Nanda Devi Peak sakal
सप्तरंग

आनंददायी नंदादेवी शिखरं

उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात ऋषीगंगा व्हॅलीत नंदादेवी शिखर समूह आहे. यात दोन शिखरांचा समावेश होतो, एक नंदादेवी तर दुसरं सुनंदादेवी.

उमेश झिरपे

हिमालय पर्वतरांग अनेक देवदेवतांचं आदिस्थान. महाभारत, रामायण, ऋषी मुनींचा हिमालयाशी दृढ संबंध आहे, हे आपण विविध पर्वतांची माहिती घेताना जाणून घेतलं. हिमालय हे देवतांचं घर आहे, आजही इथं विविध देवी - देवता अधिवास करतात, अशी स्थानिकांची, अनेक इतर लोकांची समजूत आहे. विविध शिखरं देखील देवी-देवतांच्याच नावानं ओळखली जातात, यातील एक प्रमुख शिखर म्हणजे माउंट नंदादेवी!

उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात ऋषीगंगा व्हॅलीत नंदादेवी शिखर समूह आहे. यात दोन शिखरांचा समावेश होतो, एक नंदादेवी तर दुसरं सुनंदादेवी. नंदादेवी शिखराची उंची ही ७ हजार ८१६ मीटर असून सुनंदादेवी या शिखराची उंची ७ हजार ४३४ मीटर आहे. सुनंदादेवी या शिखराची ओळख नंदादेवी-पूर्व शिखर अशी देखील आहे. शिखरं तब्बल दोन किलोमीटर लांब अशा हिमकड्याने जोडलेली आहेत.

अतिउंच शिखरं व विस्तीर्ण असा कडा त्यामुळं हा शिखर समूह धिप्पाड व भेदक वाटतो. या दोन्ही शिखरांचा संदर्भ भगवद् गीतेत आढळतो. या दोन्ही शिखरांवर नंदा व सुनंदा देवींचा अधिवास आहे, असं मानलं जातं. त्यामुळं स्थानिक लोक या दोन्ही शिखरांना अतिशय पवित्र मानतात.

नंदादेवी शिखर समूह हा गिर्यारोहकांसाठी आव्हानात्मक राहिला आहे. उंचीनुसार सध्या जगातील तेविसाव्या क्रमांकाचं असलेलं नंदादेवी शिखर सन १८०० मध्ये जगातलं सर्वोच्च शिखर म्हणून ओळखलं जात होतं. पुढं इतर शिखरांचा शोध लागल्यावर नंदादेवी शिखराचा उंचीनुसार क्रमांक खाली येत गेला. उंची कमी असली तरी इथली आव्हानं ही भेदक आहेत. या दोन्ही शिखरांचे कडे हे अतिशय उंच व तीव्र आहेत, येथे चढाई करावयाची असल्यास अक्षरशः काटकोनातील हिमभिंतीवर चढाई करावी लागते.

१९३६ मध्ये पहिल्यांदा नंदादेवी शिखर चढाई यशस्वी झाली. नोएल ओडेल व बिल टिलमन यांनी नंदादेवी शिखरमाथा गाठण्यात यश मिळविलं. त्यानंतर अनेक वर्षे कित्येक दिग्गज गिर्यारोहक या शिखरावर चढाई करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत होते. मात्र कोणालाही यश मिळालं नाही.

भारतीय सैन्यदलानं १९५७ व १९६१ असे दोन असफल प्रयत्न केले. शेवटी १९६४ मध्ये कर्नल नरेंद्र कुमारांच्या नेतृत्वाखाली पहिली भारतीय व शिखरावरील दुसरी मोहीम यशस्वी झाली. १९५१ मध्ये फ्रेंच संघातील गिर्यारोहकांनी नंदादेवी व सुनंदादेवी या दोन शिखरांना जोडणाऱ्या कड्याच्या बाजूने चढाई करण्याचा प्रयत्न केला. त्यात अपघात होऊन दोन गिर्यारोहकांचा मृत्यू झाला व पुढं मोहीम अर्धवट राहिली.

या मोहिमेत दिग्गज गिर्यारोहक व एडमंड हिलरींच्या साथीनं जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवर सर्वांत प्रथम चढाई करणारे शेर्पा तेनसिंग नोर्गे मदतनीस सदस्य म्हणून सहभागी झाले होते. पुढे अनेक वर्षांनी आठवणींना उजाळा देताना तेनसिंग नोर्गे सांगायचे, की नंदा-सुनंदादेवी या जोड पर्वत शिखरांवरील मोहीम ही त्यांच्या आयुष्यातील सर्वांत कठीण गिर्यारोहण मोहीम होती, अगदी एव्हरेस्टपेक्षाही कठीण. येथे असणाऱ्या आव्हानांची सर कोणत्याच दुसऱ्या शिखरांना येणार नाही, असेही ते सांगायचे.

नंदादेवी शिखर समूहाशी जोडली जाणारी प्रमुख घटना किंवा कथा म्हणजे या परिसरात हरवलेले रेडियो ॲक्टिव्ह डिव्हाइस. भारताचे गुप्तचर खाते व अमेरिकेची संस्था सीआयए यांनी संयुक्त विद्यमाने न्यूक्लियर पॉवर्ड टेलिमेट्री रिले लिसनिंग डिव्हाइस नंदादेवी शिखरमाथ्यावर बसविण्यासाठी १९६५ ते १९६८ अशी तीन वर्षे कसून प्रयत्न केले.

चीनच्या शिंजियांग प्रांतात चालू असलेल्या मिसाइल टेस्टिंगची माहिती मिळविण्यासाठी हे डिव्हाइस बसविण्याचा मानस होता. मात्र, अतिशय खराब हवामान व नंदादेवी पर्वत शिखरावरील आव्हाने यांमुळे ते डिव्हाइस शिखरमाथ्याच्या जवळ सोडण्यात आले. पुढे त्या डिव्हाइसशी संपर्क होऊ न शकल्याने त्याचा शोध घेण्याची मोहीम आखण्यात आली, ज्यात यश आले नाही.

रेडियो ॲक्टिव्ह असल्याने म्हणजे किरणोत्सर्ग होण्याची शक्यता असल्याने या संपूर्ण परिसरात मानवी वावर बंद करण्याचे प्रशासनाने ठरविले, असे सांगितले. त्यामुळे नंदादेवी शिखर समूहाच्या पायथ्याशी असलेलं नंदादेवी अभयारण्य सर्वांसाठीच अनेक वर्ष बंद होते.

नंदादेवी अभयारण्य हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या वारसा यादीत समाविष्ट आहे. झंस्कार पर्वतरांग व ग्रेटर हिमालय यांच्या मध्ये वसलेला हा परिसर तब्बल ६ हजार ४०७ वर्ग किलोमीटर परिसरामध्ये पसरलेला असून उत्तराखंड राज्यातील पिथोरगड, बागेश्वर व चमोली जिल्ह्यात पसरलेला आहे. ऋषी गंगा, धौली गंगा, पुष्पावती, खिरो गंगा यांसोबतच अलकनंदा नदी व तिच्या इतर उपनद्यांनी हा संपूर्ण परिसर मनमोहक दिसतो. येथे जगातून नष्ट होत चाललेल्या वृक्षांच्या विविध दुर्मीळ प्रजाती आढळून येतात.

आशियाई काळे अस्वल, हिमालयीन करडे अस्वल यांचे मुख्य घर याच परिसरात आहे. सोबत भरळ, हिमालयीन ताहर, हिमचित्ता, हिमालयीन कस्तुरी मृग येथे प्रामुख्यानं आढळून येतो. नंदादेवी-सुनंदादेवी या पर्वत शिखरांना स्थानिक लोक अतिशय पवित्र मानतात. नवरात्री उत्सवात या देवतांचं विशेष पूजन देखील केलं जातं.

गढवाल व कुमाऊ हिमालयाची रक्षणकर्ता देवता अशी नंदा-सुनंदा पर्वतांची ओळख आहे. नंदा-सुनंदा म्हणजे माँ दुर्गा व पार्वती यांची रूपं. या दोन्ही देवता कडक असून मानवाच्या चुकांची शिक्षा ही प्रकोपातून देतात, अशी स्थानिकांची गाढ श्रद्धा आहे.

२०२१ मध्ये नंदादेवी शिखर परिसरातील हिमनदीचं प्रसरण झाल्यानं धौलीगंगा व ऋषीगंगा नद्यांना महापूर आला, ज्यामध्ये धौलीगंगा नदीवरील रेनी गावात असलेले जलविद्युत केंद्र वाहून गेले, तसेच १४० हून अधिक लोकांचा यात मृत्यू झाला. या घटनांमध्ये देवीचा प्रकोप होता, असं स्थानिकांना वाटतं.

नंदादेवी व सुनंदादेवी पर्वतशिखरं ही नितांत सुंदर आहेत. तेथे देवीचा अधिवास असतो... यावर मतमतांतरे असतीलही... मात्र ही दोन्ही शिखरं त्यांच्या नावाप्रमाणे व ओळखीप्रमाणे अतिशय आनंद व समृद्ध करणारी शिखरं आहेत.

(लेखक हे ज्येष्ठ गिर्यारोहक असून ‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघा’चे अध्यक्ष आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT