All is well book sakal media
सप्तरंग

'ऑल इज वेल' : मनातला सक्सेस पासवर्ड

संदीप काळे

पुस्तक परीक्षण

'ऑल इज वेल' : मनातला सक्सेस पासवर्ड.

संघर्ष माणसाला कधीही चुकत नाही. संघर्षातून यशाचा मार्ग शोधावा लागतो. जीवनातील सुखदुःखाच्या वाटेवर येत असलेला संघर्ष माणसाला खऱ्या अर्थाने जगायला शिकवतो. खाचखळगे असणार्‍या आयुष्यात आपल्याला जे हवे ते मिळविण्यासाठी धडपड करणे हेच प्रयत्नवादी तरुणाचे लक्ष्य असते. हे 'ऑल इज वेल' च्या प्रत्येक पानावर दिसते. नवा विचार, नवा दृष्टिकोन अंगी बाळगून जीवनाचे सार्थक करणे म्हणजे जगणे होय. ग्रामीण भागातील छोट्याश्या खेड्यातून संघर्षमय प्रवास करून समाजातील लोकांचे कल्याण आपल्या पत्रकारितेतून करणार्‍या पत्रकाराचे आत्मचरित्र असलेल्या या पुस्तकाचे शीर्षक 'ऑल इज वेल : मनातला सक्सेस पासवर्ड.' अगदी योग्य आहे. आपण एकदा पुस्तक वाचायला घेतले तर ते पुस्तक खाली ठेवणार नाही. राज्यपाल, केंद्रीय राज्यमंत्री, अशा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत 'ऑल इज वेल : मनातला सक्सेस पासवर्ड.' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला.

संपादक, लेखक, निवेदक, संघटक संदीप काळे यांनी आपल्या संघर्षात्मक जीवनाची पायाभरणी ते यशाचे शिखर गाठण्यापर्यंतचा प्रवास अतिशय जिद्दीने आणि चिकाटीने पार केला. संदीप काळे यांनी आपल्या पहिलीपासून ते पत्रकारितेला सुरुवात करेपर्यंतचा प्रवास 'ऑल इज वेल' या पुस्तकात मांडला आहे. संदीप काळे पत्रकार असो की लेखक, त्यांची पत्रकारिता आणि त्यांचे लिखाण दोन्ही क्षेत्रातील त्यांनी साधलेला संवाद सर्वोत्कृष्ट गोष्टीची खात्रीशीर हमी असते. 'भ्रमंती लाईव्ह' नावाचं सकाळमधील त्यांचे सदर समाजाभिमुख पत्रकारितेचे आणि लिखाणाचे जिवंत उदाहरण आहे. आजवर अनावृत, मुक्काम पोस्ट आई, माणुस'की', अश्रूंची फुले, ट्वेल्थ फेल, प्रेमसेतू, क्रांतीची पावलं, गंध आपुलकीचा अशा वैशिष्ट्यपूर्ण अनेक पुस्तकांची निर्मिती संदीप काळे यांनी केली. तरुण, तडफदार आणि हसरे व्यक्तिमत्व असणारे संदीप काळे त्यांच्या कामामागे त्यांचा एक स्वतंत्र विचार आहे. स्वतंत्र विचार निर्माण करण्यासाठी, स्वतंत्र इतिहास निर्माण करण्यासाठी स्वतःच्या जगण्यात खूप काही घडत असतं.

'ऑल इज वेल' या पुस्तकात आत्मचरित्र साकारताना धडपड्या तरुण स्वतःला जगासमोर अभिव्यक्त करतोय. संघर्षात्मक काळाचा एक मोठा तुकडा या पुस्तकात साकारला आहे. पुस्तकाची सुरुवातच होते ती लेखकाच्या आईच्या व्यक्तीचित्रातून. कुठलीही शैक्षणिक पार्श्वभुमी नसताना, लेखकाचे आई आणि वडील मुलाच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देतात. पारंपरिक पद्धतीने काम करू न देता वेगळया क्षेत्रात जाण्यासाठी पाठबळ देणारे आई-वडील त्या काळात दुर्मीळच. शेतात काम करणारी आई आणि साखर कारखान्यावर काम करणारे वडील आताच्या जगातील पालकांसमोर नक्किच रोल मॉडेल ठरतील.

जीवनातील कठीण काळ अनुभवावर आधारित असून लेखकाच्या तरुण वयातील धडपड करणारे साहसी प्रसंग खोलवर आपल्या मनात रुततात. तरुण वयातील सळसळते रक्त लेखकांना कुठेही स्वस्थ बसू देत नाही. सतत नवीन काहीतरी नवीन निर्माण करण्याचा ध्यास लेखकाने मांडलेल्या प्रत्येक पानावरील भावभावनेतून दिसून येते. गावातील, पंचक्रोशीतील वातावरण कुठलेही मोठे स्वप्न बघण्याचे नव्हते. परंतु, लेखकानी आपल्या मेहनतीच्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर मोठे स्वप्न पाहिले आणि ते यशस्वीसुद्धा करून दाखवले.

जवळपास पस्तीस वर्षापूर्वीचा तो काळ होतकरू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणारा नव्हता. तेव्हाच्या काळातील लेखकाची आर्थिक परिस्तिथी, दिवा लाऊन अभ्यास करावा इतकी हलाखीची होती. या परिस्तिथीची लेखकाच्या मनावर झालेली जखम आपल्याला शब्दाशब्दातून जाणवते. त्यातूनच बालमनावर झालेले विविध संस्कार, शालेय जीवनातील शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे लेखकाचे विचार प्रगल्भ झाले. संदीप काळे यांची सर्वोत्तम विचारांची प्रगल्भता आपल्या मनाला स्पर्शून जाते. लेखक आणि वाचकांचे नातं जुळणे हे त्यांच्या ललित लिखाणाचे यशस्वी गमक आहे.

छोट्याश्या खेड्यातून सुरू झालेल्या लेखकाच्या प्रवासातील धाडसी निर्णय अनेक टप्प्यांतून जातात. कुमार वयातील अंतरंगी अनुभव, वाचकांनासुद्धा विविध टप्प्यात घेऊन जातात. कुमार वयातील मित्रांच्या म्हणण्यावरून बिडी ओढणारे लेखक, दारू कशी बनवतात हे पहायला दारू भट्टीवर जाणारे लेखक, अशा अनेक प्रसंगावरून लेखकातील धाडसी पत्रकार आपल्याला बालवयापासूनच जाणवतात. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर, आपले गाव सोडून गेल्यावर मनाची झालेली गोंधळाची अवस्था, कुणीही ओळखीचे नसताना केवळ स्वतःच्या हिमतीवर शहरात ओळख निर्माण करणे, विद्यार्थी जीवनातील बाबींनादेखील लेखकानी स्पर्श केला आहे.

धडपड्या तरुण असल्यामुळे लेखकांना विविध लोकांचा सहवास खूप कमी कालावधीत लाभला. महाविद्यालयात असताना विविध संघटनांशी लेखकाचा संबंध आल्यामुळे त्यांच्यातील कुठल्याही गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक झाला. सर्वोदय, राष्ट्र सेवादल, अंधश्रध्दा निर्मूलन समिती, छात्र भारती, नई तालीम या संघटनांनी त्यांच्यातील व्युत्पन्न व्यक्तीमत्व घडविले. प्रेम हा विषय सर्वांच्या जीवनात खूप आवडीचा विषय असतो. त्यातही ते प्रेम कोवळ्या वयात झालेले असेल तर ते आपल्या मनाच्या खूप जवळचे असते.

महाविद्यालयीन जीवनात बाबा आमटेंच्या सोमनाथ छावणीत गेल्यावर प्रेमात पडलेले लेखक आपले प्रेम सोडून गेल्यावर कसे सावरतात, आणि त्यांचे शिक्षक त्यांना यात कशी मदत करतात, हे आपल्याही मनाला वाचल्यानंतर हळवे करते. प्रेमातून सावरताना लेखक मात्र आपल्या प्रेमाला अजूनही त्यांचे प्रेम बाबा आमटेंच्या सोमनाथ छावणीत आहे, असे सांगून आपल्याला अस्वस्थ करतात. याउलट, त्यांच्या वर्गात शिकणारे एक मुलगा आणि मुलगी प्रेम आणि आकर्षण यातील फरक लक्षात न आल्यामुळे कसे आयुष्य बरबाद करून घेतात याकडेही लेखकाने वाचकांचे लक्ष वेधून घेतले आहे. लेखकाची आत्मप्रतिमा सगळ्याना भावणारी आहे.

लेखकांना विविध ठिकाणी भेटलेली माणसे, अनेकप्रकारे त्यांच्या जीवनातील प्रसंगाशी एकरूप झालेत. बाबा आमटे, डॉ. नरेंद्र दाभोळकर, सूरज बरंठ, अण्णा हजारे इ. यांच्या संस्कारात त्यांच्या तरुण वयाला आचारविचारांची एक वेगळी ऊर्जा मिळाली आहे. चळवळीत काम केल्यामुळे एक धडपडीवृत्ती त्यांच्या प्रत्येक कामात दिसून येते. संदीप काळे त्या काळात कुणीही पत्रकार होण्याचा विचार करणार नाही, अशा काळात त्यांनी एकट्याने धाडसी निर्णय घेऊन योग्य ते पाऊल उचलले आणि स्वतःला सिद्ध करून दाखवले. या पुस्तकात विचार, प्रयोग आणि प्रक्रिया उलगडून दाखवण्याचे काम लेखकानी केलेले आहे.

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!

गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!...

संदीप काळे यांचे व्यक्तिमत्व सुरेश भटांनी लिहिलेल्या या ओळींसारखे आहे. एकूणच प्रत्यक्षात भेटून सगळया लिखाणाची भाषा गप्पा माराव्यात इतकी थेट आहे. वाचताना वेगळीच मजा येते. पुस्तकात पत्रकारितेच्या क्षेत्रातील अनेक मोठी-मोठी माणसे आपल्याला भेटतात. लेखकाची मित्रमंडळी आपल्याला आपलीशी वाटतात. लेखकाचे आई-वडील आपले आई-वडील वाटतात. लेखकाचे शिक्षक आपले शिक्षक वाटतात. लेखकाचे प्राध्यापक आपले प्राध्यापक वाटतात. एकंदर, उत्साहाची अखंड मैफल असणारे संदीप काळे हे आपलेसे वाटतात. आपलेसे वाटणारे हे लिखाण आपल्याला त्यांच्याशी जोडणारे आहे. कारण संदीप काळे यांचा प्रवास चैतन्याची भ्रमंती करणारा आहे.

धडपड्या तरुणाच्या जीवनाचा अर्थ कळणं, विद्यार्थी जीवनाच्या खोलात जाणं, संघर्षात्मक जीवनाच महत्व समजणं. लिखाणात ह्या गोष्टी तशा नेहमीच अवघड असतात. पण, या लिखाणात ते सहज शक्य झाले आहे. कारण,

पत्रकार-लेखकाची लेखणी मानवी संबंध जोडणारी, सामान्य माणसाला अंतर्मुख करणारी आहे.

जेष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांनी प्रस्तावना देऊन सांगितले आहे, "वास्तवदर्शी साहित्य हे एकाचवेळी साहित्यही असतं आणि माणसाच्या जगण्याचा इतिहासही असतो." शरद पवार, अण्णा हजारे, प्रकाश आमटे, सिंधूताई सपकाळ, फ. मुं. शिंदे, श्रीराम पवार, डॉ. महेंद्र कल्याणकर, डॉ. मनोजकुमार शर्मा सगळया मातब्बर मंडळीनी पुस्तकाची पाठराखण केली आहे.

'ऑल इज वेल'चे मुखपृष्ठ आणि मांडणी चित्रकार डॉ. नरेंद्र बोरलेपवार यांनी केले आहे. बोरलेपवार यांच्या कलाकृतीला सलाम करावे अशी निर्मिती बोरलेपवार यांनी केली आहे. बोरलेपवार यांच्या कलाकृतीमुळे 'ऑल इज वेल' पुस्तकाच्या आशयाला परिपूर्णता प्राप्त झाली आहे. पत्रकाराने आत्मचरित्र लिहिणे तसे दुर्मीळच आहे. मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तीन भाषांमध्ये हे पुस्तक एकाचवेळी प्रकाशित करण्याचा वेगळा विक्रम संदीप काळे यांनी केला आहे. हे मराठी साहित्यामध्ये कधी घडले नाही. ह्या वेगळया लिखाणाचा आनंद घेणं एक निखळ अनुभव म्हणता येईल. 'ऑल इज वेल' हे पुस्तक मराठी साहित्याला घातलेला एक वैचारिक सोनेरी मुकुट आहे. जे साहित्य वास्तविक जीवनाशी संबंधित नसते, ते साहित्य असते कुठं? असा अनेकवेळा 'ऑल इज वेल' वाचल्यावर पडल्याशिवाय राहत नाही.

'ऑल इज वेल'च्या प्रत्येक पानापानावर आपल्याला आपला इतिहास दिसेल. असं वाटते अरे, हे तर माझ्यासोबत घडलं होतं. हे तर माझ्याविषयी लिहिले गेले. असे अनेक दाखले 'ऑल इज वेल'मध्ये आहेत. बालपण, शालेय, शिक्षण, कर्तव्याचे खाच-खळगे, अपुऱ्या इच्छा-आकांक्षा, मित्र, परिस्थिती, महाविद्यालयीन शिक्षण आणि विशेषतः आपल्यावर संस्कार करणारे आईवडील. गुरुजनवर्ग या सगळ्यांचा मिलाप 'ऑल इज वेल'मध्ये अतिशय उत्कृष्टपणे मांडण्यात संदीप काळे यशस्वी झाले आहेत. संदीप काळे यांची आई कमलबाई आणि वडील रामराव, त्यांचे गुरू प्रा. राजाराम वट्टमवार, प्रा. सुरेश पुरी आणि पत्रकारितेमध्ये विद्याभाऊ सदावर्ते यांच्यासारखे दिग्गज मंडळी यांचा खास करून उल्लेख आपल्या आत्मचरित्रात संदीप काळे यांनी केलेला आहे. आपल्याला लहानपणी असणाऱ्या वाईट सवयी आणि त्या वाईट सवयींमुळे आपले झालेले नुकसान, त्यातून वेळीच सावरणे याचा स्पष्टपणे उल्लेख आत्मचरित्रामध्ये करण्यात आलेला आहे. 'ऑल इज वेल' आत्मचरित्र मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणून नोंद होणारे पुस्तक निश्चित असणार आहे.

पुस्तक : 'ऑल इज वेल' : मनातला सक्सेस पासवर्ड.

लेखक : संदीप काळे.

प्रकाशन : सकाळ प्रकाशन.

पृष्ठे : २७२.

किंमत : १९० रुपये.

पुस्तक परीक्षण: प्रीती कांबळे, मुंबई.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT