pl deshpande written-directed play Ti Phoolrani ever green play Sakal
सप्तरंग

हरिततृणांची ओली मखमल

ग्रीक पुराणांमध्ये ‘मिथ्स’ बनलेल्या मोठ्या विलक्षण व्यक्तिरेखा पाहायला मिळतात. जसा स्वतःच्याच प्रतिमेच्या प्रेमात पडणारा ‘नार्सिसस,’ तसाच स्वतःच्याच निर्मितीच्या प्रेमात पडणारा ‘पिग्मॅलियन.

राज काझी

...पण, या मालिकेला लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर नेलं, ते पुलंच्या ‘फुलराणी’नं. ‘इंडियन नॅशनल थिएटर’ निर्मित आणि पु. ल. देशपांडे लिखित-दिग्दर्शित ‘ती फुलराणी’ या नाटकाचा पहिला प्रयोग २९ जानेवारी १९७५ ला मुंबईत झाला.

ग्रीक पुराणांमध्ये ‘मिथ्स’ बनलेल्या मोठ्या विलक्षण व्यक्तिरेखा पाहायला मिळतात. जसा स्वतःच्याच प्रतिमेच्या प्रेमात पडणारा ‘नार्सिसस,’ तसाच स्वतःच्याच निर्मितीच्या प्रेमात पडणारा ‘पिग्मॅलियन.’

महान शिल्पकार असलेल्या ‘पिग्मॅलियन’नं आपलं अवघं कसब पणाला लावत संगमरवरात एक अप्सरेसम लावण्यवती घडवली आणि तिच्या स्वर्गीय सौंदर्यानं खुळावून तिच्या प्रेमात पडला! आजतागायत शेकडो वर्षं या ‘पिग्मॅलियन’चा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वावर वा त्याच्या प्रेमकथेचा प्रभाव देशोदेशीच्या साहित्य व कला व्यवहारांत कायम आहे.

जवळपास पाचेकशे वर्षांपूर्वीच्या शेक्सपिअर आणि नंतर गिल्बर्ट आदींच्या नाटकांपासून पाचेक वर्षांआधीच्या दक्षिण कोरियाच्या म्युझिक अल्बमपर्यंत आढळत आलेला ‘पिग्मॅलियन’ आजही ‘जिंदा है!’ (या कोरियन अल्बमचं नावच ‘पिग्मॅलियन’ आहे!) तद्वतच, चित्रपटांपासून चित्रकलेपर्यंत आणि साहित्यापासून मानसशास्त्रापर्यंत जगभर त्याचं स्पष्ट-अस्पष्ट प्रतिबिंब उमटत येतंच आहे.

जगविख्यात नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या जर्मन ‘पिग्मॅलियन’ नाटकाचा पहिला प्रयोग १९१३ मध्ये व्हिएन्नात झाला. पुढच्याच वर्षी हे नाटक इंग्रजीत लंडनच्या ‘वेस्ट एन्ड’च्या रंगमंचावर अवतरलं. या ‘पिग्मॅलियन - अ रोमान्स इन फाइव्ह ॲक्ट्स’च्या पुढं अनेक आवृत्त्या निघत गेल्या.

१९५६ मध्ये गीतकार लर्नर आणि संगीतकार लोव या दुकलीनं ‘पिग्मॅलियन’वर आधारित संगीतिका ‘माय फेअर लेडी - अ म्युझिकल इन टू ॲक्ट्स’ न्यूयॉर्कमध्ये सादर केली. १९६४ ला ‘माय फेअर लेडी’ सिनेमाच्या पडद्यावर आलं आणि जगभरात प्रचंड गाजलं. रेक्स हॅरिसन व ऑड्रे हेपबर्न यांच्यातल्या अद्‍भुत केमेस्ट्री अन् जुगलबंदीनं हा चित्रपट अविस्मरणीय केला आणि याची मोहिनी इंग्लंड-अमेरिकेबाहेरचं जगही व्यापू लागली.

आपल्यापुरतं बोलायचं, तर भारतात ही ‘लेडी’ पहिल्यांदा उर्दूतून प्रवेश करती झाली. बेगम कुदसिया जैदी लिखित ‘आझरका ख्वाब’ हे ‘पिग्मॅलियन’वर आधारित नाटक ‘इप्टा’ संस्थेनं १९७० मध्ये सर्वप्रथम सादर केलं. १९७२ च्या डिसेंबरात ‘मराठी रंगभूमी’नं विद्याधर गोखले यांचं ‘स्वरसम्राज्ञी’ रंगमंचावर आणलं. पाठोपाठ म्हणजे, अगदी पुढच्याच महिन्यात जानेवारी ७३ ला ‘इंडियन नॅशनल थिएटर’च्या निर्मितीतून मधू राय यांचं ‘संतू रंगीली’ गुजराती रंगभूमीवर आलं.

या ‘फुलराणी’नं हजारांहूनही जास्त हाऊसफुल्ल प्रयोग तर केलेच; पण, त्याहूनही कित्येक पटीनं जास्त लाखो मराठी रसिकांच्या अलोट प्रेमाची कमाई केली आणि मराठी रंगभूमीवरच्या पहिल्या स्त्री सुपरस्टारलाच नाही तर ‘भक्ती बर्वे’ या अमर आख्यायिकेला जन्म दिला!

स्वभाषेचा आग्रह-दुराग्रह, भाषेच्या उच्चार पद्धतीवरून ठरणाऱ्या उच्च-नीचत्वाचे निकष जगभरच्याच मनुष्यसमाजात रूढ आहेत. याला अर्थातच मराठी समाजही अपवाद नाही; किंबहुना, यात दोन पावलं पुढंच आहे. पुलंना ‘पिग्मॅलियन’ वाचता वाचताच त्यातली पात्रं आपली वाटायला लागली ती यामुळेच!

बोलीभाषा, शब्दांचे उच्चार, त्यातले हेलकावे, लकबी यातून आढळून येणारी जातीय, प्रांतीय, ग्रामीण, नागरी वैशिष्ट्यं टिपत राहणं, हा पुलंचा आवडता छंद! ‘पिग्मॅलियन’मधल्या निरनिराळ्या पात्रांच्या संवादांची मराठी रुपडी त्यांना नाटक वाचतानाच दिसू लागली आणि हे नाटक मराठीत आणण्याचं त्यांच्या मनात बसलं; पण, बरीच वर्षं तसं काही घडलं नाही.

पुढं कधीतरी सतीश दुभाषी त्यांना नवं नाटक देण्याची गळ घालू लागले आणि त्यांच्या मनातला ‘पिग्मॅलियन’ पुन्हा जागा झाला!

नाटकातला प्रोफेसर हिगिन्स त्यांना दुभाषीत दिसू लागला आणि त्यांनी नाटक लिहायला घेतलं. सातारच्या कूपर गेस्ट हाऊसमधल्या मुक्कामात अवघ्या दोन दिवसांत दोन अंक लिहून झाले; मात्र, तिसरा अंक पूर्ण व्हायला पाचवा महिना उजाडला! सतत जागतं असलेल्या पुलंमधल्या कवितेच्या प्रेमातून ‘पिग्मॅलियन’मधली फुलवाली इलायझा डूलिटिल नाटकाच्या शीर्षकस्थानी जाऊन बसली ‘फुलराणी’ होऊन!

इंग्रजी चित्रपटाचा रात्रीचा शेवटचा खेळ संपल्यानंतर मुंबईच्या पावसात रस्त्यावर चिडचिड करत टॅक्सी शोधणाऱ्या त्रस्त समुदायात निश्चिल शांतपणानं लोकांच्या संवादातून त्यांच्या भाषेसंबंधी नोट्स घेणाऱ्या भाषाशास्त्रज्ञ प्रोफेसर अशोक जहागीरदारला ही ‘फुलराणी’ भेटते ती इथंच.

कऱ्हाडी ठसक्यात मुंबईचा व्यवहारीपणा आणण्याच्या प्रयत्नातही तिचा मूळचा निरागसपणा लपत नाही. टिकून राहण्यासाठीची हुशारी आणि पुढं जाण्यासाठीची जिद्दी वृत्ती जाणवल्याशिवाय राहत नाही; पण, तिच्यात तडफदारपणा असला, तरी तिच्याच तोंडची भाषा तिच्या पुढं जाण्याआड येणार, असं प्रोफेसर महाशय बोलून दाखवतात.

या फुलवालीची भाषा बदलली, तर हिचं भविष्यही बदलू शकतं असं योगायोगानंच तिथं भेटलेल्या विद्वान डॉ. विश्वनाथ जोशींना अशोकनं सांगितलेलं असतं. हे कानी पडलेली ती फुलवाली मंजुळा दुसऱ्याच दिवशी त्याचं घर गाठते व आपल्याला शिकवण्याची विनंती करत राहते.

मंजुळेला शुद्ध बोलायला शिकवून सहा महिन्यांत राजकन्या म्हणून बड्या लोकांच्या पार्टीत बेमालूम फिरवून आणून दाखवण्याचा विडाच अशोक उचलतो. मंजुळेच्या ‘फी’ची जबाबदारी व या प्रयोगाचं प्रायोजकत्व डॉ. विश्वनाथ ऊर्फ विसूभाऊ आनंदानं स्वीकारतात.

गावंढळ मंजुळेच्या कायापालटाच्या ट्रेनिंगचा पुढचा अंक त्यानंतर सुरू होतो. बोलण्याच्या रीतीबरोबरच वागण्याच्या रीतीही शिकवणं क्रमप्राप्त झालेलं असतं. नाटकातला हाच भाग खरं तर ‘फुलराणी’चं बलस्थान होतं.

शब्दांच्या उच्चारांबरोबर त्यांच्या अर्थांपासून त्यातल्या भावांच्या छटांपर्यंत पोहोचण्याच्या प्रवासात अशोकच्या स्वभावाचे व मनाचे कंगोरेही मंजुळेला कळत जातात व कळत-नकळत बंधही जुळत-तुटत जातात. या भागात ‘फुलराणी’नं मूळ ‘पिग्मॅलियन’लाही मागं सोडलं आहे!

शेवटी येणारा ‘हाय सोसायटी पार्टी’चा प्रसंग हा नाटकाचा अर्थातच एक ‘हायपॉइंट’ आहे; पण, गंमत म्हणजे, तो नाटकाचा ‘क्लायमॅक्स’ नाही. पैजेप्रमाणं व अपेक्षेपेक्षा जास्तच मार्क मिळवत मंजुळा पार्टी जिंकूनच परत येते; पण, नाटक इथं संपत नाही.

प्रयोग कमालीचा यशस्वी झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ अशोक व विसूभाऊ सेलिब्रेशनला ‘बसतात!’ यशाच्या धुंदीत अशोकचा अहंकार उसळून येतो. हे सगळं त्याचंच कौशल्य, त्यात मंजुळेचा सहभाग कळसूत्री बाहुली एवढाच, अशा उन्मादापर्यंत पोहोचलेल्या अशोकच्या दिशेनं चप्पल भिरकावून मंजुळा ताठ कण्यानं उभी राहते. ‘शिकायला आलेलाही काही शिकवून जातच असतो,’ याचीच प्रचिती पुन्हा येते. एका वेगळ्या वर्गसंघर्षातल्या विजयाचं सूचन करतच नाटक संपताना आणखी उंचीवर गेलेलं असतं!

पुलंची बहुतांश नाटकं रूपांतरित वा आधारित होती; पण, ती कायम अस्सल व आपल्या मातीतली वाटत राहिली. ‘ती फुलराणी’ हे लेखनदृष्ट्या त्यांचं सर्वोत्तम नाटक मानलं गेलं. मराठी भाषेच्या बारकाव्यांबरोबरच मराठी माणसाच्या स्वभावातल्या बारीक खोडी आणि त्या-त्या भागातल्या मातीचा गुण हे सगळं या रूपांतरात उतरलं.

भाषांतर, अनुवाद व रूपांतर ही चढती भाजणी ओलांडून हे नाटक ‘अनुसर्जन’ या पातळीला पोहोचल्याचं आणि हे अनुसर्जन स्वतंत्र सृजनाच्या सममूल्य असल्याचं सप्रमाण प्रतिपादन ‘ती फुलराणी’च्या छापील संहितेच्या प्रस्तावनेत रसिक व्यासंगी अरुण आठल्ये यांनी ज्या अभ्यासपूर्ण पद्धतीनं लिहिलं आहे, ते मुळातूनच वाचायला हवं.

मूळ नाटकात असूच न शकणारी एक अपूर्व प्रकारची नांदी पुलंनी या नाटकासाठी स्वतंत्रपणे लिहिली आहे. भाषेची निर्मिती, त्यातली स्वर-व्यंजन व्यवस्था, शब्दांचा जन्म या सगळ्या जटिल गोष्टी ही नांदी सोप्या आणि सुरेलपणे सांगते!

याच चालीवर खुसखुशीत पण, नेमकं मर्म उलगडणारे नाटकाचे संवाद आहेतच; पण, नाटकाच्या प्रयोगात बहार आणतात, ती यातली ‘लिरिकल’ अर्थात गेय स्वगतं!

‘‘जा..जा..मंजुळा, जा. मी तुला केली क्षमा,

जरी तू केलास माझा कंप्लिट मामा..!’’

हे अशोकचं शेवटचं स्वगत प्रेक्षकांना जणू गुदगुल्या करायचं; पण, खरी आणि अजरामर मौज म्हणजे,

‘‘थांब!..तुला शिकवीन चांगलाच धडा,

तुज्या पापाचा भरलाय घडा’’

हे मंजुळेचं स्वगत तर भक्ती बर्वेंनी मराठी रंगभूमीच्या मुकुटात जडवलेलं एक अनमोल रत्न आहे. खरं तर त्यांच्या ‘फुलराणी’नं मराठी नाट्यरसिकांच्या अंत:करणात भोवतालच्या कोलाहालात शांतवणारी सदाहरित तृणांची एक मखमल अंथरून ठेवली आहे. ‘अखेरचा सवाल’पासून ‘आई रिटायर होतेय...’पर्यंत व्हाया ‘हँड्स अप,’ ‘किमयागार,’ ‘हयवदन’ ते ‘नागमंडल’पर्यंत त्यांच्या एकापेक्षा एक सरस, अविस्मरणीय भूमिकांच्या मांदियाळीतही ‘फुलराणी’ शीर्षस्थानीच राहील.

मराठी रंगभूमीच्या इतिहासातली सदाबहार सुखात्मिका ‘फुलराणी’ भक्ती बर्वेंचंच स्मरण करून देत राहील हे खरंच; पण, भक्कम साथ देणारे तुल्यबळ सतीश दुभाषी आणि अरविंद देशपांडे यांचाही हे नाटक विसर पडू देणार नाही. एरवी कधीही यत्किंचितही भावविवश न झालेले डॉ. श्रीराम लागू भक्ती बर्वेंच्या दुर्दैवी अपघाती निधनावर म्हणाले होते, ‘‘बहुधा देवलोकी ‘फुलराणी’चा प्रयोग करायचा असेल, बाकी सगळं तिथं होतंच; पण, भक्तीशिवाय ‘फुलराणी’ अशक्यच!’’

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गानं जाता-येता ‘त्या’ बोगद्यानंतरच्या निष्ठुर वळणावर अस्सल मराठी रसिकाला आजही ‘रातराणी’चा गंध मनोमन जाणवतो म्हणतात...

(लेखक नाट्य व चित्रपट क्षेत्राचे जाणकार अभ्यासक असून, पटकथाकार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT