सकारात्मक  sakal
सप्तरंग

त्या तिथं...जिथं अंधार नसतोच!

सकारात्मक रूपात माझ्या मनात आला. संयोजक म्हणाले : ‘‘ ‘सार्थपणे वृद्ध कसं व्हावं’

डॉ. यशवंत थोरात

हे जरा नाट्यमय वाटेल; पण लंडनमधील ऑक्सफर्ड रोडच्या फुटपाथवर थरथर कापणारा माणूस आणि मुंबईतल्या चर्चगेट रेल्वे स्टेशनच्या एका कोपऱ्यात मुटकळून पडलेला माणूस यांच्यात कितीतरी गोष्टी समान होत्या - दोघंही वृद्ध, गरीब, निराधार आणि दयनीय अवस्थेतले. संवेदना हरवलेल्या महानगरांत साठलेल्या कचऱ्याचा भाग झाले होते ते. त्यांच्याकडे एकदा पाहिलं आणि दुसरीकडं नजर वळवली. मनात विचार आला : ‘या लोकांना खरंच जगायचं असेल?’

त्यानंतर निवृत्त शिक्षकांच्या मेळाव्यात बोलण्यासाठी मला निमंत्रण आलं, तेव्हा तोच विचार सकारात्मक रूपात माझ्या मनात आला. संयोजक म्हणाले : ‘‘ ‘सार्थपणे वृद्ध कसं व्हावं’ या विषयावरचे माझे विचार निवृत्त मंडळीना ऐकायचे आहेत.’’ निमंत्रण देऊन ते गेले. तरी बराच वेळ मी त्याच विचारात गढून गेलो...मला प्रश्न पडला : ‘निवृत्त होऊन काळ उलटला तरी आपल्यापैकी बरेच जण पूर्वी भोगलेल्या पदाला का चिकटून बसतात? पदं तात्पुरती असतात. मग पदांवरून बाजूला झाल्यावरदेखील आपण त्याच त्याच लेबलांना काय म्हणून चिकटून राहतो? कधी काळी आपण जे कुणी होतो ते सोडून का देत नाही?’

आणखी एक विचार मनात आला : ‘आयुष्याच्या संध्याकाळीसुद्धा खूप गोष्टी करण्यासारख्या असतात. त्या सोडून नाना-नानी पार्कात सकाळचा फेरफटका मारणं, नातवंडांना शाळेत नेणं-आणणं, देशातल्या चालू घडामोडींवर तावातावानं गप्पा मारणं अशा गोष्टींतच आपण का अडकून पडतो? त्यापेक्षा नव्यानं आपली ओळख तयार करणं, आपला आत्मसन्मान पुन्हा मिळवणं, अनुभवांतून आलेलं शहाणपण आणि आत्मविश्वास यांच्या बळावर अनोख्या गोष्टींचा शोध घेणं अशा गोष्टींत आपण का गुंतवून घेत नाही स्वतःला?’

कार्यक्रम ग्रामीण भागात आयोजिण्यात आला होता. उपस्थित श्रोत्यांकडे पाहिलं तर ते दिसलेच नाहीत; माझंच प्रतिबिंब दिसलं मला त्यांच्या जागी. भाषण सुरू झालं... ‘कोणत्याही वस्तूला एक्स्पायरी डेट असतेच आणि वयोमान ही त्याचीच प्रक्रिया आहे’, मी म्हणालो. एक गोष्ट स्पष्ट आहे: मनुष्याच्या म्हातारपणाबद्दलच्या चर्चेला सध्या नव्यानं महत्त्व आलंय. उपलब्ध माहितीवरून दिसतं की, सबंध जगात ज्येष्ठ नागरिकांची टक्केवारी सातत्यानं वाढतेय. म्हणून वृद्धत्वाचे समाजावर जे परिणाम होतात त्यावरही हल्ली जास्त लक्ष दिलं जातंय.

वृद्ध होण्याची प्रक्रिया आपण अनुभवतच असतो; परंतु वर्षांमागून वर्षं निघून जाणं ही वृद्धत्वाची एकमेव खूण नाही. काही लोक लवकर म्हातारे होतात, तर काहीजण आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंत तरुण राहतात. अभ्यासातून आणि प्रयोगांतून असं सिद्ध झालंय की, म्हातारपण ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. वैयक्तिक प्रकृती, भोवतीचं पर्यावरण, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती अशा अनेक गोष्टी त्यासाठी कारणीभूत असतात.

सार्वत्रिक चित्र असं आहे की, जगातल्या प्रत्येक देशात वृद्धांची संख्या वाढते आहे आणि जागतिक लोकसंख्येच्या तुलनेत त्यांचं प्रमाणही वाढताना दिसत आहे. त्याबरोबरच वैद्यकीय शास्त्रातल्या प्रगतीमुळे सगळ्या देशांतील लोकांचं आयुष्य वाढलेलं आहे. आपण स्वतंत्र झालो तेव्हा प्रत्येक सामान्य भारतीयाचं सरासरी आयुर्मान एकतीस वर्षं होतं. आज ते सत्तरीच्या आसपास आहे. आज ज्या वेगानं जग वृद्ध होत चाललं आहे ते चिंताजनक आहे: दर सेकंदाला दोन माणसं ‘साठी’ गाठताहेत... एकूण जगाच्या लोकसंख्येकडे बघितलं तर असे एक अब्ज लोक आहेत. सन २०३० पर्यंत सहापैकी एक व्यक्ती साठ किंवा त्याहून अधिक वयाची असेल आणि त्यांची संख्या १.४ अब्ज होईल. सन २०५० पर्यंत जगाच्या लोकसंख्येपैकी एक पंचमांश लोक साठीच्या वर असतील आणि त्यातले दोन तृतीयांश लोक कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांचे रहिवासी असतील.

त्यामुळे वृद्ध लोकांसाठी संवेदनशील आरोग्यव्यवस्था तयार करण्याचं आव्हान सगळ्याच देशांसमोर उभं राहील, राहिलेलं आहे. म्हणून, नियोजनप्रक्रियेत वृद्धांना स्थान असायला हवं...असं आपण सरकारला सुचवलं पाहिजे.

वृद्धांच्या गरजा भागवणारे कार्यक्रम आखले गेले पाहिजेत; ज्यामुळे त्यांच्या मूलभूत मानवी हक्कांचं रक्षण होईल... दिवसातून दोनदा पोटभर अन्न, चांगली आरोग्यसेवा, निवृत्तिवेतन, यांबरोबरच समाजासाठी योगदान देण्याची आणि सातत्यपूर्ण शिक्षण घेण्याची संधीही त्यांना उपलब्ध झाली पाहिजे.

ही झाली नाण्याची एक बाजू. दुसरी बाजू म्हणजे, कोणत्याही सरकारी योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर आधी आपलं आरोग्य जपलं पाहिजे, हे वृद्धांनीदेखील लक्षात ठेवलं पाहिजे. ज्याच्या त्याच्या ‘जीन्स’नुसार वृद्ध लोकांच्या आरोग्यात फरक पडतो असं पुराव्यांवरून दिसतं; तरीसुद्धा, संतुलित आहार आणि नियमित व्यायामाबरोबरच पोषक अशा नैसर्गिक आणि सामाजिक वातावरणाचा प्रभाव वृद्ध होण्याच्या प्रक्रियेवर पडत असतो. मात्र, आरोग्य उत्तम असेल तर हव्या त्या गोष्टी करण्याची वृद्धांची क्षमता तरुणांपेक्षा फारशी वेगळी नसते. म्हणून, मिळालेल्या वाढीव वर्षांत आपण समाजाच्या कसे उपयोगी पडू शकू असा विचार प्रत्येक ज्येष्ठ नागरिकानं केला पाहिजे. आणि, समाज म्हणजे ‘आपलं कुटुंब, आपला मित्रपरिवार, आपला परिसर आणि आपलं आजूबाजूचं वातावरण’ हेही त्यांनी लक्षात घ्यायला हवं.

सत्य हे आहे की, अमुक एक ‘नमुनेदार वृद्ध’ असा कुणी नसतो. जो शिकायचा थांबला तो वृद्ध... मग तो विशीतला असो नाहीतर ऐंशीचा. होता होईल तेवढं आपण स्वतःला ठणठणीत ठेवलं पाहिजे. निसर्गनियमानुसार शरीराला येणारं म्हातारपण स्वीकारावंच लागेल; मात्र, मनाचं वृद्धत्व आपण रोखलं पाहिजे. मनानं तरुण आणि बुद्धीनं तल्लख राहणं हे आपल्याच हातात आहे आणि आज तंत्रज्ञानाच्या जोरावर ते बऱ्यापैकी शक्य आहे.

म्हणूनच संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं सन २०२१-२०३० हे दशक ‘निरोगी वृद्धत्वाचं दशक’ घोषित करून, जागतिक आरोग्य संघटनेकडे या धोरणाच्या अंमलबजावणीसाठीचं नेतृत्व सोपवलं आहे.

दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी सरकार, समाज, आंतरराष्ट्रीय संस्था, व्यावसायिक-शैक्षणिक माध्यमं, खासगी क्षेत्रं अशा सर्वांनी मिळून कृती करण्याचं हे दशक आहे. यासाठी आपण संघटित झालं पाहिजे. आपण शरीरानं बलवान नसू, आपला आवाज बुलंद नसेल; पण एकदा का आपण एकत्र आलो आणि तसेच एकत्र राहिलो तर आपण समाजाचा एक प्रभावशाली घटक होऊ शकतो.

कवी म्हणतो:

तू उभरने का हौसला तो कर

ये समंदर तुझे उभारेगा...

(तरायचं असेल तर तू स्वतः निदान हात-पाय तरी हलव, समुद्र तुला स्वतःहून तारेल.)

माझ्या बोलण्याचा साधारण सूर असा होता. फार थोर असं काही त्यात नव्हतं; पण मला वाटलं श्रोत्यांपैकी एखाद्-दुसरा माणूस तरी त्यावर विचार करेल आणि माझा विचार पुढं नेईल. व्याख्यान संपलं. माझं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचलं असावं; कारण, तसा संकेत टाळ्यांच्या अपेक्षित कडकडाटातून मिळाला. त्यानंतर विचारलेल्या एक-दोन प्रश्नांना मी उत्तरं दिली. चहापान झालं. आयोजकांचा निरोप घेऊन मी जायला निघालो.

गाडीकडे जात असताना एक तरुण मुलगी - कदाचित श्रोत्यांमधल्या कुणाची तरी मुलगी असावी - जवळ आली आणि म्हणाली : ‘‘आजोबा, या वर्षी तुमची पंचाहत्तरी पूर्ण होईल...खूप वर्षं झाली ना? एवढ्या काळात तुम्ही काय काय केलं? काय शिकलात?’’

क्षणभर मी डळमळलो. सरलेल्या काळाची मला अचानक जाणीव झाली. ‘एवढ्या काळात आपण केलं काय?’ हा प्रश्न स्वतःला विचारण्याची मला हिंमत झाली नाही. वर्षं तर उलटली यात शंकाच नाही; पण माझ्या हातात राहिलेली शिल्लक काय होती? रस्त्यावरच्या अशिक्षित माणसाला मानवी स्वभावाबद्दल जेवढं कळतं त्यापेक्षा जास्त माझ्या शिक्षणानं आणि अनुभवानं मला काय शिकवलं? जगात ज्या काही गोष्टी आहेत त्या तशाच का आहेत याबद्दल मला कितपत समज आली? माझ्या आतला आणि बाहेरचा कल्लोळ समजून घेण्यासाठी माझ्या आयुष्यानं मला कोणती दृष्टी दिली?

निरर्थक जीवन जगण्याची कुणाचीच इच्छा नसते. आयुष्य वायफळ घालवून त्याला पूर्णविराम द्यावा असं कुणालाही वाटत नाही. आपल्यापैकी प्रत्येकाला काहीतरी वेगळं करायचं असतं. जीवनकार्य म्हणा किंवा मिशन म्हणा; पण आपणा सर्वांना अर्थपूर्ण आणि आपल्याहून थोर अशा कार्याचा भाग व्हावं असं वाटत असतं. जगण्यामागचा मूळ हेतू शोधण्याची आस आपल्याला अशा गोष्टी करायला प्रवृत्त करते; ज्या गोष्टींमुळे आनंद आणि समाधान मिळेल. मात्र, अर्थपूर्ण गोष्टींपेक्षा आनंददायी गोष्टी करायला आपण लवकर प्रवृत्त होतो आणि खूप उशीर झाल्यावर कळून चुकतं की, आपण जे जे गोळा केलं ते पितळ आहे; सोनं नव्हे. आणि, हीच वस्तुस्थिती आहे.

बऱ्याच वर्षांपूर्वी रिझव्‍‌र्ह बँकेत काम करत असताना माझ्या मनात शंका आली: ‘आपण जे काम करतो आहोत त्याला खरंच काही मूल्य आहे? फायलींचा रोजचा ‘निपटारा’ आपण करतो, त्यामुळे जगात काही फरक पडतो? आपल्या मासिक पगाराच्या पलीकडे त्याला काही महत्त्व आहे? का कुणास ठाऊक पण मला मदर तेरेसांची आठवण झाली. त्या आवेगात मी त्यांना पत्र लिहिलं. बराच काळ लोटला तरी काहीच झालं नाही. अचानक एके दिवशी आंतर्देशीय पत्र आलं. ते पत्र खुद्द मदर तेरेसांनी पाठवलं होतं हे पाहून मी किती विस्मयचकित झालो असेन, कल्पना करा. माझी अडचण लक्षात घेऊन त्यांनी मला आत्मपरीक्षण करायला सांगितलं होतं. आत्मकेंद्रित जीवन तर मी जगत नाहीय ना? तसं असेल तर ते ‘योग्य’ आहे का, हे तपासून पाहायला त्यांनी मला सांगितलं होतं. तुम्ही करत असलेल्या समाजकार्यात मला काही योगदान देता येईल का अशी विचारणा करणारं दुसरं पत्र मी त्यांना पाठवलं. माझी ती ‘ऑफर’ नाकारून त्यांनी उत्तर दिलं की, ‘चॅरिटी’ म्हणजे नुसती पैशांची देणगी नव्हे; इतरांचं जीवन समृद्ध व्हावं म्हणून आपला वेळ, आपलं हृदय आणि आपली प्रतिभा समर्पित करणं म्हणजे सेवा. त्यानंतरच्या एका पत्रात त्यांनी समजावलं की, ‘या धरतीवर आपण का आलो आहोत याचं उत्तर, आपला ‘स्व’ इतरांसाठी समर्पित केला तरच, मिळेल.’

त्यांचा तो सल्ला माझ्याकडून लगेच पाळला जाईल असं वाटलं होतं; पण परिस्थितीच अशी निर्माण झाली की, मी ‘करिअर’च्याच मागं धावत राहिलो. रूढार्थानं ‘यशस्वी’देखील झालो; परंतु आंतरिक शांतता आणि समाधान लाभलं नाही. नंतर निवृत्त झाल्यावर कित्येक गोष्टी करून पहिल्या. आणि, योगायोगानं मला जाणवलं की, शिकवणं, मुलांबरोबर राहणं, त्यांच्या सर्वोत्तम रूपात त्यांनी स्वतःला पाहावं यासाठी त्यांना मदत करणं, त्यांच्या स्वप्नांशी एकरूप होऊन ती साकार करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना हातभार लावणं यानंच माझ्या आतली पोकळी भरून निघाली. मी ‘फ्लेम’मध्ये शिकवलं (तेव्हा ते लिबरल आर्टस् कॉलेज होतं), ‘प्रवरा’च्या संस्थेत ‘शैक्षणिक प्रशासक’ म्हणून खूप समाधानकारक काम केलं. शेवटी ‘रयत शिक्षण संस्थे’च्या कोकणातल्या काही शाळा-महाविद्यालयांचं पालकत्व स्वीकारलं आणि ते सांभाळताना माझे आजार आणि वय कधीच विसरून गेलो.

तेवढ्यात त्या मुलीनं पुन्हा विचारलं : ‘‘आजोबा, तुम्ही वयाची पंचाहत्तर वर्षं पूर्ण करणार आहात. सांगा ना, एवढ्या काळात तुम्ही काय काय केलं? काय शिकलात?’’

मी तिच्याकडं पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर मोहक निरागसपणा झळकत होता. न राहवून मी तिला जवळ घेतलं.

‘‘बाळ, खरोखरच जाणून घ्यायचंय तुला?’’ मी विचारलं.

‘‘हो,’’ ती म्हणाली.

‘ठीक आहे... मग ऐक. मी मुळात पंचाहत्तर वर्षांचा नाहीच!’

तशी ती खळखळून हसली...अगदी मनापासून आणि तिचं ते हसू आभाळभर पसरलं. आणि ती म्हणाली : ‘‘तुम्ही तर काहीच बोलला नाहीत, आजोबा; पण तुमच्या मनातले शब्द मला ऐकू आले. बस्स् एवढंच सांगा, तुम्ही स्वतः आहात तसे, बाकीचे लोक आहेत तसे आणि हे सारं जग जसं आहे तसं स्वीकारण्याइतकी शक्ती तुमच्यात आली कशी? आणि त्यामुळेच तुम्ही पंचाहत्तरीचे वाटत नाही आहात का?’’

असं म्हणून तिनं माझा हात तिच्या हातात घेतला आणि ती माझ्याबरोबर चालू लागली...सुरुवातीला हळूहळू आणि नंतर ठामपणे पावलं टाकत...क्षितिजाच्या त्या टोकापर्यंत, जिथं अंधार असतच नाही!

(सदराचे लेखक ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ, तसंच अर्थशास्त्र-इतिहास-राजकीय घडामोडी या विषयांचे अभ्यासक-संशोधक आहेत.)

(अनुवाद : डॉ. रघुनाथ कडाकणे) raghunathkadakane@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Byculla Assembly Election: भायखळ्यात कोण मारणार बाजी? दोन शिवसेनेत काटे की टक्कर!

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

SCROLL FOR NEXT