सप्तरंग

माणुसकीची श्रीमंती

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काही माणसं असतात, की ते काहीही अपेक्षा न ठेवता, गाजावाजा न करता आपल्यासाठी खूप काही करतात.

प्रफुल्ल वानखेडे

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काही माणसं असतात, की ते काहीही अपेक्षा न ठेवता, गाजावाजा न करता आपल्यासाठी खूप काही करतात.

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काही माणसं असतात, की ते काहीही अपेक्षा न ठेवता, गाजावाजा न करता आपल्यासाठी खूप काही करतात. आपल्या आयुष्याला कळत-नकळत आकार देतात. अशी माणसं आपल्या आजूबाजूस तयार करा. घराबाहेर पडाल त्या क्षणापासून माणसं जोडत चला. फक्त स्वार्थ ठेवून किंवा उपयुक्तता आहे म्हणून ते संबंध न जपता मनापासून, प्रामाणिकपणे काम करताना दिसेल त्याला शक्य होईल ती मदत नक्की करा. ही माणुसकीची श्रीमंतीच पुढे आपल्याला हवे तेव्हा मानसिक तसेच आर्थिक स्थैर्य देते.

साधारणत: आठ-नऊ वर्षांपूर्वी आम्ही व्यवसाय विस्तार करत असताना मुंबई आणि जवळपासच्या जागांचा शोध घेत होतो. मुंबई, नवी मुंबईसह सर्वच परिसरातील जागेचे दर ऐकून हादरा बसत होता. रिटर्न ॲान इन्व्हेस्टमेंट (आरओआय) यायलाही पाच वर्षांपेक्षा अधिक काळ लागत होता. त्यामुळे तो प्रोजेक्ट रखडतो की काय, याची भीती वाटत होती.

फॅक्टरी, मशिनरी, मनुष्यबळ, इतर पायाभूत सुविधा आणि ‘आपली २४ तास उपलब्धता’ यासाठी हा प्रकल्प मुंबईजवळ पर्यायाने घराजवळ असण्याला आम्ही प्राथमिकता देत होतो; पण मुंबईत हा प्रकल्प होणे शक्यच नाही, या निष्कर्षावर आम्ही पोहचलो. तो बंद करणार अशात आमच्या डोक्यात एक कल्पना आली, की प्रकल्प पुण्यात टाकला तर बराच खर्च कमी होईल.

पुण्याला फॅक्टरी टाकणे तशी परीक्षाच होती. या आधीचे आमचे वर्कशॅाप्स अगदी नजरेसमोर होते. आता कार्यालय एका ठिकाणी आणि प्रत्यक्ष प्रॅाडक्शन सरळसरळ दुसऱ्या शहरात हे नवीनच होते. या क्षेत्रात आम्हाला अनुभव असला, तरी मॅन्युफॅक्चरिंग हे अत्यंत आव्हानात्मक क्षेत्र आहे आणि त्यात जर एखादी चूक झाली, तरी तुम्ही सहज संपून जाऊ शकता, याची जाणीव होती. त्यातली गुंतवणूक, स्वतःची, कुटुंबाची, सहकाऱ्यांची होणारी दगदग आणि इतर मानसिक त्रासाचे तोटे लक्षात घेता तो यशस्वी होईलच, याची मला खात्री नव्हती. तशा एक्सपान्शनचे बरेच फसलेले प्रयोग आम्ही याआधी पाहिले होते. पुणे असो की अन्य ठिकाणी स्थानिक लोकांचा त्रास, मानव संसाधनं तसेच प्रत्यक्ष ठिकाणांमधील प्रवासाचे अंतर यामुळे खूप बंधनं येतात. अगदी आजही हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रशासन आणि सरकार यांनी लक्ष देण्याइतपत महत्त्वाचा मुद्दा आहे.

सगळंच डळमळीत झालेलं आणि जवळपास रद्द होण्याच्या मार्गावर असताना त्या वेळी आमच्या एका अनुभवी स्नेह्यांनी मला न डगमगता पुढे जाण्यास सांगितले. अगदी खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले, ‘‘तुम्ही १०० टक्के यशस्वी होणार, अजिबात अडचण येणार नाही. स्थानिक पातळीवर काहीही लागले, तर मी तुमच्यासोबत आहे.’’ त्यांचा अनुभव आणि दरारा पाहता मला ते नक्कीच आधाराचे आणि उभारी देणारे बोल ठरले. कारण वारंवार स्थानिक लोक, तिथले इश्यूज आणि तयार होणारे प्रश्न बऱ्याच चर्चेतून पुढे यायचे आणि तो एक मोठा डोंगर यांच्या एका वाक्याने गळून पडला होता.

दुसऱ्याच दिवसापासून आम्ही सर्वजण अगदी झपाटल्यासारखे कामाला लागलो. जागानिश्चिती, मशिनरी खरेदी, त्याचे प्लान, सरकारी परवानग्या, कामगारभरती आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात हे सर्व काही पार पडले फक्त दोन महिन्यांत!

यादरम्यान मी स्वत:च पुण्यात सहा ते आठ महिने सलग तळ ठोकून होतो. बऱ्याचदा तर अगदी विकेंडला पण तिकडेच रहायचो. सर्व गोष्टी बारकाईने आणि सर्व सिस्टम आपल्याला हवी तशी तयार केली. जेवढा त्रास होईल, असे वाटले होते त्यापेक्षा कैक पट अधिक झाला. यादरम्यान बरेच कष्ट घ्यायला लागले, चढ-उतार आले; पण शेवटी त्याचे परिणाम सकारात्मकच आले.

या दरम्यान ‘तुम्ही १०० टक्के यशस्वी होणार आणि काहीही लागले तरी मी सोबत असेन,’ हे वाक्य कायम मला स्फूर्ती आणि आत्मविश्वास देत आलेय. मधूनमधून आमचे स्नेही स्वतः फॅक्टरीवर यायचे. पुण्याचा काही मित्रपरिवारही सोबत होताच. त्यामुळे बऱ्याच जणांशी चांगले कौटुंबिक ऋणानुबंध जुळले. ते अगदी आजपर्यंत कायम आहेत.

हा प्रोजेक्ट सुरू होण्यापूर्वी, जेव्हा जेव्हा मी व्यवसाय विस्ताराचा विचार करायचो, तेव्हा मी एखाद्या मोठ्या संकटात उतरत असल्यासारखा थोडासा घाबरलेला असायचो. कोणाचा म्हणावा असा आधार नव्हता किंवा कोणी गॅाडफादरही नव्हते. त्यामुळे एक अनामिक भीती असायची; पण या अनुभवानंतर मात्र संपूर्णपणे झोकून देऊन काम करायला शिकलो. चांगले काम करताना ‘आपले काही लोक नक्की आपल्यामागे आहेत,’ हा आत्मविश्वास त्यातून मिळाला!

बऱ्याचदा आपल्याला कोणीतरी फक्त खांद्यावर हात ठेवून नैतिक आधार द्यायची आवश्यकता असते. अशा काही देवमाणसांची इकोसिस्टीम आपण तयार करत जायला हवी. जे लोक आपल्याला नेहमी चांगले निर्णय घेण्यास प्रवृत्त करतील, लढाईला खरोखर सोबत असतील, ते आपल्या आणि आपण त्यांच्या कुटुंबाचा भाग बनून जातील. प्रत्येकालाच त्याची त्याची एक लढाई असतेच, ती स्वतःलाच लढायची असते; पण हे असे लोक तुमचे अधिकचे बळ ठरतात. खाजगी असो की व्यावसायिक, माझ्या आयुष्यात तरी हे ‘माझे लोक’ म्हणजे माझी खरी immune system आहे. कोणत्याही भीतीपासून माझे रक्षण हेच लोक करतात. खांद्याला खांदा लावून सोबत उभे असतात...

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी काही माणसं असतात, ते काहीही अपेक्षा न ठेवता, गाजावाजा न करता आपल्यासाठी खूप काही करतात. बऱ्याचदा आपल्या आयुष्याला ते कळत-नकळत आकार देतात. अशी माणसं आपल्या आजूबाजूस तयार करा. घराबाहेर पडाल त्या क्षणापासून माणसं जोडत चला. उगीचच द्वेष, मत्सर, जात, धर्म आणि तुलनेच्या खेळात अडकण्यापेक्षा भविष्याचा विचार तसेच करिअर आणि चांगले धडे देणारे मित्रपरिवार जोडत चला. त्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे एकमेकांना मदत करत राहणे. फक्त स्वार्थ ठेवून किंवा उपयुक्तता आहे म्हणून ते संबंध न जपता मनापासून, प्रामाणिकपणे काम करताना दिसेल त्याला आपल्याला जी शक्य होईल, ती मदत नक्की करा.

आपले हे वर्तुळ वाढेल, तसे आपण माणूस म्हणून जास्तीत जास्त श्रीमंत होत जाऊ. ही माणुसकीची श्रीमंतीच पुढे आपल्याला हवे तेव्हा मानसिक तसेच आर्थिक स्थैर्य देते. आयुष्य सुखकर करते, समृद्ध करते.

wankhedeprafulla@gmail.com

(लेखक प्रख्यात केल्विन आणि लिक्विगॅस या औष्णिक ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai School : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी, काय आहे कारण? घ्या जाणून!

Sakal Podcast: जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक ते विम्याचे पैसे लाटण्यासाठी युवक बनले अस्वल

SCROLL FOR NEXT