अगदी परवाच म्हणजे १९ ऑगस्टला ‘जागतिक फोटोग्राफी दिन ’ झाला. जागतिक फोटोग्राफी दिनाची उत्पत्ती डॅग्युरोटाइपच्या (Daguerreotype) शोधातून झाली आहे, फ्रेंच असलेले लुई डॅगुएरे (Louis Daguerre) आणि जोसेफ नीसफोर निप्से (Joseph Nicephore Niepce) यांनी विकसित केलेली छायाचित्रण प्रक्रिया प्रथम १८३७मध्ये पार पडली. फ्रेंच सरकारने १८३९ मध्ये १९ ऑगस्टला ‘डॅग्युरोटाइप’ प्रक्रियेचे पेटंट विकत घेतले व “Free to the world,” असं म्हणत जगाला अनोखा शोध भेट दिला. तिथपासून ते आधुनिक काळात फोटोग्राफीचा भरपूर वापर जगभर होतो.
आता तर एका क्लिकवर सारं येऊन थांबलंय. तंत्रज्ञानामुळं जग बदलत राहतं. आपण वर्तमानातील बदलत्या जगाचे फोटो काढून भविष्यात त्या आठवणी म्हणून जपत राहतो. कुठलाही प्रवास हल्ली फोटोग्राफीशिवाय पूर्ण होत नाही. गेल्या काही वर्षात ‘ट्रॅव्हल फोटोग्राफी’ नावाचं एक वेगळं क्षेत्रच निर्माण झालंय. प्रवास करता करता आपलं जग फोटोग्राफीच्या माध्यमातून जगाशी शेअर करणं सहज सोपं झालंय. आणि म्हणूनच आज आपण ट्रॅव्हल फोटोग्राफीबद्दल अधिक जाणून घेऊया...
फोटोग्राफीचा १८३९ ते २०२१ पर्यंत तब्बल १८२ वर्षांचा हा प्रवास झालाय. कठीण प्रक्रियेतून अगदी एका क्लिकपर्यंतचा हा प्रवास. मला व्यक्तिगत फोटोग्राफीची आवड शालेय वयापासून लागली, पुढे फिरताना ती आवड जोपासली आणि नंतर माझे व्यावसायिक जीवनही त्यातच सुरु झाले. इतकी वर्ष भारतात व परदेशात फिरताना ‘ट्रॅव्हल फोटोग्राफी’ हळूहळू समजत गेली आणि ती आत्मसात करण्याचा नेहमी प्रयत्न मी करत असतो. आपणही प्रवास करताना प्रयोग करत राहिलं पाहिजे. आर्किटेक्चरल, लॅंडस्केप, स्ट्रीट, एरियल (Aerial), एस्ट्रो (Astro), डॉक्युमेंट्री, संस्कृती व खाद्य, स्पोर्ट्स, वाइल्डलाईफ असे कितीतरी ट्रॅव्हल फोटोग्राफीचे प्रकार आहेत. भ्रमंती करताना वेगवेगळ्या ‘अँगल’मधून बघितलं ना तर प्रवास व फोटोग्राफीची मजाही घेता येते आणि भरपूर शिकायलाही मिळते.
आज काही निवडक देशांबद्दलच्या सौंदर्याबद्दल तुम्हाला सांगतो. येत्या काळात जर तुम्ही तिथे जाणार असाल तर वेगळ्या नजरेतून ते सर्व पहा आणि ‘जिंदगी वसूल’ करण्याचा प्रयत्न करा. सर्वप्रथम भारताचेच उदाहरण घेऊया. आपला देश प्रचंड आश्चर्यकारक ठिकाणांनी परिपूर्ण आणि भिन्न रंगांनी बहरलेला देश आहे. अगदी बर्फाच्या डोंगरापासून ते समुद्रकिनाऱ्यापर्यंत व विविध धर्मस्थळांपासून ते ऐतिहासिक ठिकाणांपर्यंत आपला भारत देश फिरायला अन् फोटोग्राफी करायला खूपच छान आहे. तुम्हाला कदाचित हे आधीच माहित असेल, परंतु जाणून घेणे आणि पाहणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. तसेच तुम्ही ‘द लॉर्ड ऑफ दि रिंग्ज’ व ‘द हॉब्बीट’ या फिल्म सिरीज जर पाहिल्या असतील तर त्यातील बहुतांश शूटिंग हे न्युझीलँड देशातील आहे. जर तुम्ही चित्रपट पाहिले नाहीत, तर बर्फाच्छादित पर्वत, क्रिस्टल क्लियर लेक्स, ताज्या जंगलाचे दृश्य कसे असतात हे तिथे अनुभवता येईल. लॅंडस्केपमधील विविधता तिथे पाहता येते. कधीही तुम्ही तिथे जाणार असाल तर फोटोग्राफीसाठी असंख्य ठिकाणी संधी मिळू शकते.
आग्नेय आशियातील मलेशिया, इंडोनेशिया, थायलॅंड, कंबोडिया, तिमोर लेस्ते, व्हिएतनाम येथे लॅंडस्केप व नेचर फोटोग्राफी करण्यासाठी वाव आहे. तसेच सिंगापूर किंवा जपान यासारख्या आधुनिक देशात स्ट्रीट फोटोग्राफी करता येऊ शकते. आफ्रिका खंडातील केनिया, घाना, इथोपिया, उगांडा, मोरोक्को, मोझाम्बीक, टोगो, साऊथ आफ्रिका अशा इत्यादी देशात वन्यजीवन चित्तथरारक करणारे आहे. येथील पशु-प्राणी बघणे हा अविस्मरणीय अनुभव ठरु शकतो तर संस्कृती, परंपरा व खाद्य पद्धती याचे अनोखे दर्शन घडेल. युरोपात बघायला गेलं तर तिथे हेरिटेज जपलेलं आहे. तेथील काही देशांनी जगातील विविध भागात जाऊन राज्य केलं. राज्य करत असताना बऱ्याच गोष्टी त्यांच्या देशात ते घेऊन गेले व त्याचे उत्तमरित्या जतन ते करत आहेत.
याच युरोपातील युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, स्वित्झर्लंड, ग्रीस, क्रोएशिया, स्पेन, इटली अशा बऱ्याच देशांमध्ये ऐतिहासिक वारसास्थळांचे जतन केले जाते. तेथील नैसर्गिक सौंदर्यदेखील अफाट आहे. हे सारं तर कॅमेराबद्ध करता येतंच शिवाय आर्किटेक्चरल फोटोग्राफीला विशेष संधी मिळते. तसेच एस्ट्रोफोटोग्राफी करण्यासाठी उत्तम स्काय लाईट्स येथे मिळतात. जगातील सुंदर अशा ग्रीस देशाला तर सभ्यतेचे जन्मस्थान म्हटलं जातं. ‘युके’तील स्कॉटलॅंड हे निवांत जाण्यासाठीचं ठिकाण आहे. इंग्लंडमधील अप्रतिम संग्रहालये व वारसा असलेल्या इमारती. क्रोएशियाकडे तर सर्व आहे. राष्ट्रीय उद्याने थक्क करणारी, आकर्षक शहरे, भव्य किनारपट्टी तर इतिहास अंतर्भूत करणारा आहे. युरोपात विविध ठिकाणी अशा कित्येक गोष्टी फोटोग्राफीसाठी आहेत. आपल्याला उत्साह आणि नजर हवी मग प्रवास सुखकर होईल बघा!
तसेच दक्षिण अमेरिकेतील पेरु, क्युबा, ब्राझील, अर्जेंटिना, चिली इत्यादी देशांमध्ये परकीय वसाहती होत्या. त्यामुळे आर्किटेक्चरल फोटोग्राफी मस्त होऊ शकते. तसेच बाईक राईडसाठी भन्नाट रुट असलेला हा भूभाग आहे. उत्तर अमेरिकेतील कॅनडा, ग्रीनलॅंड, कॅरिबियन देश, युएसए, मेक्सिको अशा अनेक देशात रोड ट्रीप्स करता येतात. ट्रॅव्हल फोटोग्राफीचे सर्व प्रकार करण्याची संधी या देशांमध्ये मिळते.
तर मित्रांनो, देशात अथवा जगभर कुठेही प्रवास करताना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून भ्रमंती केली तर फोटोग्राफी करण्यासाठी संधी आहे. आपण चांगले फोटोग्राफर आहोत की नाही याचा विचार करु नये. आपल्या लेन्समधून पाहिलेलं जग निदान आपल्या नातेवाईक-मित्र मंडळींना दाखवावे. फोटो काढा, दुसऱ्यांचे फोटो पहा, एकमेकांचे कौतुक करा. प्रवासात अशी फोटोग्राफी करण्याचा प्रयत्न करा की दर्शकाला शॉटमध्ये खेचून ते तिथे असले पाहिजेत असा अनुभव देता आला पाहिजे. वृत्तपत्रे ही फोटोंमुळे सुबक दिसतात तसेच दृश्यांना आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते अनुभवून जगता आलं पाहिजे.
(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.