Texas Country Sakal
सप्तरंग

प्रगतीची संधी देणारा देश...

टेक्सास हे राज्य म्हणजे एक देश असता, तर टेक्सास हा जगातील क्रमांक तीनचा तेल उत्पादक देश असता, फक्त रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यामागे.

सकाळ वृत्तसेवा

टेक्सास हे राज्य म्हणजे एक देश असता, तर टेक्सास हा जगातील क्रमांक तीनचा तेल उत्पादक देश असता, फक्त रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यामागे.

- नितीन सोनवणे nonviolenceplanet@gmail.com

नाचेझ शहरातून मी सकाळी निघालो. काही अंतर पार केलं. पाऊस सुरू झाला हे समजताच, ख्रिस्टिना या माझ्या मैत्रीणीनं आपल्या कारने मला पिकअप करून माझी राहण्याची व्यवस्था तिच्या सुंदर अशा हॉटेलमध्ये केली. सोबत हकीम अबू या जॉर्डनमधील, परंतु अमेरिकेत स्थायिक मित्राने जेवणाची उत्तम सोय केली. दुसऱ्या दिवशी तेथील प्रसिद्ध वृत्तपत्रात पहिल्या पानावर मी केलेल्या शाळेतील भाषणासंबंधीची बातमी छापून आली आणि लोक मला तिथं ओळखू लागले. पावसामुळे एक दिवसाचा आराम करून मी दुसऱ्या दिवशी मिसिसिपी नदी पार केली आणि लुजियाना या नवीन राज्यात प्रवेश केला. १३० किमी सायकल प्रवास करून मी अलेक्सझान्द्रीया या शहरात नारायण पटेल यांच्या मोटेलमध्ये राहिलो आणि पुढे लेक चाल्सवरून सबिन नदी पार करत टेक्सास राज्यात प्रवेश केला. टेक्सास हे अमेरिकेतील क्षेत्रफळाच्या दृष्टीने अलास्कानंतरचं दोन नंबरचं सर्वांत मोठं राज्य.

आपण खूप वेळा या टेक्सासबद्दल ऐकत असतो. हे अमेरिकेचं दक्षिण टोक आहे आणि खाली मेक्सिको सुरू होतं. मोठ्या प्रमाणात शेती आणि सोबत औद्योगिकीकरण यामुळे टेक्सास समृद्ध होत आहे. सायकल चालवत असताना मला वाटेत खूप सारी यंत्रं दिसत होती, जी चोवीस तास चालू असत. नंतर समजलं की त्यातून जमिनीतून तेल काढण्याचे काम सुरू आहे.

टेक्सास हे राज्य म्हणजे एक देश असता, तर टेक्सास हा जगातील क्रमांक तीनचा तेल उत्पादक देश असता, फक्त रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यामागे. त्यामुळे हे राज्य जगातील खूप साऱ्या लोकांना आकर्षित करतं. इथं मध्य अमेरिकेतून स्थलांतरित झालेले, ज्यांना हिस्पॅनिक असं मानतात, असे खूप लोक राहत, तसंच आफ्रिकन आणि आफ्रिकन -अमेरिकन यांचीही संख्या जास्त आहे. ह्यूस्टन आणि ऑस्टिन या शहरांत खूप सारे भारतीय लोक राहतात.

टेक्सासमध्ये मी खूप साऱ्या विद्यालयांत गांधीविचार आणि माझे अनुभव यावर व्याख्यानं केली. शिक्षकांनी मला यात्रेसाठी आर्थिक मदत केलीच, सोबत पुढील प्रवासात काही लोकांशी परिचय करून दिला आणि राहण्याची व्यवस्थाही केली. इथं टेक्सासमध्ये खूप प्रेम मिळालं. हार्डीन नावाच्या गावाबाहेर मार्क नावाच्या एका ६०-६५ वर्षांच्या मित्राने माझी राहण्याची व्यवस्था त्याच्या घरी केली. तो खूपच संवेदनशील होता, त्याच्याकडे खूप मोठी शेती होती आणि त्यामध्ये येणारा भाजीपाला आणि फळं यांना तो यंत्राने सुकवून त्यांचा साठा करी आणि हा त्याचा मोठा छंद होता. सोबत, मासेमारी करणे हेही त्याच्या आवडीचं काम. मला हे टेक्सासमधील लोक आपल्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील असल्यासारखे वाटले, कारण हे लोक खूप मनमिळवू आणि सुंदर जीवन जगणारे होते. पण त्यांच्यामध्ये अजून एका गोष्टीचं साम्य होतं ते म्हणजे, इथं असलेला वर्णभेद, म्हणजे काळ्या रंगाच्या आफ्रिकन आणि सोबत हिस्पॅनिक लोकांचा तिरस्कार आणि भेदाभेद, अगदी जसा आपल्या ग्रामीण भागातील जातिवाद आणि भेदाभेद.

या यात्रेत मी जगातील काही अशाही गावांत राहिलो, जी आपल्याला शांती आणि खूप सारे पर्याय बहाल करत. असो, मी तुम्हाला मार्कबद्दल सांगत होतो. तर, मार्कला २ मुली होत्या. एक त्याच्यासोबत होती, ती एक माजी सैनिक आणि अफगाणिस्तान या देशात सेवेला होती. तिला मी विचारलं की, युद्धाने किंवा हिंसेने शांती मिळू शकते का? तर तिचं उत्तर होतं ‘नाही’, आणि शांती हाच पर्याय आहे शांतीसाठी. ती महात्मा गांधीजींचा खूप आदर करत होती आणि त्यामुळे माझाही करू लागली. तिच्या लहान मुलासोबत मी बराच खेळत होतो.

मार्कची दुसरी मुलगी ही शहरात राहत होती आणि ती लेस्बियन होती आणि तिला एक गर्लफ्रेंड होती. अमेरिका जरी खूप प्रगत देश असला तरी इथं LGBT लोकांसाठी चांगलं सामाजिक स्थान नाही. त्यातही दक्षिणेकडील राज्यं, जिथं पुराणमतवादी विचारांचा जास्त पगडा. मार्क आपल्या मुलीमुळे दुःखी होता की त्याची मुलगी लेस्बियन आहे. त्याची ही खंत त्याने मला सांगितली आणि विचारलं की, ‘याबद्दल महात्मा गांधी यांचं काय मत असतं?’ मी उत्तर दिलं की वैज्ञानिकदृष्ट्या हे एक सत्य आहे आणि गांधीजी नेहमी सत्याच्या बाजूला उभे राहत. अहिंसा आणि सत्य या महात्मा गांधी यांच्या विचारांविषयी आणि माझे यात्रेतील अनुभव यावर आम्ही खूप वेळ बोललो. माझ्या लोकाधारावर असलेल्या यात्रेविषयी त्याला खूप आदर होता. तो एक ख्रिश्चन होता आणि जेरुसलेममधून आणलेला, तेथील ओक झाडाच्या लाकडापासून बनवलेला एक क्रॉस आणि एक चांदीचा शिक्का त्याने मला भेट दिला. त्याची श्रद्धा असलेल्या येशूच्या गावाजवळील ह्या गोष्टी होत्या आणि त्या स्वीकारताना मीही भावुक झालो. त्या वस्तू मी पुढे काही सुंदर मनाच्या लोकांना भेट दिल्या.

ह्यूस्टन शहरात माझी ओळख अतुल कोठारी आणि रमेशभाई पटेल यांच्याशी झाली आणि ते मला शहराच्या कानाकोपऱ्यात घेऊन गेले व सोबत भारतीय लोक आणि शांतीसाठी काम करणाऱ्या संस्थाच्याही भेटी घडवल्या. अतुल भाई हे गांधी लायब्ररी या संस्थेचं काम पाहतात. ही संस्था महात्मा गांधीजींच्या विचारांचा टेक्सासमध्ये प्रसार करण्याचं काम करते. येत्या काही वर्षांत ह्यूस्टन शहरात एक सुंदर आणि भव्य महात्मा गांधी संग्रहालय होणार आहे आणि त्याचं काम जोरात चालू आहे. अमेरिकी सरकार यासाठी आर्थिक मदत करत आहे, कारण त्यांना माहीत आहे की, या भारतपुत्र महात्मा गांधी यांचं जीवन किती प्रेरणादायी आहे. पुढे ऑस्टिन या शहरात मी काही दिवस राहिलो जे की माझं आवडतं शहर बनलं. याचं कारण नवीन संस्कृती. ऑस्टिनमध्ये खूप तरुण राहतात. शहराच्या मध्यभागातून नदी जाते आणि त्या पात्रात सायकल आणि चालण्यासाठी सुंदर असा मार्ग बनवला आहे. तिथं चालणं वा सायकल चालवणं हे खूप शांतीपूर्ण होतं.

सहा महिने मी या बलाढ्य देशात सायकल यात्रा करत होतो आणि हा कालावधी जीवन समृद्ध करणारा होता. सोबत जीवनाचे खूप सारे आयाम दाखवत होता. मी अमेरिकेबद्दल खूप नकारात्मक गोष्टीही सांगितल्या. इथं सामाजिक प्रश्न आहेत; पण त्यांच्या सकारात्मक बाजू पहिल्या तर त्यामध्ये अमेरिकेत असणारी चालण्या-बोलण्याची स्वतंत्रता, जसं मी ओकाइनावामध्ये अमेरिकन सैन्याविरोधात केलेल्या आंदोलनाबद्दल मला कुठंही काही त्रास दिला गेला नाही. राष्ट्राध्यक्षांच्या घरासमोरही एखादी व्यक्ती टेन्टमध्ये राहून १०-१५ वर्षं आंदोलन करू शकते. तेच मी दिल्ली इथं युक्रेन आणि रशिया यांच्या दूतावासासमोर युद्ध होऊ नये म्हणून शांती पदयात्रा करत होतो, तर दिल्ली पोलिसांनी मला धमकी देऊन तेथून हाकलून दिलं.

न्यूयॉर्कमधील मेट्रोमधून प्रवास करताना मला त्या मेट्रोच्या डब्यात पूर्ण जगातील लोक दिसत होते, हे चित्र मी कुठंच नाही पहिलं. विज्ञान आणि तंत्रज्ञान यामधील चाललेल्या प्रगतीमुळे या देशाने खूप मोठं योगदान जगासाठी दिलं आहे आणि देत आहे. याचा फायदा मानवजातीस होत आहे.

इथं जगभरातील लोक राहतात आणि येथील मूळ स्थानिक लोकही त्यांना सामावून घेतात आणि यातून मानवी विकासाच्या उच्चांकावर जातात. कलांमध्ये विशेषकरून हॉलिवूडचे चित्रपट आणि संगीत जे जगाला प्रभावित करतं आणि सोबत जगातील तरुणांना एका गोष्टीवर एकत्र आणतं. अमेरिका ही शक्यता आणि संधीची भूमी आहे आणि त्यामुळे खूप भारतीय लोक तिथं जाण्यासाठी खूप संघर्ष करतात. जर आपल्याला नवीन काही तरी प्रयोग किंवा निर्माण करायचं असेल, तर हा देश म्हणजे मशागत केलेली जमीन आहे. भेटू मेक्सिकोमध्ये.

(सदराचे लेखक जगभर भ्रमंती कऱणारे असून महात्मा गांधी यांच्या विचाराचे प्रसारक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लोकसभेचा उत्साह सातव्या आसमानावर; विधानसभेत भ्रमाचा भोपला फुटला, काँग्रेसच्या आत्मविश्वासानं MVAचा खेळ केला?

Abhimanyu Pawar won Aausa Assembly Election : औसा मध्ये फडकला भाजपाचा झेंडा! अभिमन्यू पवारांचा भव्य विजय

Kopri Pachpakhadi Assembly Election 2024 Result: येऊन येऊन येणार कोण! कोपरी पाचपाखाडीत एकनाथ शिंदेंचा एकहाती विजय; केदार दिघेंचा लाजिरवाणा पराभव

Karveer Assembly Election 2024 Results : करवीर मतदारसंघात पुन्हा 'चंद्रदीप'; अतिशय चुरशीच्या लढतीत राहुल पाटलांचा अवघ्या काही मतांनी पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

SCROLL FOR NEXT