विविध उपक्रमांबरोबरच वाचक, समाजाच्या सहभागाच्या आणि समन्वयाच्या भूमिकेतून ‘सकाळ’ची वाटचाल होत राहिली आहे. परिणामी, समाजाचे आणि वाचकांचे बळ ‘सकाळ’सोबत राहिले आहे.
विविध उपक्रमांबरोबरच वाचक, समाजाच्या सहभागाच्या आणि समन्वयाच्या भूमिकेतून ‘सकाळ’ची वाटचाल होत राहिली आहे. परिणामी, समाजाचे आणि वाचकांचे बळ ‘सकाळ’सोबत राहिले आहे. याच बळावर भविष्याची आव्हाने पेलण्यासही ‘सकाळ’ सक्षमपणे उभा आहे.
नव्वदच्या दशकात इंडियन न्यूजपेपर्स सोसायटी आणि वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्यूजपेपर्स अँड न्यूज पब्लिशर्स संघटना, ज्या आता ‘वॅन-इफ्रा’ नावाने ओळखल्या जातात, या संघटनांच्या संपर्कात मी आलो. इंडियन न्यूजपेपर्स सोसायटीमुळे देशभरातील वर्तमानपत्रे कशाप्रकारे काम करतात, त्यांचा आवाका किती आहे, याचा अंदाज यायला लागला. काही वर्तमानपत्रे आपल्या प्रांतात सबळ होती, परंतु परप्रांतात जाऊन व्यवसायवृद्धी करावी, अशी जाणीव त्यांच्यात निर्माण होत होती. स्थानिक पातळीवर मूळ स्थान असलेल्या ‘सकाळ’ने पुण्याबाहेर जाऊन या काळात विस्तार करायला सुरुवात केली. ‘सकाळ’ने याची सुरुवात कोल्हापूरपासून केली. परंतु त्याची गती कमी होती.
प्रयोगशीलतेचा कालखंड
नव्वदच्या दशकात जागतिक पातळीवर नवीन प्रयोगशीलतेला प्रारंभ झाला होता. प्रयोगशीलतेची, बदलांची चर्चा जागतिक पातळीवरील परिषदांमध्ये होत होती. उदा. वर्तमानपत्र आताची बातमी देणारे पाहिजे, मला पाहिजे त्या विषयाची माहिती हवी तेव्हा आणि हवी तशी मिळावी, अशी वाचकांची अपेक्षा परिषदांमध्ये व्यक्त होत होती. गेल्या तीन दशकांत यामध्ये आमूलाग्र बदल झाला. आताच्या डिजिटल युगात स्मार्ट फोनच्या माध्यमातून माहिती जगभर उपलब्ध होत आहे. परंतु नव्वदच्या दशकाच्या प्रारंभी हे थोडेसे स्वप्नवत होते. ‘मेट्रो़’सारखे वर्तमानपत्र नव्वदच्या दशकाच्या मध्यावर प्रयोग म्हणून सुरू झाले, ज्याची किंमत शून्य रुपये होती. मात्र ते तीन ते चार वर्षांत ते आर्थिकदृष्ट्या यशस्वी झाले. माझ्या दृष्टीने हे वादळ होते. साधारणपणे दरवर्षी थोडी किंमत वाढवावी हा तेव्हापर्यंत एक मान्य केलेला मार्ग होता. तो मार्ग आता बंद करणे आवश्यक ठरेल, हे माझ्या लक्षात आले. तीच पद्धत कायम राहिली असती, तर आज सर्व भारतीय वृत्तपत्रांची किंमत १० ते १५ रुपयांपेक्षा अधिक झाली असती. मात्र, नव्वदच्या दशकातील प्रयोगांमुळे ती रोखली गेली. आता किंमत भरून काढण्यासाठी विविध मार्गांचा उपाय करणे क्रमप्राप्त होते. जाहिरात किंवा विविध उपक्रमांचा शोध घेऊन वर्तमानपत्र चालविणे आवश्यक ठरले. विशेषतः जाहिरातींची जागा, आकार या गोष्टींमध्ये नावीन्य आणणे भाग होते. वर्तमानपत्र हे संपादकीय मजकुराबरोबर जाहिरातींवर जगणे ही आवश्यक बाब ठरली. काही वर्तमानपत्रांनी जाहिरातींचा अतिरेक केला. त्यांच्या वाचकांना ते चालले. कारण, त्यांचा खप वाढत होता. स्पर्धा असल्याने याचाही स्वीकार करावा लागला.
नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार
बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि त्यानुसार सुधारणा करण्यात ‘सकाळ’ कायमच अग्रेसर राहिला. संस्था म्हणून, तसेच संपादकीय आणि आर्थिक बाबी ध्यानात ठेवून ‘सकाळ’च्या मूळ तत्त्वांना बगल द्यावी लागणार नाही, याची काळजी घेतली. ‘सकाळ’ विस्तारला. त्याचबरोबर सामाजिक मूल्यांना, सामाजिक उपक्रमांना ‘सकाळ’ने वाढते प्राधान्य दिले. ‘एनआयई’ (न्यूजपेपर इन एज्युकेशन), अर्थमंथन, बालमित्र यांसारख्या विद्यार्थी ते उद्योजक अशा सर्व घटकांना प्रशिक्षणासाठी माध्यम निर्माण केले. हे करत असताना संस्थापक डॉ. ना. भि. परुळेकर यांच्या काळापासून सुरू असलेले उपक्रम मोठ्या प्रमाणावर वाढत गेले. त्याशिवाय वेगळा सामाजिक न्यास निर्माण केला. या सर्व गोष्टींभोवती समाजाच्या साहाय्याने समाज सुधारण्याची भूमिका आजतागायत कसोशीने पाळली गेली. त्यामुळे सर्व उपक्रमांमध्ये चांगले यश मिळाले. ‘सकाळ रिलीफ फंड’सारख्या उपक्रमातून एक हजारपेक्षा अधिक गावांत जनसहभागातून पाण्याचे व अन्य सामाजिक प्रश्न यशस्वीपणे सोडविले. समाजाच्या भल्यासाठी राबविलेल्या उपक्रमांची अशी कित्येक उदाहरणे सांगता येतील.
संपादकीय स्वातंत्र्य कायम
हे सर्व करत असताना संपादकीय धोरणात मूलतः बदल करावा लागला नाही. डिजिटल युगात वाचकांना सहज उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या पलीकडे जाणारी नावीन्यपूर्ण माहिती, प्रबोधनपर चर्चासत्र आणि लोकोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देत सामाजिक जाणीव निर्माण करणे, तिला प्रोत्साहन देणे आदी गोष्टी ‘सकाळ’ने जाणीवपूर्वक अंगीकारल्या. या दरम्यान टीव्हीच्या माध्यमातून चोवीस तास बातम्या, अन्य माहिती देण्यास वेगवेगळ्या चॅनेलद्वारे सुरुवात झाली होती. ‘सीएनएन’सारख्या चॅनेलने जगभरात नवीन पायंडा निर्माण केला, जो सर्वांना स्वीकारावा लागला. हे सर्व करताना आधुनिकता, आर्थिक क्षमता, वाचकांच्या अपेक्षा आणि समाधान, स्पर्धा, सातत्याने होत असलेल्या सुधारणा, नवीन तंत्रज्ञानाची नोंद घेत काम करणे आवश्यक ठरले.
‘ॲग्रोवन’द्वारे शेतकऱ्यांना प्रशिक्षण
स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्याकडील बहुतांश वर्तमानपत्रे प्रामुख्याने राजकीय आणि नंतर सामाजिक जाणिवेतून काम करत होती. नवीन शतकात ‘सकाळ’ने नेहमीप्रमाणे सामाजिक जाणिवांना प्राधान्य दिले. नवीन क्षेत्रात पाऊल टाकत त्या क्षेत्राची आवश्यकता ओळखून पावले उचलली. शेतकऱ्यांची गरज ध्यानात घेत ‘ॲग्रोवन’सारखे कृषी क्षेत्राला वाहिलेले दैनिक सुरू केले. ते यशस्वी ठरले. त्या माध्यमातून सरपंच महापरिषद, तसेच महाराष्ट्र कृषी कौशल्य विकास कार्यक्रमाद्वारे भारत सरकारच्या साहाय्याने सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे, काळानुरूप काही बदल केले पाहिजेत, ही जाणीव निर्माण केली. ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्यांवर योग्य उपाययोजना सुचविल्या जातात. विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून त्यांच्या उत्पादनांना संधी दिली जाते.
पुढचे पाऊल
सध्याच्या दशकातही जागतिक पातळीवर अनेक वर्तमानपत्रे बंद पडली. काही वर्तमानपत्रांनी आपल्या डिजिटल माध्यमातून आर्थिक बाजू मजबूत केली. काळानुरूप विविध आव्हाने येतच असतात; फक्त आता ती फक्त विलक्षण गतीने येत आहेत. अशीच आव्हाने भविष्यकाळातही येत राहतील, याची जाणीव ठेवत ‘सकाळ’ संस्था काम करत आहे. वाचकांना जे हवे ते त्याला योग्य माध्यमातून पोहोचवावेच; शिवाय समाजाला जे हवे तेही योग्य माध्यमातून देत विविध उपक्रमांतून, सहभागाच्या आणि समन्वयाच्या भूमिकेतून पुढची वाटचाल होत राहील. जोपर्यंत समाज आणि वाचक आमच्या पाठीशी आहे, तोपर्यंत ‘सकाळ’ला चिंता करण्याचे कारण नाही. यामुळे मला भविष्यकाळातील वाटचालीचीही चिंता वाटत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.