Nilu Phule Sakal
सप्तरंग

‘प्रेसरूम’मधून बाहेर पडताना...

‘सिंहासन’ कादंबरीवर जब्बार पटेल यांनी त्याच शीर्षकाचा चित्रपट काढला, त्याला आज चार दशकं उलटून गेली आहेत.

प्रकाश अकोलकर akolkar.prakash@gmail.com

‘सिंहासन’ कादंबरीवर जब्बार पटेल यांनी त्याच शीर्षकाचा चित्रपट काढला, त्याला आज चार दशकं उलटून गेली आहेत.

महाराष्ट्रातील राजकारणाचं भविष्यवेधी चित्रण करणाऱ्या ‘सिंहासन’ या कादंबरीत अरुण साधू यांनी उभा केलेला दिगू टिपणीस हा ‘रिपोर्टर’ आज प्रत्यक्षात असता तर तो आजचं राजकारण बघून कादंबरीच्या कथानकाप्रमाणेच कोलमडून पडला असता...की आजची बातमीदारी बघून तो पत्रकारितेतूनच बाहेर पडून ‘पीआर’ मध्ये गेला असता? ...की तो ‘प्रेसरूम’मध्येच बसून ‘स्टेनोग्राफी’ पत्रकारिता करत राहिला असता?

‘सिंहासन’ कादंबरीवर जब्बार पटेल यांनी त्याच शीर्षकाचा चित्रपट काढला, त्याला आज चार दशकं उलटून गेली आहेत. मात्र, एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतरही निळू फुले या मोठ्या ताकदीच्या अभिनेत्यानं उभा केलेला दिगू टिपणीस आजही अनेकांच्या आठवणीत आहे. अर्थात्, साधू यांनी हा ‘रिपोर्टर’ आपल्या कादंबरीत उभा केला तेव्हा आजच्यासारखी बातमीदारीवर बंधनं बिलकूलच नव्हती. काय बातमी द्यायची, कशी द्यायची हे वार्ताहरांना कुणी सांगू शकत नसे. उलट, संपादकांनाच सुनावणारे दिगू टिपणीससारखे वार्ताहर त्या काळात प्रत्यक्षात असत. अर्थात्, त्या काळातही पत्रकारिता धुतल्या तांदळासारखी स्वच्छ वा गंगौघासारखी पवित्र होती, असा दावा कुणी केला तर तो हास्यास्पदच ठरेल. एक मात्र खरं की, याच चार दशकांच्या काळात एकुणातच समाजात जे काही आमूलाग्र बदल झाले, त्याचा परिणाम पत्रकारितेवर आणि राजकारण्यांवरही होणं अपरिहार्य होतं. त्याचाच मोठा फटका जसा राजकारणाचा स्तर खालावण्यात झाला तसाच तो बातमीदारीचं रूपडं आरपार बदलून टाकण्यातही झाला.

तो काळ असा होता की, काही विचक्षण राजकारणी, आज काय निवेदन केलं तर ते ठळकपणे छापून येईल, असं सकाळी सकाळी काही पत्रकारांना विचारत असत. मात्र, गेल्या वर्षभरातच असं दिसू लागलंय की, सकाळीच उठून राजकारणी बोलायला सुरुवात करतात आणि बातमीदार ‘स्टेनोग्राफी’ पद्धतीनं त्यांचं म्हणणं शुद्धलेखनाप्रमाणे लिहून घेऊन मोकळे होताहेत...

तो काळ असा होता की, बातमीदार हे राजकारण, अर्थकारण, क्रीडा, सांस्कृतिक आदी क्षेत्रांतील गैरप्रकार खोदून काढत आणि त्यांच्या बातम्यांवर मग राजकारण्यांना आपला दिवसभराचा अजेंडा ठरवावा लागत असे. आज काय घडतंय बघा. साधं आर्यन खानप्रकरण बघितलं तरी लक्षात येईल की, त्यानंतरची सगळी बातमीदारी ही नवाब मलिक नावाचे एक राजकीय नेतेच करत आहेत आणि वार्ताहर फक्त ‘...अस सांगून मलिक पुढं म्हणाले की...’ या थाटाच्या पत्रकारितेत मश्गूल आहेत. त्यामुळेच, ‘या वर्षीचं ‘बेस्ट इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिझम’चं ॲवार्ड हे नवाब मलिक यांनाच द्यायला हवं,’ असं विधान एक पत्रकारमित्र रोहित चंदावरकर करून मोकळे झाले! हे विधान हसण्यावारी नेण्याजोगं बिलकूलच नाही हे इथं आवर्जून नमूद करायला हवं.

अर्थात्, शोध पत्रकारितेतून बरेचसे बातमीदार बाहेर पडले याचं मूळ त्यांच्यावरील दबावात जस आहे, त्याचबरोबर मार्केट इकॉनॉमीनं समाजाला घातलेल्या विळख्यातही आहे...पत्रकारितेतील काहींना हे सारं चालणारं आहे, तर काहींना ते निराशेच्या गर्तेत ढकलणारं आहे. बरं, एकदा पत्रकारितेत आणि मुख्य म्हणजे त्यातही बातमीदारीत दोन-पाच वर्षं घालवली की त्याला/तिला बाकी कोणताच उद्योग जमेनासा होतो...निदान तो वा ती तसं समजायला तरी लागते. मग तो रिपोर्टर बातमीदारीतून बाहेर पडून ‘पीआर’मध्ये शिरतो. तिथं त्याला पैसेही बरे मिळू लागतात आणि मग एकेक बातमीदार या व्यवसायातून बाहेर जाऊ लागतो.

आपल्या देशात पत्रकारितेवर खऱ्या अर्थानं कठोर बंधनं ही इंदिरा गांधी यांनी सत्तरच्या दशकात लादलेल्या आणीबाणीच्या काळात आली होती. त्या बंधनांना आव्हान देत लिहिणाऱ्या आणि गजाआडही गेलेल्या पत्रकारांची संख्या कमी नव्हती. मात्र, अनेक पत्रकारांनी विविध कारणास्तव लगोलग सरकारधार्जिणं लेखन सुरू केलं होतं. तेव्हा लालकृष्ण अडवानी यांनी ‘व्हेन आस्क्ड् टू बेण्ड, दे स्टार्टेड क्रॉलिंग...’ म्हणजेच ‘यांना जरा वाकायला सांगितलं होतं तर, त्यांनी थेट रांगायलाच सुरुवात केली’ अशा शब्दांत त्या पत्रकारांची संभावना केली होती. आता नव्वदी ओलांडलेल्या अडवानींना, कोणतीही रीतसर बंधनं नसतानाही रांगणारी पत्रकारिता बघून, काय वाटत असेल?

त्यापलीकडची एक बाब म्हणजे, पंतप्रधानांनी पत्रकारांना सामोरं जाणं टाळणं ही आहे. नरेंद्र मोदी यांनी काही मुलाखती जरूर दिल्या आहेत; पण त्या पत्रकारांना नव्हे तर, उठता-बसता सरकारपक्षाची तळी उचलणाऱ्या अक्षयकुमारसारख्या अभिनेत्याला! हा सारा प्रवास काय सांगत आहे? बातमीचं महत्त्व कमी झाल्याची तर ही लक्षणं नाहीत ना? अवघ्या अडीच-तीन दशकांपूर्वी बातमी कळण्यासाठी सकाळच्या वेळी घरात येऊन पडणाऱ्या वर्तमानपत्राची वाट बघावी लागत असे...आता, बातमी घडताक्षणीच तुमच्या हातातल्या स्मार्ट फोनमध्ये न मागता येऊन पडत आहे...बातमीचा हा वेगवान प्रवास अचंबित करणारा जसा आहे, तसाच तो ‘बातमीचं मूल्य कमी कमी होत चाललं आहे काय,’ असा प्रश्न विचारायला लावणाराही आहे.

घराघरात घुसलेल्या टीव्हीच्या शेकडो चॅनेल्सचं रूपांतर पेड चॅनेलमध्ये झालं तेव्हा बातमी देणाऱ्या वाहिन्यांपेक्षा मनोरंजनपर आणि माहितीपर वाहिन्यांसाठी लोक अधिक पैसे मोजायला तयार आहेत असं स्पष्ट झालं. त्यामुळे या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मग अनेक वृत्तवाहिन्यांनी ‘मोफत’ प्रसारण देऊ केलं. याचा अर्थ कसा लावायचा? लोकांना बातमीच नको आहे की काय? की बातम्यांचा दर्जा घसरला आहे असा बोध त्यातून घ्यायचा?

प्रश्न अनेक आहेत आणि त्यांची उत्तरं ‘प्रेसरूम’मध्ये बसून वा ‘प्रेसरूम’च्या बाहेर पडून जनमनाचा कानोसा घेतल्यानंतरही देणं कठीण आहे.

‘सिंहासन’मधला दिगू टिपणीस अशाच अनेक प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडला होता. मात्र, त्याला पडलेले प्रश्न हे पत्रकारितेविषयीचे नसून राजकारणाच्या गुंत्याबद्दलचे होते...तो गुंता सोडवणं त्याच्या भाबड्या मनाला कठीण होत गेलं आणि तो कोलमडून पडला. आज दिगू टिपणीस असता तर त्याला असेच प्रश्न पत्रकारितेला बसलेल्या गाठींबद्दल पडले असते. मात्र, त्यामुळे तो कोलमडला नसता तर उलट अधिक जोमानं पत्रकारिता करत राहिला असता असं आपण म्हणू शकतो काय?

त्यामुळे जुन्या बातम्यांचे, हुकलेल्या बातम्यांचे आणि फसलेल्या बातम्यांचेही संदर्भ नव्यानं जुळवण्याचं काम कधी तरी थांबवायलाच हवं. गरज वर्तमानाकडे अधिक सतर्क होऊन, अधिक दक्ष होऊन बघण्याची आहे. ‘जुने जाउ द्या मरणालागुनी...’ असं केशवसुतांनी लिहून ठेवलंय ते खरंय...त्यांची ही हाक नव्याचा शोध घेण्यासाठी होती...आपणही तेच करायला हवं.

अगदी दिगू टिपणीस आज असता तरी त्यानं हेच केलं असतं...

(हे पाक्षिक सदर आता समाप्त होत आहे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT