Obsessed with foreign explorers of caves historical place archeological sector Sakal
सप्तरंग

विदेशी संशोधकाचा ध्यास लेण्यांचा

सकाळ वृत्तसेवा

- केतन पुरी

आपण बऱ्याच ठिकाणी हे ऐकत आलोय, की एखाद्या लेणीची निर्मिती चार-पाचशे वर्ष सुरू होती, किंवा एखाद्या मंदिरांची निर्मिती होण्यासाठी हजार वर्ष लागली. पण तुम्हाला सांगितलं, की एखाद्या लेणीची निर्मिती केवळ काही वर्षांमध्ये झाली आहे, तर त्यावर विश्वास ठेवणं आपल्याला काहीसं कठीण जाईल.

पण हे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलं एका विदेशी व्यक्तीनं. एक संशोधक भारतात येतो. इथल्या अत्युत्कृष्ट गोष्टीच्या प्रेमात पडतो. तब्बल ६५ वर्षे फक्त एकच ध्यास... एकच ध्येय... अजिंठा..! आपल्या देशाच्या संशोधन क्षेत्रातील मैलाचा दगड मानलं जाणारं संशोधन ज्यांनी केलं, ज्यांच्या अभ्यास आणि अध्ययनामुळं इतिहासाचा अभ्यासक्रम बदलला.

अजिंठ्याच्या लेणींचा आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्रातील इतरही लेणींचा दुर्लक्षित आणि काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेला इतिहास ज्यांनी अथक परिश्रमानं समोर आणला, ते महान संशोधक वॉल्टर स्पिंक. अविश्वसनीय वाटावं असं काम त्यांनी आपल्या संशोधनाद्वारे जगासमोर मांडलं.

अजिंठ्याच्या सर्वांत प्रसिद्ध लेणींची निर्मिती केवळ १८-२० वर्षांमध्ये झाली असल्याची गोष्ट पुराव्यासहित त्यांनी सिद्ध केली आहे, तब्बल अडीच हजारपेक्षा जास्त पानांमधून. त्यांनी केलेल्या संशोधनामुळे फक्त अजिंठाच नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मागं असणाऱ्या लेणी, वेरुळ, घारापुरी लेणींच्या निर्मिती काळाची सुद्धा पुनर्मांडणी करावी लागली.

त्यांचं संशोधन, आकलन आणि मांडणी यांविषयी आपण या लेखमालेतून समजून घेऊच. त्या आधी, अजिंठ्याच्या लेणींमागं असणाऱ्या निर्मात्यांचा इतिहास आणि त्यांचा शासनकाळ समजून घेण्याची गरज आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणाऱ्या अजिंठा आणि वेरुळच्या लेणी जगप्रसिद्ध आहेत. जागतिक वारसास्थळांच्या यादीत असणाऱ्या या लेणींना दरवर्षी लाखोंच्या संख्येनं देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. बऱ्यापैकी लोकांचा हा गैरसमज असतो, की अजिंठा आणि वेरुळ हे फार जवळ आहेत. पण, जिल्ह्याचं ठिकाण असणाऱ्या छत्रपती संभाजीनगरपासून वेरुळ केवळ तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि अजिंठा विरुद्ध दिशेला शंभर किलोमीटर अंतरावर आहे.

जिल्ह्याच्या ठिकाणावरून अजिंठ्याला जाण्यासाठी बस तसंच स्थानिक वाहतूक करणाऱ्या गाड्यांच्या साहाय्यानं सहजपणे पोचता येईल. अजिंठा लेणींच्या वाहनतळापासून शटल सेवा कार्यरत असून लेणींपर्यंत जाण्याची सोय उपलब्ध आहे.

अजिंठ्याचा शोध फार रोमांचक पद्धतीनं लागला. खरेतर शोध म्हणताना आपण एका गोष्टीकडं लक्ष दिलं पाहिजे. भारतातील कित्येक ऐतिहासिक वास्तू कोणत्या ना कोणत्या मार्गानं कायम लोकसमूहाच्या संपर्कात राहिल्या.

ज्या वास्तू शतकानुशतके जमिनीखाली किंवा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या, त्या उत्खननाच्या माध्यमातून पुरातत्त्व संशोधकांनी समोर आणल्या. पण काही वास्तू काळाच्या ओघात विस्मृतीत गेल्या.

लोकांचं दुर्लक्ष झालं किंवा इतर काही कारणांमुळं त्या वास्तू लोकसंपर्कापासून दूर गेल्या. अपघातानं किंवा अथक संशोधकीय प्रयत्नांमुळं त्या पुन्हा एकदा जगासमोर आल्या. त्याला आपण शोध म्हणण्यापेक्षा पुनर्प्रकाश वगैरे शब्दांमध्ये बांधू शकतो. पण, त्या वास्तूंचं अस्तित्व कित्येक शतकांत पहिल्यांदा लोकांसमोर आल्यामुळं आपण ‘शोध’ सारखे शब्द वापरतो. असो.

अजिंठ्याच्या डोंगररांगेत शिकार सुरू होती. उन्हाळ्याचे दिवस होते. वाघाचा माग काढत काढत ही मंडळी वाघूर नदीच्या जवळ जाऊन पोचली. नदीच्या वरच्या बाजूला एक भलीमोठी गुहा त्यांना दिसली. शिकार करायला आलेल्या समूहात ब्रिटिश सैन्यातील घोडदळाचा अधिकारी जॉन स्मिथ सुद्धा होता. हातात मशाली घेऊन हे सगळे त्या गुहेत घुसले.

आतमध्ये गेल्यावर मात्र त्यानं वेगळंच विश्व दिसलं. वेगवेगळ्या रंगांनी रंगवलेली चित्रे, भलेमोठे खांब, मध्यभागी स्तूप आणि अजून खूप काही काही. हे सगळं बघून स्मिथ हरखून गेला. त्या लेणीमध्ये त्याने आपलं नाव लिहून ठेवलं. John A. Smith, २८ APRIL १८१९. अचानकपणे भारताच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कलाकृती जगासमोर उजेडात आली.

अपघातानं का होईना पण या लेणी समोर आल्या. वणव्यासारखी ही गोष्ट पसरत गेली. नितांत सुंदर निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या या लेणींच्या दर्शनासाठी कित्येक लोकांचे येणं जाणं सुरू झालं. त्यावेळेस भारतात फार मोठी राजकीय उलथापालथ सुरू होती. मराठ्यांचं स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आलं होतं. इंग्रज हळूहळू संपूर्ण भारतावर वर्चस्व प्रस्थापित करत होते. त्यातच अजिंठ्याच्या लेणी प्रकाशात आल्या.

लंडनपर्यंत लेणींची चर्चा पोचली होती. तिथून एक चित्रकार भारतात आला. मेजर रॉबर्ट गिल. उत्तम चित्रकार. रॉयल एशियाटिक सोसायटीने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला होता. अजिंठा लेणीतील चित्रांच्या प्रतिकृती निर्माण करण्याचा मानस होता.

त्यासाठी रॉबर्ट गिल अजिंठ्याला आला. चैत्यगृह, विहार यांच्यासोबत भिंतीवर काढलेल्या चित्रांच्या प्रतिकृती सुद्धा तयार करण्यात येणार होत्या. लेणींच्या जवळ असणाऱ्या गावामधून नैसर्गिक रंगसुद्धा तयार करण्यात आले होते.

लेणींची शक्य तेवढी साफसफाई करण्यात आली होती. तिथपर्यंत जायला पायऱ्यांची डागडुजी करण्यात आली. गिलनं जवळपास ३० चित्र तयार केली. सन १८६६ मध्ये लंडनच्या ‘द क्रिस्टल पॅलेस’ मध्ये ही चित्रं प्रदर्शनासाठी लावण्यात आली होती.

दुर्दैव पाहा, गिलनं तयार केलेल्या २९ चित्रांपैकी २५ चित्रं आगीत जळून खाक झाली. त्यानंतर एक चित्रसुद्धा असंच जळालं. गिलने काढलेली आणि अपघातातून सुरक्षित राहिलेली उर्वरित चार चित्रे ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’ येथे ठेवण्यात आली.

गिल आणि पारो यांची प्रेमकथा आजही अजिंठा गावातील लोकांच्या मनात जिवंत आहे. अजिंठ्याला पहिल्यांदा जगाच्या कलामंचावर नेणारा हा महान कलाकार आजही महाराष्ट्रातील भुसावळ येथे चिरनिद्रा घेत आहे.

पण या लेणींची खरी निर्मिती कधी झाली ? याचे कलाकार कोण ? या लेणींचा काळ कसा ठरवला गेला ? अजिंठ्याचे जन्मदाते कोण ? या प्रश्नांची उत्तरं शोधणं गरजेचं आहे. भारतातील सर्वांत वैभवशाली आणि श्रीमंत घराण्यांपैकी एक म्हणून वाकाटक इतिहासात प्रसिद्ध आहे.

अनेक अभ्यासक आणि संशोधक वाकाटकांच्या कारकीर्दीला भारताचे सुवर्णयुग म्हणून संबोधतात. या राजघराण्याच्या दोन शाखा होत्या. एक नागपूरजवळ असणाऱ्या ‘नंदीवर्धन’ ऊर्फ ‘नगरधन’ येथील तर दुसरी ‘वस्तगुल्म’ ऊर्फ ‘वाशीम’ शाखा. नगरधन शाखेतील रुद्रसेन, प्रभावती गुप्तसारख्या प्रभावी व्यक्तिरेखा होऊन गेल्या. महाराष्ट्रातील सर्वांत सुरुवातीच्या मंदिरांपैकी काही मंदिरांची निर्मिती याच राजघराण्यानं केली. दुसरीकडं, वत्सगुल्म शाखेत फार महत्त्वाचा प्रसंग घडणार होता.

सम्राट हरिषेन गादीवर बसला होता. त्याच्या अधिपत्याखाली असणाऱ्या कलाकारांची नजर पडली एका सुंदर भागावर... हरिषेनच्या आधी, तब्बल तीनशे वर्ष आधी काही लेणी त्या डोंगरावर खोदल्या होत्या.

एका सुंदर जगाची निर्मिती करायला कलाकार डोंगराच्या पायथ्याला येऊन उभे होते. अजिंठ्याच्या अद्‍भुत लेणींची निर्मिती व्हायला सुरवात होणार होती... पण हा हरिषेन आणि त्याचे प्रतिस्पर्धी असणारे लेणीचे निर्माते कोण ? जाणून घेऊ या पुढच्या भागात...

(लेखक हे पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असून लोकसंस्कृती तसंच प्राचीन - मध्ययुगीन भारतीय इतिहास हे देखील त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT