सप्तरंग

आव्हानात्मक अन् आकर्षक

‘हिंसा आणि संघर्षाने चालत असलेल्या या जगात गांधींचा शांती आणि अहिंसेचा संदेश २१ व्या शतकात मानवी अस्तित्वाची गुरुकिल्ली आहे,’ असे मत नेल्सन मंडेला यांनी २००७ मध्ये व्यक्त केले.

प्रज्ञेश मोळक pradnyesh.molak@gmail.com

‘हिंसा आणि संघर्षाने चालत असलेल्या या जगात गांधींचा शांती आणि अहिंसेचा संदेश २१ व्या शतकात मानवी अस्तित्वाची गुरुकिल्ली आहे,’ असे मत नेल्सन मंडेला यांनी २००७ मध्ये व्यक्त केले. महात्मा गांधी यांची कालच जयंती झाली. तसेच त्यांच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन जगभर पाळला जातो. गांधीजींनी मांडलेला शांती आणि अहिंसेचा विचार आपल्यासारख्या प्रवाशांनी पुढे नेला पाहिजे असं मला वाटतं. हाच विचार माझा एक अवलिया मित्र २०१६ पासून पुढे घेऊन जात आहे. मूळचा राशीन, अहमदनगरचा असणारा ३० वर्षीय नितीन श्रीरंग सोनावणे हा जगाचा कधी झाला कळलंच नाही. २०१६ मध्ये १८ नोव्हेंबरला नितीन सेवाग्राममधल्या गांधी आश्रमापासून सायकलवरून प्रवासाला निघाला. निमित्त काय होते? तर गांधीजींचा शांती आणि अहिंसेचा मार्ग लोकांपुढे आणायचा. जगभरातील लोकांना या मार्गावर चालण्यास प्रवृत्त करायचे असा मानस त्याने ठेवला आणि गेली पाच वर्षे नितीन पायी आणि सायकलवर प्रवास करतोय. एखादं ध्येय ठेवून ते गाठण्यासाठी माणूस काय काय करु शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नितीन.

सेवाग्राम, भारतातून सुरु झालेला प्रवास पुढे थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, चीन, मकाऊ, जपान, दक्षिण कोरिया, पुढे अमेरिका, त्यापुढे दक्षिण अमेरिकेतील मेक्सिको, ग्वाटेमाला, होंडुरास, अल साल्वाडोर, निकाराग्वा, कोस्टा रिका, पनामा, कोलंबिया, इक्वेडोर आणि पेरू असा प्रवास त्याने केला. नंतर आफ्रिका खंडात दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, झांबिया, टांझानिया, रवांडा, युगांडा, केनिया, इथिओपिया, सुदान, इजिप्त आणि मग इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड, जर्मनी, स्पेन, पोर्तुगाल, जॉर्जिया, तुर्की, सर्बिया, मॅसेडोनिया, अल्बेनिया, मॉन्टेनेग्रो, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान असे एकूण ४६ देशात २५ हजार किलोमीटर सायकल प्रवास तर १३ हजार किलोमीटर पायी प्रवास करत जुलै २०२१ मध्ये नितीन भारतात आला. फक्त ४६ देशातील प्रवास म्हणू शकलो असतो परंतु मुद्दामहून सर्व देशांची नावं लिहिली कारण कुठून कुठे गेला हे समजलं पाहिजे.

खिशात अगदी तुरळक पैसे घेऊन एका विशिष्ट विचाराने व ध्येयाने माणूस किती बेभान होऊन आयुष्य पणाला लावतो हे नितीनच्या प्रवासातून दिसून येतं. एकीकडे गांधीजींचे विचार रुजविण्याचे काम तर दुसरीकडे एवढे मोठे धाडस. वैयक्तिक मला त्याच्या या दोन्ही गोष्टींचे कौतुक वाटतं. त्यात तो मराठी असल्याचा अभिमान तर वाटतो परंतु नितीन हा खऱ्या अर्थाने वैश्विक झालाय असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.

नितीन सोनावणे याला जगभरात आता Gandhi Peace Walker म्हणून ओळखलं जातं. कालच दिल्लीतील ''राजघाट'' येथे तो ''शांतता वॉक'' करत पोहोचला. खरं तर आपण प्रवासाच्या गप्पा नेहमी मारतो. परंतु असं धाडस करणारे फार कमी असतात. गांधीजी स्वतः उत्तम प्रवासी होते असं मी मानतो. लंडन असेल किंवा दक्षिण आफ्रिका त्यांनी त्यांचा ठसा उमटवला. त्यानंतर पुढे गोपाळ कृष्ण गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली गांधीजींनी संपूर्ण भारत पालथा घातला. जो माणूस प्रवास करतो तो अधिक प्रगल्भ होत जातो. हेच गांधीजी प्रकाशझोतात आले ते म्हणजे त्यांच्या दक्षिण आफ्रिकेतील दिवसांमुळे. त्याच दक्षिण आफ्रिकेची थोडक्यात माहिती तुम्हाला सांगणार आहे.

दक्षिण आफ्रिकेची अष्टपैलू विविधता केवळ त्याच्या चैतन्यशील लोकांमध्ये दिसत नाही, तर प्रत्येक गोष्टीत दिसून येते. दक्षिण आफ्रिकेच्या तीन राजधान्या आहेत; प्रिटोरिया (कार्यकारी) केप टाउन (विधायी) आणि ब्लूमफोन्टीन (न्यायिक). या देशाची लोकसंख्या पाच करोड ९० लाख इतकी आहे तर येथे झुलू, झोसा, आफ्रिकन, सेपेडी, इंग्रजी, त्सवाना, सेसोथो, सोंगा, स्वाती, वेंडा आणि एनडेबेले या भाषा बोलल्या जातात. या देशातील लँडस्केप आणि वन्यजीव एकमेकांना टक्कर देत प्रवाशांना अविश्वसनीय दृश्ये आणि साहसी उपक्रम देतात. जसं भारत हे नाव उच्चारलं तर गांधीजी, ताज महाल, हिमालय इत्यादी गोष्टी समोर येतात तसेच दक्षिण आफ्रिका म्हटलं तर टेबल माउंटन, रग्बी टीम, नेल्सन मंडेला, क्रुगर राष्ट्रीय उद्यान, वन्यजीव, खाद्यपदार्थातील ब्राई (Barbecue) आणि सर्फिंग डोळ्यासमोर येतं. टेबल माउंटनवर २ हजारपेक्षा ही अधिक वनस्पतींच्या मूळ प्रजाती आहेत. वन्यजीवन आणि पर्यावरण हे एकत्रित येऊन प्रवाशांना मेजवानी देतात.

Inspiring New Ways असं दक्षिण आफ्रिकेचं पर्यटन घोषवाक्य आहे. वेस्टर्न केपचे निसर्गरम्य वैभव दक्षिण आफ्रिकेत फार पूर्वीपासून पर्यटन क्षेत्रात एखादं ड्रॉकार्ड (Drawcard) असल्यासारखं आहे. गौतेंग या प्रांतात जोहान्सबर्ग व प्रिटोरिया ही दिमाखदार शहरं आहेत. क्वाझुलु-नताल (KwaZulu-Natal) हे नैसर्गिक आणि सांस्कृतिक पूर्ण आहे. जोहान्सबर्गला City of Gold म्हणतात आणि ते एक गजबजणारं शहर आहे. केप टाउन हे शहर समुद्रकिनारपट्टीवर असल्यामुळे फार सुंदर असून रात्री तिथे अप्रतिम रोषणाई असते. डर्बन हे पूर्व किनारपट्टीवर आणि पर्यटकांचे तिथे नेहमी आकर्षण राहते. आफ्रिकेचे दक्षिणेकडील टोक, केप अगुल्हास (Cape Agulhas) येथे हिंद आणि अटलांटिक महासागर एकत्र येतात हे बघण्यासारखे आहे. व्हॅली ऑफ डार्कन्सबर्ग येथून कुठले ही पॅनोरमा दृश्य भन्नाट दिसतं. हत्ती आणि झेब्रा भरपूर प्रमाणात आढळतात. तसेच डॉल्फिन्स आणि इतर सागरी प्राणी देशाच्या संपूर्ण किनारपट्टीवर दिसतात. देशात सर्वत्र भिन्न पद्धतीचे म्युझिक, पक्षी, विविध लोकं आणि एक अनोखेच चैतन्य आहे.

दक्षिण आफ्रिकेत ऐतिहासिक ठिकाणं, संग्रहालये, साहसी ठिकाणं तर आहेतच सोबत लोकही आशावादी आहेत. संघर्षातून हा देश उभा राहिलाय. काही प्रमाणात तिथे आताही संघर्ष चालू असतो. देशांतर्गत वादविवाद असतातच. अर्थात ते कुठे नसतात... परंतु महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांना तिथे प्रचंड मानलं जातं. नितीन सोनावणे सारखे इतर उदारमतवादी लोकं या जगात आहेत म्हणून जग एकसंघ राहण्यास मदत होते असं मला वाटतं. अशा लोकांकडून खरोखर प्रेरणा मिळते. जिंदगी वसूल करता करता जिंदादिल असणं खूप महत्वाचं आहे. आज गांधी जयंतीनिमित्त दक्षिण आफ्रिका तुमच्यासमोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला. दक्षिण आफ्रिका जरी चिंताजनक आणि आव्हानात्मक असला तरी आकर्षक आणि प्रेरणादायी आहे. हा देश खरं तर खूप मोहक आहे आणि म्हणूनच बहुतेक प्रवासी वेळोवेळी तेथे फिरायला जातात.

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट यूवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT