rajmata jijausaheb and gopal ganesh agarkar Remembrance Day sakal
सप्तरंग

इष्ट तेच बोलावे...

राजमाता जिजाऊसाहेब तसेच समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर या दोघांचाही स्मरणदिवस आज एकाच दिवशी असावा, हा प्रेरणादायी योगायोग आहे.

अवतरण टीम

- प्रतिमा जोशी, pratimajk@gmail.com

राजमाता जिजाऊसाहेब तसेच समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर या दोघांचाही स्मरणदिवस आज एकाच दिवशी असावा, हा प्रेरणादायी योगायोग आहे. या दोघांच्या कालखंडात सव्वादोनशेहून अधिक अंतर आहे; मात्र महाराष्ट्राचा कणा ताठ ठेवण्यासाठी आणि प्रतिकूल परिस्थितीशी झुंज घेण्याची वृत्ती धारदार ठेवण्यासाठी त्यांनी भक्कम आदर्श समोर ठेवले....

स्वराज्य स्थापन करणे हेच इष्ट आणि तेच तुमचे साध्य असे आपल्या मुलाला निक्षून सांगणाऱ्या नि त्यासाठी सर्व राजकीय संकटे अंगावर घेणाऱ्या राजमाता जिजाऊसाहेब तसेच इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार, असे कठोर निश्चयाने ठणकावून सांगणारे नि त्यापायी अतोनात कष्ट आणि टीका झेलणारे समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर या दोघांचाही स्मरणदिवस आजच्या १७ जून रोजी असावा, हा एक प्रेरणादायी योगायोग आहे.

या दोघांच्या कालखंडात सव्वादोनशेहून अधिक अंतर आहे; मात्र महाराष्ट्राचा कणा ताठ ठेवण्यासाठी आणि त्याची विवेकबुद्धी शाबूत ठेवण्यासाठी, प्रतिकूल परिस्थितीशी झुंज घेण्याची वृत्ती धारदार ठेवण्यासाठी त्यांनी भक्कम आदर्श समोर ठेवले. अंगीकृत कार्य हाती घेतले, की कितीही विरोध झाला तरी प्रसंगी आप्त-स्वकियांचीही पर्वा न करता ते तडीस न्यायचा कणखरपणा त्यांनी महाराष्ट्राला शिकवला आहे.

महाविद्यालयीन जीवनातच जॉन स्ट्यूअर्ट मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचा प्रभाव पडल्याने आगरकर बुद्धिप्रामाण्यवादी आणि अज्ञेयवादी बनले. समाजाची वर्तमान घडी दुहेरी आणि अन्यायकारक मापदंडावर बसवलेली आहे आणि ती मोडून काढून विवेकी विचारांवर आधारित नवी घडी बसविण्यास पर्याय नाही, या पक्क्या निष्कर्षावर ते आले होते. त्या काळी एका प्रसिद्ध वृत्तपत्रातील त्यांचे लेख समाजातील दुष्टप्रवृत्तीवर सणसणीत कोरडे ओढत होते.

सामाजिक प्रश्नांना अग्रक्रम देण्याऐवजी राजकीय प्रश्नांची जाणीव अधिक तीव्र असली पाहिजे, असे त्या वृत्तपत्र चालकमंडळींस वाटत असल्यामुळे, आगरकरांचा वैचारिक कोंडमारा होऊ लागला. परिणामत: ते बाहेर पडले (१८८७) आणि आपल्या क्रांतिकारक सामाजिक विचारांच्या प्रतिपादन-प्रसारासाठी ‘सुधारक’ हे पत्र त्यांनी काढले (१८८८). त्यात केवळ सामाजिक नव्हे, तर राजकारण आणि अर्थशास्त्र यावरही लेख येत.

राजकारण हे निखळ बाजूला काढता येत नाही, सामाजिक आणि आर्थिक विषयांचा ऊहापोह आणि अंतर्भाव केल्याशिवाय ते पूर्णत्वाला जाऊच शकत नाही, अशी विचारांती त्यांची ठाम धारणा बनली होती. राजकीय गुलामी संपवली, तरी आलेले नवे स्वराज्य अर्थपूर्ण आणि आधुनिक पद्धतीने चालवायचे, तर मुळात नागरिक त्यासाठी शिक्षित आणि समजदार असणे गरजेचे आहे; अन्यथा असे स्वराज्य हे गुलामीपेक्षाही वाईट ठरेल, हा दृष्टिकोन होता.

याच बुद्धिवादी दृष्टिकोनातून समाजजीवनाचे विश्लेषण करून अन्याय्य रुढी आणि परंपरा यांच्यावर त्यांनी कडाडून हल्ले चढविले. बुद्धीच्या निकषांखेरीज अन्य कोणताही निकष ते मानीत नसल्यामुळे समाजसुधारणांचे समर्थन करण्यासाठी स्मृतिवचनांचा आधार घेणे त्यांना मान्य नव्हते. नीतिमान आणि सदाचरणी समाजाच्या निर्मितीसाठी ईश्वर आणि धर्म यांचीही आवश्यकता त्यांना वाटत नव्हती. परोपकारादी सद्गुण धर्माच्या आधी अस्तित्वात आले असून नंतर धर्मात ते गोवले गेले, अशी त्यांची भूमिका होती.

बुद्धिवाद, व्यक्तिवाद, समता आणि मानवतावाद या चतु:सूत्रीने त्यांचा सारा सामाजिक विचार व्यापलेला आहे. साहजिकच, पूर्वजन्म आणि पुनर्जन्म यांसारख्या कल्पनांवर त्यांचा विश्वास नव्हता आणि चातुर्वर्ण्य, जातिसंस्था, अस्पृश्यता, बालविवाह इ. गोष्टी त्यांना सर्वथैव अमान्य होत्या. मनुष्यजातीचे ऐहिक सुखवर्धन हेच त्यांचे ध्येय बनले होते. तथापि निव्वळ इंद्रियसुखालाच ऐहिक सुख मानण्याइतपत त्यांची दृष्टी संकुचित नव्हती.

नीतिमान आणि संयमी जीवनामुळे मनाला लाभणारे समाधानही या ऐहिक सुखात त्यांना अभिप्रेत होते. व्यक्तिस्वातंत्र्यामुळे स्वार्थ आणि स्वैराचार फैलावण्याऐवजी समाजातील व्यक्ती परोपकारी आणि परहितचिंतकच होतील, असे त्यांना वाटे. उलट व्यक्तिस्वातंत्र्य न मानणाऱ्या व निरुपयोगी परंपरांनी वेढलेल्या समाजाची केव्हाही प्रगती होऊ शकणार नाही, अशी त्यांची धारणा होती.

परंपरांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन ऐतिहासिक होता. त्यामुळे एखादी गोष्ट समाजाच्या एका अवस्थेत उपयुक्त ठरली असेल, हे ते मान्य करीत; मात्र तीच गोष्ट बदलत्या काळात जाचक ठरल्यास बिनदिक्कतपणे टाकून द्यावी, असे ते म्हणत. अशा रुढी आणि परंपरा स्वखुषीने सोडून द्यावयास समाज तयार नसेल, तर त्या कायद्याने नाहीशा कराव्या, असे त्यांचे मत होते.

सामान्यांचे जाऊच द्या; परंतु ईश्वर आणि धर्म यांच्याविषयीचे आगरकरांचे विचार रा. गो. भांडारकर आणि न्यायमूर्ती रानडे यांसारख्या सुधारक व्यक्तींनाही पटत नसत. सुधारकातील लेखांविरुद्ध चहुबाजूंनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली. खुनाच्या धमक्या, प्रेतयात्रा काढणे इ. प्रकार झाले; परंतु ‘इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार’, या भूमिकेतून सामाजिक सुधारणांचा कडवा पुरस्कार त्यांनी आमरण चालू ठेवला.

सुधारकातील लेखांतून त्यांचे समाजजीवनाच्या विविध अंगांचे सूक्ष्म निरीक्षण आणि सखोल चिंतन प्रत्ययास येते. स्त्रियांचा पोषाख, विधवांचे केशवपन, सोवळे-ओवळे, अंत्यविधी आणि अंत्यसंस्कार, हजामत, जोडे इ. विषय जसे त्यांत आहेत, तसेच देवतांची उत्पत्ती, मूर्तिपूजा, आत्म्याची मरणोत्तर स्थिती इत्यादींसारखे तात्त्विक आणि धर्माशी निकटचा संबंध असलेले विषयही आहेत.

सामाजिक सुधारणा आणि कायदा यांचे संबंध काय असावेत, यासंबंधीची आपली भूमिका मांडण्यासाठी आणि समाजहितकारक कायद्यांच्या जोरदार पुरस्कारासाठी काही लेख लिहिले गेले आहेत; तर काही लेखांतून सामाजिक गुलामगिरीने जखडून गेलेल्या स्त्रियांच्या शिक्षणादी समस्यांविषयी मूलगामी विचार आलेले आहेत.

लोकमान्य टिळक आणि सुधारक आगरकर यांच्यातील विवाद महाराष्ट्राच्या परिचयाचा आहे. टिळक आणि आगरकर यांच्यात पुढे बरेच वैमनस्य निर्माण झाल्याचेही दिसते. टिळक राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्यात देशपातळीवरील लोकमान्य नेते बनले; तर आगरकरांना स्वातंत्र्य उपभोगण्यास समाज लायक तर बनू दे, अशी भूमिका घेतल्यामुळे सनातन्यांनी जिवंतपणीच स्वतःची प्रेतयात्रा काढली गेल्याचे वेदनादायी दृश्य पाहावे लागले. वास्तविक राजकीय विचारांच्या जहालपणात ते टिळकांच्या बरोबरच होते. राजकीय हक्क आणि राजकीय स्वातंत्र्य यांची तीव्र जाणीव त्यांच्या लेखांतून स्पष्टपणे प्रतिबिंबित झालेली आहे.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना भारतीय लोकशाहीची वाटचाल कशी चालू आहे, याचा शोध घेतला, तर आगरकर यांची तळमळ आपल्यापर्यंत थेट पोहोचू शकेल. हजारो वर्षे राजेशाही आणि सरंजामी जीवनपद्धतीत हयात घालवलेल्या भारतीय नेते आणि जनतेला लोकशाही जीवनपद्धती अंगाला लावून घेण्यासाठी बऱ्याच प्रशिक्षणातून जावे लागणार, हे कटू असले तरी आजचे सत्य आहे.

सरंजामी मानसिकतेत नेते, राज्यकर्ते तर अडकले आहेतच; परंतु भारतीय लोकसुद्धा आजही प्रजाजन या भूमिकेतून बाहेर पडताना दिसत नाहीत. त्यांची जागरूक नागरिक बनण्याची वाटचाल अतिशय संथ आणि नाईलाजाने होताना दिसते आहे. त्याचमुळे जगण्याच्या भौतिक प्रश्नांना, नागरी सुविधांसारख्या मूलभूत गरजांना, सर्व स्तरांवर विकास होण्याच्या अपरिहार्यतेला महत्त्व द्यावे, असे भारतीयांना फारसे वाटत नाही. त्याऐवजी मानवी जगण्याच्या प्रगतीशी काहीएक संबंध नसलेल्या कल्पनारम्य आणि चौकटबद्ध मुद्द्यांना आपल्या लोकशाहीत महत्त्व आलेले आहे.

जिजाऊ आऊसाहेबांच्या अलौकिक कार्यकर्तृत्वाला दिखाऊ मुजरे बरेच केले जातात; पण रयतेच्या सुख-दुःखात सहभागी न होणारा राजा काय कामाचा, अशी शिकवण आपल्या पुत्राला देऊन त्याचे स्वराज्य लोककल्याणकारी असावे, यासाठी डोळ्यात तेल घालून जागता पहारा देणाऱ्या जिजाबाई नजरेआड केल्या जातात. राजा हा प्रजेचा उपभोगशून्य स्वामी आहे, याची जाणीव करून देणारी ही राजमाता खऱ्या अर्थाने लोकमाता होती. लोकांची भाषा अवगत असलेली स्वराज्याची प्रेरणा होती.

याच लोकांच्या भाषेला व्यवहारात मानाचे स्थान मिळावे, ज्ञान लोकांपर्यंत पोहचवावे या अंत:प्रेरणेने आपल्या पाठच्या भावाला, ज्ञानेश्वरांना गीता प्राकृत भाषेत आणण्याचा आदेश देणाऱ्या संत निवृत्तीनाथांचा स्मरणदिवस २३ जून रोजी येत आहे. निवृत्तीनाथ तर जिजाऊंच्याही आधी साडेतीनशे वर्षांहून अधिक काळापूर्वी लोकांशी संवाद साधण्याचे मर्म सांगून गेलेत.

महाराष्ट्राच्या या समृद्ध परंपरेचा गर्व नकोय, तर सार्थ अभिमान वाटावा, असे वर्तन तुम्हा-आम्हा सर्वांकडून अपेक्षित आहे. निवृत्तीनाथांसह चारी भावंडांना त्रास देणाऱ्या कर्मठ प्रवृत्तीचे, जिजाऊ - शिवरायांना उपद्रव करणाऱ्या मस्तवाल वतनदारी अरेरावीचे आणि आगरकरांच्या मरणाची अपेक्षा करणाऱ्या खिल्लीबाज विकृतांचे अनुकरण करायचे की या तिघांनी दाखवलेल्या मार्गावरून चालत सुसंस्कृत, विवेकी आणि सभ्य भारत घडवायचा, हे आपणच ठरवायचे आहे.

(लेखिका ज्‍येष्ठ पत्रकार आणि सुपरिचित कथाकार असून, सामाजिक प्रश्नांवर सातत्याने लेखन करतात.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif : 'तुम्ही मला आशीर्वाद दिला नसता, तर मी आमदार-मंत्री झालोच नसतो'; असं का म्हणाले मुश्रीफ?

"त्याने त्याच्या मुलाला एक फोन केलेला नाही" ; 'इस प्यार को..'फेम अभिनेत्रीचा एक्स नवऱ्यावर आरोप, म्हणाली...

Dhule City Assembly Constituency : अनिल गोटे शिवबंधनात; ठाकरेंनी दिला एबी फॉर्म! मातोश्रीवर प्रवेश; धुळे शहराची उमेदवारी

कलर्सच्या नव्या मालिकेचं प्रसारण रखडलं; प्रेक्षकांनी रोष व्यक्त करताच वाहिनीने मागितली माफी, पोस्ट करत लिहिलं-

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला सुरुवात

SCROLL FOR NEXT