Patna High Court sakal
सप्तरंग

स्त्रीचे भूत आणि भविष्य...

पतीने आपल्या पत्नीला भूत किंवा पिशाच म्हणण्याला क्रूरता म्हटले जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नुकतेच पाटणा हायकोर्टाने नोंदवले.

श्याम पेठकर

पतीने आपल्या पत्नीला भूत किंवा पिशाच म्हणण्याला क्रूरता म्हटले जाऊ शकत नाही, असे निरीक्षण नुकतेच पाटणा हायकोर्टाने नोंदवले. मग बायकोने नवऱ्याला सैतान म्हटले तर?

अकबर-बिरबलाच्या अनेक कथा आहेत. त्यात खऱ्या किती आणि प्रक्षिप्त किती, हे सांगता यायचे नाही; परंतु मूळ ज्या काय कथा असतील, त्यात पुढच्या काळात ज्या समाविष्ट करण्यात आल्या त्या अगदी चपखल आहेत... आता स्त्रियांचेच बघा ना. स्त्रिया हसल्या तर त्या अवखळ, उच्छुंखल आहेत, अशी त्यांची संभावना केली जाते; मात्र त्यांच्यावर हसण्यातच पुरुषार्थ आहे, अशी आपली पुरुषसत्ताक समाजाची पक्की धारणा आहे. त्यातही ‘बायको’ हा तर कायमच थट्टेचा विषय राहिला आहे. बायकोला घाबरणारा पुरुष म्हणजे एकदम ‘हे’ असे समजले जाते.

एकदा अकबर बादशहा दरबारात म्हणतो, ‘आपल्या राज्यात बायकोला घाबरणारे मर्द फार नाहीत.’ त्यावर बिरबल हसतो. म्हणतो, ‘सगळेच पुरुष हे बायकोला घाबरतात.’ बादशहा मग त्याला आव्हान देतो की, ‘हे सिद्ध करून दाखव.’ बिरबल मग त्याच्या पद्धतीने हे सिद्ध करत जातो. बादशहा म्हणतो, ‘एक पठाण आहे तो तर बायकोला अजिबात घाबरत नाही.’ बिरबल मग त्या पठाणाकडे घोड्याचा व्यापारी बनून जातो आणि त्याला घोडे दाखवितो.

त्याला विचारतो की, ‘बायकोला घाबरतो का?’ तर तो म्हणतो, ‘औरत तो पैर की जुती होती है!’ त्याला घोडे पसंत येतात. एक घोडा घ्यायचा असतो. भावठाव ठरतो अन् बिरबल म्हणतो की, मोहरा द्या... तर पठाण विचार करतो. घरात जातो. बाहेर येतो. असे तीन-चार वेळा होते. मग बिरबल विचारतो, ‘क्या समस्या है?’ तर तो म्हणतो, ‘बीवीसे पूछना है, काला लूं या सफेद और यह भाव बराबर है की नही? नही तो बाद मे मुझेही भूगतना पडेगा...’

हे असे आहे. अगदी पहेलवानातला पहेलवानही बायकोला घाबरतोच; परंतु तो ते दाखवत नाही. समाजासमोर असे दाखविण्याचा आटापिटा असतो की, बायकोच आपल्याला कशी थर्र घाबरते... उलट बायका मात्र, नवऱ्याचा आपल्याला कसा धाक आहे, हे दाखवितात. ‘बाई, ह्यांना ना अज्जीबात सहन होत नाही’ असे ज ला ज लावून जोर देत सांगतात.

‘ह्यांना ना अगदी गर्रम पोळ्या लागतात, अगदी तव्यावरची ताटात’, ‘ह्यांना ना अजिबात उशीर झालेला चालत नाही’ ही वाक्ये तर बायकांच्या तोंडी अगदी सहज असतात. ‘आमचे हे किनई इतके तापट आहेत ना...’, ‘माझ्या नवऱ्याचा राग नाही परवडत बाई!’ ही तर अगदी परीटघडीची ठेवणीतली उद्‍धृते आहेत.

पत्नी अत्याचार पीडित पतींचीही एक संघटना तिकडे नाशिककडे आहे. आता हे ऐकतानाही आपला पुरुषी इगो हर्ट होतो, मात्र ते तसे आहे... तरीही बायकांची थट्टा केली जातेच. बहुतांश विनोद हे बायकांवरच असतात. कधी काळी सरदारजी हे विनोदातले मुख्य पात्र असायचे, त्या वेळीही बायकांची बरोबरी याबाबत ते करत नव्हते. आता मात्र बायकांवर सुखनैव विनोद केले जातात. त्या कशा बडबड्या असतात, त्यांना व्यवहार कसा नाही कळत वगैरे...

दोन पुरुषांना महत्त्वाच्या विषयावर बोलायलाही फार फार तर अर्धा तास बस झाला; अन् दोन बायका विनाविषय कितीही तास बोलू शकतात, असे सहज म्हटले जाते. नायगारा धबधबा बघायला बायकांचा एक ग्रुप गेला अन् मग तिथला गाईड सांगत होता की, ‘या धबधब्याचा आवाज इतका मोठा असतो की, कानठळ्या बसतात अन् इथून पंचवीस किलोमीटर अंतरावरही तो ऐकू जातो.’ ग्रुपमधली एक बाई म्हणते, ‘आम्हाला तर आवाज येत नाही.’ ...तर गाईड म्हणतो, ‘त्यासाठी तुम्हाला आपसातल्या गप्पा थांबवाव्या लागतील. तुमच्या गप्पा थांबल्या ना की धबधब्याचा आवाज येऊ शकतो...’

हिंदी व्यंग कवितेत तर घरवाली हा कायम थट्टेचाच विषय राहिला आहे. ‘मरी घराडी बोल्यो...’ अशी सुरुवात करणारे शर्मा असोत की काका हाथरसी असो.

बोल बेटा बोल क्या खाएगा?

क्रिम रोल? नही, नही...

लड्डू गोल गोल? नही, नही...

पपडी खाएगा? नही, नही...

जानता हूं माँ पर गया है, मेरी खोपडी खाएगा...

अशी हट्ट करत रडणाऱ्या बाब-बेट्यातल्या संवादात आईला आणले जाते. तिला गृह मंत्रालय, सरकार वगैरे म्हटले जाते तेही थट्टेनेच. अगदी दुर्गा, चंडीही म्हटले जाते ते काही खूप आदराने, भक्तिभावाने नाहीच. त्यात उपरोधच अधिक असतो. मग तिला सहजच भूतही म्हटले जाते. ‘माझ्या मानगुटीवर बसली आहे ही पिशाच’ असे सहज म्हटले जाते.

एका नवऱ्याला त्याच्या बायकोने विचारले, ‘का हो, तुम्ही स्वत:पासून अनेकांचे वाढदिवस व इतर महत्त्वाच्या तारखा विसरता; मात्र आपल्या लग्नाचा वाढदिवस अगदी न चुकता लक्षात कसा राहतो? इतके प्रेम करता माझ्यावर?’ तर नवरा म्हणतो, ‘काय आहे, दर्दनाक घटना दीर्घकाळ स्मरणात राहतात ना!’

...तर अशा थट्टा बायकाही गांभीर्याने घेत नाहीत; मग अगदी खऱ्या अर्थाने गांभीर्यानेही अशी शेलकी संबोधने वापरली जाऊ लागतात आणि भयानक हे की, बायकांना त्याचे काहीच वाटत नाही... ‘मारलं नवऱ्याने, शिवीगाळ केली तर काय झालं? तो त्याचा अधिकारच आहे,’ असे मत असणाऱ्या बहुतांश बायका असतात. डॉल्स हाऊस इंग्रजीत एकोणिसाव्या शतकातच लिहिले गेले. म्हणजे, त्या बाईला काहीच कमी नाही. अगदी मोठा बंगला आहे, उंची वस्त्र-दागिने आहेत.

तिने छान छान राहावे व मस्त मस्त हसावे, नवऱ्याला रिझवावे, असेच असते. मात्र, तिला मताधिकार नसतोच. अगदी तिने कुठले कपडे घरी घालायचे, कुठले पार्टीत घालायचे, हेदेखील नवरा ठरवितो. तिला जाणीव होते की, ती एक बाहुली आहे नवऱ्यासाठी... तो तिला छान छान सजवतो, त्याला वाटते तसे नाचवितो, तिच्याशी खेळतो... मग ती घरातून बाहेर पडते. आपल्याकडे ‘थप्पड’ हा आता दोन-पाच वर्षांपूर्वी आलेला चित्रपट. त्यातही तिला आपले अस्तित्व केवळ एका बाहुलीचे आहे, हे कळायला भर पार्टीत नवऱ्याकडून झापड खावी लागते.

बायकांच्या बाबत जी थट्टा असते, थट्टा वाटते ती मग किती सहज एक गंभीर रीत होऊन बसते, ही तिचे तिलाही कळत नाही. नवरा लाडाने तिला पहिल्यांदा, ‘तू माझ्या मानगुटीवर बसलेलं भूत आहेस...’ असे म्हणतो, तेव्हा तिला त्याचे कौतुक वाटते. आपण कधी लाडानेही एकांतात नवऱ्याला, ‘तुम्ही ना राक्षस आहात, राक्षस माझ्या उरावर बसलेले’ असे म्हणत नाही. म्हणू शकत नाही.

आधी लाडाने, मग थट्टेने अन् मग गांभीर्याने स्त्रियांची ही अवहेलना होत असते. ते कुणालाच आक्षेपार्ह वाटत नाही. बिहारमधील एका बाईला ते तसे वाटले आणि कोर्टात घटस्फोटाची केस दाखल झाली. ते प्रकरण असे, कलम ४९८ आणि हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१ नुसार पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाटणा हायकोर्टाने पतीवरील गुन्हे रद्द केले आहेत.

नालंदा अतिरिक्त सत्र न्यायालयाने पतीला दोषी ठरवत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात पतीने पाटणा हायकोर्टात धाव घेतली होती. महिलेच्या वडिलांनी १९९४ मध्ये मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. मुलीचा पती आणि तिच्या सासरच्या विरोधात ती तक्रार होती. पती मुलीचा मानसिक आणि शारीरिक छळ करतो, असे त्यात म्हणण्यात आले होते.

हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार, पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानंतर पोलिसांनी पती आणि इतर अकरा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर सत्र आणि अपिलीय कोर्टाने आरोपी पतीला एक ते दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर पतीने हायकोर्टाने धाव घेतली. पतीच्या बाजूने वकिलाने कोर्टात म्हटले होते की, हुंडा कोणी मागितला, कधी मागितला आणि पत्नीला कशा पद्धतीने त्रास देण्यात आला, याचा कोणताही स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही.

वडिलांनी कोर्टात दावा केला होता, की सासरचे मुलीला भूत आणि पिशाच म्हणतात. तसेच मुलीने सासरच्यांकडून अत्याचार होत असल्याचे पत्राद्वारे वारंवार कळवले होते, असा दावा वडिलांनी केला होता. हायकोर्टाने त्यावर म्हटले, की भूत किंवा पिशाच म्हणणे क्रूरता नाही. शिवाय, मुलीने वडिलांना लिहिलेले एकही पत्र कोर्टासमोर सादर करण्यात आलेले नाही.

पतीने आपल्या पत्नीला भूत किंवा पिशाच म्हणण्याला क्रूरता म्हटले जाऊ शकत नाही, असे महत्त्वाचे निरीक्षण पाटणा हायकोर्टाने नोंदवले आहे. पीठाचे न्यायमूर्ती म्हणाले, की वैवाहिक संबंधात (विशेषत: अपयशी ठरलेल्या) पती आणि पत्नी एकमेकांविरोधात अनेकदा घाणेरड्या भाषेचा वापर करतात; पण असे सर्वच आरोप क्रूरतेच्या व्याख्येत येत नाहीत.

आता हा न्यायालयाचाच निर्णय आहे, त्यामुळे त्यावर काय टिप्पणी करायची? मात्र, मग बायकोने नवऱ्याला असे सैतान, भूतनाथ म्हटले तर? त्याला जेवायला खूप लागतं म्हणून त्याला बकासुर म्हटले तर त्यात त्याचा अपमान नाही किंवा त्यातही क्रूरपणा नाही, असाही या निर्णयाचा अर्थ काढायचा का?

न्यायालय म्हणते, की भांडण झाल्यावर आणि घटस्फोटाच्या काळात पती-पत्नी असे एकमेकांना काय काय म्हणतच असतात. म्हणजे? शिव्या घालणे, घालूनपाडून बोलणे हा मानसिक छळाचा प्रकार नाही का? आता नेमक्या या प्रकरणात वकिलांनी काय युक्तिवाद केला अन् पुरावे काय सादर करता आले नाहीत, यावर निकाल ठरला असेल... मात्र प्रश्न उरतोच की बायकोला भूत, पिशाच म्हणणे किंवा तत्सम काही म्हणणे म्हणजे कायद्याने चालून जाणारे आहे.

आता नवरे खुशाल बायकोला वाट्टेल ते बोलतील आणि मग कोर्टात प्रकरण गेले तर या केसच्या निकालाचा दाखला देतील. न्यायमूर्तीही संदर्भ म्हणून या केसचा निकाल पटलावर ठेवतील. म्हणजे आता तर रानच मोकळे झाले आहे.

नवरा-बायकोत थट्टेचे नाते असावे; पण ते एकतर्फी नसावे ना... बायकांनी अशी थट्टा केलेली पुरुषांना आवडतच नाही. त्याचे काहीही परिणाम होऊ शकतात.

बायकांचा भूतकाळ हाच होता, वर्तमानही बऱ्यापैकी तसाच आहे. मग पुन्हा बेगमची अस्मिता राखण्यासाठी स्वत: बिरबलच हवा... एकदा बादशहा आणि बेगम आंबे खात बसले होते. बादशहा आंबा खाल्ला की कोय आणि साल बेगमसमोरच्या थाळीत टाकायचा. त्यामुळे बादशहा आंबा तर खात होता; मात्र त्याच्या समोरच्या थाळीत साल किंवा कोय जमा होत नव्हती. थोड्या वेळाने तिथे बिरबल आला. बादशहा बिरबलाला म्हणाला, ‘बघ बिरबल बेगम किती हावरट आहे.

आम्ही आंबे खायला बसलो अन् बेगमने बघ हावरटपणे किती आंबे खाल्ले ते...’ बेगमचा चेहरा खर्रकन उतरला. त्या आपली बाजू मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न करू लागल्या. बिरबल हसून बादशहाला म्हणाला, ‘त्यांचे ठीक आहे की त्यांनी खूप आंबे खाल्ले, असे त्यांच्या समोर पडलेल्या कोय आणि सालांवरून दिसते; पण तुम्ही तर त्यांच्यापेक्षाही हावरट दिसता, तुम्ही कोय आणि सालांसकट आंबे खाल्लेले दिसतात...’

आता थट्टेतून मानहानीची शिकार होणाऱ्या स्त्रीच्या मागे एखादा बिरबल उभा झाला पाहिजे किंवा मग पुन्हा कुठल्या पुरुषाचाच आधार घेण्यापेक्षा स्त्रीनेच ज्या भाषेत तिच्याशी बोलले जाते तसेच बोलायला हवे... आंब्याच्या प्रकारणात बिरबलाने वाचविले होते. नंतर बेगमने बिरबलाचे आभार मानले. त्या म्हणाल्या, ‘बिरबल, दरवेळी तुम्ही सोबत असायला हवे, कारण बादशहा संधी मिळेल तिथे अशी थट्टेतून मानहानी करत असतात...’

बिरबल म्हणाला, ‘मग तुम्हीच तुमच्या बिरबल व्हा. त्याशिवाय हे काही थांबणार नाही...’ बेगमला ते पटले. अगदी दोनच दिवसांत बेगमला आपण जशास तसे उत्तर देऊन आपली अस्मिता राखू शकतो, याचा प्रत्यय आला. एका सकाळी बादशहा म्हणाला, ‘बेगम, आम्हाला स्वप्न पडले काल अन् त्यात तुम्ही आलात...’ बेगमला आनंद झाला, ‘व्वा! इतकं प्रेम आमच्यावर की, तुमच्या सोबत असूनही तुमच्या स्वप्नातही आम्हीच येतो...

बरं काय दिसलं स्वप्नात?’ बादशहा म्हणाला, ‘तुम्ही आणि आम्ही दोन वेगवेळ्या टाक्यांत पडलो आहोत...’ बेगम म्हणाली, ‘वाह! तुम्ही नि मी टाक्यात? मग मज्जा केली असेल आपण...’ बादशहा म्हणाला, ‘आम्ही सहदाच्या टाक्यात पडलो होतो आणि तुम्ही घाणीच्या...’ बेगमचा चेहरा पडला; पण त्यांना बिरबल आठवला. बेगम हसून म्हणाल्या, ‘अगदी अस्सेच स्वप्न आम्हाला पडले. अगदी सारखेच.

तुम्ही सहदाच्या टाक्यात पडला आहात आणि मी घाणीच्या टाक्यात... फरक इतकाच होता की, टाकी लागूनच होती एकमेकांना अन् तुम्ही माझं अंग चाटत होते अन् मी तुमचं...’ मग मात्र बादशहा गप्पगार झाला. त्यानंतर मात्र बादशहा बेगमची थट्टा करताना चार वेळा विचार करायचा. तसा बदल आता होतो आहे. पुरुषीपणाचे भूत स्त्रियांनी मानगुटीवरून उतरविणे सुरू केले असल्याने आता त्यांचा वर्तमान ताठ कण्याचा होतो आहे आणि म्हणून भविष्य सुधारण्याची संधी आहे.

pethar.shyamrao@gmail.com

(लेखक प्रसिद्ध नाटककार आणि कथाकार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT