प्रत्येकाला प्रवास करायला आवडतं. प्रवास कुठे करायचा?, कसा करायचा?, काय नियोजन आखलं पाहिजे या साऱ्याबद्दल चर्चा करुन माणसं प्रवासाचं ठिकाण ठरवत असतात. एकटं म्हणजेच सोलो प्रवासी असेल तर त्या व्यक्तीला फारसा विचार करावा लागत नाही. परंतु कुटुंब असेल किंवा मित्र मैत्रिणींचा ग्रुप असेल तर मात्र प्रवास करताना दहा नाही तर शंभर गोष्टींचा विचार करावा लागतो. एकटं फिरणं आणि समुहानं फिरणं याचं समीकरण वेग-वेगळं असतं.
यावरच प्रवासाचे ‘बजेट’ ठरतं. पण मला वाटतं की, सगळ्यांनीच कधी ना कधी ‘बजेट ट्रॅव्हल’ केलं पाहिजे. निदान प्रयत्न तर केला पाहिजे कारण अनुभव महत्वाचा आहे. आणि हो, ‘बजेट ट्रॅव्हल’च केलं पाहिजे असंही नाही. स्वतःवरच खर्च करायचा आहे तर मग जास्तीही करुच शकता की...! या सगळ्याचं सार इतकचं आहे ते म्हणजे प्रवास केला पाहिजे. आता कोरोनानंतर जग अधिक खुलं झालंय. नियम काही प्रमाणात शिथिल झाले आहेत. लोक बाहेर पडायला लागलेत. दिवाळी किंवा त्यानंतर प्रवास करायला अजिबात हरकत नाही. त्यासाठी सर्वांना सदिच्छा!
‘बजेट ट्रॅव्हल’ करायचं की नाही हा मुद्दा कायम राहू शकतो. कधी बजेट तर कधी बिनधास्त खर्च करुन फिरुयात...! आज मी तुम्हाला एका महागड्या देशाबद्दल सांगणार आहे. देश तसा छोटा आहे पण जगातील सर्वोच्च दराचं चलन असणारा देश कोणता तर तो म्हणजे कुवेत (Kuwait).
कुवैती दिनार किंवा KWD ने जगातील सर्वाधिक चलनाचा मुकुट जिंकला आहे. ते तेल-आधारित व्यवहारांसाठी ‘मध्य पूर्व’ मध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. १ कुवैती दिनार म्हणजे २३३ रुपये आहे. या देशात पिण्याच्या पाण्याची बाटली जवळपास १२० रुपयांना मिळते. वाळवंटी आणि ‘मिडल ईस्ट’ मधील हा सर्वात लहान देश. तेलाने समृद्ध अशा या देशाला इराक आणि सौदी अरेबिया या बलाढ्य देशांनी वेढलेलं आहे. कुवेतच्या पूर्वेला समुद्र म्हणजेच ‘पर्शिअन गल्फ’ आहे. कुवेत इतिहासातील सर्वात वादग्रस्त प्रदेशांपैकी एक आहे. इराकने १९९० मध्ये कुवैतवर केलेले आक्रमण कदाचित बहुतांश लोकांना माहित असेल, परंतु तेथील सभ्यता हजारो वर्षांपासून अर्थात दिलमुम साम्राज्यापासूनची (Dilmum Empire) आहे.
कुवेतची राजधानी कुवेत शहर असून देशाची लोकसंख्या ४२ लाख इतकी आहे. तेथील प्रमुख भाषा अरेबिक आहे. कुवेत हा एक मुस्लिम धर्मीय देश आहे. इतर कुठल्याही महिन्यात तिथे जाता येतं पण फेब्रुवारी ते एप्रिल हे महिने तिथे जाण्यास उत्तम आहेत. वाळवंटी भाग असल्यामुळे या भूभागात कायम उन्हाळा असतो. कुवेत फिरण्यासाठी ३-४ दिवस पुष्कळ झाले. सैल हाताने खर्च केला तर पावणेदोन ते दोन-अडीच लाख खर्च येऊ शकतो आणि जर एकटे असाल व त्यात बजेट खर्च केला तर ८० हजार ते लाख रुपये खर्च येऊ शकतो. भारतीयांसाठी व्हिसा गरजेचा आहे. त्यासाठी अगोदरच कागदपत्रे सादर करावी लागतात. अनेक भारतीय तिथे नोकरी – व्यवसाय करण्यासाठी जातात.
कुवेतमध्ये जवळपास वीसहून अधिक संग्रहालये आहेत. विविध प्रकारची ही संग्रहालये सर्व अभ्यागतांना आकर्षित करतात. आपण ऐतिहासिक संग्रहालयांचा आनंद घेऊ शकता, जे भूतकाळातील कुवैती जीवनाचे प्रतिनिधित्व करतात, सर्व जीवंत क्रियाकलाप, सवयी आणि परंपरा. तसेच, ऐतिहासिक घरे आणि रस्त्यांसाठी मॉडेल तयार केले आहे. जर तुम्हाला इस्लामिक कलेची आवड असेल तर तुम्ही इस्लामिक संग्रहालयांना भेट देऊ शकता. या संग्रहालयांमध्ये पवित्र कुराण, इंग्रजी हस्तलिखिते, वाद्ये, चिलखत, जुने इस्लामिक फर्निचर, सोन्याचे आणि चांदीचे दागिने, धातूचे काम, कापड आणि जुने इंग्रजी पोशाख यांचे दुर्मिळ संग्रह प्रदर्शित केले जातात. नैसर्गिक, पर्यावरण आणि औद्योगिक विज्ञान प्रेमींसाठी विविध प्रकारची विज्ञान संग्रहालये स्थापन केली आहेत. ही संग्रहालये त्यांच्या अभ्यागतांना स्पेस, प्राणीशास्त्र, विमानचालन, इलेक्ट्रॉनिक्स आणि तेल क्षेत्रात विशेष विज्ञान उपकरणे आणि प्रदर्शन प्रदान करतात.
कुवेत राष्ट्रीय सांस्कृतिक संग्रहालय, शेख अब्दुल्ला अल सालेम सांस्कृतिक केंद्र, अल सलाम पॅलेस, बैट अल-ओथमॅन संग्रहालय, अहमद अल-जाबेर तेल आणि वायू संग्रहालय, सदू हाऊस, आधुनिक कला संग्रहालय, कुवेत सागरी संग्रहालय, तारिक रजब संग्रहालय, तारिक रजब म्युझियम ऑफ इस्लामिक कॅलिग्राफी, अमेरिकन सांस्कृतिक केंद्र, अल कुरैन शहीद संग्रहालय, ऐतिहासिक - विंटेज आणि शास्त्रीय कार संग्रहालय, डिक्सन हाऊस, दर्पण घर, कुवेत पोलीस संग्रहालय, कुवेत हवाई दल संग्रहालय, नॅशनल बँक ऑफ कुवैत संग्रहालय, कुवेत सिरेमिक हाऊस, कुवेतचे इस्लामिक पुरातन वस्तुसंग्रहालय, अशी अद्वितीय संग्रहालये आपणास पाहायला मिळतात.
कुवेत टॉवर्स, सौक अल-घरबल्ली, द एव्हेन्यूज मॉल अशी काही ठिकाणं पर्यटकांना आकर्षित करतात. कुवेत टॉवर्सची आश्चर्यकारक आधुनिक वास्तुकला प्रवाशांना अचंबित करते. फैलाका (Failaka) बेटावर आखातातील काही सर्वात श्रीमंत पुरातत्वीय स्थळे आहेत. कुवेतमध्ये तीसहून अधिक मॉल्स व मनोरंजक पार्क्स आहेत. अल अहमदी, हवाली, अस सलीमियाह, सबाह अस सलीम, अल फरवानीयाह, अल फहहिल, कुवेत शहर, अर रुमायथियाह, आर रिक्काह, सलवा, अल मानकाफ, अर रबियाह, बयान, अल जाहरा, अल फिंटास, जानूब अस सुरह, अल महबुलाह, अड दशमाह, ऐश शामियाह, अल वफराह, अझ झवर व मुबारक अल कबीर ही काही मोजकी आणि प्रमुख शहरे कुवेतमध्ये आहेत.
थोडक्यात काय तर वर्तमानातील ‘फास्ट फॉरवर्ड’ जगात कुवेत हा आखाती आकर्षक शैली असणारा बाजारपेठेतील सर्वात मनोरंजक कोपऱ्यांपैकी एक आहे. पारंपारिक बेडौइन आदिवासी (Bedouin Tribesmen) आणि पूर्णपणे आधुनिक तेल-समृद्ध शेख लोकं, परंपरेचा बुरुज व स्त्रियांच्या हक्कांसाठी उदयोन्मुख रणांगण आणि उदारमतवादी कल असणारा हा कुवेत देश आखातीचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य सांगत एका छोट्या जागेत वसलेला आहे. त्यामुळे जगातील सर्वोच्च चलन असणाऱ्या ‘क्वालिटी, क्लासिक कुवेत’ या देशाला एकदा तरी भेट दिलीच पाहिजे. त्याहून पुढे जाऊन येथे नोकरी-व्यवसायाच्या संधी शोधता येतील. ‘जिंदगी वसूल’ जर करायची असेल, तर अधिक मोठे स्वप्न बघितली पाहिजेत. ती स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. प्रयत्नशील राहून जोमाने पैसे कमवून जग फिरले पाहिजे. जग फिरले की भरपूर दारे उघडी होतील आणि त्यातून आयुष्य सार्थकी लागल्याची भावना निर्माण होईल. चला तर मग, एकटे अथवा ग्रुपने येणाऱ्या काळात जास्तीत जास्त फिरुया...!
(सदराचे लेखक ‘बजेट ट्रॅव्हलर’ असून ‘डू इट यूवरसेल्फ’ पद्धतीचे पर्यटक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.