पोर्नस्टार प्रकरणात अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नुकतीच अटकेची कारवाई झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ डिसेंबरला होणार आहे.
- पूनम शर्मा, rahulgadpale@gmail.com
पोर्नस्टार प्रकरणात अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नुकतीच अटकेची कारवाई झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ डिसेंबरला होणार आहे. त्यावेळी मात्र रिपब्लिकन पक्षातर्फे राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू होईल. या खटल्यात ट्रम्प यांच्यावर कारवाई होईल की नाही, हे येणारा काळच सांगेल, मात्र अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची तीव्र इच्छा असलेले आणि रिपब्लिकन पक्षातर्फे प्रमुख दावेदार असलेल्या ट्रम्प यांना रोखता येणार नाही, हे मात्र निश्चित.
गुन्हेगारी कृत्याखाली दोषारोपपत्र दाखल झालेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अटक होणारे इतिहासातील पहिलेच अध्यक्ष ठरले. पोर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्सचे तोंड बंद करण्यासाठी दिलेल्या पैशांचा हिशेब लपवण्यासाठी ट्रम्प यांनी आपल्या खातेवहीत चुकीची माहिती नोंदवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात त्यांना अटक झाल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. या प्रकरणावर आता पुढील सुनावणी ४ डिसेंबर २०२३ ला होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे रिपब्लिकन पक्षातर्फे अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार निवडण्याच्या प्रक्रियेच्या ऐन दोन महिन्यांपूर्वीची आहे. विशेष म्हणजे त्यासाठी डोनाल्ड ट्रम्प हे प्रमुख दावेदार आहेत; परंतु या प्रकरणात ते दोषी आढळले, तरी त्यांना राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढण्यापासून रोखता येणार नाही.
मॅनहॅटन न्यायालयात सरकारी वकिलाने त्यांच्यावर फौजदारी कायद्याच्या आधारे गुन्हेगारी कृत्याचा आरोप लावला. त्यानंतर अटक करतेवेळी ट्रम्प हे मख्ख चेहरा घेऊन शांत बसले होते. या आरोपांचे ट्रम्प यांनी खंडन करत याला ते राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे; तरीही अटकेच्या कारवाईदरम्यान त्यांनी समाजमाध्यमावर सहा वेळा आपले म्हणणे मांडले. २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीचे पावित्र्य कमी करणे आणि निवडणूक कायद्यांचे उल्लंघन केल्याचे प्रकरण दडवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी उद्योगधंद्यातील जमा-खर्चाच्या नोंदी खोट्या दाखवल्या, असे असिस्टंट डिस्ट्रिक्ट ॲटर्नी क्रिस्तोफर कॉन्रॉय यांनी सुनावणीवेळी म्हटले. त्यावर ट्रम्प यांनी स्वतःवरील आरोप फेटाळून लावले.
आपल्या निवडणूक मोहिमेला धोका पोहोचू शकणाऱ्या गोष्टी लपवण्यासाठी त्यांनी जे पैसे दिले, त्यांचा जमा-खर्च दडवण्यासाठी ट्रम्प यांनी आपल्या कंपनीतील नोंदवहीत खोट्या नोंदी केल्या, यावर हे आरोपपत्र आधारित आहे. पोर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्सने ट्रम्प यांच्याशी संबंध असल्याचे २००६ ला म्हटले होते. तिला गप्प करण्यासाठी दिलेल्या पैशांची भरपाई करण्यासाठी ट्रम्प यांनी त्यांचे तत्कालीन वकील मायकेल कोहेन यांना धनादेश दिले होते. अशा प्रकारच्या धनादेशाच्या ३४ खोट्या नोंदी नोंदवहीत आढळल्या आहेत. हा खटला मॉडेल कॅरेन मॅकडॉगल हिच्याशी असलेल्या संबंधांबद्दलदेखील आहे.
ट्रम्प यांच्यावरील आरोपांची मालिका ऑक्टोबर २०१६ मध्ये समोर आलेल्या एका चित्रफितीमुळे सुरू होते. तेव्हा स्टॉर्मी डॅनियल्सने ट्रम्प यांच्यासोबत असलेल्या लैंगिक संबंधांची जाहीर वाच्यता करण्याचा निर्णय घेतला. अध्यक्षीय निवडणुकीवेळी ट्रम्प यांची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून मायकेल कोहेन यांनी तिला एक लाख ३० हजार डॉलर दिले. न्यूयॉर्क सिटी न्यायालयाकडून जाहीर केलेल्या निवेदनानुसार, ट्रम्प यांनी हे पैसे देण्यास नोव्हेंबरच्या निवडणुकीपर्यंत विलंब केला. जेणेकरून त्यांच्या निवडणूक प्रचाराला कोणताही धोका पोहोचू नये. प्रचार मोहीम संपल्यावर शेल कंपनीद्वारे पैसे देण्यासाठी ट्रम्प यांनी मायकेल कोहेन यांना अनेक धनादेश दिले. निवडणूक निर्धोकपणे पार पडल्यानंतर कॅरेन मॅकडॉगल आणि रखवालदाराला माहिती उघड न करण्याच्या करारातून मुक्त करण्यात आले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील खटला कोणत्या गुन्ह्यांवर आधारित आहे, हे न्यूयॉर्कचे वकील ॲल्विन ब्रॅग यांनी मंगळवारी स्पष्ट केले. त्यापैकी दोन निवडणुकीशी संबंधित आहेत. बेकायदेशीररीत्या निवडणुकीचा प्रचार करणे आणि प्रचार मोहिमेत २७०० डॉलर देणगीची मर्यादा ओलांडल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मतदारांपासून ही वस्तुस्थिती लपवण्यासाठी ट्रम्प यांनी नोंदवहीत फेरफार केला आणि या दोन निवडणूक कायद्यांचे उल्लंघन केले, असे सरकारी वकिलाकडून सांगण्यात आले. ट्रम्प यांनी ६ जानेवारीच्या गदारोळात निधी उभारण्याची संधी साधली होती, तेच धोरण अवलंबवत त्यांनी निधीसाठी आवाहन करणारे ई-मेल पाठवले. त्यांच्या अटकेच्या काही काळ आधी पाठवलेल्या ई-मेलमध्ये त्यांनी लिहिले होते, ‘अमेरिकेत न्यायाचे राज्य गमावल्याबद्दल आज आम्ही शोक व्यक्त करतो. आज सत्ताधारी पक्षाने त्याच्या मुख्य विरोधी पक्षनेत्याला न केलेल्या गुन्ह्याबद्दल अटक केली आहे.
अमेरिका हा तिसऱ्या जगातील मार्क्सवादी देश बनला असून मतभिन्नता दर्शविल्यामुळे आपणास गुन्हेगार ठरवत आहे आणि राजकीय विरोधकांना कारागृहात टाकत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारमोहिमेसाठी मला निधी द्या, जेणेकरून मी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून देशाला पुन्हा महान बनवेन.’
अटकेची कारवाई झाल्यानंतर फ्लोरिडातील घरी परतल्यानंतर केलेल्या भाषणात ट्रम्प यांनी आपल्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे आणि आपण निर्दोष असल्याचे पुन्हा एकदा निक्षून सांगितले. आपल्या भाषणात त्यांनी सरकारी वकिलांवर तीव्र शब्दात टीका केली आणि वैयक्तिक कागदपत्रांचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याचे म्हटले. एवढेच नव्हे, तर त्यांनी न्याय विभागाच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. आपल्याविरोधात शस्त्र म्हणून वापर केला म्हणून न्याय विभागाचा आणि एफबीआयचा निधी बंद केला पाहिजे, अशीही टीका त्यांनी समाजमाध्यमावर बोलताना केली.
दुसरीकडे ट्रम्प यांचे वकील, समर्थक आणि रिपब्लिकन पक्षातील त्यांचे विरोधकही म्हणतात की त्यांच्याविरोधातील खटला फारसा कठीण नाही. या आरोपांमुळे त्यांना चिंता करण्याची फारशी गरज नाही. न्यूयॉर्क न्यायालयाचा हा खटला पुढे टिकेल की नाही, यावर कायदेतज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. हा खटला कमकुवत आहे आणि तो फेरतपासणीत टिकणार नाही, असे काही जणांना वाटते, तर काहींना त्यांच्यावरील आरोप सिद्ध होईल, असे वाटते.
दरम्यान, ट्रम्प यांच्यावरील अनेक गंभीर प्रकरणांचा तपास अद्याप प्रलंबित आहेत. उदा. २०२० च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही सत्तेत राहण्यासाठी केलेले डावपेच, संसदेवरील हल्ल्याप्रकरणी त्यांची भूमिका, कागदपत्रांची चुकीची हाताळणी, न्यायदानात अडथळा आणणे, आदी. प्रकरणी त्यांच्यावर आरोप आहे. पोर्नस्टार प्रकरणात अटक झाल्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणात या खटल्याऐवजी इतर प्रकरणांवर अधिक लक्ष केंद्रित केले, हे मात्र लक्षात घेण्यासारखे आहे.
कागदपत्रांच्या चुकीच्या हाताळणी प्रकरणात ट्रम्प यांच्याविरोधात फेडरल अधिकाऱ्यांकडे पुरावे आहेत. या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई होण्याची अधिक शक्यता असल्याचे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे. तसेच ट्रम्प यांनी काही कागदपत्रे स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला; परंतु सर्व कागदरपत्रे परत केल्याचा दावा करून अधिकाऱ्यांची दिशाभूल केल्याचे वृत्त ‘द पोस्ट’ने दिले होते. २०२० च्या निवडणुकीनंतर ट्रम्प यांनी जॉर्जिया राज्याच्या अधिकाऱ्याला फोन केला आणि त्यांना आपल्या बाजूचे मतदार शोधण्यास सांगितले. जेणेकरून त्यांचा विजय होईल.
रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून डोनाल्ड ट्रम्प अजूनही प्रमुख दावेदार आहेत; परंतु त्यांच्या व्हाईट हाऊसमधील प्रवेशावर तपासाची टांगती तलवार आहे. न्यूयॉर्क खटल्यातील व्यावसायिक खातेवहीतील चुकीच्या नोंदी करण्यासाठी त्यांना चार वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तथापि, ट्रम्प दोषी ठरले, तरी न्यायाधीश त्यांना तुरुंगवासाची शिक्षा देणार नाहीत, अशी शक्यता आहे. रिपब्लिकन पक्षातर्फे नामांकनाची प्रक्रिया सुरू होण्याच्या दोन महिन्यांपूर्वी ४ डिसेंबरला पोर्नस्टार खटल्याची पुढील तारीख आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्यासाठी परिस्थिती अनुकूल दिसत नाही; पण त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले, तरी त्यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढणे आणि जिंकण्यापासून रोखता येणार नाही, हेही खरे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षातील अन्य उमेदवारांच्या तुलनेत ट्रम्प यांना निवडणूक लढवण्याची आणखी संधी आहे.
(लेखिका ग्लोबल स्टार्ट व्ह्यूच्या संपादक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.