Praful Wankhede writes Be literate sakal
सप्तरंग

सही साक्षर व्हा!

आर्थिक साक्षरता म्हणजे फक्त पैसे कमवणे, गुंतवणे आणि वाढवणे एवढेच नाही तर जागरूकता, ज्ञान, कौशल्य आणि चिकित्सक वृत्ती कायम ठेवत आपल्या सहीचे गुडविल वाढवणे हेही आहे.

प्रफुल्ल वानखेडे

आर्थिक साक्षरता म्हणजे फक्त पैसे कमवणे, गुंतवणे आणि वाढवणे एवढेच नाही तर जागरूकता, ज्ञान, कौशल्य आणि चिकित्सक वृत्ती कायम ठेवत आपल्या सहीचे गुडविल वाढवणे हेही आहे. आपल्या खिशाला पेन कोणत्या ब्रॅंडचा किंवा किती किमतीचा आहे, यापेक्षा त्याचा वापर करून तुम्ही केलेली सही किती मूल्याची आहे, याला जास्त महत्त्व असते.

माझे वडील पोस्टात कामाला होते. त्यामुळे घरातले सर्व आर्थिक व्यवहारही पोस्टातूनच व्हायचे. गावातली विकास सेवा सोसायटी किंवा शेती, बी-बियाणे आणि तत्सम बाबींच्या नव्या-जुन्या कर्जासाठी घरात एक-दोन जिल्हा बॅंकेची खाती होती. तीही वडीलच पाहायचे. पुढे मी कॉलेजला गावाबाहेर पडलो. तिकडेही खर्चासाठी पैसे मनी-ॲार्डरने पोस्टातच यायचे. त्यामुळे माझा वयाच्या २०-२१ वर्षांपर्यंत बॅंकेशी कसलाच संबंध आला नव्हता. आयुष्यात पहिल्यांदा मी बॅंकेत पाऊल टाकले ते कामाला लागल्यावर आठवडाभरानंतर. त्यात ती मोठी सरकारी बॅंक. टोकन, स्लिप, कागदपत्र याबद्दलचे माझे अज्ञान. पैशांच्या व्यवहाराची भीती. त्यात कसले कसले (मुर्ख, बावळट) लोक बॅंकेत येतात, अशा हावभावाचे खतरनाक कटाक्ष व काही टोमणेही. मला राग यायचा संबंधच नव्हता, कारण दरवाजात बंदूक घेतलेला शिपाई जणू मलाच मारायला ठेवलाय, ही अनामिक भीती.

तिथल्या दीड-दोन तासाच्या भयंकर अपमानानंतर मी कुठलंही काम न करता बाहेर पडलो. कंपनीत कामाला जात होतो; पण एचआरचे लोक बॅंक डिटेल्स मागून त्रास देत होते. शेवटी वडिलांना माझी अडचण सांगितली आणि पगाराच्या दोन-चार दिवस आधी कशीतरी कागदपत्रे जुळवून अत्यंत दहशतीच्या वातावरणात माझे आयुष्यातले पहिले बॅंक खाते सुरू झाले.

पुढे वर्षभरात मी मुंबईत आलो. नवीन ठिकाण, नवी कंपनी. पुन्हा तोच प्रश्न - पगार जमा कुठे करायचा? त्या बॅंकेत केला तर आताच्यासारखी एटीएम किंवा ॲानलाईनची सोय नव्हती. नवे खाते उघडावे तर आता सोबत वडील नव्हते. सुरक्षित घर, गाव सोडून इकडे यायचा निर्णयही माझाच. त्यामुळे सहन करण्यापलीकडे दुसरा उपाय नव्हता. रहिवासी दाखला, घरभाड्याचे ॲग्रिमेंट, पॅन कार्ड, रेशन कार्ड किंवा टेलिफोन बिल असलं काहीही माझ्याकडे नव्हतं.

काय करावं या विवंचनेतच पगाराच्या दिवसापर्यंत मी बॅंकेत जायचीही हिंमत करू शकलो नाही. शेवटी तिथल्या अकाऊंटंटला खरी परिस्थिती सांगितली. माझ्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत, त्यामुळे बॅंकेऐवजी मला रोख रकमेत पगार मिळेल का? या प्रश्‍नावर ते मला हसणार किंवा रागावणार, अशी भीती होती. परत एकदा अपमानाची मनापासून तयारी केली होती; पण क्षणाचाही विलंब न करता अकाऊंटंटने लगेच होकार दिला. दोन-पाच मिनिटांत पाकिटात ‘कॅश’ दिली. त्या वेळी मला झालेला आनंद आणि कंपनीच्या उपकाराची भावना पराकोटीची होती. काळानुरूप पुढे काही वर्षांनी कटू सत्य समजल्यावर कपाळावर हात मारण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता.

पुढचे वर्ष-दीड वर्ष मी कॅशमधेच पगार घ्यायचो. त्यामुळे बॅंकेशी काहीच संबंध यायचा नाही. त्या काळी मी नवीन प्रोडक्ट डेव्हलपमेंट पाहायचो. या कामासाठी अनेक लहान-मोठ्या कंपन्यांशी संबंध यायचा. एक दिवस चारकोप भागात आमच्या कंपनीच्या व्हेंडरकडे इन्स्पेक्शन करण्यासाठी गेलो. त्याचे मालक एक दक्षिण भारतीय गृहस्थ होते. एकदम टापटिप राहणी, कामाला एकदम चोख अशी त्यांची ओळख. मी शॅाप-फ्लोअरवरील काम संपवून त्यांच्या केबिनमध्ये गेलो, तर त्यांची एक मीटिंग सुरू होती, म्हणून त्यांनी बाजूला एका स्टूलवर बसायला लावले.

ते मुंबईतलं टिपिकल वर्कशॅाप होतं. त्यांचं ॲाफिसही तसंच. चार-पाच जण दाटीवाटीने बसलेले. पाच-दहा मिनिटांत माझ्या लक्षात आले की, त्यांचे बॅंकेतल्या माणसासोबत वादविवाद सुरू आहेत. हे मालक त्यांच्यावर आणि त्यांच्या अकाऊंटंटवर रागावले होते. कारण बॅंकेने त्यांच्या खात्यातून विनाकारण काही चार्जेस जास्तीचे कट केले होते आणि त्या तशा कराराच्या पेपरवर खुद्द त्या मालकांची बॅंकेने सही घेऊन ठेवली होती. त्यांनी चार-पाच महिन्यांपूर्वी काही कागदांवर सह्या घेतल्या होत्या, त्यात हे लिहिलेले होते, असे बॅंकेचे म्हणणे होते. आता हे दर महिन्याला होत होते आणि त्यामुळे ते लालबुंद होऊन भांडत होते. बॅंकेने शेवटी त्यांना कोणत्या तरी दुसऱ्या प्लानमध्ये ॲडजेस्ट करून तो संपूर्ण चार्ज माफ केला आणि तेव्हा कुठे हे प्रकरण मिटले.

हे सर्व झाल्यानंतर ते मला एकदम सुपरहीरो वाटू लागले. बॅंकेच्या लोकांनाही कोणीतरी गुडघे टेकायला लावू शकतो, त्यांच्या चुका काढू शकतो आणि या अशा पद्धतीने योग्य माहिती असेल, तर आपला फायदा होऊ शकतो, याचा नवाच शोध मला लागला होता.

मी काम झाल्यानंतर त्या साहेबांना - माझ्या बॅंकेच्या कटू अनुभवाबद्दल सांगितले. त्यांनी मला जे पुढे सांगितले ते जास्त महत्त्वाचे होते. ते म्हणाले - आज बॅंकेशी मी भांडलो म्हणून भीतीने किंवा मी संपूर्ण बरोबर आणि ते चूक म्हणून त्यांनी माझे ऐकले नाही, तर माझ्या त्यांच्या बॅंकेतल्या ठेवी, माझ्याकडून होत असलेले आर्थिक व्यवहार व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांना माहीत असलेली माझ्या सहीची ताकद! मी ठरवले तर एका सहीने त्यांच्या बॅंकेतील सर्व व्यवहार दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे ते माझे ऐकत आहेत. नेहमी लक्षात ठेव - तुझ्या सहीची आर्थिक ताकद जेवढी मोठी तेवढी तुझी किंमत मोठी. बॅंकेतली किंवा व्यवहारातली आपली सही अत्यंत महत्त्वाचा ऐवज असतो. आपल्या बुद्धीने, कर्माने आणि चांगल्या मार्गाने त्याची किंमत नेहमी वाढवत न्यायची. कोणत्याही वेळी सही करताना अत्यंत जबाबदारीने करायची. ते आर्थिक व्यवहार असो की अजून कोणतेही कायदेशीर कागदपत्र. एकदा सही केली की त्याला परतीचा मार्ग नसतो. आपली सही म्हणजे गुडविल असते. फसवणुकीच्या बऱ्याच घटना या अशाच होत असतात. प्रत्येक कागद हा वाचल्याशिवाय सही करायचा नाही. दुसरे महत्त्वाचे म्हणजे - ताबडतोप जाऊन बॅंकेचे सर्व व्यवहार शिक. आयुष्यात पुढे जायचे असेल तर बॅंक आणि आर्थिक व्यवहार कळत नसतील, तर प्रगती केवळ अशक्य आहे. केवळ एक शिकला-सवरला मजूर म्हणून या मुंबईत उरशील.

मी त्यांची सर्व वाक्य एखाद्या गुरूमंत्रासारखी जपली. पुढचे कित्येक दिवस याचा बारकाईने अभ्यास केला आणि शिकत गेलो. बॅंकेत अकाऊंट तर ओपन केलेच, शिवाय सर्व व्यवहार बारकाईने शिकायचा प्रयत्न केला व अजूनही करतोय. आपल्याला सर्वांनाच सही करताना नेहमी जबाबदारीचे भान हवे; मग ती सही स्वतःसाठी असो की इतरांसाठी - साक्षीदार, जामीनदार किंवा इतर कोणत्याही कारणाने.

साधारण २००५ च्या दरम्यान एक मराठी सिनेमा आलेला ‘काय द्याचं बोला’. त्यात दोन तरुण मुंबईत मजा करायला येतात आणि काही करायच्या आधीच पोलिसांच्या कृपेने एका गुन्ह्यात अडकतात. पुढे शिकले-सवरले असूनही गुन्ह्याची कबुली असलेल्या कायदेशीर कागदावर, कोणताही विचार न करता, ते कागद न वाचताच सही करतात आणि पुढे बराच त्रास सहन करतात त्यावरील हा सिनेमा! पुढे विनोदी अंगाने गेलेला सिनेमा सर्वांच्या लक्षात राहतो; पण त्यात विचार करण्यासारखा जो सिन आहे त्यात अशा गंभीर प्रकरणातही बरेच लोक सहज सह्या करतात आणि नंतर पश्चात्ताप करण्याशिवाय काहीही पर्याय नसतो, हे लक्षात येतं. चेक वा कागदपत्रांवर सह्या करताना मसुदा, तारीख, तसेच रिकाम्या जागा व्यवस्थित पाहिल्याशिवाय सही करू नये. अपूर्ण किंवा रिकामे फॅार्म्स, इन्शोरंस, होम लोन, क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन किंवा इतर कोणत्याही बॅंकेचे एकगठ्ठा कागद कधीही वाचल्याशिवाय सह्या करूच नयेत.

आर्थिक साक्षरता म्हणजे फक्त पैसे कमवणे, गुंतवणे आणि वाढवणे हेच नव्हे तर जागरूकता, ज्ञान, कौशल्य आणि चिकित्सक वृत्ती कायम ठेवत आपल्या सहीचे गुडविल वाढवणे हेही आहे.

आणि सरते शेवटी - आपल्या खिशाला पेन कोणत्या ब्रॅंडचा किंवा किती किंमतीचा आहे, यापेक्षा त्याचा वापर करून तुम्ही केलेली सही किती मूल्याची आहे याला जास्त महत्त्व असते, हे कायम लक्षात ठेवायचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Byculla Assembly Election: भायखळ्यात कोण मारणार बाजी? दोन शिवसेनेत काटे की टक्कर!

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

SCROLL FOR NEXT