poet suresh bhat poetics  sakal
सप्तरंग

मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते!

कविवर्य सुरेश भटांची बहुआयामी काव्यप्रतिभा आपल्या आकलनाच्या चिमटीत पकडणं फारच कठीण आहे.

अवतरण टीम

कविवर्य सुरेश भटांची बहुआयामी काव्यप्रतिभा आपल्या आकलनाच्या चिमटीत पकडणं फारच कठीण आहे.

किशोर बळी

कविवर्य सुरेश भटांची बहुआयामी काव्यप्रतिभा आपल्या आकलनाच्या चिमटीत पकडणं फारच कठीण आहे. कवितेच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये ज्या सामर्थ्यानिशी सुरेश भट उमटतात, त्याला सलामच करावासा वाटतो.

मराठी कवितेतलं हे एक भन्नाट रसायन असल्याची वारंवार प्रचीती येते. रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात... ते अगदी शेवटच्या रसवंतीचा मुजरा या त्यांच्या कवितासंग्रहातून उभा झालेला भटांच्या प्रतिभेचा हिमालय रसिकांना स्तिमित केल्याशिवाय राहत नाही.

या कवितांचा भरभरून आनंद आपण घ्यावा आणि इतरांनाही द्यावा, एवढेच मला वाटते. आज सुरेश भटांची जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना त्यांच्या काव्यप्रदेशातून फेरफटका मारताना अंतरंगात उमटलेले हे तरंग आहेत.

एखादा कवी खूपच सुंदर लिहितो, हे आपण कसं समजावं? तर समाजमनावर त्याच्या कवितेचा किती प्रभाव पडू शकला, हे त्याचं परिमाण असू शकतं, असं मला वाटतं. एखादा कवी काव्यशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत उत्कृष्ट लिहीत असेलही;

परंतु त्याच्या कविताच कुणाला ठाऊक नसतील, त्या वाचल्यानंतर चटकन समजत नसतील किंवा समाजाच्या सुख-दुःखाचं प्रतिबिंब त्याच्या शब्दांत उमटत नसेल, तर तो समीक्षकांच्या नोंदी आणि संदर्भांपुरताच मर्यादित राहतो, तो लोकांचा कवी होऊ शकत नाही.

म्हणूनच सुरेश भटांना वाटतं की ‘कवीचं खरं न्यायालय ही सामान्य जनता आहे.’ त्याच्यावर प्रेम करणारे रसिकच त्याच्या कवितांना जगवतील. याहून दुसरी कुठलीही मोठी मान्यता कलावंताकरिता असू शकत नाही.

कधीकधी सुंदर शब्द आपल्या कानावर पडतात. आपल्याला भावतात. कारण ते अंतःकरणात पाझरलेले असतात. अशा वेळी हे लिहिणारा कवी कोण, ही गोष्टदेखील दुय्यम ठरते. जसे की एखादा चांगला पदार्थ आपल्याला आवडतो आणि त्याची चव अगदी जिभेवर रेंगाळते, तेव्हा तो कुणी बनवलेला आहे, हा एक वेगळा विषय असतो. आणि तिथेच तो आचारी यशस्वी झालेला असतो. तशी तिथेच कविता जिंकलेली असते. तिथेच कवीच्या प्रतिभेचे सामर्थ्य सिद्ध झालेले असते.

‘पहाटे पहाटे मला जाग आली... तुझी रेशमाची मिठी सैल झाली’ असे रोमँटिक गाणे कानावर पडते तेव्हा ते भटांचेच आहे की अन्य कुणाचे किंवा ते भावगीत आहे की गझल याला फारसा अर्थ नसतो. ते मनाला भावणे सर्वांत महत्त्वाचे असते.

‘मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं... जाईच्या पाकळ्यांस दव अजून सलते गं’ हे ऐकताना होणारा आनंद हा ते कुठल्या वृत्तात लिहिलेले आहे, यावर अवलंबून असत नाही. ‘मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे’ किंवा ‘मालवून टाक दीप चेतवून अंग अंग’ अशी अजरामर गाणी लिहिणारे सुरेश भट म्हणूनच श्रेष्ठ कवी असतात.

‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे...’ अशा अप्रतिम शब्दांमधून आपल्याला भेटणारे सुरेश भट हे उत्तम प्रेमकवी वाटतात. श्रुंगारिक कविता लिहिणारे वाटतात; परंतु दुसरीकडे ते ‘गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे...

आणीन आरतीला हे चंद्र-सूर्य-तारे’ अशी मातृभूमीचा गौरव करणारी कविता लिहितात; तर कधी ‘उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ असे म्हणत जगण्याचे बळ पुरवतात आणि त्यांचे हेच शब्द नव्या संघर्षाचा ऊर्जास्त्रोत होतात.

काल भीमजयंती जगभर साजरी झाली. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या चतुःसूत्रीतून समाजजीवनाला मानवतेचं अधिष्ठान देण्याचं मौलिक कार्य बाबासाहेबांनी केलं. सुरेश भटांवर बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव होता, हे त्यांच्या अनेक रचनांमधून सहजपणे लक्षात येईल. भीमरायांना अभिवादन करताना सुरेश भट लिहितात -

भीमराया, घे तुझ्या या लेकरांची वंदना

आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना

काल जे होते मुके आज बोलू लागले

अन् तुझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले

हे वसंता घे मनाच्या मोहरांची वंदना

आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना

डॉ. बाबासाहेबांवर हजारो गाणी लिहिल्या गेली; परंतु त्यातही अशा गीताचा आशय ठसठशीतपणे मनामनावर कोरला गेला, यात कुठलीही शंका नाही. अशा प्रकारे समाजजीवनावर मोठा प्रभाव टाकण्यात भटांची कविता यशस्वी झाली, असे वाटते.

जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला

मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो

असे सुरेश भट लिहितात ते निर्विवादपणे मराठी गझलेसंदर्भातच. अरबी-फारसीतून आलेली गझल माधव ज्युलियनांनी प्रथमतः मराठीत लिहिली खरी; परंतु ती सर्वार्थाने मराठीची झाली, याचे श्रेय सुरेश भटांचे आहे. एल्गार आणि झंझावात या दोन संग्रहात सुरेश भटांच्या अधिकाधिक गझलरचना समाविष्ट आहेत.

रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा

गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी

माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा

किंवा

कुठलेच फूल आता मजला पसंत नाही

कळते मला अरे हा माझा वसंत नाही

मी रंग पाहिला या मुर्दाड मैफलीचा

कुठल्याच काळजाचा ठोका जिवंत नाही

अशा कित्येक रचनांनी मराठी रसिकांना वेड लावले. सुरेश भटांचे सादरीकरणही भन्नाटच होते. लयबद्ध पद्धतीने आणि अत्यंत बाणेदारपणे ते गझल सादर करायचे. ही लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच गेली; परंतु भट केवळ स्वतःच्याच निर्मितीपुरते मर्यादित राहिले नाहीत.

त्यांना गझल एक चळवळ म्हणून पुढे जाणे अपेक्षित होते आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच घडतदेखील गेले. महाराष्ट्राच्या खेड्या-पाड्यात लिहिणाऱ्या उत्तम कवींचा शोध घेत त्यांच्यातील गझलप्रतिभेचा शोध घेण्याचा प्रयत्न भटांनी केला.

त्यातून अनेक गझलकार लिहिते झाले. हा प्रभाव अशा पद्धतीने वाढत गेला की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘मराठी कवितेवर गझलेचे आक्रमण’ असा परिसंवाद आयोजित केला गेला. मात्र तत्कालीन साहित्य वर्तुळाला भटांच्या गझलेची दखल घ्यावीशी वाटली नाही अथवा साहित्य संमेलनात एखाद्या मुशायऱ्याचे आयोजनही करावेसे वाटले नाही.

आज आपण पाहतो की गझल ही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सर्वत्र गझल मुशायऱ्यांना भरभरून प्रतिसाद लाभत आहे, तरीही स्वतंत्रपणे अखिल भारतीय साहित्य संमेलनात गझलेला हक्काची जागा मिळालेली दिसत नाही. ती अद्यापही कट्ट्या-बिट्ट्यावरच रेंगाळत आहे, हे दुर्दैव मनात सलत असल्याची जाणीव सुरेश भटांच्या जयंतीच्या निमित्ताने अधिकच होते.

आज मराठी गझलेने रसिकांच्या मनात जागा मिळवली आहे, यात शंका नाही. मोठ्या प्रमाणात गझल लिहिली जात आहे. खेड्या-पाड्यातून अगदी सहजपणे गझलचे तंत्र आत्मसात करून गझलकार गझल लिहीत आहेत.

मांडणी आणि आशय अशा दोन्ही दृष्टीने ज्येष्ठ गझलकारांचा प्रभाव टाळून आपली स्वतंत्र मुद्रा उमटवणारी गझल नव्या पिढीकडून लिहिली जात आहे. ‘विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही’ असे सुरेश भटांनी लिहून ठेवले आहे, ते आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. छोट्या-मोठ्या साहित्य संमेलनांमधून गझल मुशायरे स्वतंत्रपणे होत आहेत. रसिकांची भरभरून दाद मिळत आहे. कुठल्याही साहित्यिक कार्यक्रमात गझलच भाव खाऊन जात आहे.

होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिला

एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले

हा शब्द जणू भटांनी गझलेलाच दिला असावा. संपूर्ण आयुष्य गझलेसाठी झोकून दिल्यानंतर आज या अमृताच्या रोपट्याला खराखुरा बहर आला असल्याचे आपल्याला दिसते. जोवर मराठी भाषा जिवंत आहे, तोवर भटांचे शब्द मराठी वैखरीत दरवळत राहतील, यात शंका बाळगण्याचे कुठलेही कारण नाही. भट म्हणतात -

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते

मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो

मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT