सप्तरंग

कौरव...पांडव आणि सदसद्विवेक...!

आपल्या आयुष्यात काही वेळा अशा काही घटना घडतात की, त्या किंवा त्यांचा परिणाम आपण आयुष्यभर विसरत नाही. हे फक्त घटनांपुरतंच मर्यादित नसतं.

प्रताप पवार

आपल्या आयुष्यात काही वेळा अशा काही घटना घडतात की, त्या किंवा त्यांचा परिणाम आपण आयुष्यभर विसरत नाही. हे फक्त घटनांपुरतंच मर्यादित नसतं. काही व्यक्ती, तसंच काही पुस्तकं किंवा वाचन या बाबीही आपल्या आयुष्यावर एक कायमचा ठसा उमटवून जात असतात. अर्थात्, मला त्या गोष्टीतून काय नवीन शिकायला मिळालं, काय बोध झाला त्याबद्दल हे आहे, त्याच्याशी तुम्ही सहमत व्हाल असं नाही. ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा, इतकंच सुचवायचं आहे.

मी भगवद्गीता म्हटलं तर शिकलो आहे...तिचे पहिले दोन अध्याय आमच्या दामले गुरुजींमुळे पाठही होते. आजही पहिले काही श्लोक पाठ आहेत. शवासनाच्या वेळी मी ज्या प्रार्थना करतो किंवा श्लोक म्हणतो (अगदी गायत्री मंत्रापासून) त्यांत पहिल्या अध्यायातले काही श्लोकही असतात. ते का असतात त्याचं मी विश्लेषण करणारच आहे.

भगवद्गीता, ज्ञानेश्वरी यांची सरळ भाषांतरं वाचून मला फारसा बोध झाला नाही. काही मर्यादित ज्ञान जरूर मिळालं.

उदाहरणार्थ :

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि।।

अर्थ सरळ आहे : ‘तू कर्तव्य, कार्य करत राहा; परंतु कोणत्याही फळाची अपेक्षा न करता. फळ मिळायचं तेव्हा मिळेल; परंतु केव्हा, किती याच्याबद्दल आपण विचार करायचा नाही. मात्र, तू सातत्यानं प्रयत्न करत राहा...’ श्रीकृष्ण पुढं सांगतात - आपल्या भाषेत - ‘त्यामुळे तुम्ही थांबताही कामा नये.’ म्हणजे, बीजाची (कामाची) पेरणी करत राहायचं, हे आपल्याला समजतं. भगवद्गीतेत वारंवार अध्यात्म आणि कर्तव्ये, व्यवहार यांचा समन्वय साधण्याचा उपदेश केला गेला आहे. त्यांच्या भाषेत - पैसा, संसार वगैरे सर्व करायचं आहे; परंतु त्यात अडकून न राहता. काही मौलिक तत्त्वं सांगितली गेली आहेत, जी मला पटली किंवा आवडली किंवा समजली.

उदाहरणार्थ : धृतराष्ट्र हा अंध आहे; परंतु तो पुत्रप्रेमानं अंध झालेला आहे. त्याला दुर्योधनाचे दोष दिसतच नाहीत. गांधारी (माता) हिनं डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. म्हणजे, ‘मी काही पाहिलं नाही,’ असं म्हणायला ती मोकळी होते.

आई-बाप अशा पुत्रप्रेमापोटी अंध होतात किंवा डोळ्यांवर पट्टी बांधून घेतात तेव्हा ‘दुर्योधन’ निर्माण होतो. जेव्हा त्याला आडकाठी करणारे, समजावून सांगणारे आई-वडीलही नाहीत; मग तो दुसऱ्या कुणाचं आणि का ऐकेल! भले मग, ते सांगणारे श्रीकृष्ण का असेनात.

अशा व्यक्ती सर्वोच्च सत्तास्थानी बसतात तेव्हा भीष्म, द्रोणाचार्य यांच्यासारखी द्वयी मूग गिळून बसते! तुम्हाला अनेक घरं अशी आढळतील की, जिथं उशिरा किंवा तीन-चार मुलींनंतर पुत्र जन्मला तर त्याचे इतके लाड होतात, कौतुक होतं की तो आपली सर्व कर्तव्ये विसरतो. अत्यंत आत्मकेंद्रित होतो. बहिणींबद्दल बाजूला ठेवू; पण त्याला आपल्या आई-वडिलांबद्दलही प्रेम, कृतज्ञता नसते. हा वृत्तीनं दुर्योधनच असतो.

मला आणखी एक महत्त्वाचं वाटलं...योगी परमानंद परमहंस यांचं पुस्तक वाचल्यावर मला ते उमगलं. म्हणजे असं की - आपण वाचतो, कुरुक्षेत्रावर धर्मयुद्ध सुरू होणार आहे किंवा सुरू झालं आहे...हे कशाचं युद्ध आहे? तर, पांडव म्हणजे गुण आणि कौरव म्हणजे दुर्गुण. प्रत्येकाच्या स्वभावात हे दोन्ही असतात. प्रश्न असा आहे की, तुम्ही कुणाला महत्त्व, प्राधान्य देता.

उदाहरणार्थ : तुम्ही सामाजिक, शैक्षणिक काम करता आहात; परंतु पैसे उकळता. ज्या व्यक्तींना पर्याय नसतो; त्यांचा तुम्ही गैरफायदा घेता. तुमच्यातली हाव, लोभ, स्वार्थ हे ‘कौरवपुत्र’ बळकट आहेत आणि ते समाजाचं, व्यक्तींचं भलं करणाऱ्यांकडून मोबदला मोजून घेतात. असं रोजच्या आयुष्यात घडत असतं. दुर्गुण, वासना वगैरे शंभर आहेत (कौरव). गुण मात्र मर्यादित आहेत (पांडव).

तुमचं व्यक्तिमत्त्व या दोघांच्या प्रभावावर ठरतं. आपल्यात हे दोन्ही असतात. त्यातलं प्राबल्य कुणाचं हा प्रश्न असतो. यावर मात करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करत राहावे लागतात. त्यामुळे श्रीकृष्णांनी सांगितलं आहे - ‘तुम्ही संसार करणं, कर्तव्य बजावणं, पैसा, सत्ता मिळवणं यात वावगं काही नाही.’ मात्र, त्यामागचा तुमचा हेतू चांगला आहे की स्वार्थी आहे...यातून तुम्ही परमार्थ साधता आहात की केवळ पैसा, चैन, उपभोग, अन्याय वगैरेंसाठी ‘कौरवां’चा वापर करता आहात, या बाबी महत्त्वाच्या ठरतात.

व्यवहार आणि अध्यात्म यांचा समन्वय ठेवा. आयुष्य सुखी होईल. मोह, निःस्वार्थी सेवा वगैरे गोष्टी आपल्याला रोजच्या आयुष्यात दिसतात. तुम्ही निर्णय घेता म्हणजे तुमची सदसद्विवेकबुद्धी किती जागरूक किंवा दक्ष आहे यावर तुमचे निर्णय ठरतात. ती सदसद्विवेकबुद्धी बुद्धी म्हणजे ‘श्रीकृष्ण’! ते आपल्याला सांगत असतात; परंतु त्यांचं ऐकायचं की नाही हे आपण ठरवायचं असतं.

आपण काही कारणानं ‘अंध’ झालो (उदाहरणार्थ : व्यक्ती, जात, धर्म आदींचा द्वेष) किंवा आपण याबाबतीत डोळ्यांवर पट्टी बांधून घेतली तर सदसद्विवेकबुद्धीवर खूप मर्यादा पडतात. तुमचं व्यक्तिमत्त्व त्यावर ठरतं. अनेक लोकप्रतिनिधी वक्तृत्वशैलीच्या जिवावर तुमच्यातल्या भावना भडकावतात. तुमच्यातल्या ‘कौरवां’ना जागं केलं जातं.

मध्यंतरी एका गोष्टीचा मी उल्लेख केला होता, तीबाबत पुन्हा लिहावंसं वाटतं. शिक्षण म्हणजे ‘हिटलरनं साठ लाख ज्यू लोकांना हाल करून मारलं’ असा इतिहास वाचणं नव्हे, तर शिक्षण म्हणजे, लाखो साध्या-सरळ असलेल्या जर्मन लोकांना हिटलरनं उद्युक्त कसं केलं याचा ऊहापोह आणि त्यातून धडा घेणं.

परत अशी परिस्थिती होण्याची शक्यता दिसू लागल्यावर तिचा प्रतिकार करा. तुमच्यातले सुप्त ‘कौरव’ अशा नेतृत्वाला बळी पडणार नाहीत असं पाहा. तुमच्यातले ‘पांडव’ जागरूक ठेवा. तुम्ही वाहवत जाणार नाही, याची काळजी तुमच्या सदसद्विवेकबुद्धीला घेऊ देत.

‘अध्यात्म आणि व्यवहार यांचा समन्वय साधा,’ असं आपण म्हणतो, त्याबद्दलच मी काही चर्चात्मक वाचनातून शिकलो. मला त्याचा उपयोग झाला आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आपण म्हणतो, ‘ही माझी गाडी आहे,’ ‘हे माझं घड्याळ आहे,’ ‘हा माझा शर्ट आहे,’ परंतु म्हणजे, ‘ते तुम्ही का?’ तर नाही. या वस्तू म्हणजे तुम्ही नव्हे!

तुम्ही गाडीची काळजी घेता...मळलेले, वापरलेले कपडे पुन्हा धुऊन इस्त्री करून वापरता; परंतु त्या गोष्टी कायमच्या नाहीत. याच्या पुढं जाऊन असं सांगितलं गेलं आहे की, तुमचे केस कापले तरी काही बिघडत नाही. मग ते केस तुम्ही असता का? तर नाही.

एखाद्या वेळी अपघातानं तुमचा पाय कापायची वेळ आली तरी, तुम्ही जिवंत असतात ना! म्हणजे तुमचा पाय म्हणजे तुम्ही नव्हे. हे सर्व एवढ्यासाठीच सांगतोय; कारण थोडक्यात, जे माझं आहे, तो मी नाही. मग माझ्या शरीराचं काय? स्पष्ट आहे की, माझं शरीर म्हणजे मी नव्हे! हे शरीर मी किंवा प्रत्येक जण त्यागणार आहे. जन्म आणि मृत्यू अटळ आहे.

गाडी वा शर्ट जुना झाल्यावर आपण बदलतो किंवा नवीन घेतो; परंतु मालक आपणच असतो. धर्मात असं सांगितलं आहे की, मृत्यूनंतर मनुष्य नवीन शरीर धारण करतो, म्हणजे आताच्या भाषेत, कपडे बदलतो. मात्र, मालक म्हणजे आत्मा, तो आपणच असतो ना.

मग जे माझं नाही त्याचा किती आणि का मोह ठेवायचा? शरीराच्या निमित्तानं सध्या जे सोबत आहे, बरोबर आहे किंवा जे मालकीचं आहे; तेही शरीर एकदा गेलं की ते माझं असणार नाही. हे जर एवढं स्पष्ट आहे तर मग, शरीराबरोबर जगताना या ‘कुरुक्षेत्रा’त ‘पांडवां’ना जिंकू द्यायचं की ‘कौरवां’ना, हे आपण ठरवायचं आहे.

शरीरसुद्धा माझं नाही हे समजल्यावर मोह, मत्सर, राग, द्वेष, लबाडी का करायची? कारण, त्यामुळे जे मिळणार आहे ते आपला देह ठेवल्यावर आपलं असणार नाही. कर्तव्य करा. युद्ध लढा. उत्तम जगा...मात्र, निरपेक्षपणे. रात्री झोपताना याचं स्मरण करून शांतपणे झोपा. उद्या पुन्हा लढायला तयार व्हा!

भगवद्गीतेवर एका लेखात परीक्षण करणं अशक्य आहे; परंतु व्यावहारिक दृष्टिकोनातून जे सहज समजेल, पटेल असं लिहिण्याचा हा प्रयत्न आहे. कर्म करत राहा, म्हणजे पाट्या टाकत राहा असं नाही. पूर्ण शक्तीनं, भक्तीनं, निरपेक्षपणे झोकून द्या. जणू तुम्ही परमेश्वराची भक्ती करत आहात; जी केल्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो. एखादी कलाकृती ही अनेक पिढ्यांच्या अनुभवांतून आलेली असते.

भगवद्गीता हेसुद्धा चार वेद, १०२ उपनिषदं, हिंदू धर्माची सहा तत्त्वज्ञाने यांचं सार आहे. म्हणजेच, भारताचा व्यवहार आणि तत्त्वज्ञान यांतून, त्यातल्या पिढ्यान्‌पिढ्यांच्या अनुभवांतून अध्यात्माकडे वळलेल्यांचा हा परिपाक आहे. मी सांगतोय ते सर्व तत्त्वज्ञान तुम्हाला अवघड, बोजड तर वाटत नाही ना? मला खरंच शांत झोप येते.

कारण, झोपताना मी या सर्व गोष्टींपासून दूर होतो. मग शांत झोप का येणार नाही? आंतरराष्ट्रीय प्रवास करताना मी भारत विसरतो, मस्तपैकी विश्रांती घेतो. आपोआपच थकवा जातो. विमानातून उतरल्यावर कामाला सज्ज असतो. मित्रांना आश्चर्य वाटतं. मी हे वरदान मिळवू शकलो आहे. तुम्हीही प्रयत्न करा, सवयीनं तुम्हालाही मिळेल!

‘अनुभवें आले’ या सदरामधला हा अखेरचा लेख. या सदराला आपण व्हॉटस्ॲप मेसेजद्वारे, ई-मेलद्वारे, प्रत्यक्ष भेटीत खूप भरभरून, उत्साहवर्धक प्रतिसाद दिलात, याबद्दल मनापासून आभार व्यक्त करून आता आपला निरोप घेतो...! नूतन वर्षाच्या आपणां सर्वांना याच विचारांतून मनःपूर्वक शुभेच्छा..!!

या सदरामधल्या लेखांचं पुस्तक ता. २६ जानेवारी २०२४ रोजी प्रकाशित होईल. सवलतीत नोंदणीसाठी इच्छुकांनी ‘सकाळ’ कार्यालयाशी आणि महाराष्ट्रातल्या प्रमुख विक्रेत्यांशी संपर्क साधावा.

(हे साप्ताहिक सदर आता समाप्त होत आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT