Womens Carnival Sakal
सप्तरंग

जैवविविधतेचा देश

इपिलेस हे कोलंबियाचं शेवटचं गाव आणि पुढे इक्वेडोर या देशाची सीमा सुरू होते. जेव्हा मी या सीमेवर पोहोचलो, तेव्हा तिथं हजारो लोक रांगेत उभे होते आणि तेवढेच जमिनीवर बसले होते.

सकाळ वृत्तसेवा

इपिलेस हे कोलंबियाचं शेवटचं गाव आणि पुढे इक्वेडोर या देशाची सीमा सुरू होते. जेव्हा मी या सीमेवर पोहोचलो, तेव्हा तिथं हजारो लोक रांगेत उभे होते आणि तेवढेच जमिनीवर बसले होते.

- नितीन सोनवणे nonviolenceplanet@gmail.com

इपिलेस हे कोलंबियाचं शेवटचं गाव आणि पुढे इक्वेडोर या देशाची सीमा सुरू होते. जेव्हा मी या सीमेवर पोहोचलो, तेव्हा तिथं हजारो लोक रांगेत उभे होते आणि तेवढेच जमिनीवर बसले होते. हे सर्व पाहून मला वाटलं, ‘आता खूप वेळ लागेल इक्वेडोर या देशात प्रवेश मिळवायला.’ मीही त्या रांगेत उभा राहिलो. काही वेळ थांबल्यावर समजलं की, हे सर्व लोक व्हेनेझुएला या देशातील निर्वासित आहेत आणि इतर देशांच्या आश्रयाला आले आहेत. ते त्यांची कागदपत्रं तयार करत होते. या निर्वासित लोकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी रेड क्रॉस ही जागतिक आरोग्य संघटना काम करत होती. या निर्वासितांमध्ये लहान मुले होती, या सर्वांचं भविष्य खडतर आणि खूप कष्टाने भरलेलं असणार होतं. हे सर्व नवीन देशात स्थिर होण्याचं स्वप्न घेऊन पुढे चालले होते. मी एक प्रवासी असल्यामुळे माझं काम लगेच झालं आणि मी इक्वेडोर देशात प्रवेश केला. इथे भारतीय नागरिकांना व्हिसा घेण्याची गरज नाही, त्यामुळं कुणीही भारतीय विमानाचं तिकीट काढून इक्वेडोर या देशात थेट जाऊ शकतो.

मी इक्वेडोरची राजधानी क्विटो या शहराच्या दिशेने सायकल यात्रा सुरू केली. पहिला दिवस खूप अविस्मरणीय होता. पावसानं माझं स्वागत केलं आणि सुंदर अशा डोंगरांतून छोटी छोटी सुंदर अशी गावं माझ्या सायकलने मी पार करत पुढे जात होतो. वाटेत मला काही पांढरेशुभ्र लामा प्राणी दिसले, जे माझ्यासाठी नवीन होते. सायंकाळ झाली तेव्हा मी एका चोता दरीमध्ये पोहोचलो, जिथे चोता नदी वाहत होती. येथील कापूरया नावाच्या गावात मला काही सांस्कृतिक मिरवणुका जाताना दिसल्या. हे रिओ दि जानेरोमधील कार्निवलसारखं होतं. इथे काही महिला एकसारखे कपडे घालून समूहनृत्य करत होत्या. एकेक नृत्यमंडळ आपलं नृत्य सादर करत होतं. येथील सर्व लोक हे आफ्रिकन वंशाचे होते, त्यांना इथे आफ्रो-इक्वेडोरयान असं म्हणतात.

इक्वेडोर हीसुद्धा स्पॅनिश देशाची वसाहत होती आणि या भागात उसाच्या शेतीसाठी आफ्रिकेच्या लोकांना गुलाम म्हणून आणलं होतं. सात टक्के लोक हे आफ्रो-इक्वेडोरयान आहेत. अमेरिकेत वंशवाद हा खूप मोठ्या प्रमाणात होता आणि तो अजूनही आहे, हे मी अनुभवलं होतं; पण स्पॅनिश वसाहतीमध्ये मात्र तो मोठ्या प्रमाणात पहायला मिळत नाही. स्पॅनिश लोकांनी आफ्रिकन लोकांशी लग्न केलं होतं; पण अमेरिकेतमध्ये असं घडलं नाही. सध्या तिथे अशी लग्नं होतात; परंतु त्यांची संख्या नगण्य आहे. असंच काहीसं आपण भारतात पाहतो. अजून आपल्या इथे आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह यांचा स्वीकार फार कमी आहे.

आंतरजातीय, वंशीय आणि धर्मीय विवाह हे माणसामाणसांतील अंतर दूर करतील. महात्मा गांधी यांनी आपल्या शेवटच्या काळात जातिअंतासाठी आंतरजातीय विवाहांना महत्त्व दिलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की, ते फक्त दलित आणि दलितेतर यांच्यामधील विवाहांना उपस्थित राहतील, इतर विवाहांसाठी उपस्थित राहणार नाहीत. माझा जन्म नावाचा अपघात हा भारतातील दलित समाजात झाला. इथे मी अपघात म्हणत आहे, कारण आपण कोणत्या जातीत जन्माला यावं यासाठी जन्मापूर्वी कोठे अर्ज करण्याची व्यवस्था नसते. आपल्या भारत देशात सर्वांत जास्त हिंसक गोष्ट जी आहे, ती म्हणजे जात व्यवस्था.

ही विचित्र व्यवस्था मूठभर लोकांच्या फायद्यासाठी इतर लोकांना गुलामीत आणि गरिबीत टाकते. लहानपणी नकळत ही व्यवस्था करोडो बालकांचं माणूसपण काढून घेते आणि आपण कमी किंवा उच्च आहोत ही जाणीव मनात भरते. मी जेव्हा मोठा झालो, तेव्हा एक उच्च जातीची मुलगी म्हणाली, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, कारण तू खालच्या जातीचा आहेस आणि मी जर लग्न केलं, तर माझे वडील मला मारून टाकतील. त्यानंतर मी ठरवलं की, मी जर भविष्यात लग्न केलं तर ते भारतीय मुलीशी करणार नाही. अशा या हिंसक जातरचनेत मी वाढलो आणि त्या न दिसणाऱ्या हिंसेने मला आणि अनेकांना खूप वेळा मारलं.

आपण या सामाजिक ओळखीपेक्षा वेगळे आहोत आणि ही रचना चुकीची आहे आणि ती कशी नष्ट करता येईल यासाठी काम करणं महत्त्वाचं आहे. माझ्या या जीवनाच्या शोधयात्रेसाठी ही जात व्यवस्था काही अंशी महत्त्वाची ठरली असं मला वाटतं. जेव्हा मी सलग ५ वर्षं जगातील ४६ देशांत पायी आणि सायकलने प्रवास करत होतो, तेव्हा भारत देशाचं नाव उंच करत होतो, कारण परदेशात माझी ओळख भारतीय अशीच होती; पण जेव्हा भारतात परतलो, तेव्हा लोक मला माझी जात विचारू लागले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे मी शिक्षण घेऊ शकलो आणि पुढे महात्मा गांधी यांचा विचार घेऊन जगभरात गेलो. ही दोन महान माणसं माझ्या जीवनात महत्त्वाची आहेत. त्यांच्या दोघांत वैचारिक मतभेद होते; पण मनभेद कधीच नव्हते. शांती म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न खूप लोकांना असतो. मला गवसलेला शांतीचा अर्थ खूप विशाल आहे, त्यात मन, विचार, समाजरचना, देश-विदेश आणि पर्यावरण यांमध्ये एकता आणि एकमेकांची काळजी. जोपर्यंत आपल्या भारतीय समाजात जाती व्यवस्था आहे, तोपर्यंत हा देश अशांत आहे. काही लोकांशी जेव्हा मी जात व्यवस्थेबद्दल बोलतो, तेव्हा ते म्हणतात, ‘कुठे आहे आता जातिवाद?’ आणि काही लोक तर म्हणतात की, आधीच्या काळी अशी व्यवस्था भारतात नव्हती. असं बोलणारे पुड्या सोडत आहेत एवढंच मी सांगेन, कारण त्या माणसाला वर्तमान स्थितीबद्दल काही करायचं नसतं आणि विषय भरकटवायचा असतो. याबद्दल पुढे बोलूच; पण आता इक्वेडोरबद्दल समजून घेऊ.

इक्वेडोर या देशाच्या उत्तरेला कोलंबिया, दक्षिणेला पेरू आणि पश्चिमेला प्रशांत महासागर आहे. इक्वेडोर म्हणजे विषुववृत्त, यावरून देशाचं नाव इक्वेडोर पडलं. विषुववृत्त आपल्या पृथ्वी ग्रहाच्या मध्यभागी असलेली काल्पनिक रेषा आहे, ज्याने पृथ्वीचे दोन भाग पडतात; उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. इक्वेडोर हा देश भारतासारखा विकसनशील देश आहे आणि त्याची लोकसंख्या १ करोड ८२ लक्ष एवढी आहे. अँडी पर्वत, प्रशांत महासागर किनारा, अमेझॉन जंगल आणि गॅलापागोस बेटं हे चार मुख्य भौगोलिक प्रदेश आहेत. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा येथील बर्फ वितळला, तेव्हा उत्तर आणि मध्य अमेरिकेतून काही सभ्यता इथे आल्या आणि विकसित झाल्या. पुढे स्पॅनिश वसाहतींपूर्वी दक्षिणेतील इंका सभ्यतेने इथे राज्य केलं होतं.

या देशात उच्च पातळीची जैवविविधता आहे आणि आपल्याला माहीत असलेली गॅलापागोस बेटं या देशाचा भाग आहे. गॅलापागोस या बेटांवरील जैवविविधता पाहून चार्ल्स डार्विनने उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडला. ही बेटं पाहण्यासाठी जगभरातील लोक इथे येतात. मानवी अधिकाराप्रमाणे निसर्गाचे अधिकार मान्य करणारा इक्वेडोर हा जगातील पहिला देश आहे. केळीच्या निर्यातीत इक्वेडोर हा जगात पहिल्या क्रमांकावर आहे. इथे कोका (चॉकलेट) लागवड केली जाते. मका, बटाटे आणि कसावा यांचंही पीक घेतलं जातं. इथे स्पॅनिश भाषा बोलली जाते. देशाचं अधिकृत चलन हे अमेरिकन डॉलर आहे.

ग्रामीण भागात मी काही मूळ निवासी असलेल्या लोकांना भेटलो. त्यात बहुतेक महिला या पनामण टोपी घालतात, हे मी पहिल्यांदाच पाहिलं. मी जेवण करण्यासाठी एका मंडईत गेलो होतो, तिथे सर्व गोष्टी मिळतात आणि सोबत जेवणाचीही व्यवस्था असते. ‘शाकाहारी जेवण इथे मिळेल का?’ हे मी विचारत राहिलो; पण तिथे फक्त मांसाहारी जेवण मिळत होतं. मला शेवटी उकडलेले बटाटे आणि मका मिळाली. या मंडईमध्ये बहुतांश खरेदी आणि विक्री करणाऱ्या महिला होत्या. काही महिला आपल्या शेतातून फळं-भाज्या विक्रीसाठी घेऊन येतात. पुढे रस्त्यावर खूप ठिकाणी पुतळे, जे की येथील जीवनपद्धती आणि इतिहास सांगत होते. इथलं जीवन संथगतीने आणि शांतीत चालू असतं, मी ते अनुभवत पुढे क्विटो शहरात पोहोचलो.

(सदराचे लेखक सायकलवरून जगभर भ्रमंती करतात आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रसार करतात.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hatkanangale Assembly Election 2024 Results : हातकणंगले मतदारसंघात महायुतीच्या अशोकराव मानेंनी 46 हजार 397 मतांनी मिळवला विजय

राष्ट्रपती बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना आमदारही बनता येईना ; निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आकडा वाचून बसेल धक्का !

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पराभवानंतर काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी, राजीनाम्याची केली मागणी

Dilip Sopal won Barshi Assembly Election : बार्शीमध्ये दिलीप सोपलचं! शिवसेना शिंदेच्या राजेंद्र राऊतचा पराभव

Rais Shaikh Won In Bhiwandi East Assembly Election : भिवंडी पूर्वेत रईस शेख विजयी; शिवसेनेच्या संतोष शेट्टींचा मोठ्या फरकाने पराभव

SCROLL FOR NEXT