सप्तरंग

निरलंकारी प्रगल्भता!

व्यक्त होणं माणसाचं काम आहे. पण, आयुष्याला आपण व्यक्त होऊच देत नाही. आयुष्याने व्यक्त व्हायला आपण नुसतं असायला हवं. नुसतं ‘असायचं’ ही अवस्था उकलून सांगता येणार नाही. ती उकलून सांगायची; तर आध्यात्मिक भाषाच वापरावी लागेल.

सकाळ वृत्तसेवा

बुकथॉट

वय झालं की प्रगल्भ स्त्रीचा अलंकारांचा सोस सुटतो. तसा कवितेचा निरनिराळ्या सजावटीचा अलंकरणाचा सोस सुटला पाहिजे. तसं मीनाक्षी पाटील यांच्या ‘ललद्यदस् ललबाय’ कवितेत घडलं आहे. म्हणून ती निरलंकारी (निरहंकारी) वाटते.

-रवीन्द्र दामोदर लाखे

व्यक्त होणं माणसाचं काम आहे. पण, आयुष्याला आपण व्यक्त होऊच देत नाही. आयुष्याने व्यक्त व्हायला आपण नुसतं असायला हवं. नुसतं ‘असायचं’ ही अवस्था उकलून सांगता येणार नाही. ती उकलून सांगायची; तर आध्यात्मिक भाषाच वापरावी लागेल. नुसतं असण्याची गती टोकाची असते. खूप वेगात फिरणारं चक्र आपल्या चर्मचक्षूंना जसं स्थिर भासतं तशी तिथं गती नि स्थिती एक झालेली असते. या अतिन्द्रिय अनुभवाचं जसंच्या तसं वर्णन करता येणार नाही. तशा अतिन्द्रिय अनुभवाची ही ‘ललद्यदस् ललबाय’ कविता नुसतं

असण्याची आहे.

‘ललद्यदस् ललबाय’मधील दुसऱ्या कवितेच्या (खरं तर ती पहिलीच कविता) सहाव्या भागात कवीने म्हटलंय, की पहिल्याच कवितासंग्रहात एक कवी म्हणून काय सांगायचं आहे, ते मी सगळं काही सांगून टाकलंय. आता नवीन काय सांगायचं? तरीही अखेर कवयित्रीने या नव्या संग्रहात खूप काही आत्ममौलिक असं सांगितलं आहे.

‘आपुले मरण मी...’ या शीर्षकाच्या कवितेत मला लल्ला तीव्रतेने आठवली. लल्लाचा जन्म माहीत नाही; मृत्यू माहीत नाही. आध्यात्मिकदृष्ट्या लल्लाचा लौकिक मृत्यू झालेला होता. तिला समाज जी वागणूक देत होता ती मेल्यासारखीच. तो मरणसोहळा कवयित्री मीनाक्षी पाटील यांनीही प्रत्यक्ष जगताना पाहिला आहे. हे अहंचं मरण आहे. इगोचं मरण आहे. या मरणाचा सोहळा अनुपम्य असणारच. मध्येच अशीही एक कविता आहे, की या जगात जगायचं तर कोमात जगणं चांगलं. कोमा म्हणजे जिवंत अशी मृतावस्था.

कवितेचे असतेपण महत्त्वाचं आहे. ते असतेपण मीनाक्षी पाटील यांच्या कवितेत आहे. कुणी किंवा काही होण्याच्या इच्छेपासून जागच्या जागी किंवा आत आत पळत राहिलेली ही कविता आता आपल्या, ‘आहे’ या मकामपर्यंत पोहोचलीय; परंतु अद्यापही कवित्व नि अस्तित्व एकात्म होण्याची या कवितेला वाट पाहावी लागणार आहे.

मीनाक्षी यांची कविता वाचताना, ॲडमने प्रथमच एखादं फूल पाहावं, तसा मला तिच्यातला प्रत्येक शब्द दिसला. त्या शब्दाभोवतीची आदिम शांतता ऐकू आली. मला शब्द कळला नाही - शब्दाला मी कळलो, असं मला जाणवलं. त्या शब्दाचा अनुभव मी झालो मग त्या अनुभवाची अनुभूती होताना मी वजा झालो. समोर उरलं ते त्या कवितेचं केवळ असणं. संतांच्या कवितेप्रमाणे त्यांची अवघी कविता संवादात्मक आहे. ती लल्लेश्वरीशी संवाद करतेय तो स्वतःला उद्देशून. तुका म्हणे... प्रमाणे. तिची भाषा संवादातून निर्माण झालीय. संवाद म्हटले, की त्या संवादातल्या टेक्स्टपेक्षा सबटेक्स्टला महत्त्व जास्त येतं. बहुतेक वेळा अर्थबहुलता देणारं सबटेक्स्ट अपघाताने कळतं नि त्यामुळे आपल्याला येणारं चकितपण एकुणात नवीन असतं. मीनाक्षी यांची चित्रं पाहतानाही मला माझा परीघ सोडावा लागला, जशी ही कविता वाचताना सोडावा लागतो. तिचं ‘लाईट विदीन’ नावाचं एकल चित्रप्रदर्शन मी पाहिलं होतं. माझं त्या चित्रांविषयीचं आकलन असं होतं की सजीवांप्रमाणे निर्जीव वस्तूतही गती असते. ती त्या वस्तूची चल अवस्था दर्शवते. गती म्हणजे कोणत्याही वस्तूच्या स्थितीत काळानुसार होणारा बदल होय. गती विविध भौतिक प्रणालींना लागू होते : कण, वक्रता आणि अवकाश-वेळ. एखादी प्रतिमा, आकार आणि सीमा हेदेखील गतीची भाषा बोलू शकतात; परंतु स्थिती आणि गती मीनाक्षी पाटील यांच्या या चित्रात आणि कवितेत एकात्म होते तेव्हा ही चित्रे पाहणाऱ्याला आणि तिच्या कविता वाचणाऱ्याला आपल्यातल्या ‘लाईट विदीन’ची दिशा दाखवतात. मीनाक्षी यांच्या नव्या कवितासंग्रहातही ‘लाईट विदीन’चाच शोध आहे. लाईट विदीन म्हणजे डीएनए म्हणावं का?

I think therefore I am या देकार्तेच्या तत्त्वज्ञानाच्या धर्तीवर मीनाक्षी म्हणते मी कविता लिहिते म्हणजे मी आहे. म्हणजे प्राणापलीकडे कवी कवितेशी अनन्य आहे. तिला दुसरं आयुष्य नाही. पहिल्या संग्रहात एका कवितेत कवयित्रीची मुलगी आई नवी गोष्ट सांगू शकत नाही, हे पाहिल्यावर आईला म्हणते,

नाहीतर एक कर ना

बदलूनच टाक सगळ्या गोष्टी

सुरुवातीपासून शेवटपर्यंत (१४ डीएनए)

सगळ्या गोष्टी उलटीकडून पाहाणं किंवा उलट्यापालट्या करून पाहाणं यानं त्या गोष्टींचे नवे आयाम सापडत जातात. या गोष्टींमध्ये आपल्या भावभावना आपले विचार, विकार, वासना हेही उलटसुलट करून पाहिलं जातं. कलानिर्मितीतलं एक रहस्यच मुलगी आईला सांगते. मुलीएवढा इनोसन्स कवीकडे असायला हवा. तोच इनोसन्स मिळण्याच्या क्षणाची वाट पाहणं म्हणजेच कलाकाराची साधना म्हटली जात असावी... असं आपण म्हणून टाकू या.

‘इज इट इन युवर डीएनए’ या कवितेत काळ आणि अवकाश यांची फारकत झालेलं जग आहे जे कवयित्रीला प्रश्न विचारतंय. भवतालात घडणाऱ्या घटनांवर व्यक्त होता येत नाहीय. भूकेचे, गर्दीचे, घराचे, भौतिक प्रगतीचे, खुर्चीचे असे अनेक प्रश्न कवीच्या मनात उद्भवतात. हे प्रश्न म्हणजेच खरं वास्तव असतं आणि ते कवीला निरुत्तर करतं- हा भवताल बदलणं आपल्याला शक्य आहे का? कवीला नाक्यानाक्यावर दिसतात अनेक होर्डिंग्ज-प्रत्येक होर्डिंग विचारत असतं इज इट इन युवर डीएनए? हे सारं मी बदलवू शकेन, असा माझा पिंड आहे का? मार्केटिंगचा हा जमाना, हे ग्लोबलाईज्ड जग जणू काही विचारतं आहे की आमच्यात जगण्याचं डीएनए तुझ्यात आहे का? उंच उंच आणि भव्य उभारलेली होर्डिंग्ज हे झेंडे आहेत. उंच आणि महान होण्याची स्पर्धा करणाऱ्या माणसांच्या भौतिक प्रगतीचे. या जगात पहिलं पाऊल टाकल्या टाकल्या कवीला कळलं होतं हे माझं जग नाही. तरी ती घर नावाचं जिगसॅा पझल जोडायचा प्रयत्न करत राहिली; पण लोक ते उधळत राहिले.

एक अखंड असं घर नसतंच. त्या घरातल्या प्रत्येकाचं घर वेगळं असतं. जेवढी घरात माणसं तेवढे घराचे तुकडे असतात नि त्या तुकड्यांचे आकार बरोबर दुसऱ्या आकाराशी जुळवायचे असतात. या माझ्या म्हणण्याला पुष्टी देणारी या संग्रहातली पहिली कविता आहे. एक स्पष्टीकरण : ललद्यदस् म्हणजे चौदाव्या शतकातली काश्मिरी शैवसंत कवी लल्लेश्वरी किंवा तिला लल्ला अरिफ असंही म्हटलं जातं. तर ती पहिली कविता आहे ललद्यदस् ललबाय अर्थात ललबाय म्हणजे अंगाईगीत- लल्लेश्वरीला कवयित्री सांगते आहे की, एक अंगाईगीत या अखिल विश्वासाठी गा. या युगाला एका शांत झोपेची गरज आहे. या युगाला एखादं सुंदर स्वप्न तरी पडेल किंवा खडखडीत जाग तरी येईल कायमची! ती अंगाई केकिरव वृत्तात गा. केकि केका म्हणजे मोर. मोर घरटं बांधत नाही. कुटुंब करीत नाही. मोरांच्या पिलांचा स्वतंत्र असतो कळप आणि नर मादीचेही वेगवेगळे. या कवितेच्या सुरुवातीला उल्लेख केलेली दु:खे आहेत ती सगळी भिन्नलिंगी शरीर आणि मन यांच्या विसंवादातली आहेत. शरीराचं लिंग वेगळं आहे नि मनाचं लिंग वेगळं आहे. कुठल्याही भौतिक दु:खाचा यात उल्लेख नाहीय. कवीचा लल्लेश्वरीचा पिंड मोराचा म्हणावा का? म्हणून टाकू या.

हा नवा संग्रह कवयित्रीने लल्लाला अर्पण केला आहे म्हणजे संत लल्लेश्वरीला. लल्लेश्वरीच्या काव्याला वाख म्हटलं जायचं. हा वाख चार ओळींचा असतो. तसा काही स्पष्ट आकृतिबंध या कवितेने अवलंबिला नाहीय. धरण फुटल्यानंतर वाहणाऱ्या पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे ही कविता आपल्यासमोर येते किंवा पुरासारखी.

सर्व संग्रह वाचल्यावर जाणवलेल्या गोष्टींमध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कवितेतल्या काव्यात्मक चिंतनाचं प्रदर्शन कुठल्याही कवितेत कवयित्रीकडून मांडलं गेलं नाहीय. काव्यात्मक चिंतन नावाची ही गोष्ट अमूर्त असते. अमूर्त जे असते तेच केवळ सत्यांश देण्याची शक्यता असते. किंवा असं म्हणू की तेच केवळ सत्याकडे जाण्याची दिशा ओळखते. कवयित्री स्वत: चित्रकार, चित्रपटकार असल्यामुळे चित्रकारांचे अर्थपूर्ण उल्लेख तिच्या कवितेतली अमूर्तता अधिक समृद्ध करतात. उदाहरणार्थ : सालवादोर दाली वगैरे. आणि त्या मराठी भाषेच्या अभ्यासक असल्यामुळे निरनिराळ्या म्हणी, निरनिराळ्या बोधकथा यांचा समर्पक वापर त्यांनी आपल्या कवितेतील अमूर्तता सखोल करण्याकरता केला आहे.

वय झालं की प्रगल्भ स्त्रीचा अलंकारांचा सोस सुटतो. तसा कवितेचा निरनिराळ्या सजावटीचा अलंकरणाचा सोस सुटला पाहिजे. तसं या कवितेत घडलं आहे. म्हणून ही कविता निरलंकारी (निरहंकारी) वाटते. या कवितेत तपशिलांचा गजबजाट नाहीय. कुठल्या भूमिकेचा पाया घेऊन उंच होणारी ही कविता नाहीय. एखाद्या कवितेच्या समग्र भानात व्यक्ती आणि समष्टीच्या आयुष्याचे सगळे आयाम दिसून येतात. तसं समग्र भान या कवयित्रीला आहे. स्वत:चीच कविता गिरवण्याचा प्रघात या संग्रहात दिसून येत नाही. रसिक आणि कविता यात एक विशिष्ट अंतर ठेवून जो आशय व्यक्त होतो तो एकूण मानवी जाणीव-नेणीवेच्या समग्रतेचा तळ गाठतो. याचं कारण मला वाटतं ते असं की, या कवितेच्या भावाशयाची मूळ सामग्री अंतर्मनातली (हृदयाच्या अंतर्हृदयातील) आहे; तर ही कविता मराठी कवितेत आपलं स्वतःच असं अनन्यसाधारण स्थान मिळवेल, याची मला खात्री आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT