saptrang sakal
सप्तरंग

अ-अमिताभचा ; आरसपानी सौंदर्य आणि तगड्या पठाणामधलं प्रेम

त्यावेळी प्रेक्षकांच्या मनात भारत-अफगाणिस्तान दरम्यानचे संबंध सुधारले असतात

जी.बी.देशमुख gbdeshmukh21@rediffmail.com

भागीदारी मुकुल एस. आनंद यांच्याबरोबरची-३

मुकुल एस. आनंद आणि अमिताभनं ९० पासून सलग तीन वर्षे तीन भव्य कलाकृती सादर केल्या. ‘अग्निपथ’ चा ‘विजय दीनानाथ चौहान, ‘हम’ मधला ‘टायगर’ आणि ‘खुदा-गवाह’मधील अफगाणी पठाण ‘बादशाह खान’. त्यावेळी पन्नाशीला टेकलेल्या अमिताभच्या कारकिर्दीला या अनोख्या भूमिकांनी वेगळीच उभारी दिली होती. ‘ खुदा-गवाह’ मध्ये अफगाणिस्तानचा अस्सल पठाण ‘बादशाह खान’ झाला होता अमिताभ बच्चन. जमिनीवरील बोकड घोड्यावरून उचलून नेण्याच्या जिंकलेल्या रांगड्या खेळात प्रतिस्पर्धी श्रीदेवी आहे हे लक्षात येताच तो अलगद पराभव स्वीकारतो. त्याच्या मोठ्या मनाची साक्ष देणाऱ्या घटना घडतात त्या चित्रपट संपेपर्यंत थांबायचं नाव घेत नाहीत.

ऐतिहासिक प्रकारातील चित्रपट नसूनही अफगाणी कबिलेवाला म्हणून प्रचंड वेशभूषा अंगावर सांभाळून अमिताभला हा बादशाह खान साकारावा लागला होता.

आपल्या बापाच्या खुन्याचं मस्तक हिंदुस्थानातून आणून दिल्यास तुझ्याशी निकाह करीन असं सांगणाऱ्या खुबसुरत श्रीदेवीसाठी हा दिलेर पठाण हे दिव्यही पार पाडतो. या मोहिमेसाठी घोड्यावर बसून अफगाणिस्तान-भारत सीमेवर येऊन ज्यावेळी अमिताभ ‘सर जमीन-ए-हिंदुस्थान, अस्सलाम-अलेकूम’ अशी ललकारी देतो, त्यावेळी प्रेक्षकांच्या मनात भारत-अफगाणिस्तान दरम्यानचे संबंध सुधारले असतात. एक रोमांच सरसरून अंगावर आलेला असतो.

तर्कशक्तीला वाव न देता बादशाहखान अचाट शक्तीचे प्रयोग करत भारतीय तुरुंगात असलेल्या श्रीदेवीच्या वडिलांच्या खुन्यास जीवे मारून स्वत: भारतीय पोलिसांच्या ताब्यात जातो. पण जेलर रणवीरसिंह सेंगरी (विक्रम गोखले) दिलेरी दाखवत त्याला एक महिन्याची मुदत देउन अफगाणिस्तान जाऊ देतो. अफगाणिस्तानात जाऊन, श्रीदेवीशी लग्न करून, वचनाचा पक्का असलेला पठाण एका महिन्यात परत येतो आणि नंतर कधी परत जाऊच शकत नाही. वचनांच्या गाठीने बांधला गेलेला पठाण आणि त्याची बायको झालेली श्रीदेवी आयुष्यभर भयंकर विरह यातना सहन करतात.

अफगाणी लहज्यातील हिंदीत ‘सोच अगर गहरी हो जाये तो फैसले कमजोर हो जाते है’ किंवा ‘रोशनी हो अगर खुदा को मंजूर तो आंधीयोमे चिराग जलते है’ असे अमिताभच्या खर्जातल्या आवाजातील संवाद थिएटरात घुमतात आणि आपण अफगाणिस्तान आणि भारतात चित्रीकरण झालेल्या बाह्यचित्रिकऱणाच्या लोकेशनमध्ये हरवून जातो. ‘तू ना जा मेरे बादशाह एक वादेके लिये’, ‘तु मुझे कुबूल, मै तुझे कुबूल’, अशा सर्वच गाण्यांना लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी दिलेल्या कर्णमधूर चालींमागे मोहम्मद अजीज चे भसाडेपण लपून गेले होते. या गाण्यांमध्ये पडद्यावर अमिताभ आणि श्रीदेवीला बघण्यातली मजा काही वेगळीच होती. अफगाणी वेशभूषेत श्रीदेवीचे निरागस सौंदर्य अधिकच उजळले होते. दुहेरी भूमिकेतील श्रीदेवीची मुलगी झालेली आधुनिक श्रीदेवी आणि मुळात म्हातारी न झालेली पण म्हातारीचा अभिनय करणारी श्रीदेवी अशी सौंदर्याची दुहेरी मेजवानी आपणास मिळते.

विक्रम गोखलेंना दिलेले वचन पाळण्यासाठी श्रीदेवीसारख्या बायकोला लग्नानंतर एका महिन्यात सोडून जाणारा हा पठाण मला तरी तेव्हा मूर्खच वाटला होता. पण त्याच्याकडे स्पष्टीकरण सशक्त होत - ‘धोका गुनाह है जान-ए-बहार’.

या चित्रपटातले अत्यंत ताकदीचे कॅमेरावर्क, (डब्ल्यू. बी. राव यांच्यासारखे समर्थ छायाचित्रकार ज्यांनी, हम, धडकन रंगीला यासारख्या लोकप्रिय चित्रपटांची कामगिरी पेलली होती.) पार्श्वसंगीत, अफगाणी छटा आणि पहाडासारखा अमिताभ. अफगाणिस्तान - भारत अशा वाटेल तेव्हा येरझारा करणे, अभ्यागतांनी अमिताभला थेट त्याच्या तुरुंगातील कोठडीत जाउन भेटणे अश्या गोष्टी तर्कबुद्धीला रजा दिल्याशिवाय या चित्रपटाची मजा घेता येत नाही. बादशाहखानचा मित्र झालेला खुदाबक्ष रंगवला होता डॅनीने. नागार्जुन, किरणकुमार यांनीसुद्धा आपापल्या भूमिका छान पार पाडल्या होत्या. दिलेला शब्द पाळण्यासाठी आयुष्य मातीमोल करून घेण्याची तयारी असलेले हे पात्र रंगवताना अमिताभने हिंदी सिनेमातील आधीचे सर्व पठाण विसरायला लावले होते. कल्पनेच्या पलीकडच्या विरह यातना, विक्रम गोखले यांच्यासोबतच्या प्रसंगातील भावोत्कटता सारेच विलक्षण होते.

या चित्रपटात अफगाणिस्तानच्या सीमेवरील पहाडासारखा राकट, अजिंक्य, आत्मविश्वासाने ओतप्रोत, भारताचा अफगाणी मित्र वाटला होता अमिताभ. सगळे नियम आणि तर्क गुंडाळून ठेवलेल्या पटकथेत अमिताभचा करिष्मा आणि श्रीदेवीचे आरस्पानी सौंदर्य डोळे आणि डोके दिपवून टाकते. मुकुल एस. आनंद यांनी केवळ अमिताभला डोळ्यासमोर ठेऊन हा चित्रपट बनवला होता आणि अमिताभनं त्यांचा विश्वास सार्थकी लावत एक अफलातून भूमिका साकारली होती.

जी.बी.देशमुख

gbdeshmukh21@rediffmail.com

( सदराचे लेखक अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT