Soybean Sakal
सप्तरंग

डोळ्यांतनं आभाळ वाहिलं...

आधी सुका दुष्काळ पाचवीला पुजलेला म्हणून कमी पावसात येणारं आन रोकडं मिळवून देणार पीक म्हणून सोयाबीन घेतलं...

नितीन पवार koripati.production@gmail.com

आधी सुका दुष्काळ पाचवीला पुजलेला म्हणून कमी पावसात येणारं आन रोकडं मिळवून देणार पीक म्हणून सोयाबीन घेतलं... सगळं ठरलं, पोरीची मोबायलवर शाळा हुती तिला चांगला मोबायल घ्याचा... बायकुला एखाद लुगडं घ्याचं ठरल... काय बी इचारलं की माझं येकच उत्तर ठरल्यालं हुत सोयाबीन गेला की घिवू..तीन महिनं वाट बघितली... सोन्यासारखा सोयाबीन वावरात उठून दिसत हुता...आता इकला की सोसायटीचा हाफ्ता, लाईट बिल आणि बायको पोरीसाठी कायं कायं करायच हुतं.. स्वतःसाठी सुद्धा एखादी चांगली पैरण आन जीनची एकादी पॅन्ट घ्याची ठरवलं हुतं..

जसं जसं सोयाबीन काडायची येळ जवळं येत हुती तशी धाकधूक वाढली व्हती... सरकारनं सोयाबीनचं दर जाहीर केलं.. आन तोंडचा घास काडून घेतल्यागत झालं... आठ हजाराचा भाव यंदा पाच हजारावर आला... तस दर वर्षीचं सरकार आसं करत..

सोयाबीन जास्तीचा झाला की दर पाडतं पण यंदा पडायचा म्हजी किती ? मुद्दल सुद्धा सुटणार नव्हती... मनातलं सगळं मनातच दाबून ठिवावं लागणार हुतं.. घरात कळालं पण कुणीच काय बोललं नव्हतं... सगळ्यांनी मनातल्या इच्छा मनातच दाबून ठिवल्या हुत्या...तोंडावर कुणीच काय दाखवत नव्हतं.. पोरगी चार वर्षाची असून तिला बापाचं मन कळलं हुत... बायको पदराआड डोळ्यातलं पाणी दडिवल्यालं माझ्या नजरेतनं चुकलं नव्हतं...

पण माझ्या हातात सुदा कायचं नव्हतं... आता हाय ह्या किमतीला दिवून निदान कर्ज भागवून टाकावं ह्या इचारान हातरूनवर पडलो... बायकू सगळी आवराआवर करून आली.. मी छताकडं बघत इचारत पडलो हुतो.. बाह्येर ढगाचा कडकडाट काळीज चिरत हुता..बायकूंन डोक्यावर हात ठिवला आन म्हणाली...‘‘ आमचा आजिबात इचार करू नगा.. तुमी कर्जाचं आधी बघा... लवकर मोकळं करू अन हरभरा पेरू त्यात...’’ मी म्हणलं ‘‘आपला कोण वाली हाय का नाय... का वाऱ्यावर सोडलंय सगळं.. सरकार शेतकऱ्याच्या भल्याचं असायला पायजे... जगाचं पॉट भरणारा जोवर उपाशी राह्यल तोवर आमची हाय लागणार त्याला, ध्यान्यात कसं येत न्हाय ह्यांच्या... ’’ यावर बायकू कायचं न बोलता नुसतीच बसून राहिली.. लायट गेली आन पुन्हा एकदा वीज चमाकली अन मी बाहेर आलो... बघितलं तर आभाळ भरलं हुत...आता माजी पुरती झोप उडाली...

बॅटरी घिवून चार पाच पोर जमली हुती, मिबी त्यांच्या मागून रानाच्या वाटकडं गेलो.. पण करणार काय हुतं.... पाऊस पडणार हॆ मनोमन समद्यास्नी म्हायती हुत.. तरिबी वावरात इवून पोर थांबली हुती... आक्ख वावर उघड हुत... आम्हाला त्याला झाकाव एवडा कागद नव्हता.. न आमच नागडेपण झाकावं एवडा अंगभर कपडा न दरिद्री झाकावी एवढा पैसा... सगळंच उघड्यावर हुत त्यात पाऊस इरोधात उभा हुता... बघता बघता सरीवर सरी आल्या... मोठा पाऊस कोसळायला लागला... एकबी पोरग जागचं हललं नव्हतं... प्रत्येकाच्या डोळ्यातनं आभाळ वाहिल हुतं...! सकाळ पोतर सगळ्या वावरात पाणीच पाणी झालं हुत... दुपार होईपर्यंत पाऊस कमी झाला नव्हता...गुडगाभर पाण्यातन आम्ही सोयाबीन काडून जमंल तितका झाकून ठेवत हुतो... पण अर्धा सोयाबीन पाण्याखाली गेला हुता... नव महिना आईच्या पोटात जपल्याला बाळ मेल्यालं निघाल्यावर आयला जे वाटलं तसचं मलाबी वाटतं हुत...

जिवाच रान करून वावरातलं पाणी काडलं तरी मागं राहत हुत...वाहून गेल्याला सोडला तरी राहिल्याला सुदा इकायच्या लायकीचा नव्हता.. सरकारी माणसं पंचनामे करून गेली ती पुन्हा फिरकली न्हायत.. टीव्हीवर बातमी येईल वाटलं पण कुणी तरी बड्या माणसानं कुठंतरी गांजा वडला म्हणून अटक झाल्याची बातमी आठं दिवस झळकली पण आठ दिवसात गळफास घेतल्याल्या आठ शेतकऱ्याच मोल वावरातल्या सोयाबीन एवढं सुदा नव्हतं हेचं खरं हुतं...!

(सदराचे लेखक ‘गावाकडच्या गोष्टी ’ या ‘यू ट्यब’ वरील बेवमालिकेचे लेखक -दिग्दर्शक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT