piano love music and actress breakup cinema movie sd burman c ramchandra mukesh Sakal
सप्तरंग

पियानो प्रेम आणि नायिका...

एके काळी हिंदी सिनेमाचा नायक प्रेमभंग झाला, की तो पियानो शिकायचा आणि मुकेशच्या आवाजात गायचा.

द्वारकानाथ संझगिरी dsanzgiri@hotmail.com

एके काळी हिंदी सिनेमाचा नायक प्रेमभंग झाला, की तो पियानो शिकायचा आणि मुकेशच्या आवाजात गायचा. मुकेशच्या आवाजाबद्दल अनेकांची भिन्न भिन्न मतं होती. नौशाद, एस डी बर्मन, सी रामचंद्र, ओ पी नय्यर यांचं मुकेशबद्दल, अर्थात त्याच्या आवाजाबद्दल चांगलं मत नव्हतं.

नौशादनं ‘अंदाज’ सिनेमात दिलीपकुमारच्या मनाविरुद्ध मुकेशला गाणी दिली. पण साधारण १९५२ नंतर ७२ मध्ये आलेल्या ‘साथी’ सिनेमा पर्यंत मुकेशला त्यांनी गाणं दिलं नाही. माझी हिंदी सिनेमातल्या पियानो संदर्भातली काही निरीक्षणं आणि पियानोवर म्हटलेली काही सुंदर गाणी यावर मी या उत्तरार्धात लिहिणार आहे.

सिनेमात पियानो जसा नायक वाजवतो, तशी नायिका सुद्धा वाजवते. दोघं एक - एकटे गातात, असे सिनेमे रग्गड आहेत. बरेचदा नायक पियानो वाजवतो आणि नायिका गात असते पण नायिका पियानो वाजवतीयं आणि हीरो गातोय हे फार क्वचित असतं.

चटकन आठवणारं उदाहरण म्हणजे ‘जब जब फुल खिले’ मधलं ‘यहा मैं अजनबी हूँ ’ हे गाणं. हे गाणं त्या दोघांमधल्या तणावाचं नातं दाखवतं. पियानोवर गाणं सुरू असताना काही वेळेला नर्तक नाचत असतात.

दिलीपकुमार, राज कपूरच्या ‘अंदाज’ मध्ये तर कक्कू ही त्या काळातली सर्वांत लोकप्रिय नर्तकी दोन गाण्यांत नाचली आहे. क्लबमधील गाणं असेल किंवा बॉलरूममधील, तर जोड्या नाचताना दिसतात. पण पियानो वाजवला जातोय आणि नायक सोलो डान्स करतोय असं निदान १९८० पर्यंत गाणं आठवत नाही. कारण त्या काळात पुरुष नाचत नसतं.

पियानो वाजवला जातोय, नायिका दर्द व्यक्त करते आहे आणि खलनायिका येते, हे काही गाण्यांत दाखवलं गेलंय. उदा. मधुबाला पियानोवर गात असलेल्या ‘सबकुछ लुटा के होश मे आये तो क्या किया’ या गाण्यात.

नायक पियानो वाजवतो आहे, नायिका गाते आहे आणि खलनायक त्याच्या कारवाया करतोय असेही सीन आहेत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे, ‘लव्ह इन टोकियो’ मधलं, ‘मुझे तुम मिल गये हमदम’ यात जॉय मुखर्जी पियानो वाजवतो, आशा पारेख तिला त्याचं प्रेम लाभल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते आणि खलनायक प्राण कारवाया करतो.

आशा पारेखला फोन येतो आणि तिचा मूडच बदलून जातो. तो बदललेला मूड लतानं त्या गाण्यात फार सुंदर व्यक्त केलाय. हे गाणं मला प्रचंड आवडतं कारण त्यात संगीतात पूर्ण भर पियानोवर आहे. इतर वाद्यं फार कमी आहेत. त्यामुळं पियानोचा गोडवा अनुभवता येतो.

नायक-नायिका मोठे नसताना काही वेळा पियानो नायक होतो. अनुपमा सिनेमातलं गाणं आठवतंय ? ‘धीरे धीरे मचल ऐ दिले बेकरार...’ काय मेलडी आहे. गाणं गाणारी नायिका नाही. ती नायिकेची आई असते.

नायिकेच्या वडिलांसाठी ते गाणं ती म्हणते. गाणारी जी नटी आहे तिचं नाव सुरेखा पारकर. संत ज्ञानेश्वर, बंबई रात की बाहो में अशा सिनेमात तिने काम केलं आहे आणि ज्याच्यासाठी गाते त्याचं नाव तरुण बोस. तो कधीही तरुण दिसला नाही. मला या गाण्याचे टेकिंग सुद्धा प्रचंड आवडतं आणि त्याचे शब्द किती सुंदर आहेत. ती गात असते आणि मागून तो येतो आणि त्या वेळी तिचे शब्द काय आहेत ?

उसके दामन की खुशबू हवाओ में है

उसके कदमो की आहट फिजाओ में है

लतादीदी आणि हेमंतकुमार यांची ही अजरामर मेलडी आहे. नायक-नायिका ऐवजी फक्त पियानो, गायिका आणि साहिर लक्षात राहतो. ते गाणं म्हणजे, शगुन सिनेमातलं ‘तुम अपना रंजो गम अपनी परेशानी मुझे दे दो...’ पडद्यावर नेहमीप्रमाणे त्रिकोण दिसतो.

पियानोचा लिड उघडलेला आहे आणि त्यातून नायक, नायिकेला होणाऱ्या वेदना त्याच्या चेहऱ्यावर दिसतात. नायक आहे कंवलजित, नायिका वहिदा. पडद्यावर हे गाणं लिबी राणा म्हणते. तिचे हिंदी सिनेमातलं नाव निवेदिता.

तिच्या चेहऱ्यावर दुःख आहे पण त्याला त्यागाची किनार आहे. कंवलजितला चेहऱ्यावर दुःख दाखवताना ज्या वेदना होतात, त्या पाहून आपल्यालाही वेदना होतात. पडद्यावर निवेदिता प्रेमभंगाच्या भावनेतून गाताना नायकाचं दुःख स्वतःकडे मागते. संगीतकार खय्यामची बायको जगजित कौर हिने ते गाणं म्हटलं आहे.

हृदयात कालवाकालव करणारं ते गाणं आहे. तसेच आणखीन एक गाणं म्हणजे ‘दिल के झरोखे में तुझको बिठाकर’ या गाण्याची चाल जयकिशननं तयार केली पण पियानो वाजवलाय चक्क शंकरनं.

जयकिशनने रफीला सांगितलं, "दिल के झरोखे में तुझको बिठाकर" हे आख्खं धृपद तू सलग गायलास म्हणजे श्वास न घेता गायलं तर गाणं उठावदार होईल. रफीने तसं केलं. रेकॉर्डिंगनंतर रफी जयकिशनला म्हणाला, "बाबा रे, असं गाणं मला गायला लावू नकोस.

तू माझा श्वास बंद केलास. मी अशी दहा गाणी गायली तर अकरावं गाणं गायला जिवंत असणार नाही." पियानो वाजवण्याची एकंदरीत शम्मी कपूरची स्टाईल, त्यातून त्यानी व्यक्त केलेलं मनातलं वादळ आणि शम्मीचे व्यक्तिमत्त्व यासाठी जयकिशनची विनंती किती परफेक्ट होती हे जाणवतं.

हिंदी सिनेमात पियानो पडद्यावर १९७०-८० पर्यंत प्रामुख्याने दिसला. मग हळूहळू पडद्यावर दिसणारा पियानो आणि त्याच्यावरचं गाणं कमी होत गेलं. काही अपवाद होते. मेरी जंग हा सिनेमा. जावेद अख्तरने लिहिलेला सिनेमा. त्यात आनंद बक्षीचं गाणं आहे.

‘जिंदगी हर कदम

एक नई जंग है

जीत जायेंगे हम

तू अगर संग है’

या सिनेमात पियानोचा उपयोग चक्क एका व्यक्तिरेखेसारखा केला गेला आहे. पुढे पुढे अर्थात दोन गोष्टी झाल्या. एक म्हणजे सिनेमाच्या कथा बदलल्या आणि गाण्यातले पूर्वीचे हळवे प्रेम, प्रेमाचे त्रिकोण, प्रेमभंग हे हद्दपार झालं. हीरो ॲक्शन-हीरो झाले. प्रेम, रोमांसमध्ये कवायती आल्या. त्यामुळं पियानो आता क्वचित दिसतो पण ज्यांनी जुने हिंदी सिनेमा पाहिले, ज्यांना ते आवडतात, ते पियानो कधीच विसरू शकत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT