या नादात कोण काय बोलतंय हे पोरास्नी कळायचं न्हाय आन घरच्यासनीबी...धाव्या दिशी जमल्याली साखर गोळा करायचो...अर्धी इकायचो त्यात बटर आन् च्या पावडर घ्याचो आन अर्ध्या साखरचा च्या करायचो... त्या दिवशी निबार च्या बटर खायचो... अप्रूप वाटायचं... कधी मिळायचं न्हाय... आता बटर काय, टोस्टचा पुडा पडलाय घरात, पण च्या प्याची इच्छा न्हाय...! त्या आरतीचा आन साखरचा गणपती गेला कुठं?
पुन्हा नोव्हेंबरला दिवाळी याची... दिवाळी म्हंजी वर्षातला सगळ्यात मोठा सण... कुणी कितीबी गरीब आसलं तरी दिवाळीला पोरासनी कापडं घ्याची आन बहिणीला भावबीज करायला पातळ, घ्याची तजवीज करून ठेवल्याली असायची... बायका त्या दिवसात दिवस- रात्र लाटणी पोळपाट घिवून ह्या घरातन त्या घरात जाताना दिसायच्या... हसत खेळत कानवलं, लाडू हुयाच.. आम्ही आयबरूबर नुसतं हिंडायचो... पयला गरम गरम कानावला खायाचो... पैरा करून बायका एकमेकींला मदत करायच्या... शिवाय गप्पा रंगायच्या...
दिवाळीदिवशी पहाट दारात सडा पडायचा,रांगूळ्या काढायच्या...पोर उटण्यानं अंगुळ करायची... एवढ्या सकाळी बहीण यायची अंगुळ घालायला.. नवीन कापडं घालून देवळाखाली कोण आधी जाऊन फटाक वाजवतंय आस हुयाचं...आखी माळ न वाजवता एक एक तोटा काढून पाच दिवस पुरवायचो... काय काय पोरं तर देव दिवाळी पावतर ठेवायची... आता प्रत्येकाच्या दारात एका टायमाला हजाराची माळ लागती पण देवळाखालची पोरं गिली कुठं...?
या सगळ्या सणात उजवा असल्याला एक सण म्हणजे गावची जत्रा, ती प्रत्येक गावात आजबी व्हते... महिनाभर आधीपासन सुरवात हुती... वाकळा धुयाला, कुणाची बैलगाडी जात्या ह्यज्यावर सगळ्यांचं लक्ष्य आसायच.. दोन तीन घरच्या वाकळ घिवून नदीवर जायचो... सगळ्यांनी मिळून एकमेकाला वाकळ धू लागायच्या असतात मग पुन्हा तिथंच वाळवून संध्याकाळी घरी आणायच्या... सगळ्यांनी मिळून दगडावर वाकळ आपटायला लय मज्जा यती... पुन्हा आयपती प्रमाण कुणी घराला रंग देत तर कुणी पोतेर मारून घेत...आदल्या दिवशी छबीना निघतो... देव वरसातनं एकदा स्वतः पालखीत बसून आपल्या दारात येनार म्हणून समदं गाव रातभर जागं आसतं... इमाने इतबारे, पीक पाणी चांगलं यव दे...पोराबाळांना सुख लागू दे आस आन् एवढंच मागणं असत... गुलालानं पोरं भरत्यात.. ढोलावर ताल धरत्यात... देव कौल देतो... गावची काळजी घेतो...पुन्हा सकाळी लवकर उटून मटण आणत्यात... बायका सयंपाकला लागल्या की पोरं तमाशाची वाट धरत्यात.. तमाशा उभा राहिला की घरी कुणीच राहत न्हाय.. अगदी जिवंत कला...पाच तास माणसं जाग्यावरनं उटायची न्हायत...पोरांच्या फर्माईश ची सगळी गाणी वन्स मोर वाजायची... वग झाला की पोरं पावण्याकडं लक्ष्य द्याची... त्या दिवशी सगळी खुश असायची...आता जत्रला सगळी यत न्हायत... तमाशाच्या जागी ऑर्केस्ट्रा असतो... दुकानंबी आता तितकीशी नसत्यात... गाव तिथंच हायं, पण एकोप्यान जीव लावणारी, देवावर सुडून निवांत हुणारी, चेहऱ्यावर समाधान असणारी ती माणसं गिली कुटं...?
(सदराचे लेखक गावाकडच्या गोष्टी या ‘यू ट्यूब’ वरील वेबमालिकेचे लेखक - दिग्दर्शक आहेत.)
(हे साप्ताहिक सदर आता समाप्त होत आहे.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.