pratap pawar travel gangapur camp shiv mandir couple food life sakal
सप्तरंग

पिलानीतील काही वेगळे अनुभव

या कॅम्पमध्ये निषेध म्हणून, आठ-बारा दिवस आम्ही कुणीही दाढी करायची नाही, असं ठरवलं होतं

प्रताप पवार

आमचा कॅम्प एके वर्षी गंगापूर जिल्ह्यातील एका खेड्यात ठेवायचा असं आमच्या प्राध्यापकांनी आणि संयोजकांनी ठरवलं. आमच्या विरोधाला काही किंमत नव्हती, त्यामुळे अगदी नाखुषीनं आम्ही तिथं गेलो. राजस्थान कॅनॉलचं बरंचसं काम नुकतंच पूर्ण होऊन त्यात पाणी यायला लागलं होतं, हे एक आकर्षण होतंच.

आम्हाला रविवारी पूर्ण सुटी होती. आता वेळ कसा घालवायचा असा विचार करत, आसपास काही पाहण्याजोगं आहे का, याचा आम्ही शोध घेतला. जवळच्याच एका छोट्याशा डोंगरावर गरम पाण्याचे झरे आहेत, असं समजलं.

मग काय, सकाळी व्यवस्थित नाश्ता करून आम्ही चार-पाच मित्र निघालो. त्या डोंगरावर तासाभरात पोहोचल्यावर समजलं की, इथं नाही तर पुढच्या डोंगरावर झरे आहेत. थोडी झाडीपण दिसत होती.

आता इथपर्यंत आलोच आहोत तर पुढंही जाऊ, असा विचार आम्ही केला. पुढच्या डोंगरावर पोहोचेपर्यंत दुपारचे बारा-साडेबारा वाजले होते. जागा छान होती. तिथं एक छोटंसं, टुमदार शिवमंदिरही होतं; परंतु वस्ती नव्हती. फक्त वयस्कर पुजारी आणि त्यांची पत्नी. भूक लागल्यानं आम्ही विचारलं : ‘‘काही खायला मिळू शकेल का?’’

पुजारी म्हणाले : ‘‘अर्थातच. अर्धा-एक तास थांबा, आम्ही स्वयंपाक करतो.’’

आम्ही गप्पा मारत होतो तोपर्यंत पुजारीणबाईंनी जात्यावर दळण दळायला सुरुवात केली. पुजारी त्यांना सर्व मदत करत होतेच.

त्या दोघांनी अतिशय प्रेमानं, आग्रहपूर्वक आम्हा सर्वांना जेवायला घातलं. लागलेली भूक आणि त्यांचं आतिथ्य यामुळे जेवण अतिशय रुचकर लागलं. जेवण झाल्यावर मुलांनी खिशात हात घालून पैसे काढले. त्यामागचं कारण मला अर्थातच समजलं.

मी म्हटलं : ‘‘हे उभयता आपल्याकडून पैसे घेणार नाहीत.’’

आमचे दिल्ली, कोलकता आदी ठिकाणचे शहरी मित्र म्हणाले : ‘‘तुला काय माहीत? आम्ही पैसे देणारच.’’

मी म्हटलं : ‘‘जरूर प्रयत्न करा.’’

पैसे देऊ केल्यावर पुजारी म्हणाले : ‘‘आपण आपल्या मुलांकडून पैसे घेतो का? मग मी तुमच्याकडून कसे पैसे घेऊ?’’ मित्र निरुत्तर झाले.

मी काटेवाडी-बारामतीचा असल्यानं मी खेडं आणि शहर यांतील मनोवृत्ती जाणून होतो. पुजाऱ्यांनी पैसे नाकारल्यावर मला मित्रांनी विचारलं, ‘‘यार, आता काय करायचं?’’

मी म्हटलं : ‘‘समोरचं मंदिर या पुजाऱ्यांचं असल्याविषयीची खात्री करून घेऊ आणि आपले पैसे देवापुढं ठेवू. ते पुजाऱ्यांना मिळतील.’’

मित्रांनी विचारलं : ‘‘तुला काय माहीत?’’

मी म्हटले : ‘‘पुजाऱ्यांना विचारा.’’

पुजाऱ्यांना मी विचारलं. तसं करायला त्यांनी होकार दिला. हा माझ्या शहरी मित्रांना दुसरा सुखद धक्का होता. अतिथी देवो भव...असं खेड्यांमध्ये निश्चितपणे अनुभवास येतं; परंतु माझ्या मित्रांनी ते कुठं अनुभवलं होतं!

त्याच गावात आम्ही विद्यार्थी संध्याकाळी चालत आमच्या कॅम्पकडे येत होतो. मी थोडा भरभर चालतो, त्यामुळे बराच पुढं होतो.

या कॅम्पमध्ये निषेध म्हणून, आठ-बारा दिवस आम्ही कुणीही दाढी करायची नाही, असं ठरवलं होतं. पिलानीला पोहोचल्यावर माझा जवळचा मित्र माझ्याकडे पाहून म्हणाला : ‘‘तू दाढी कर; परंतु मिश्या कापू नकोस.’’

मी विचारलं : ‘‘का?’’

तो उत्तरला : ‘‘तुझं नाक आणि ओठ यांच्यात अंतर आहे. त्यामुळे तुझ्या चेहऱ्याला मिश्या शोभून दिसतील!’’ त्याची ही प्रेमळ सूचना मी आजतागायत पाळली आहे! मी कसा दिसतो याचा फारसा विचारही यापूर्वी मनात आलेला नव्हता.

पिलानीत पहिली दोन-तीन वर्षं ‘एनसीसी’ ही आवश्यक बाब होती. आमचे कॅम्प वेगवेगळ्या शहरांत होत असत. शेवटच्या वर्षी - म्हणजे ‘एनसीसी’च्या - आमचा कॅम्प आग्रा इथं ठरला. आम्हाला अर्थातच आनंद झाला.

ताजमहालाचं आकर्षण होतंच. विद्यार्थ्यांशी नातं कसं जोडायचं हे आमचे प्राध्यापक डॉ. महेश्वरी सरांना चांगलं माहीत होतं; परंतु त्याचबरोबर ते कडक शिस्तीचेही होते. सैनिकांच्या कुटुंबांना राहण्यासाठीची चाळवजा घरं

आमच्या कॅम्पभोवती सर्व बाजूंना होती. त्यामुळे, आम्ही कुणीही बेशिस्त वागता कामा नये, पिलानीचं नाव खराब होता कामा नये अशी सक्त ताकीद आम्हाला दिली गेली होती. महेश्वरी सरांनी पौर्णिमेची रात्र पाहून आमचा

‘नाईट-मार्च’ ताजमहालवर ठेवला. आम्ही सर्व एकदम खूश. पौर्णिमेच्या रात्री ताजमहाल पाहणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता. त्यामुळे पाच मैल परेड करत जाणं आणि येणं हे मोठं अंतरही आम्हाला जाणवलं नाही. शेवटच्या दिवशी परेडची स्पर्धा होती. आमच्याबरोबर इतर कॉलेजचे विद्यार्थीही होते.

‘माझा प्रत्येक विद्यार्थी सर्वार्थानं उठून दिसला पाहिजे. अगदी बुटापासून डोक्यावरच्या कॅपपर्यंत...’, अशी अपेक्षा महेश्वरी सरांनी व्यक्त केली. आम्ही सर्वांनी तीन-चार तास बूटपॉलिश करण्यात, कपड्यांना इस्त्री करण्यात घालवले.

महेश्वरी सरांचा शब्द खाली पडू देणं आम्हाला शक्यच नव्हतं. पालकाची शिस्त आणि ममता महेश्वरी सरांमध्ये होती. त्यांच्या इच्छा, सूचना आम्हाला साहजिकच शिरोधार्य असत.

अशा कॅम्प्समधून खूप शिकायला मिळतं. प्रत्येक जण वेगळ्या स्वभावाचा, पार्श्वभूमीचा असतो. या सर्वांना एका विचाराच्या कक्षेत आणणं, त्यांच्यात सांघिक शिस्त, अभिमान निर्माण करणं हे एक शास्त्रच आहे.

तुमच्या हृदयाला जेव्हा ते भिडतं तेव्हा कुण्या मुकादमाची गरज पडत नाही. संस्था उभ्या करताना, चालवताना आपणही या विचारांतून वागण्याचा प्रयत्न केल्यास सांघिक यश मिळतं. शेवटी यशही सर्वांचं असतं आणि अपयशही!

आधी सांगितल्यानुसार, राजस्थान कॅनॉल हा राजस्थानच्या दृष्टीनं गंगेइतकाच महत्त्वाचा होता. अनेक वर्षांच्या खटपटीनंतर त्याची पूर्तता झाली होती. सुटीच्या दिवशी आम्ही काही मित्रांनी त्यात पोहायचं ठरवलं.

माझं लहानपण बारामतीच्या कॅनॉलमध्ये पोहण्यात गेलं. आम्हाला त्या गढूळ पाण्यामुळे तेव्हा त्वचेचे आजार कसे झाले नाहीत याचं आजही आश्चर्य वाटतं. तुम्हाला हसू येईल; परंतु कॅनॉलमध्ये आमच्याबरोबर पोहणाऱ्या म्हशींवर बसून मैलभर प्रवास करणं ही आमच्या दृष्टीनं चैनीची गोष्ट असे!

याच पार्श्वभूमीवर राजस्थान कॅनॉलमध्ये पोहण्यास मी उत्सुक होतो. सकाळचे अकरा-साडेअकरा वाजलेले होते. कडक ऊन्ह होतं. कॅनॉल म्हणजे मोठ्या नदीच्या पात्रासारखा होता. आमच्या बारामतीचा कॅनॉल याच्यापुढे अगदी छोटा होता.

पाण्यात उतरल्यावर ध्यानात आलं की, पाणी हरिद्वारच्या गंगेच्या पाण्याप्रमाणे अगदी थंडगार आहे. कॅनॉलच्या दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत जाऊन परत यायचं असं आम्ही ठरवलं होतं. निम्म्या-अर्ध्या भागात जाईपर्यंत एक-दोन मित्रांची दमछाक होते आहे, असं ध्यानात आलं आणि आम्ही परत फिरलो. काठावर आलो...

आणि तसेच कॅम्पकडे चालू लागलो. सुमारे अर्धा किलोमीटर चालल्यानंतर ध्यानात आलं की, आपण कपडे विसरून आलो आहोत. त्या बर्फासारख्या पाण्यानं आमची विचारशक्तीच नाहीशी झाली होती. हा वेगळाच अनुभव होता. चालण्यामुळे अंगात आलेली ऊब आणि लागलेली भूक यामुळे आम्ही जागेवर आलो होतो.

दोन्ही कॅनॉलमधील तुलना माझ्या मनात कायमची कोरली गेली. चाकोरीबाहेर जा, काहीतरी शिकायला मिळतं. संरक्षण काढून घ्या, लढायला शिकावं लागतं. आमच्या आई-वडिलांप्रमाणे मुलांवर प्रेम करा; परंतु फाजील लाड करू नका. ते मुलांच्याच हिताचं ठरतं. आमचं तरी हित यामुळे नक्कीच झालं. पाहा, पटतंय का...

पाठीमागून आवाज आला. मारवाडी भाषेत विचारलं गेलं : ‘‘ए पोरा, कुठं चालला आहेस?’’ मी मागं वळून पाहिलं तर, एक बंदूकधारी जाट उंटावर बसलेला होता. प्रफुल्लित, रसरशीत चेहरा, उत्तम शरीरयष्टी, भरदार दाढी-मिश्या, डोक्याला मुंडासं. मी उत्तरलो : ‘‘इथं जवळच आमच्या कॅम्पकडे चाललो आहे.’’

त्यानं उंटाला खाली बसवलं आणि म्हणाला : ‘‘बैस, मी सोडतो तुला तिकडे.’’ ‘नाही’ म्हणायचा प्रश्न उद्‍भवत नव्हता. त्यानं गुळाचा खडा माझ्या हातावर ठेवला आणि म्हणाला : ‘‘हे खा.’’ याचा अर्थ मी तुझ्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे. आता मला काळजी करायचं कारण नव्हतं. आपल्याला स्थानिक चालीरीती माहीत असल्यास जीवन सुकर होतं एवढंच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Assembly Election 2024 Result : साडेपाच हजार मतदारांनी वापरला ‘नोटा’; 3 मतदारसंघांत 106 जणांची पोस्टलमधून नकारघंटा

Kung Fu Pandya! हार्दिक पांड्याचा ट्वेंटी-२०त भीमपराक्रम; असा विक्रम करणारा पहिला भारतीय

Nashik Assembly Election 2024 Result : बंडखोर, मातब्बर अपक्षांना मतदारांनी नाकारले

Viral Video : आत्तेभावाच्या साखरपुड्याच्या पडता पडता वाचली करिष्मा ; पापाराझींना म्हणाली "वो मत डालना"

Kagawad Accident : लग्नासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; कार अपघातात दांपत्य ठार, दोन मुलं कोसळली नाल्यात

SCROLL FOR NEXT