Chatni Bhakri Sakal
सप्तरंग

गावाकडच्या गोष्टी : चटणी -भाकरी...

आयची आय आजारी हुती म्हणून ती माह्यारला गिली हुती.. माझ्यासाठी सरी म्हातारीकडं निरोप ठिवला हुता..दोन चार दिस तरी ती येनार नव्हती..

नितीन पवार koripati.production@gmail.com

आयची आय आजारी हुती म्हणून ती माह्यारला गिली हुती.. माझ्यासाठी सरी म्हातारीकडं निरोप ठिवला हुता..दोन चार दिस तरी ती येनार नव्हती.. मला आता एकट्याला राहावं लागणार हुत... तसं मला भात आन च्या करायला यायचा...त्यो बी आय रानातन यसस्तवर मला करून तिवायला लागायचा म्हणून सवय झाल्याली पण आता नुसता भात खावून कस राह्याच ह्यजा मी इचार करीत हुतो...शाळेतन घरी आलो.. बुधवार हुता त्या दिशी... शाळंला एकाच शर्ट पॅन्ट हुती त्यामुळ गुरुवारी रात्री आय ती धूनं चुलीवर अडकवायची... मग रातभर चुलीच्या धगीन वाळायची... न्हाय वाळली तरी निम्मी आंगावर वाळवायचो...

आज आपल काय खरं न्हाय म्हणून मी कामाला लागलो... आडावरनं पाणी भरलं..पिट मळल.. पण भाकरी काय जमना, भूक तर लागल्याली... च्या बरंबर बटार खावं म्हणलं तर शनवार शिवाय बाजार न्हाय...भाकरीच्या पिटाचा मी पार गरगुट काला केला हुता...त्यो सगळा तसाच ठेवला... घरात सगळं डब हुडाकलं, कुट शिजक्या शेंगा... तर कुट दूध आसलं काय काय घावंल... दूध आन शेंगा निबार हाणल्या पण प्वाट काय भरलं न्हाय.. आज आपल्याला उपाशीच झोपावं लागतय आस मनोमन ठरवून उद्या शाळेत गेल्यावर सरी म्हातारी पक्षी ठेवल्याला पाच रुपयातल्या दोन रुपयाचा मी वडापावं खायचं आस ठरीवलं... आन शाळेची कापडं धुयाला घितली... आयगत साबण लावला, काय काय केल तरी मळ काय निगाला न्हाय...घरातला, माणसातला, कपड्यातला साऱ्या साऱ्यातला मळ कसा काढायचा फकस्त आयलाच म्हायत हुत..

तरी निबार हाणली कापड. पुन्हा म्हणलं लय नगो, न्हायतर चड्डीला पडल्याली भोक आजून फाटत्याल.. पुन्हा आयनं बघितलं तर आपल्याला लय मार पडलं... कवा कवा वाटायचं ह्या कापडं लय मळवली की आय कशाला कावती..पोरा पेक्षा कापडं मोठी हायत व्हय.. पण आता धुताना हात दुखल्यावर कळत.. सोप्प न्हाय.. माज्या हाताच निदान तिज्यागत कातडं तरी निघालं नव्हतं.. कापड धून झाल्यावर मला अजून भूक लागली.. आता काय खावं आन काय करू आस झालं...तांब्याभर पाणी पेल.. भाकरी नसली की आयं तसच करायची ह्ये मला म्हायती हुत...पाणी पिवून वाईच बरं वाटलं, पण भूक काय कमी झाली न्हाय.. तसाच हातरूनाव पडलो... आज लवकरच झोपायचं म्हणलं. म्हंजी आपल्याला भूक लागल्या ह्येच आपण इसरून जावं... पण डोळं काय मिटना... तसाच पडून हुतो.. त्या दिशी आयची लय आठवन आली... तिला खायाला नसलं तरी मला ती कवाच उपाशी झोपू द्याची न्हाय... पण मला एक कळत न्हाय नुसत्या तांब्याभर पाण्यावर कसा तिजा डोळा लागत आसल... की तीबी अशीच माझ्यागत जागीच राहात आसल.. ह्या इचारात पडून हुतो...

एवढ्यात बाजूच्या सरू म्हातारीनं आवाज दिला... पोरा झोपलासं व्हय र्र... मी न्हाय म्हणलो...‘ मग दार उघड की तिन्हीसांचं कशाला दार लावलंय...? मी जाऊन दार उघडलं.. ह्या सरू म्हातारीन आजवर आयकडं माझ्या लय कागाळ्या केल्या हुत्या... हिज्या मुळं लयदा मला मारबी बसला हुता... म्हणून मला ती आजिबात आवडतं नव्हती... ती मला सारखं ताप द्यायची, शिव्या द्याचू म्हणून, मिबी तिज्या लय खोड्या काढायचो... तिजी काठी दडवून ठेवायचो... कवा कवा चष्मा द्याचो न्हाय... मग बसायची हुडकत... आज तिनं पहिल्यांदा मला जीव लावल्यागत हाक मारली हुती...मी दार उघडलं.. म्हातारीच्या हातात टावेलत गुंडळल्यालं कायतरी हुत... तिनं माझ्या पुढ्यात टावेल सोडला.. चटणी भाकरी हुती... मी म्हातारीकडं बघितलं.. तुज्या आयनं कुणाकडं भाकरी सांगितली आसल नसलं म्हणलं... आपुनच न्ह्यावी... आता माझ्या हातची तुला आवडत्या का न्हाय कुणास ठावक बया... आसं म्हणून तिनं भाकरीला चटणी लावली आन घास पुढ्यात धरला... त्या दिशी चटणी जिवढी ग्वाड लागली ती पुन्हा कवाच न्हाय... आयला मी कायम म्हणायचो सारकी काय चटणी भाकरी खायाला दितीस... पण आज मला कळलं त्या म्हातारीची आन आयची आवस्ता निराळी नव्हती...तिज पोरगं गेलं म्हणून तिला चटणी भाकरी ग्वाड हुती आन हिजा नवरा गेला म्हणून...

त्या दिशी म्हातारीबर लय बोलो तिलाबी कुणीतरी लागतच बोलायला... पुन्हा म्हातारी गिली आन गावातल्या एक दोन न्हाय सात बायका भाकरी घिवून आल्या, नुसत्या एक दिवस न्हाय तर सात दिवस.. कुणी असो नसो गावाकडं कुणी उपाशी राहत न्ह्याय...सात दिवसांन आय आली. आय म्हणाली, माज्या पोरानं एवढं दिसं काय खाल्लं, कसं राह्यलं कुणास ठावक.. आज त्याला पायजे त्ये करून घालते... मला इचारलं सांग नुसतं काय पायजे तुला... मी म्हणलं..''चटणी भाकरी’ कर.. !

(सदराचे लेखक ‘गावाकडच्या गोष्टी’ या यू ट्यूबवरील वेबमालिकेचे लेखक - दिग्दर्शक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT