वर्धा येथून ५-६ लोकांसोबतचा प्रवास... नंतर मुंबईतून अजय सोबत होता. नियोजित वेळापत्रकानुसार अजय कंबोडिया देशातून भारतात परतला.
- नितीन सोनवणे nonviolenceplanet@gmail.com
वर्धा येथून ५-६ लोकांसोबतचा प्रवास... नंतर मुंबईतून अजय सोबत होता. नियोजित वेळापत्रकानुसार अजय कंबोडिया देशातून भारतात परतला. त्याची सायकल आम्हाला तिथं विकावी लागली, कारण ती परत घेऊन जाण्याचा खर्च खूप होता. आता व्हिएतनामच्या दिशेने एकट्याचा प्रवास चालू झाला. मनात खूप भीती होती की आपण एकटा कसा प्रवास करणार? कोणी मला अडवले तर? अजय काही महिने माझ्या सोबत होता व त्यामुळे जास्त कुठे भीती जाणवली नव्हती. आम्ही एकदुसऱ्याची काळजी घेत होतो. या देशामध्ये अजयला शाकाहारी जेवण मिळणे खूप कठीण होते. मलाही ते पाहवत नव्हते. तो कधी कधी एक एक भाताचा कण घेऊन खात असे. तो परत भारतात परतला. यानंतर आम्ही ज्यांच्या सोबत राहत होतो, ते भन्ते रतन यान, यांच्या शुभेच्छा घेऊन दुसऱ्या दिवशी माझा ‘एकला चलो रे’चा प्रवास सुरू झाला.
मनामध्ये भीती, खूप साऱ्या शंका आणि थोडा उत्साहही होता. संमिश्र मानसिक स्थिती होती ती. मी कुठे सैराट होऊन अडकून पडेल की काय? मी एकटा स्वतंत्र होऊन नवीन दुनियेत प्रवेश करत आहे, सोबत गांधीजी यांचा फोटो, त्यांच्या विचारावर चालू झालेला हा प्रवास म्हणजे खूप मोठी जबाबदारी होती, आपल्या कडून एखादी चूक झाली, तर महात्मा गांधी आणि भारताचे नाव खराब होऊ शकते, याची पावलोपावली जाणीव मला पाच वर्षे होती. आता मी खऱ्या अर्थाने स्वतंत्रपणे सत्याच्या शोधात प्रवासाला लागलो. असा प्रवास सहजासहजी भारतात अनुभवता येत नाही. आपला समाज हा आपल्याला प्रत्येक कृतीला सतत कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांच्या विचार क्षमतेनुसार नियंत्रित करू पाहत असतो, यामुळे नवीन काही पद्धतीने जगणं वा वेगळा विचार मांडणं यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो आणि ते फार कठीण असतं.
फ्नॉम पेन्ह या शहरापासून तीन दिवसांत १९० किमीचा प्रवास करून मी बावेत या शहरात आलो, जिथून व्हिएतनाम अवघे पाच किलोमीटर दूर होतं. रात्री एका बुद्ध विहारात पोहचलो. तेथील मुख्य भन्ते तरुण होते, त्यांच्या सोबत माझी चांगली दोस्ती झाली. त्यांच्यासोबत बरीच चर्चा झाली आणि मी तेथील एका मोठ्या खोलीत मच्छरांपासून संरक्षण व्हावं यासाठी तंबू टाकून, बाजूला सायकल ठेवून झोपी गेलो. सकाळी उठलो तर बाजूला आणखीन एक तंबू मी पहिला. एक रशियन मुलगी आणि मुलगा त्यात होते, त्यांच्यासोबत थोडसं बोलल्यानंतर मला समजलं की ते हिचहायकिंग (मिळेल या गाडीने लिफ्ट घेऊन प्रवास करणं) करत आहेत. दोन वर्षे मिळेल त्याला हाथ दाखवून प्रवास... मला हे खूप कुतूहलाचा वाटलं आणि आपल्या प्रवासातही अशीच मदत होत राहील यासाठी वैश्विक शक्तीकडून मिळालेला एखादा संकेत मला वाटला. व्हिएतनामवरून कंबोडिया येथे ते आले. गेली दोन वर्षे ते असा कमी खर्चाचा प्रवास करत होते. वयाने ते माझ्यापेक्षा थोडे मोठे होते. त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ, त्यांचे राहणीमान खूप सामान्य होते. त्यांच्याकडून मी व्हिएतनामबद्दल माहिती घेतली आणि काही शब्द शिकलो. त्यांचा निरोप घेऊन मी सकाळीच व्हिएतनाममध्ये प्रवेश केला आणि ‘हो ची मिन’ या सर्वांत मोठ्या शहराकडे निघालो.
बत्तीसशे साठ किलोमीटरची किनारपट्टी लाभलेला व्हिएतनाम हा एक खूप सुंदर देश आहे. प्रचंड मनुष्यबळ असलेला एक उभरता देश म्हणून आपण याकडे पाहू शकतो. मी प्रवास केलेला हा माझा पहिला साम्यवादी देश होता, जेव्हा मी प्रवेश केला तेव्हा इथे कंबोडियाचे खूप सारे कामगार कामासाठी मोठ्या वाहनातून व्हिएतनाममध्ये प्रवेश करत होते. इथं कपडे आणि बुटं बनविण्याचे खूप कारखाने आहेत. वाटेत मी खूप साऱ्या मूर्ती पहिल्या. त्या दगड आणि लाकडाच्या होत्या. खूपच कुशल शिल्पकार या देशात आहेत. पुढे चीनमध्ये मी अशा वस्तूंची मागणी पहिली आहे. पहिले दोन दिवस मी एका विहारामध्ये राहिलो. व्हिएतनाममध्ये महायान बुद्धिझम आहे. येथील माँक हे शाकाहारी आहेत. त्यांचे पदार्थ खूप वेगळे आहेत, जे की बाहेर हॉटेलमध्ये मिळत नाहीत. ५-६ करुणामय भन्ते तिथे राहत होते आणि त्यांनी मला छोट्या छोट्या भेटी दिल्या. मी जेव्हा प्रमुख भन्तेंना विचारलं की, मला तुमच्या सोबत एक फोटो घ्यायचा आहे, तेव्हा ते अत्यंत प्रसन्न मुद्रेने स्मितहास्य करत म्हणाले, ‘‘जर तू परत इथे यायचं वचन देत असेल तर काढ.’’ मी त्यासाठी होकार दिला आणि त्यांच्या परवानगीने फोटो काढला. अशी खूप आपुलकीची माणसं मला जगभरात मिळाली.
जेव्हा आपण निर्मळ आणि प्रेमाच्या भावनेने कोणाला भेटत असतो, तेव्हा पुन्हा आपल्याला कितीतरी पटीने प्रेमच परत मिळते, याची असंख्य उदाहरणे मी अनुभवली आहेत.
मी, ‘हो ची मिन'' या शहरात प्रवेश केला. आत्तापर्यंतच्या प्रवासात सायकलच्या सीटमुळे खूप त्रास होत होता. नवीन सीट घेण्यासाठी चंदू धांडे या माझ्या मित्राने मदत केली. दूरच्या प्रवासासाठी चांगली उपकरणे सोबत असणे गरजेचे असते, हे मला हळू हळू समजत गेले. ‘हो ची मिन’ या शहराचे पूर्वीचे नाव साईगॉन हे होते. व्हिएतनाम युद्ध हे जगप्रसिद्ध आहे. या युद्धात खूप मोठे नुकसान झाले आहे. त्याचे परिणाम आजही इथे दिसतात. युद्धात अमेरिकेने वापरलेल्या रासायनिक बॉम्बमुळे आजही काही लोक अपंग जन्माला येतात. अशाच एक संघटनेला मी भेट दिली जे या लोकांना मदत करतात. व्हिएतनाम युद्धाच्या स्मरणतः येथे एक खूप मोठे संग्रहालय उभारलं आहे, ते मी पहिले. हे युद्ध थांबावे यासाठी कोलकतामध्ये मोठा मार्च काढण्यात आला होता, याचाही फोटो येथे मी पहिला. याचबरोबर ‘हो ची मिन’ यांच्या भारतभेटीचे काही फोटोही होते. या संग्रहालयातील फोटो-वस्तू याहून युद्धाची दाहकता यातून स्पष्ट दिसली. या युद्धात १३ लाखांहून अधिक लोकांची जीवितहानी झाली होती, वित्तहानीचा तर विचारच नको. युद्धाचं करण काहीही असो, परंतु युद्धाचे मानवते वरील परिणाम हे खूप विचार करायला लावणारे आहेत.
(सदराचे लेखक जगभ्रमंती करणारे व महात्मा गांधी यांच्या विचाराचे प्रसारक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.