Vietnam Country Sakal
सप्तरंग

व्हिएतनाम : आपुलकी आणि विश्‍वास

मित्रांनो आज विषय व्हिएतनामचा... हा देश जर चांगल्या पद्धतीने फिरायचा असेल तर एक-दीड महिना पाहिजे.

प्रज्ञेश मोळक pradnyesh.molak@gmail.com

मानवजातीला गेल्या कित्येक महिन्यांपासून जागतिक संकटाचा सामना करावा लागत आहे. कोरोना विषाणूचे भिन्न प्रकार व त्याचबरोबर हवामान बदलाचे होत असलेले परिणाम आपण बघत आहोत. हिमालयात काय घडतंय हे आपण पाहतोय. तसेच महाराष्ट्रासह जगातील अनेक देशांमधील पूर परिस्थितीला आपण सामोरे जात आहोत. कदाचित सध्या हे आपल्या पिढीचे सर्वांत मोठे संकट आहे. होय, ही संकटांची विविध वादळं निघून जातील. आता इथून पुढे आपण एका वेगळ्याच जगात राहू. आणि, म्हणूनच आपल्याला मिळालेले आयुष्य आपण सार्थकी लावलं पाहिजे. आपल्या सर्वांना जागतिक सहकार्याची आणि विश्वासाची भावना एकमेकांमध्ये निर्माण करायला हवी. अशीच मित्रत्वाची, सहकार्याची, प्रेमाची, आपुलकीची व विश्वासाची भावना मी व्हिएतनाममध्ये अनुभवली. या पद्धतीचे वातावरण आपल्या सर्वांना एकत्र येऊन उभं करावं लागेल. हे एकट्या-दुकट्याचं काम नाही.

तर मित्रांनो आज विषय व्हिएतनामचा... हा देश जर चांगल्या पद्धतीने फिरायचा असेल तर एक-दीड महिना पाहिजे. मी या देशात ९-१० दिवस होतो. उत्तर - मध्य - दक्षिण व्हिएतनाम अशा तीन भागात आपण त्याला विभागू शकतो. हा देश ‘S - Shaped’ किंवा सापासारखा किंवा ड्रॅगन सारखा आहे. या देशाची लोकसंख्या जवळपास साडे-नऊ कोटी असून हानोई (Hanoi) ही राजधानी आहे. व्हिएतनामीझ भाषा इथं बोलली जाते. देशातील प्रमुख शहरातील लोकं मोडकं तोडकं इंग्लिश बोलतात. बऱ्याचदा अनुवादक ॲप्सचा वापर करावा लागतो. पण खरं सांगू तर या देशातील नागरिक मला फार साधे-सरळ व नम्र स्वभावाचे वाटले.

व्हिएतनामचे पूर्वी दोन भाग होते. वेगवेगळ्या युद्धात अनेक माणसं गेली. व्हिएतनाम- अमेरिकन युद्धाकडे जगाचे लक्ष होते. युद्धाच्या रणनीती पण भन्नाट होत्या. त्या कशा होत्या हे हो चि मिन्ह शहरापासून ( Ho Chi Minh City) दोन तासाच्या अंतरावर असलेलं कुची टनल्स (Cu Chi Tunnels) येथे गेल्यानंतर समजते. इंडो-चायना युद्ध व व्हिएतनाम युद्ध असे दोन महत्वाचे कालखंड येथे दिसतात. त्याचं एक भव्य संग्रहालय हो चि मिन्ह शहरात आहे. ते आवर्जून बघितलं पाहिजे. एक देशाचा प्रवास कुठून कुठपर्यंत झालाय हे तर तिथे कळतच परंतु कुठल्या जखमातून किंवा संकटातून व्हिएतनाम कसा घडत गेलाय याची कल्पनाही तिथे येते.

उत्तर व्हिएतनामला हानोई, हा लॉंग बे (Ha Long Bay), सापा (Sapa) मै चाऊ (Mai Chau), हाय फोंग (Hai Phong) ही शहरं आहेत तर हो चि मिन्ह व कुची टनल्स ही ठिकाणं दक्षिणेत आहेत. मध्य व्हिएतनाममध्ये हुई (Hue), द नॉंग (Da Nong) व होई अन (Hoi An) या शहरांचा समावेश होतो. चीन, थायलंड, लाओस व कंबोडिया हे व्हिएतनामच्या आजूबाजूचे देश तर पूर्वेकडे तीन हजार २६० किलोमीटरची लांबलचक समुद्रकिनारपट्टी. हानोई व हो चि मिन्ह शहरात ट्रॅफिक तर विचारुच नका. हा देश फक्त टू व्हिलर्सचाच आहे की काय असं वाटतं.

या देशात कमी पैशात फिरता येतं. ‘शोधलं म्हणजे सापडतं,’ असं काहीसं म्हणतात. तिथे स्वस्तात काय करता येईल याचा शोध घेता ‘Hanoi e.Buddies’ नावाची एक संस्था सापडली. ‘Go with a local’ अशी एक टूर त्यात सापडली अन् मग तेथील विद्यार्थिनीने मला संपूर्ण हानोई फिरवलं. सर्वात भारी म्हणजे... ‘Hanoi e.Buddies’ तुम्हाला निशुल्क फिरवतं. ‘कसं ? का? काही काय सांगतोय मित्रा?’, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येतील. तर त्यांचा अजेंडा थोडा वेगळा आहे. ही पोरं पोरी कॉलेजला जाणारी असून English Literature या विषयात डिग्रीचा अभ्यास ते करतात. त्यांचा इंग्रजीचा सराव व्हावा. तर कसा करता येईल? तर परदेशी पर्यटकांसोबत फिरलो, त्यांना हानोई शहरातील प्रेक्षणीय ठिकाणं दाखवले, तेथील संस्कृती व खाद्यसंस्कृतीचा अनुभव द्यायचा असेल तर मग त्या परदेशी पर्यटकांसोबत ‘इंग्रजीत संवाद’ साधावा लागेल आणि त्यातून विद्यार्थ्यांची इंग्रजी सुधारण्यास हातभार लागेल असा त्यातला हेतू. कसली भन्नाट कल्पना आहे ना? एक प्रकारे व्यापाराचे उदाहरण आहे. ‘एक हाथ से लेना और दुसरे हाथ से देना’, असा काहीसा हा प्रकार आहे. हे असे असंख्य ‘ट्रॅव्हलिंग ट्रिक्स’ जगभरात आहेत. आपण फक्त शोधक नजरेने त्याकडे बघितलं पाहिजे.

डोंगर, समुद्र, आधुनिक शहरं असा हा देश आहे. निसर्ग सौंदर्य बरेच आहे. शेती पण बऱ्यापैकी आहे. जगात काजूचे क्रमांक एकचे उत्पादक आहेत. तसंच काळी मिरी, भात व कॉफी जगभरात सर्वाधिक प्रमाणात निर्यात करतात. उत्तर ते दक्षिण व्हिएतनाम अशी बाईक राईडही करता येते.

आजच्या सदरात कुठल्या शहरात काय पहायचं हे मुद्दामहून नाही लिहिलं कारण ‘डू इट युवरसेल्फ’ची थोडी फार का होईना अंमलबजावणी करायचा प्रयत्न प्रत्येक प्रवाशाने केला पाहिजे. तरीसुद्धा हा ‘लॉंग बे’ या आश्चर्यचकित करणाऱ्या ठिकाणाबद्दल थोडं सांगतोच. समुद्र, छोटे छोटे आयलॅंड, सूर्योदय - सूर्यास्त अन् क्रुझ. २/३ दिवस येथे सहज घालवू शकता. ‘Ha Long’ म्हणजे ‘Descending Dragon’. गुगल मॅपवर बघितलं तर लक्षात येईल. या आयलॅंडला ‘Limestone’ भरपूर प्रमाणात दिसतं. काही गुहा भारी आहेत इथं. त्यातले ‘Figures’ आपल्या कल्पनाशक्तीमुळे दिसून येतात. जंगल तर आहेच आणि २/४ ठिकाणी ट्रेक करता येतो. ‘वॉटर स्पोर्ट्स’ एन्जॅाय करता येतात. १९६९ आयलॅंड असून त्यातील फक्त ४० बेटांवर जवळपास सोळाशे लोकं या परिसरात राहतात परंतु लाखो करोडो पर्यटक दरवर्षी येथे येतात. एका प्रवाशाने तर ‘हा लॉंग बे’ ला ‘Rock Wonder in the Sky’ असं म्हटलंय. एकदा का होईना इथं जायलाच पाहिजे.

(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट युवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT