The New York Times Sakal
सप्तरंग

सुपारीबाज नव्‍हे; धाडसी पत्रकारिता

२३ जानेवारीला ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने ‘द बॅटल फॉर द वर्ल्ड्‌स मोस्ट पॉवरफूल सायबर वेपन्स’ हा सखोल वृत्तांत प्रकाशित केला.

प्रशांत पाटील

२३ जानेवारीला ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने ‘द बॅटल फॉर द वर्ल्ड्‌स मोस्ट पॉवरफूल सायबर वेपन्स’ हा सखोल वृत्तांत प्रकाशित केला.

- पूनम शर्मा

सरकार येतं, सरकार जातं; मात्र चांगल्या आणि प्रामाणिक शोधपत्रकारितेला पर्याय नाही, हे स्पष्ट आहे. व्ही. के. सिंह हे न्यूयॉर्क टाइम्सला सुपारी मीडिया म्हणून बदनाम करण्याचा प्रयत्न करू शकतात; परंतु आरोप-प्रत्यारोप होऊनही मुक्त, स्पष्ट आणि निर्भय पत्रकारिता कायम राहणार आहे, हे वेळोवेळी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दाखवून दिले आहे. या वृत्तपत्राबाबतचा हा रिपोर्ताज...

२३ जानेवारीला ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने ‘द बॅटल फॉर द वर्ल्ड्‌स मोस्ट पॉवरफूल सायबर वेपन्स’ हा सखोल वृत्तांत प्रकाशित केला. पेगॅससचा वापर करून इस्रायल दुसऱ्या देशासोबत राजनैतिक संबंध कशाप्रकारे प्रभावित करत आहे, याचा हा सविस्तर वृत्तांत आहे. पेगॅससच्या माध्यमातून इस्रायलला आपला जगभरात प्रभाव वाढवायचा आहे; तर एनएसओ कंपनीला गडगंज नफा कमवायचा आहे. या दोन्हींचा एकत्रित परिणाम म्हणजे मोबाईल हॅक करणारे पेगॅसस सॉफ्टवेअर जगभरातील नवराष्ट्रवादी नेत्यांच्या हाती लागले आहे. साधनाचा वाईट वापर रोखण्यासाठी इस्रायलने काही नियमावली घालून दिल्या; मात्र प्रत्यक्षात मानवी हक्कांच्या दडपशाहीकडे पूर्ण दुर्लक्ष करून कंपनीने पेगॅसस सॉफ्टवेअर भारत, पोलंड आणि हंगेरीसह सौदी अरेबिया या देशांना विकले आहे.

२०१७ मध्ये भारताने इस्रायलशी झालेल्या संरक्षण कराराचा एक भाग म्हणून पेगॅससची खरेदी केल्याचा दावा न्यूयॉर्क टाइम्सच्या या रिपोर्टमध्ये करण्यात आला. त्यामुळे भारतात नव्याने राजकारण तापले आहे. आतापर्यंत न्यूयॉर्क टाइम्सच्या या रिपोर्टवर मोदी सरकारने प्रतिक्रिया न देणे पसंत केले आहे; मात्र केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह यांनी न्यूयॉर्क टाइम्स हे सुपारी मीडिया असल्याची टीका केली. २०१७ मध्ये भारत-इस्राईलमध्ये दोन अब्ज डॉलरच्या संरक्षण साहित्य खरेदीचा करार झाला. या करारात पेगॅसस स्पायवेअर आणि क्षेपणास्त्र प्रणालीचा मुख्यत्वे समावेश होता, असे न्यूयॉर्क टाइम्सच्या या रिपोर्टमध्ये म्हटलंय. गेल्या वर्षभरापासून पेगॅसस सॉफ्टवेअरचा वापर जगभरातील पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्ते, विरोधी, सत्ताधारी पक्षाचे नेते आणि इतरांची हेरगिरी करण्यासाठी झाल्यावरून इस्रायलची एनएसओ कंपनी प्रकाशझोतात आली आहे. यामध्ये भारतातील अनेक नेते, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

सकाळ ‘अवतरण’ने जनरल व्ही. के. सिंह यांच्या या विधानाबद्दल न्यूयॉर्क टाइम्सशी संपर्क साधला असताना, न्यूयॉर्क टाइम्सच्या प्रवक्त्याने ‘अवतरण’ला सांगितले, की ‘‘हा रिपोर्ट वर्षभर सुरू असलेल्या टाइम्सच्या सखोल तपासावर आधारित आहे. यासाठी टाइम्सने अनेक देशांतील शासकीय अधिकारी, गुप्तचर तपास संस्थेचे अधिकारी, सायबर वेपन्स तज्ज्ञ, व्यावसायिक आणि गोपनीयता अधिकाराचे कार्यकर्ते यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. आमच्या स्वतंत्र निष्पक्ष पत्रकारितेचे हे एक भक्कम उदाहरण आहे.

ट्रम्प आणि न्यूयॉर्क टाइम्स

शासकीय अधिकारी आणि प्रसारमाध्यमांमध्ये कायम छत्तीसचा आकडा असतो. शोधपत्रकारिता करताना तो तपास जेव्हा नेत्यापर्यंत येऊन पोहोचतो, त्या वेळी वाद उत्पन्न होतात. न्यूयॉर्क टाइम्सबाबत असले प्रकार नेहमी घडतात. कारण हे वृत्तपत्र शोधपत्रकारितेसाठी जगभरात ओळखले जाते.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या अध्यक्षीय कार्यकाळात न्यूयॉर्क टाइम्स हे त्यांच्या टार्गेटवर होते. ते वांरवार टाइम्सला देशद्रोही वृत्तपत्र म्हणायचे. ट्रम्प कायम न्यूयॉर्क टाइम्सला फेलिंग न्यूयॉर्क टाइम्स असे म्हणत हेटाळणी करायचे; मात्र ट्रम्प यांच्यासारख्या हुकूमशाही कार्यपद्धतीच्या अध्यक्षापुढे न्यूयॉर्क टाइम्स कधी झुकले नाही. १९७१ पासून सर्व अमेरिकन अध्यक्षांनी आपले व्यवहार, करभरणा सार्वजनिक केला; मात्र ट्रम्प यांनी त्यांचे व्यवहार सार्वजनिक करायला नकार दिले. न्यूयॉर्क टाइम्सने गुप्तपणे ट्रम्प यांच्या सर्व व्यवहारांचे तपशील गोळा करण्याचे काम सुरू केले. सप्टेंबर २०२० मध्ये, न्यूयॉर्क टाइम्सने डोनाल्ड ट्रम्प यांचे काही वर्षे भरलेल्या वैयक्तिक आणि कॉर्पोरेट कराचा सर्व तपशील सार्वजनिक केला. ड्रम्प रिअल इस्टेट व्यावसायिक असल्यापासून ते व्हाईट हाऊसमधील त्यांच्या सुरुवातीच्या कार्यकाळापर्यंतची सर्व माहिती टाइम्सने प्रकाशित केली.

यासाठी पडद्याआड काही वर्षे टाइम्सचे पत्रकार मेहनत घेत होते. सोअर्सचे नाव, त्यासंबंधीची कुठलीही माहिती बाहेर पडू नये, यासाठी अत्यंत गुप्तपणे ही शोधमोहीम सुरू होती. गोळा केलेली कागदपत्रे एका खासगी ठिकाणी सुरक्षित ठेवली होती. ही शोधमालिका प्रसिद्ध करताना न्यूयॉर्क टाइम्सचे कार्यकारी संपादक डीन बाक्वेट यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणतात, आम्ही ही वृत्तमालिका प्रकाशित करत आहोत, कारण सामान्य नागरिकांना त्यांच्या लोकप्रतिनिधीसोबत त्यांच्या आर्थिक व्यवहाराबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. १९७० पासून अमेरिकेच्या अध्यक्षाने आपली कर माहिती सार्वजनिक करण्याची पंरपरा सुरू झाली. त्यामागे बाजार आणि धोरणावर व्यापक प्रभाव टाकण्याची क्षमता असलेल्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीला आर्थिक गैरफायदा घेता येणार नाही, हा विचार होता. ट्रम्प या परंपरेला अपवाद ठरू पाहत होते; मात्र टाइम्सच्या शोधपत्रकारितेमुळे ट्रम्प यांची गोची झाली.

न्यूयॉर्क टाइम्सच्या संपादकीय पानावर एक लेख आला, यामध्ये २०१६ मध्ये रशियन अधिकारी आणि ट्रम्प यांच्यात निवडणुकीत एकमेकांना मदत करण्याचा एक करार झाला असल्याचा दावा केला होता. ट्रम्प यांच्या टिमने हा खोटा वृत्तांत आहे, असे सांगत टाइम्सविरोधात कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला. मात्र संपादकीय स्वातंत्र्याला निर्बंध घालू शकत नाही, असे स्पष्ट करून कोर्टाने हा दावा फेटाळून लावला होता.

मूळची न्यूयॉर्कमध्ये राहत असलेली कॅरोल मॅक्रेरी आता वेस्ट कोस्टला राहते. कॅरोल न्यूयॉर्क टाइम्सची नियमित वाचक आहे. हे वर्तमानपत्र अत्यंत प्रतिष्ठित असून, ते संग्रही ठेवण्याजोगे आहे, असे तिचे म्हणणे आहे. चोखंदळ वाचक न्यूयॉर्क टाइम्स आवर्जून वाचतात. किंबहुना न्यूयॉर्क टाइम्स हे अमेरिकेचे राष्ट्रीय वर्तमानपत्र आहे. या वर्तमानपत्राची वार्तांकनाची लांबी आणि खोली अत्यंत उल्लेखनीय आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे आर्थिक व्यवहार प्रकाशात आणण्यासाठी टाइम्सने केलेली पत्रकारिता, शोधमोहीम उत्कृष्ट नमुना होती. मोठ्या पदावर बसणाऱ्या व्यक्तींना जबाबदार धरण्यासाठी या प्रकारची शोधपत्रकारिता अत्यंत महत्त्वाची आहे, असे कॅरोलचे म्हणणे आहे.

पेंटागॉन पेपर्स

स्वतंत्र पत्रकारितेसाठी न्यूयॉर्क टाइम्स कायम इतर माध्यमासाठी दिशानिर्देशक राहिला आहे. सोअर्स आणि माहिती मिळवण्याचा या वृत्तपत्राचा रेकॉर्ड अभूतपूर्व आहे. याच वृत्तपत्राने व्हिएतनाममधील अमेरिकेच्या गुप्त कारवायांचा बुरखा फाडणारे पेंटागॉन पेपर्स प्रकाशित केले होते. १९७१ मध्ये टाइम्सच्या पहिल्या पानावर हा खळबळजनक रिपोर्ट प्रकाशित झाला. यामुळे तत्कालीन अमेरिकन प्रशासन हादरले होते. संरक्षण विभागातून टाइम्सने ही कागदपत्रे मिळवली. यात १९४५ ते १९६७ पर्यंत व्हिएतनाममध्ये अमेरिकेच्या राजकीय आणि लष्करी सहभागाची संपूर्ण गुप्त माहिती होती. व्हिएतनाम युद्धात अमेरिकेने गुप्तपणे लष्करी कारवाया तसेच उत्तर व्हिएतनामच्या किनारी भागात हल्ल्यांची व्याप्ती वाढवली होती. मात्र याचे वार्तांकन कुणीही केले नव्हते.

अमेरिकन प्रशासनाने व्हिएतनाम युद्धाबद्दल जनतेची दिशाभूल तर केलीच; मात्र संसदेतही चुकीची माहिती दिली होती. हे न्यूयॉर्क टाइम्सच्या पेंटागॉन पेपरने सिद्ध केले. टाइम्सने ही सर्व कागदपत्रे डॅनियल एल्सबर्ग यांच्याकडून मिळवली. पुढे त्यांच्यावर देशाविरुद्ध कट रचणे, हेरगिरीसारखे आरोप लावण्यात आले; मात्र ते सर्व आरोप कोर्टाने फेटाळले.

शोधपत्रकारितेची पंरपरा

न्यूयॉर्क टाइम्समध्ये संपादकीय विभाग आणि शोधपत्रकारितेचा विभाग हा इतर विभागांपासून स्वतंत्र आहे. वर्तमानपत्रात प्रकाशित होणाऱ्या शोधमालिकेबद्दल न्यूजररूममध्ये काम करत असलेल्या पत्रकारांनाही माहिती नसते. टाइम्स ‘रिडर्स सेंटर’च्या माध्यमातून आपल्या वाचकांना ही शोधमोहीम कशी राबवली, याबद्दल सविस्तर तपशील देते. शोधपत्रकारिता विभाग पडद्याआड शांतपणे काम करतो. जेव्हा शोधवृत्तांत प्रकाशित होतात, त्या वेळी जगभर खळबळ माजते. हा विभाग केवळ शोधमोहिमेवर काम करतो.

न्यूयॉर्क टाइम्सच्या शोधपत्रकारिता करणाऱ्या विभागाचे नेतृत्व सहाय्यक व्यवस्थापकीय संपादक रेबेका कॉर्बेट आहेत. त्याना डीन मर्फी हे सहकार्य करतात. हॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता हार्वे वेनस्टीन याचे अनेक दशकांचे लैंगिक गैरवर्तन उघडकीस आणणारी वृत्तमालिका रेबेका यांनी संपादित केली होती. यानंतर MeToo ही चळवळ अधिक मजबूत झाली, जगभर पसरली. यासाठी त्यांना पुलित्झर पुरस्कार मिळाला. डीन मर्फी यांनी चीनमध्ये ॲपल उत्पादन कारखान्यात कामगारांची कशी गळचेपी होते, याचे चित्र जगापुढे मांडले होते. चिनी सरकारमधील उच्च स्तरावरील भ्रष्टाचार त्यांनी बाहेर काढला होता. त्यानंतर चीनमध्ये न्यूयॉर्क टाइम्सवर बंदी आली.

न्यूयॉर्क टाइम्स

  • आतापर्यंत १३२ पुलित्झर पुरस्कार जिंकले आहेत

  • न्यूयॉर्क टाइम्सला राष्ट्रीय वर्तमानपत्र म्हटले जाते

  • अमेरिकेत तिसऱ्या क्रमांकाचे मोठे वृत्तपत्र

  • सर्क्युलेशननुसार जगातील १८ वे मोठे वृत्तपत्र

(लेखिका ग्लोबल स्टार्ट व्ह्यूच्या संपादक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narayan Rane: त्यांनी आता महाराष्ट्रात तोंड दाखवू नये; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

IPL 2025 Auction Live: अश्विनची १० वर्षांनंतर CSK संघात घरवापसी! तब्बल इतके कोटी मोजत घेतलं संघात

Latest Maharashtra News Updates : देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या डोक्यात येतायत आश्रमवासी होण्याचे विचार? म्हणते, "महाराष्ट्रावर प्रेम नसतं तर..."

IPL 2025 Mega Auction LIVE Streaming: ऋषभ, श्रेयस आणि व्यंकटेश अय्यर या लिलावातील महागडे खेळाडू! कॉनवेची चेन्नईत घरवापसी, तर वॉर्नर-पडिक्कल अनसोल्ड

SCROLL FOR NEXT