Lifestyle 
सप्तरंग

गप्पा ‘पोष्टी’ : ‘ हेल्दी लाइफस्टाइल’चा झटका!

पावसाळा संपून थंडीच्या दिवसांची चाहूल लागायला लागली की मला ‘हे.ला.’चा जोरदार झटका येतो. ‘हे.ला.’ म्हणजे हेल्दी लाइफस्टाइल!

प्रसाद शिरगावकर

पावसाळा संपून थंडीच्या दिवसांची चाहूल लागायला लागली की मला ‘हे.ला.’चा जोरदार झटका येतो. ‘हे.ला.’ म्हणजे हेल्दी लाइफस्टाइल!

मस्त थंडी पडायला लागलेली असते. थोडं थोडं उशिरा उजाडायला लागलेलं असतं. सकाळी सकाळी पांघरुणात मस्त गुरफटून झोपावंसं वाटायला लागलेलं असतं. अशावेळी, सकाळी सहा-साडेसहाला उठायचं. बाहेर अंधार असताना, थोडंसं धुकं वगैरे असताना घराबाहेर पडायचं. गेल्यावर्षीच घेतलेली तशी नवीकोरी ट्रॅकपॅंट कंबरेला घट्ट होते म्हणून, नुकतीच दोन साईज पुढची आणलेली ट्रॅकपॅंट घालायची. त्याचबरोबर कितीही मोठ्या साईजचा आणला तरी पोटापाशी वर्तुळाकार फुगणारा नवा एक्सरसाईज स्पेशल टीशर्टही घालायचा. डोक्यावरच्या तुरळक केसांमधून झाकणारं टक्कल लपवायला कानटोपी घालायची का ‘कानटोपी घातल्यावर तू अगदी पेन्शनर दिसतोस,’ अशी बायकोनं केलेली कमेंट आठवून ती घरीच ठेवायची (‘ती’ म्हणजे कानटोपी) हे आयत्यावेळी ठरवायचं! कपाटातल्या मोज्यांच्या ढिगातून एकसारखे दिसणारे दोन मोजे शोधून घ्यायचे. तीन वर्षांपूर्वी घेतलेले पण फारसे न वापरल्याने नव्यासारखेच वाटणारे वॉकिंग शूज घालून आवरून सज्ज व्हायचं.

हा सगळा जामानिमा करून, घराबाहेर पडून, गुलाबी वगैरे थंडीत, मूड वगैरे नुसार, वीस मिनिटांपासून एक तासापर्यंत चालायचं, मधूनच पळायचं, मग पळणं जमत नाही म्हणून पुन्हा चालायचं वगैरे. हाश्शहुश्श करत परत येताना टपरीवरच्या चहाचा मोह टाळायचा. घरी येऊन आलं घातलेला, कमी दुधाचा, बिनसाखरेचा चहाची पावडर घातलेला काढा चव घेत घेत प्यायचा. ‘हे.ला.’चा खूपच जोराचा झटका असेल तर ब्रेकफास्टला फक्त ओट्स. मग दिवसभरातले चार-सहा चहा बंद. काही प्यावंसं वाटलंच तर फक्त ग्रीन टी. अधल्या मधल्या भुकेच्यावेळी अबर-चबर खाणं बंद. भूक लागलीच तर ताजी सफरचंदं. त्याच बरोबर, पावसाळ्यात कधी पाऊस पडला म्हणून, तर कधी पडला नाही म्हणून हाणले गेलेले तामसी भजी-वडे बंद. बंद म्हणजे बंदच. जेवणातही पालेभाजी-भाकरी, ताजी सॅलड्स-कोशिंबिरी असलं एकदम सात्त्विक जेवण.

संध्याकाळी पुन्हा एकदा योगा, प्राणायाम, ध्यान वगैरे. मग पहाटे लवकर उठायचं म्हणून रात्री लवकर झोपायचं वगैरे. थंडीनिमित्त मला ‘हेलाचा असा झटका येतो आणि महिन्याभरात शरीर फिट, मन सुपरफिट होतं. आय मीन, असं सगळं डोळ्यांसमोर दिसायला लागतं!

तर होतं असं की, ‘हे.ला.’चा झटका आला की काय होणार हे सगळं अगदी झोपेतही मनःचक्षूंना स्पष्ट दिसत असतं. पण मग, तीनदा स्नूझ केलेला मोबाईलचा अलार्म पुन्हा एकदा वाजल्यावर बंद केला जातो! तोवर घड्याळात आठ वाजून गेलेले असतात. आणि मग, उबदार दुलईतून बाहेर पडणं जिवावर आलं असतानाच, माझं ‘हे.ला.’चं स्वप्न, दर थंडीप्रमाणे, यंदाही पुन्हा एकदा भंग पावतं!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

Latest Maharashtra News Updates live : संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिक्षेत्रात पोलिसांना सापडले ५ कोटी रोख

Gold Price: सोने 6,000 आणि चांदी 12,000 रुपयांनी स्वस्त; ट्रम्प यांच्या विजयानंतर सोनं स्वस्त का होत आहे?

SCROLL FOR NEXT