pravin tokekar 
सप्तरंग

ठंडा मतलब..! (प्रवीण टोकेकर)

प्रवीण टोकेकर

"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपट दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच तयार केला होता. भाषेची त्याला फारशी गरजच नव्हती; पण संस्कृतीकरण, यांत्रिक प्रगती, विकास, औद्योगिक उलाढाली, राजकारणं, युद्ध...या असल्या गोष्टींच्या आहारी जात आपण कुठल्या थराला आलो आहोत, यावरचं ते एक अप्रतिम भाष्य होतं. हा मस्त विनोदी चित्रपट म्हणून खूप गाजला. विनोदी, काहीशा विक्षिप्त कहाणीतून जागतिक समाजाला आरसा दाखवणाऱ्या या चित्रपटाविषयी...

विज्ञान-तंत्रज्ञानाची कास धरत मानवानं अंतरिक्षात भराऱ्या मारल्या. आता तर मंगळावर वस्ती होऊ शकेल का, याचीही तो सिरिअसली चाचपणी करू लागला आहे. जेम्स वॉट नामक एका स्कॉटिश यांत्रिकानं अठराव्या शतकात शोधलेल्या एका वाफेच्या इंजिनानं सुरू झालेली ही यंत्रक्रांती, आपल्याला कुठं घेऊन चालली आहे, बघा! तसं बघायला गेलं तर माणसाला चाकाचा शोध लागला, तेव्हाच या प्रवासाला सुरवात झाली होती, असं म्हणावं लागेल. किंवा त्याच्याही आधी अग्नि प्रज्वलित करण्याचा इल्लम आदिमानवाच्या हाताला लागला तेव्हा असेल, नाहीतर टोकदार दगडाचं अश्‍मयुगीन हत्यार त्यानं पहिल्यांदा बनवलं तेव्हा असेल...काही का असेना, मधल्या हजारो वर्षांत काय काय घडलं, ते मात्र स्तिमित करणारं आहे.
या घटकेलाही तुम्ही हा मजकूर वाचता आहात, तेव्हा कदाचित "नासा'चं "इनसाइट' हे "यंत्र' मंगळाचा पृष्ठभाग खरडून काढण्यात मग्न असेल. त्यानं पाठवलेले फोटो, माहितीच्या विश्‍लेषणासाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि वैज्ञानिक कामात गढलेले असतील. त्याचे मस्त फोटो आले, की आपण ते एकमेकांना मोबाइल फोनमधून फॉर्वर्ड करूच, आणि "फोर-जी भलतंच स्लो चालतं,' असं म्हणत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी बरंच काही घडायचंय, असंही मनातल्या मनात म्हणत राहू. कारण ही तंत्रज्ञानं आता आपल्या अगदी हातातोंडाशी आहेत.

...पण पृथ्वीवरच्या काही तुरळक कोनाकोपऱ्यांत अद्याप अशाही वस्त्या आहेत, की ज्यांनी मोबाइल फोन सोडा, अंग झाकणारं कापडसुद्धा अजून पाहिलेलं नाही. शिजवलेलं अन्न ही त्यांच्यासाठी कधीतरी घडणारी चीज आहे. गेल्याच महिन्यातली गोष्ट आहे. अंदमान-निकोबार बेटांपैकी सेंटिनल नावाच्या बेटावर आगंतुकासारखं घुसू पाहणाऱ्या एका अमेरिकी मिशनऱ्याला तिथल्या आदिवासी टोळीनं ठार मारून टाकलं होतं. या रानटी टोळीला तुमचा विकास, धर्म, भाषा, साधनसुविधा यातलं काहीही नको आहे. विकसित माणूस कसा राहतो, हे त्यांना मुळात ठाऊकच नाही. अत्याधुनिक पोशाखातला हा आगंतुक त्यांना दुष्टशक्‍तीचा प्रतिनिधीच वाटला असणार. परकं ते वाईट, ही भयभावना अजूनही तिथल्या जंगलात वावरते आहे. त्या सेंटिनल बेटावर आजही कोणी प्रगत माणूस पाय टाकू शकलेला नाही. भारतासकट बाकी देशांच्या सरकारांनीही त्यांना हवं तसं राहू द्यायचं, असंच ठरवलं आहे. हे सेंटिनल्स नरभक्षक आहेत, अशीही प्रदीर्घ काळ समजूत होती; पण तसं नाही. ते कमालीचे प्रांतप्रेमी आहेत, एवढंच. आभाळातून उडत जाणारं विमान त्यांना बहुधा दैवी किंवा राक्षसी शक्‍ती वाटत असेल. बेटाच्या बाजूनं मंदपणे सरकणारी अवाढव्य जहाजं त्यांना भयभीत करत असतील. प्लॅस्टिक किंवा काच नावाची वस्तू त्यांनी पाहिलेली नसेल...
सेंटिनलांच्या बाबतीतली ही घटना ऐकल्यानंतर एकदम आठवला तो ऐंशीच्या दशकात जगभर खळबळ माजवणारा चित्रपट- "द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी!' दक्षिण आफ्रिकेतल्या जेमी ओइस नावाच्या क्रेझी निर्माता-दिग्दर्शकानं मायदेशातच हा चित्रपट केला होता. भाषेची त्याला फारशी गरजच नव्हती; पण संस्कृतीकरण, यांत्रिक प्रगती, विकास, औद्योगिक उलाढाली, राजकारणं, युद्ध...या असल्या गोष्टींच्या आहारी जात आपण कुठल्या थराला आलो आहोत, यावरचं ते एक अप्रतिम भाष्य होतं. "द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा मस्त विनोदी चित्रपट म्हणून खूप गाजला. त्या विनोदी, काहीशा विक्षिप्त कहाणीनं दिलेला छुपा संदेश मात्र जागतिक समाजाला आरसा दाखवणारा होता.
दक्षिण आफ्रिकेच्या खंडात जंगली श्‍वापदं मुबलक. हल्लीच्या काळातला तो जागतिक अरण्य-पर्यटनासाठीचा हॉटस्पॉट आहे. महागडी टूर करून तिथं जाऊन "बिग फाइव्ह' बघून आल्याचे फोटो अभिमानानं दाखवणं, हा देशोदेशीच्या पर्यटकांचा आवडता छंद. "बिग फाइव्ह'म्हणजे आफ्रिकन हत्ती, काळा गेंडा, महाकाय रानगवे, आफ्रिकन सिंह आणि चित्ता! यांचं दर्शन झालं, की अरण्यप्रेमींना मोक्ष मिळतो. मुबलक प्राणीसंपदा, विशाल गवताळ प्रदेश, निबिड रानं, दुर्गम वाळवंट असं सारं काही या प्रदेशात बघायला मिळतं.

अरण्य-पर्यटन हे आताशा तिथलं उपजीविकेचं महत्त्वाचं साधन झालं असलं, तरी तीस-चाळीस वर्षांपूर्वी परिस्थिती अशी नव्हती. दक्षिण आफ्रिकेवर वर्णविद्वेषाचं गडद सावट होतं. गोऱ्या कातडीनं तिथं चालवलेलं काळ्या रंगाचं दमन हा जागतिक टीकेचा विषय होता. अनेक वर्षं त्यापोटी दक्षिण आफ्रिकेला सर्वंकष बहिष्काराला तोंड द्यावं लागलं. त्यामुळे तिथं नेमकं काय घडतंय, हे कळायलाही मार्ग नव्हता. त्या काळात जेमी ओइसनं हा चित्रपट बनवला. काही तुरळक देशांत त्याचं प्रदर्शन झाल्यावर बोलबाला होऊ लागला. थोड्याच काळात जवळपास तीस-चाळीस देशांत त्याला मागणी येऊ लागली. जेमतेम पन्नास लाख डॉलर्समध्ये बनवलेला चित्रपट त्याच्या वीसपट पैसा मिळवून गेला.

या चित्रपटातला नायक कुणी नामचिन नव्हता. एक साधा आदिवासी बुशमन होता. बुशमन ही जमात आफ्रिकेच्या कलहारी वाळवंटाच्या प्रदेशात आढळते. लाज झाकायपुरतं अंगावर वस्त्र. हातात भाला किंवा खांद्याला तीरकमठा. सुरकुतलेले; पण हसरे चेहरे. संपूर्णत: निसर्गावर अवलंबून असलेली ही जमात विकासाबिकासाच्या गप्पांपासूनसुद्धा दूर आहे. त्यांच्या काही श्रद्धा-अंधश्रद्धा आहेत. त्यांचे अन्न मिळवण्याचे मार्ग नैसर्गिक आहेत. सृष्टीची खरीखुरी बाळं म्हणा हवं तर...अशा बुशमनपैकी निक्‍साव टोमा नावाचा एक नामिबियातला एक आदिवासी दिग्दर्शक जेमी ओइसनं नायक म्हणून निवडला होता. कहाणी, पटकथा, संवाद वगैरे सबकुछ ओइसचंच होतं.
तसं बघायला गेलं, तर या चित्रपटाचं कथासूत्र हीच पटकथा आहे; पण आवर्जून वर्णन करता येईल, असं कथानक नाही. प्रसंगाप्रसंगानं फुलत, धावत जाणारी ही जगावेगळी कहाणी आपली नसूनही "आपली' वाटते, हेच तिचं यश आहे. मनमुराद हसवणारा हा चित्रपट चित्तवृत्ती प्रफुल्लित करतो, तेवढाच अंतर्मुखसुद्धा करतो.
* * *

कलहारी वाळवंटाच्या एका वेशीवर थोडीफार हिरवाई होती, तिच्या कुशीत एक बुशमनची वस्ती आहे. पंधरा-वीस घरं. गवतानं शाकारलेली. बाकी जगणं सारं उघड्यावर...आसपासच्या इलाख्यात आणखीही वस्त्या आहेत; पण सगळे कसे गुण्यागोविंदानं नांदतात, राहतात. "जहां गम भी न हो, आसू भी न हो, बस प्यार ही प्यार पले' अशी ही वस्ती. हातावर पोट असल्यानं सगळेच हसरे. भविष्याची चिंता नाही, वर्तमानाचं व्यवधान नाही. पैसा म्हणतात, त्या नाण्यांचं तिथं अस्तित्वच नाही. कारण जंगलातली रानडुकरं किंवा हरणं किलोच्या रेटमध्ये आपलं मांस विकत नाहीत, आणि फणसाच्या बदल्यात फणशीचं झाड पैसे मागत नाही. भूक लागली, की रानमेवा मुबलक आणि फुकट आहे. संग्रह कसला करणार? संग्रहीवृत्ती नसली, की बऱ्याच गोष्टी सोप्या होतात.

झाय नावाचा बुशमन हा त्या वस्तीचा म्होरक्‍या. चार पावसाळे बघितलेला, सिंहाच्या कळपासमोरून धीटपणे जाणारा झाय कुठं कुठं रानोमाळ भटकत असतो. म्हणून तो शहाणासुद्धा आहे थोडा. बारीक केस. अपरं नाक. निरागस हसू. बहुतेक दातांची वाट लागली आहे...आणि हो, उघड्यांपेक्षा उघडा! कमरेला काहीतरी आहे, ते आपलं नशीब म्हणायचं.
एक दिवस रानोमाळ भटकत असताना उंचावरून एक विमान जात होतं. झायला वाटलं, हल्ली हे पंख न हलवता उडणारे पक्षी फार दिसू लागले आहेत. कधी कधी ढगातून विमान जाताना घरघराट व्हायचा. देवाला भयंकर गॅस झाला असून त्याचाच हा आवाज आहे, अशी बुशमनची समजूत होती. कधी कधी नेमकी तेव्हाच सोसाट्याची वावटळ यायची. तेव्हा बुजुर्ग बुशमन दुसऱ्याला म्हणायचा : ""बघ, म्हटलं नव्हतं तुला? देवच!''
झाय बघत होता, त्या विमानाच्या पायलटनं बेदरकारपणे खिडकीतून कोकची बाटली फेकली. कशी कुणास ठाऊक, ती खाली येऊन पडली; पण फुटली मात्र नाही. झायनं ती अप्रूपाची गोष्ट उचलली. असला प्रकार त्यानं उभ्या आयुष्यात कधी पाहिला नव्हता, नि ऐकलाही नव्हता. निमुळती. पाण्यासारखी निरंगी. निर्मळ दिसणारी. त्याला बाटली म्हणतात, हे तरी त्याला कुठं ठाऊक होतं?
आभाळातल्या देवानं आपल्याला प्रसाद पाठवल्याची त्याची भावना झाली. ती बाटली घेऊन तो घरी आला. तिथून सुरू झाला एक अनर्थकारी घटनांचा धम्माल सिलसिला.
* * *

झाय बुशमनला कोकाकोलाची रिकामी बाटली मिळाली, त्याच वेळेला दक्षिणेकडे सुमारे 600 मैल अंतरावरल्या अवाढव्य शहरात दुसरंच नाट्य घडत होतं.
...शहरी माणूस काही आदिवासींसारखा निसर्गावर अवलंबून नाही. निसर्गासाठी तो स्वत:त बदल करण्यापेक्षा निसर्गच बदलून टाकण्याकडे त्याचा कल आहे. मग तो शहरं वसवतो. रस्ते अंथरतो. वाहनं चालवतो. यंत्र चालवतो...आणि हे सगळं नीट श्रमाविना चालत राहावं म्हणून विजेच्या लाइनी टाकत जातो. त्याला कुठं थांबावं हेच समजत नाही. तो सारखा आपलं पर्यावरण सोयीनं बदलत राहातो. आता अशा सततच्या बदलाशीही पुन्हा जमवून घ्यावं लागतंच. त्यासाठी प्रशिक्षित करण्यासाठीच तो आपल्या मुलाबाळांना शाळा नावाच्या ठिकाणी सक्‍तमजुरीवर धाडतो. विशेष म्हणजे, एवढे बदल करूनही सुसंस्कृत माणसाला सतत स्वत:ला बदलत ठेवावं लागतं. म्हणजे असं, की समजा आज सोमवार आहे, आणि सकाळचे साडेसात वाजलेत, तर तेव्हा वेगळं पर्यावरण असतं. धडपडत स्वत:त बदल करत तो कचेरी गाठतो, तर तिथलं पर्यावरण पुन्हा वेगळंच असतं. आठच्या सुमारास सगळ्यांनी बिझी दिसलं पाहिजे, असं ते पर्यावरण असतं. साडेदहा वाजता पंधराएक मिनिटं बिझी न दिसणंही मॅनेज करावं लागतं तिथं!..असं दिवसभर करत राहायचं. थोडक्‍यात या सुसंस्कृत शहरी माणसाच्या दिवसाचे छोटे छोटे तुकडे पाडलेले असतात. त्या प्रत्येक तुकड्याचं म्हणून एक पर्यावरण किंवा परिस्थिती असते. अवघड आहे ना? साहजिकच काही जण काहीच्या काही हुकतात. उदाहरणार्थ, खालीलप्रमाणे :
...उपाहारगृहातली गर्दी टाळत केट थॉम्प्सन एका टेबलाशी आली.
""इथं कुणी बसलंय?'' तिनं विचारलं. उत्तरादाखल शेजारच्या बाईनं जरा सरकल्याचा अभिनय केला.
""माझ्या डोक्‍यातला गोंधळ तुला ऐकू येत नाहीये ना?,'' त्या बाईनं चमकून विचारलं. केट नाही म्हणाली. नंतर केटला पीट भेटला.
""बोटस्वानात टीचरची कमतरता आहे, अशी काही बातमी होती ना?,'' केटनं त्याला विचारलं.
""तुझा अर्ज टाकण्याचा विचार आहे की काय?''
""हं...बघू जमलं तर...''ती विचारमग्न होत म्हणाली.
...केट थॉम्सन तिथल्या पर्यावरणात काय करणार? तिथं तर रोजच सोमवार असतो, किंवा मंगळवार...खरं तर रविवारच असतो.
* * *

झाय बुशमनला सापडलेल्या बाटलीत प्रसादासारखं काहीही नव्हतं; पण चीज नायाब होती, हे खरं. वस्तीपाड्यांमध्ये ती हाताळायची स्पर्धा लागली. या निमुळत्या, पारदर्शक वस्तूचं काय करायचं असतं? कुणी कुणी जमेल तसं डोकं लढवलं. सापाची कातडी गुंडाळायला उत्तम आहे ही वस्तू. पाबो बुशमन म्हणाला, की "त्यातून संगीत चांगलं निर्माण होतं. मी वाजवून पाहिली.' कुणी गोचिडी मारायला त्याचा उपयोग केला. चीजच तशी होती, त्याला काय करणार? पण त्या वस्तूनं बुशमनच्या वस्तीत कधी नव्हेत ते बखेडे आणले. वस्तू ठेवायची कुणाकडे, हा शंभर नंबरी सवाल होता. वस्तीत हव्यासाला सुरवात झाली. भांडणं, हेवेदावे सुरू झाले. एका कोकच्या रिकाम्या बाटलीनं तिथं काहूर आणलं.
शेवटी कंटाळलेल्या झायनं मनाशी म्हटलं ः ""या वस्तूमुळे आपल्यात इतकी भांडणं होतायत, याचा अर्थ हा देवाचा प्रसाद नसणार. ही नक्‍कीच काही अशुभ गोष्ट आहे. ही अपशकुनी चीज आपल्याकडे नको. देवाची गोष्ट देवाला परत केली पाहिजे.''
...पण कशी करणार? देवाच्या घरी जाऊन दार वाजवून ""...घ्या बुवा, तुमची वस्तू...नाहीतर बदलून तरी द्या!'' असं म्हणायचं? खूप दिवस चालल्यावर एका ठिकाणी जग संपतं. तिथून देवाचं घर जवळ आहे. तिथं जाऊन बाटली फेकून यायचं असं झायनं ठरवलं.
""वेड लागलंय का? तिथं जायला चाळीस दिवस पायी चालावं लागतं!,'' पाबो म्हणाला.
""मी उद्याच पहाटे निघतो!,'' झाय निर्धारानं म्हणाला, आणि खरंच दुसऱ्या दिवशी तो पायीपायी निघालादेखील. हातात काठी, कमरेला बाटली, पायात बळ आणि मनात भळभळ.
* * *

आता कहाणीनं आणखी एक वळण घेतलं. केट थॉम्सन मजल दरमजल करत आपल्या नोकरीच्या ठिकाणी निघाली होती. तेव्हाच अँड्रयू स्टेन नावाचा एक बावळट जीवशास्त्रज्ञ सामान बांधून कलहारीच्या जंगलात निघाला होता. हत्तींच्या महाविष्ठेचं विश्‍लेषण करून हत्तीजीवनाची गुह्यं उकलण्याचा त्याचा चंग होता. एमप्युडी हा त्याचा सहायक-कम- चालक-कम-सबकुछ टाइपचा माणूस त्याच्यासोबत होताच. शिवाय टूर गाइड जॅक हाइंड हे एक स्वतंत्र प्रकरण होतं.
या कहाणीत व्हिलनची कमतरता वाटू नये, म्हणून सॅम बोगा नामक एका खलनायकाचीही सोय करण्यात आली आहे. कुठल्या तरी पुढाऱ्याच्या हत्येचा कट फसल्यानंतर रानोमाळ सैरावैरा धावत सुटलेला हा सॅम बोगा हा एक दहशतवादाचा केविलवाणा प्रकार आहे. हे पाच जण म्हणजे आफ्रिकेत अवतरलेले खरेखुरे "बिग फाइव्ह!'

झायची या लोकांशी टप्प्याटप्प्यानं गाठ पडत गेली आणि कलहारीत अक्षरश: कल्ला झाला. एकतर त्यानं विचित्र "कातड्या'नं अंग झाकून फिरणारी गोरीपान माणसं पाहिलीच नव्हती कधी. त्यात त्यानं पहिल्यांदा अशी गोरी बाई बघितली. तिच्या अंगावर कोळिष्टकांनी बनलेली वस्त्रं आहेत, हे बघून तो चकित झाला. तिच्याबरोबर जीवशास्त्रज्ञ स्टेन होता. तो सिगारेट ओढत होता. त्याच्या तोंडातून धूर येताना पाहून झायची खात्रीच पटली, की हा देवच असला पाहिजे. याच्या पोटात आग आहे, आग!
वास्तविक अत्यंत दयनीय असा प्रवास जीपनं करून स्टेन, केट आणि कंपनी या जंगलात येऊन अडकली होती. त्यांची जीप तितक्‍याच दयनीय कारणांमुळे झाडाच्या शेंड्यावर जाऊन अडकली होती. आता ती तशी का अडकली, हे विचारू नका.
मधल्या काळात चेहऱ्यावरही केस असलेल्या एमप्युडीला झायनं थांबवून बाटली देऊ केली होती. कारण तेव्हा एमप्युडी गोल गोल फिरणाऱ्या दोन पायांच्या प्राण्यावर बसून चालला होता. हासुद्धा देवच असणार ना! पण तो "नको' म्हणाला. शिवाय त्याला तोडकी मोडकी बुशमनांची भाषा येत होती. एम्प्युडी हा झायला भला माणूस वाटला. झाडावरच्या त्या बबून माकडासारखाच. त्या बबूननं त्याची बाटली पळवून झाडाचा शेंडा गाठला होता, तेव्हा झायनं त्याला कित्ती समजावलं : ""बाबा रे, नको मोह धरूस त्या बेकार वस्तूचा. त्या वस्तूनंच माझी वाट लावली. कलागती लावणारी गोष्ट आहे ती. फेक माझ्याकडे. तुझं वाट्‌टोळं होईल, लेका!'' बबूननं त्याचं ऐकलं. बाटली फेकली...
भूक लागली म्हणून झायनं एक शेळी मारली. ती अर्थात कुण्या मेंढपाळाची मालमत्ता होती. त्याला अटक झाली. कोर्टात उभं करण्यात आलं. तिथं काही माणसं बसली होती. झाय सगळ्यांकडे बघून हसला; पण कोणीही ढिम्म हसले नाहीत. त्याला शिक्षा फर्मावण्यात आली.
""झायला देहांताची शिक्षा झाली!'' एमप्युडी हळहळत म्हणाला.
""तीन महिन्यांची झाली रे!'' स्टेननं त्याला सुधरवलं.
""तेच ते...त्या बिचाऱ्यानं आयुष्यात भिंत नावाची गोष्टच पाहिली नाहीये हो! तो मरणार तुरुंगात, म्हणजे देहांतच नाही का?''
मग स्टेन आणि एमप्युडीनं काही मखलाशी करून झायला सोडवलं. त्या सुमारास सॅम बोगा नावाचा दहशतवादी जंगलात दडी मारून बसलाय, अशी खबर असल्यानं पोलिसही गोळा झाले होते. झायचा मागकाढ्या म्हणून उपयोग करता येईल, अशा कल्पनेनं त्याची सुटका करण्यात आली. त्यानंही नेमून दिलेली काम चोख पार पाडलं. सॅम बोगाचा बोंगा त्यानं आवरलाच; पण इतरही अनेक अतुलनीय कामगिऱ्या पटापट केल्या.
पुढं काय घडलं? स्टेन आणि केटचं "जमलं' ते कसं? सॅम बोगाचं काय झालं? झायनं जगाच्या शेवटाला जाऊन ती बाटली देवाच्या हवाली केली का?... हे सगळं चित्रपटात पाहणंच उत्तम.
* * *

"द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा चित्रपटच मुळात इतका क्रेझी आहे, की त्याची थोडीफार गोष्ट सांगणंही थोडंसं दुष्टपणाचंच होईल. एक तर स्लॅपस्टिक धाटणीनं घडणाऱ्या त्या पळापळीच्या घटना. स्लॅपस्टिक धमाल, आणि आशयघन कथासूत्र असलं समीकरण चार्ली चॅप्लीनसारख्या एकमेवाद्वितीय प्रतिभावंतालाच जमू शकतं. "द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा त्या पठडीतलाही नाही. निवेदकाच्या सांगण्यानिशी कथा पुढे सरकत जाते. कलहारी वाळवंटातलं अनोळखी जग पटापट ओळखीचं, नव्हे दोस्तान्यातलं होऊन जातं. तिथलं निसर्गदत्त शांत जीवन आणि त्यात झालेली शहरी ढवळाढवळ एकाच वेळी मजा आणते, आणि चुटपुटही लावते. वन्यजीवांचं यातलं सुसंगत चित्रण कथानकाचा नकळत भाग होतं. त्यासाठी दिग्दर्शक जेमी ओइसनं एक लाख मैलांचा प्रवास केला म्हणे. त्याच्याकडे फक्‍त तीस जणांची चित्रीकरणाची टोळी होती. सगळेच्या सगळे नवखे! का? तर "नवखे लोक माझं ऐकतात म्हणून!' असलं उत्तर जेमीनं दिलं होतं.

जेमीच्या या चित्रपटीय खटाटोपाची दखल जगानं घेतली, हेही एक अक्रीतच. कारण तेव्हा दक्षिण आफ्रिका बहिष्कृत होता. आपल्या भारतातही हा चित्रपट तेव्हा बराच उशिरा रिलीज झाला होता. या चित्रपटाचा कॅमेरा डॉक्‍युमेंटरीसारखा घटना टिपत जातो. संगीतही ब्राह्म्स, चायकोवस्की असल्या अभिजात संगीतकारांच्या जुन्या सिंफनीज वापरूनच सजवलेलं; पण तिथल्या नेत्रसुखद वन्यसंपदेसाठी आणि स्लॅपस्टिक हालचालींसाठी ते इतकं अचूक परिणामकारक ठरतं की बस्स. ही आयडियादेखील अर्थातच दिग्दर्शक जेमी ओइसची. झायची मध्यवर्ती व्यक्‍तिरेखा साकारणाऱ्या निक्‍साव टोमा या बुशमनचा हा पहिला चित्रपट होता. त्याला दोन हजार डॉलर्स तेवढे मिळाले. अर्थात बराच पैसा गाठीला आल्यावर दिग्दर्शक ओइसनं त्याला आणखी वीस हजार डॉलर्स दिले. सन 2006 मध्ये हा निक्‍साव टोमा नामिबियातल्या आपल्या चिमुकल्या घरातच निवर्तला. जेमी ओइसनं नंतर त्याला घेऊन "द गॉड्‌स मस्ट बी क्रेझी' हा दुसरा भागही केला होता; पण तो विशेष चालला नाही. जपानमध्ये या चित्रपटानं सत्तरीच्या दशकात अनेक विक्रम मोडले होते. अमेरिकेत उत्तर कॅलिफोर्नियामधल्या क्‍युपर्टिनोच्या ओक्‍स थिएटरमध्ये हा चित्रपट सलग 532 दिवस सलग दाखवला गेला. शेवटी चित्रपटाची रिळं जळाली, तेव्हा त्याचे खेळ थांबले!
अर्थात, या चित्रपटात वर्णविद्वेषाचा निषेध नाही, इतकंच नव्हे तर छुपं समर्थन असल्याची टीकाही काही समीक्षकांनी केली. दिग्दर्शक जेमी ओइसनं त्याला उत्तरही दिलं नाही. आयुष्यभरात या झक्‍की इसमानं चोवीस सिनेमे काढले होते. त्यातला "ऍनिमल्स आर ब्युटिफूल पीपल' हा तर ग्रेट म्हणावा असा चित्रपट होता. सन 1974 मध्ये आलेल्या या चित्रपटानं जगातल्या वन्यप्रेमींच्या डोळ्याचं पारणं फेडलं होतं. तब्बल सात वर्ष अथक शूटिंग करून ओइसनं वन्यजीवांचे विविध मूड्‌स टिपून त्याचं कथेत रूपांतर केलेलं होतं. तो एक थोर अनुभव होता. कुणाही सुजाण माणसानं हा डॉक्‍युमेंटरीवजा चित्रपट बघावाच. प्राण्यांच्या जगातही धमाल असते. तिथं फक्‍त आहार, निद्रा, भय आणि मैथुन एवढ्याच गोष्टी नाहीत. किंबहुना या मूलभूत गरजांपोटीच अरण्यात बरीच धमाल घडत असते. ती जेमी ओइसनं अप्रतिम टिपली होती. वर्णविद्वेषाच्या बहिष्काराचा फटका त्याच्या या बेजोड चित्रपटाला बसला. इतकं महत्त्वाचं काम करूनही जेमी ओइसला कधी ऑस्कर मिळालं नाही. कारण त्याची बहुतेक कारकीर्द ही वर्णविद्वेषाच्या कालखंडातच घडली होती.

कोकची बाटली हे या चित्रपटातलं विकसित मानवाच्या आचरटपणाचं प्रतीक होतं, आणि झाय नावाचा आदिवासी निरागस निसर्गाचं मूतिंमंत रूप म्हणून उभं ठाकतं. बाकीच्या व्यक्‍तिरेखा आपल्या आयुष्यातले विविध ताणेबाणे दाखवणारी पात्रं आहेत. एकंदर चित्रपट संपतो, तेव्हा पंचतंत्रातली एखादी बोधकथा मनात तरंगायला लागते. "गॉड'ला "क्रेझी' म्हणणारा माणूसच खरा क्रेझी आहे, हे मनोमन पटतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT