poems in Konkani language Chitralipi sakal
सप्तरंग

उत्कट संवेदनांचा आवेग

कवितांच्या भाषिक अवकाशातून भावनांचे रंगलेपन

अवतरण टीम

कवितांच्या भाषिक अवकाशातून भावनांचे रंगलेपन

- प्रा. सुजाता राऊत

कवी परेश नरेंद्र कामत यांचा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कोकणी भाषेतील कवितासंग्रह ‘चित्रलिपी’चा मराठी अनुवाद तरुण पिढीतील आश्वासक कवी गीतेश गजानन शिंदे यांनी केला आहे. या कवितांच्या भाषिक अवकाशातून भावनांचे रंगलेपन सामोरे येते. ते लक्षणीय आहे. फक्त मनाला विसावा देणाऱ्या या शब्द कविता नाहीत; तर अंतर्मनातील आवेग, संवेगांचा गाढ अनुभव त्यात आहे.

साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या ‘चित्रलिपी’ या कवितासंग्रहाच्या अनुवादाकडे वळण्यापूर्वी मूळ कवितांचा आशय व सौंदर्य समजावून घेणे क्रमप्राप्त ठरते. जाणीवसंपन्न व संवेदनशील कविमन भवतालाचा वेध घेते, तसेच ते आपल्या आंतरिक प्रदेशांचाही वेध घेत असते. ‘चित्रलिपी’त स्वतःच्या अंतरंगातील प्रदेश गहिऱ्या आर्त रंगात रंगलेले आहेत व त्या अभिव्यक्तीला त्या प्रदेशातील निसर्गाचा, भूमीचा गंध लाभलेला आहे.

‘उसवते पहाट

हळूहळू

सावरीच्या बोंडांसारखी

किरणं कापूसच जशी

- जळीस्थळी’

अशी काव्यात्म अनुभूती देणारी ही अल्पाक्षरी कविता हळूहळू फुलणाऱ्या कळीप्रमाणे उमलत गेली आहे. निसर्ग व मानवी भावना एकमेकांत मिसळून गेल्या आहेत. पहाट, झाड, प्रकाश, पक्षी, होडी, काळोख, मुंगी अशा थीम कवितांतून हे चित्रदर्शी विश्व सामोरे येते.

‘त्या पणत्यांचा झिळमिळ उजेड’, ‘पिकलेले ऊन’, ‘फुलांचे घोस फुटून’, ‘मुळांना फुटून डोळे’, ‘सावल्यांची एक भाषा’, ‘सावल्यांचे रान’, ‘उजेडाचा गर्भ’ अशी अनेक अन्वर्थक शीर्षके असणाऱ्या कविता व त्यातील निसर्ग प्रतिमा आशयाबरोबर एकरूप झालेल्या आहेत. यातील काही कवितांमध्ये थीम आहे जी एकीतून उलगडून पुढच्या कवितेत दृग्गोचर होते. उदाहरणार्थ ‘नक्षत्रांच्या डोळ्यांनी’, ‘नक्षत्रांसाठी’ या कविता.

प्रेमविषयक जाणीव प्रकट करणाऱ्या कविता मोठ्या प्रमाणावर सर्वच भाषांमध्ये लिहिल्या जातात. मराठीतही अशा प्रकारच्या कविता अनेकदा ढोबळपणे अनुभव व्यक्त करताना दिसतात. ‘चित्रलिपी’त अशा भावनांची लिपी फार तरलपणे रेखाटलेली आहे. एक विस्तृत, साक्षात, समर्पणशील प्रेमभावनेचे अस्तर या कवितांना आहे.

‘ओत ग

तुझी कळशी

ओत माझ्या कळशीत

ओत ग

तुझं जिणं ओत

माझ्या जिण्यात’

इतक्याच ओळींमध्ये ही कविता संपते. पण ती एक व्यापक उत्कट जाणिवेचा खोल अनुभव देते. ही कविता अनुवादातही अतिशय सरस उतरली आहे.

‘झाड झणझणत राहिले

आणि झाडाखाली

तू अन् मी’

ही कविताही याचे अस्सल उदाहरण आहे.

चित्राला दृश्य भाषा असते तशी या कवितांना दृश्यात्मकतेत नेणारी भाषा आहे. त्यातून प्रकट होणारे संवेदन अनोखे आहे. यातील कवितांना निसर्गाचा परिमळ आहे. गोव्याच्या निसर्गसमृद्ध भूमीशी नातं जपणारी ही कविता आहे. पण ती शब्दबंबाळ किंवा ठराविक भावना त्याच त्या प्रकारे चित्रित करणारी नाही. दोन ओळींमधील जी रिकामी जागा असते, त्याला जी कविता समर्थपणे उद्गार देऊ शकते, ती मनाच्या कायम आसपास राहते. चित्रलिपीतल्या अनेक अल्पाक्षरी कवितांमध्ये हे सामर्थ्य जाणवते. त्यामुळे ती फक्त हळवी भावूक अशी कविता नाही.

‘स्वप्नांत येतात मुंग्या माझ्या

आणि माझ्या चिंतनासही मुंग्या येतात...’

ही त्याची साक्ष देणारी कविता आहे. किंवा

‘बाहेर काहीही नसते

सगळे असते आतच

काळजास बिलगलेले

काळे निळे’

हे कवीचे शब्द पूर्णपणे पटतात.

कविता हा बौद्धिक साहित्य प्रकार नसून त्यातील भाव संवेदन महत्त्वाचे असते. तोच या साहित्य प्रकाराचा अस्तित्वबिंदू आहे. त्यामुळेच गद्य प्रकारापेक्षा कवितेचा अनुवाद करणे हे जास्त आव्हानात्मक आहे. कवितेतला टोकदार अनुभव किंवा शब्दांमधला विराम अचूकपणे दुसऱ्या भाषेत उतरवताना त्यात पसरटपणा येण्याचा संभव असतो.

मराठीतील कवी, अनुवादक गीतेश गजानन शिंदे यांनी या अल्पाक्षरी कवितांना पूर्ण न्याय दिला आहे. कवितेला मूलतः असणारी लय अनुवादात अचूक पकडली आहे. यातील अनेक शब्द मराठीतील असावेत इतके चपखल वाटतात. तरीही ते मूळ कवीच्या शब्दसंपत्तीची झलक आपल्यासमोर ठेवतात. उदाहरणार्थ ‘रंगवलेले झाडपिके स्वप्न’, ‘पाणी वाहते वेडेपिसे’, ‘पिकलेले ऊन’, ‘ओलं सगळं रान मुसमुसतंय’.

मनात ओथंबलेल्या भावना मूळ कवीने ज्या उत्कटतेने प्रकट केल्या, तशा संवेदनापूर्ण पद्धतीने अनुवादात आल्या आहेत. ‘तू बोलते / मी ऐकतो ग’, ‘ओत ग’ अशा संवादात्मक बोलीभाषेतून उतरलेल्या ओळी फार प्रभावी वाटतात. कवितेच्या अनुवादात शब्दांची निवड व प्रयोजन यांचे खास महत्त्व असते. वैचारिक, सामाजिक कवितेचा अनुवाद करण्यापेक्षा भावगर्भ कवितेचा अनुवाद दुसऱ्या भाषेत करणे जास्त कसोटी पाहणारे आहे.

अनुवाद करताना मूळ कवीची शैली अबाधित ठेवणे हीदेखील अनुवादकर्त्याची मुख्य जबाबदारी असते. अनुवादक स्वतः कवी असताना त्याची व्यक्त करण्याची स्वतःची शैली असते, पण अनुवादित कवितेवर स्वतःच्या शैलीचा ठसा नसावा तर मूळ कवीचे शैलीविशेष वाचकांपर्यंत पोहोचवले गेले पाहिजेत. ‘चित्रलिपी’च्या मराठी अनुवादात याचे सजगपणे भान राहिले आहे ही जमेची बाजू आहे. कवी गीतेश गजानन शिंदे यांच्या स्वतःच्या कवितेचा बाज, प्रकटीकरण वेगळ्या शैलीचे आहे, पण त्यांनी या अनुवादात मूळ कवीची शैली उत्तम पकडली आहे.

‘वाहते नदी

गूढ घनदाट रानातून काळोख्या

वळणं घेत घेत

आपल्याच प्राक्तनाचे काठ

स्पर्शत स्पर्शत

पाण्याची चित्र

चितारित चितारित’

‘चित्रलिपी’ या शीर्षक कवितेप्रमाणे कोंकणी कवितेतील संवेदन आपल्या मनाचे काठ स्पर्शून जातात. या कवितांच्या भाषिक अवकाशातून भावनांचे रंगलेपन सामोरे येते. ते लक्षणीय आहे. फक्त मनाला विसावा देणाऱ्या या शब्द कविता नाहीत; तर अंतर्मनातील आवेग, संवेगांचा गाढ अनुभव त्यात आहे.

‘कितीही भरलं

पाणी विहिरीत

तरीही घुमत राहते रितेपण’

अशी हुरहुर लावणारी विकल भावनाही ही कविता देऊ करते. त्याच वेळी सौंदर्यानुभवाने मन तृप्तही करते. शेवटी इमर्सनने म्हटल्याप्रमाणे शब्दच कविता होण्याचा एक विलक्षण आर्त अनुभव देणारी ही चित्रलिपी मराठी वाचकांनी नक्कीच अनुभवली पाहिजे. मूळ सकस कोंकणी कविता एका उत्तम अनुवादातून गीतेश शिंदे यांनी समोर आणली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT