Paplet State fish sakal
सप्तरंग

पापलेटायन (नवे मत्स्यपुराण..!)

समुद्रपुत्र पापलेट या जगप्रसिद्ध माश्‍याला महाराष्ट्राचा राज्य मासा हे पद (न मागता) मिळाले याचा विलक्षण आनंद आम्हाला होत आहे. राज्य मासा हे पद मिळणे सोपे नाही.

प्रवीण टोकेकर pravintokekar@gmail.com

समुद्रपुत्र पापलेट या जगप्रसिद्ध माश्‍याला महाराष्ट्राचा राज्य मासा हे पद (न मागता) मिळाले याचा विलक्षण आनंद आम्हाला होत आहे. राज्य मासा हे पद मिळणे सोपे नाही. त्यासाठी खूप काही सोसावे लागते. ते काही विधान परिषदेच्या नामनिर्देशित आमदारकीसारखे पद नव्हे, की नावे जाहीर करावीत आणि विसरून जावे!

पापलेटाच्या जीवनाचे आज चीज झाले, एवढेच आम्ही म्हणू. त्यासाठी आम्ही वनमंत्री, मत्स्य संवर्धनमंत्री आणि सांस्कृतिकमंत्री रा. सुधीर मुनगंटीवार यांनी जिवाचे रान केले, याखातर आम्ही त्यांचेही ऋणी आहो. समस्त समुद्री जीवांच्या वतीने आम्ही त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो.

जमला ऐसे प्रीत कर, जैसे मच्छ कराय

टुक इक जल थी बिछडै, तडप तडप मर जाय

-जमाल (१६२५, जमाल पचिसी या संग्रहातील दोहा.

अर्थ : जमाल ऐसी प्रीत करी रे, जशी करी मासोळी,

जळातुनी निघताच त्यागते, प्राणही ती अवकाळी

समस्त सागरी सजीवांचा महानायक मत्स्यराज सरंगादेव यांच्या गुणगायनासाठी आम्ही सज्ज झालो आहो. ‘अथश्री पापलेटकथा…’ अशी काहीशी सुश्राव्य सुरवात करणे उचित ठरले असते. परंतु, काही कारणाने आज नरडे काम देत नसल्याने लिखित स्वरूपात पापलेट माहात्म्य कथन करण्यावाचून तरणोपाय नाही. (माश्याची ष्टोरी सांगताना ‘तरणोपाय’ या शब्दप्रयोगाबद्दल आम्हीच स्वत:ची पाठ थोपटून घेत आहो!) सर्वप्रथम त्या परमेशाच्या प्रथमावताराला कृतज्ञतेचा एक नमस्कार करूनच हा लहान तोंडी मोठा घास घेत आहो.

सागरपुत्र सरंग्याचा महिमा काय वर्णावा? उपनिषत्काळापासूनच या माश्याचे उल्लेख आढळतात. अनेक युगांपूर्वी देव आणि असुरांमध्ये समुद्रमंथन पार पडले. क्षीरसागर घुसळून निघाला. त्यातून चौदा रत्ने बाहेर पडली. त्यातली देवांनी काही पळवली, काही असुरांनी ढापायचा यत्न केला. या मंथनात आणखीही काय काय बाहेर पडले. त्यापैकी सोळा नंबरचे रत्न म्हणजे सरंगा, असे म्हणतात.

यापेक्षा एक भारी दंतकथा ऐकिवात आहे : कोणे एके काळी दुष्यंतराजाने दिलेली मुद्रिका शकुंतलेने हरवली. ती पाण्यात पडली. ती गिळणारा मत्स्य म्हणजे दुसरा तिसरा कोणीही नसून पापलेट हाच होय! मुद्रिका गायब झाल्यानंतर दुष्यंतराजा शकुंतलेस विसरला. एका धीवराच्या ‘जाल्यांन’ सदरहू पापलेट गावल्यानंतरच सर्व गोष्टीचा उलगडा झाला. दुष्यंत-शकुंतला आख्यानावर पुढे अनेक शतके कीर्तनकारांची पोटे भरली. खुद्द सरंग्यावरही अनेकांची पोटे भरली, तो भाग वेगळा!

आणखी एक आख्यायिका : महाभारतकाळात भीमाच्या गदेला घाबरून दुर्योधन एका तळ्यात दडून बसला होता. जाम बाहेर येता येईना! त्याला एका सरंग्याने हुसकावले, तेव्हा दुर्योधनाने त्याला ‘पुढल्या जल्मी कावळा होशील’ असा शाप दिला, अशी एक अप्रकाशित आख्यायिका आहे.

कावळ्याच्या शापाने जशी गाय मरत नाही, तद्वत दुर्योधनाच्या शापाने सरंग्याचा कावळाही झाला नाही. पोटार्थ्याच्या उदरात जाऊन त्यास मोक्षप्राप्ती होते, कारण भीमाने तसा त्यास उ:शाप दिला होता, असे आख्यायिकेत म्हटले आहे. असो.

नमनाला एवढे तेल घातल्यानंतर सरंग्याची महती वाचकांच्या लक्षात आलीच असेल. सरंगा या नावाने सुपरिचित असलेल्या या मत्स्यराजास कालौघात अनेक नामे मिळाली. त्यापैकी पापलेट हे नाव सर्वाधिक रूढ झाले. समुद्रात शार्क, व्हेल, असे अगडबंब मासे असतात. त्यांना देवमासा असे ढोबळ मानाने म्हणतात. वास्तविक ही सारी राक्षसकुळातली नावे आहेत, हे कोणीही सांगेल! खरा देवमासा पापलेट हाच होय. ज्याच्या सेवनाने पाप थोडे लेट लागते, तो पुण्यप्रद मासा म्हणजे पापलेट.

समुद्रपुत्र पापलेट या जगप्रसिद्ध माश्याला महाराष्ट्राचा राज्य मासा हे पद (न मागता) मिळाले याचा विलक्षण आनंद आम्हाला होत आहे. राज्य मासा हे पद मिळणे सोपे नाही. त्यासाठी खूप काही सोसावे लागते. ते काही विधान परिषदेच्या नामनिर्देशित आमदारकीसारखे पद नव्हे, की नावे जाहीर करावीत आणि विसरून जावे!

पापलेटाच्या जीवनाचे आज चीज झाले, एवढेच आम्ही म्हणू. त्यासाठी वनमंत्री, मत्स्य संवर्धनमंत्री आणि सांस्कृतिकमंत्री रा. सुधीर मुनगंटीवार यांनी जिवाचे रान केले, याखातर आम्ही त्यांचेही ऋणी आहो. समस्त समुद्री जीवांच्या वतीने आम्ही त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो.

रा. सुधीर मुनगंटीवार या गृहस्थांनी महाराष्ट्रातील वाघांची संख्या वाढवली. त्यासाठी तमाम व्याघ्रकुळे त्यांच्याप्रती सदैव ऋणी राहतील. हल्ली दुसऱ्यासाठी एवढे कोण करते? एखाद्या व्याघ्रयुगुलास वंशवृद्धीसाठी प्रोत्साहन द्यायचे आणि त्यांच्या संसारवेलीवर बछड्यांची फुले लागली की त्यांचेही संगोपन करायचे, हे कर्मकठीण आहे; पण हे शिवधनुष्य मुनगंटीवारजी यांनी लीलया पेलले.

ताडोबा-चंद्रपुरातील अनेक वाघ मुनगंटीवारजींचे नाव घेतले की शिकार सोडून निघून जातात, असे कळते. अशा मुनगंटीवारजींनी पापलेटाचे पुनरुज्जीवन केले, असेच म्हटले पाहिजे.

महाराष्ट्राला सातशेवीस किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. या किनारपट्टीलगतच्या अरबी समुद्रातच हा पापलेट वास करून राहातो. (अर्थ : वास म्हणजे रहिवास याअर्थी!) आजमितीस अरबी समुद्रात फक्त तेवीस हजार पापलेटे तरंगतात, असे संशोधकांचे प्राथमिक अनुमान आहे. यापेक्षा जास्त आढळल्यास नुकत्याच झालेल्या विणीच्या हंगामात पापलेटांची संख्या वाढली असेल, आणि कमी आढळल्यास श्रावण पाळण्यात मऱ्हाटी मान्सांनी हयगय केल्याचे गृहीत धरावे!

श्रावणात पापलेटांची संख्या आपोआप वाढते. तथापि, परवाचे दिवशी शुक्रवारी सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी श्रावण महिना ऑफिशियली संपला. गणपतीबाप्पाच्या आगमनास अजुनी अल्पसा अवकाश असल्याने पापलेटे अचानक डेंजरझोनमध्ये आली.

सारांश, तेवीस हजार पापलेटे या संख्येला च्यालेंज करणे कठीण आहे, हे वाचकांच्या लक्षात आले असेल. त्यातून जिज्ञासूंनी समुद्रात जाऊन पापलेटे मोजून यावे, एवढेच आम्ही म्हणू. एकतर या माश्यास आजवर कोणीही पोहताना पाहिलेले नाही. जो काही मत्स्यविशेष दिसला तो मच्छीमार्केटातच. असो.

मत्स्याहारी संप्रदायात प्राय: दोनच ढोबळ प्रकार संभवतात. एक, पापलेट खाणारे, आणि दोन, पापलेट सोडून बाकी सारे काही खाणारे! बहुसंख्य मत्स्याहारी दुसऱ्या प्रकारात मोडतात. पापलेट खाणे हे प्रकरण पचायला तसे हलके असले तरी खिशाला जड असते. दोन्ही तळव्यांवर तोलूनही बाहेर उरणारा चांगला खापरी पापलेट दोनेक हजाराच्या वर भाव खातो. तसे पाहू गेल्यास हा श्रीमंतांचा मासा आहे. गरिबांच्या तो गळी उतरत नाही.

परंतु, केवळ किमतीमुळे त्यास नावे ठेवणे हे काही आम्हाला रुचत नाही. ‘‘आम्ही नाही बुवा तसलं काही खात, बांगडा आणि बोंबील खा! पापलेटाच्या तोंडात मारेल!’’ हा एक प्रचलित युक्तिवाद तोंडावर फेकला जातो. सामनेवाल्यास पापलेट पर्वडत नाही, हे वळखून आपण फक्त ऐकून घ्यावे! हे म्हंजे कुत्रे पाळण्याची ऐपत नसताना ‘आम्हाला नाही बुवा वाघ पाळायला आवडत’ असे म्हणण्यापैकी आहे.

उपरोक्त युक्तिवाद करणारे हे मासेखाऊंमधल्या दुसऱ्या प्रकारातले! हे लोक पापलेट सोडून बाकी सर्व मासे अतिशय चविष्ट आणि औषधी असतात, असे सांगत हिंडतात. मच्छीमार्केटात यांना ओळखणे कठीण नसते. यांना कोळीणही फार भाव देत नाही. हे लोक निवटे, बोंबील, मांदेळी अशा बारक्या माश्याकडे बघत उगीचच कोळंबी चिंबोऱ्यांचा भाव विचारतील, आणि पाच-सहा बोंबील किंवा बांगडे घेऊन जातील.

पापलेटाचं गिऱ्हाईक फारसे बोलत नाही; पण कोळीण त्यांचे आगमन अचूक हेरते. ही मंडळी मच्छीमार्केटातही आंघोळ करून आल्यासारखी स्वच्छ कपड्यात येतात. लांबूनच पापलेटाकडे बोट दाखवतात. कोळीणताई किंवा दादाही ‘‘दादूस, तुज्यासाठी काऱ्हून ठेवलाय, बघ, कसला भारी हाय...’’ असे सांगून स्पेशल ट्रीटमेंट देते. असली साहेबकुळीची माणसे सामान्यत: कोळणीचे पैसे पेटीएम किंवा जीपे करतात.

ही माणसे पापलेट किंवा सरंगा किंवा हलवा खात नाहीत- ते खातात सीफूड किंवा फिश! किंवा अगदीच तपशिलात जायची वेळ आली तर, पाँफ्रेट! बाकी पापलेटाला पाँफ्रेट अशा शुद्ध नावाने हाक मारणे म्हणजे इष्टुरफाकड्याला स्टुअर्ट फॉकलंड म्हणण्यापैकी आहे. लहानपणी आपण ‘ह्येका’च सरंगो म्हणत होतो, हेही साहेबमंडळी आता आलेल्या समृद्धीमुळे विसरलेली असते.

मनगटावरचे ॲपलवॉच नाचवत पापलेटचे गिऱ्हाईक मोबाइलवर बोलत बोलत मच्छीमार्केटातून बाहेर पडते, तेव्हा कोळीण खालच्या टोपलीतला दुसरा पापलेटाचा तजेलदार नग काढून पाटावर ठेवत असते...

तान्हेबाळ आईच्या दुधावर असते, काही महिन्यांनी त्याचे उष्टावण करावे लागते. बाळ आता मऊभात किंवा खिमटी खाऊ लागणार असते. कालांतराने तेच बाळ मोठे होऊन दोनेक वडापाव सहज पचवणार असते. मत्स्याहारी होण्याच्या मार्गावर असेच अनेक काटे असतात. (आणखी एक शाब्दिक कोटी, प्लीज नोट!) मासे खाणे ही कष्टसाध्य कला आहे. त्याचे उष्टावण पापलेटापासून होते. हाच तो मासा, जो माणसाला मत्स्याहाराची दीक्षा देतो.

पापलेटात एकच एक मधला काटा, बाकी सगळा देह शुभ्र चांदण्याचाच जणू! कोवळेलूस शहाळे खावे, तितक्या सहजतेने तो मुखी जातो. पापलेटासारखा भरवशाचा, सुरक्षित मासा नाही. म्हणूनच तो महाग आहे.

सुंदरशी पापलेटाची तळलेली तुकडी संपूर्ण दुपार तृप्तीने भरून टाकते. तो तव्यावरून थेट ताटात यावा किंवा हुमणातून पानात यावा. चटणी भरलेले आख्खे पापलेट ताटात येते, त्या दिवशी तर लॉटरीचे तिकीट घेऊन बघावे. लागून जाईल!

काही बांगडावादी लोकांना पापलेटाची मिजास आवडत नाही. न आवडो! मला वाघ आवडत नाही, असे म्हणण्यात काय पॉइण्ट आहे? ‘बांगडाच खरा राज्य मासा, पापलेटाचा काय खरा नाय’ असे बांगडावाद्यांचे प्रामाणिक मत आहे. बांगडा हा रयतेचा मासा आहे, हे खरेच. तुलनेने परवडण्याजोगा, आणि चवीलाही अप्रतिम! त्याला कोळशात भाजा, गवतात भाजा, तव्यावर टाका, नाही तर कालवणात फेका, ताज्या बांगड्याची सर कश्शाकश्शाला नाही.

बांगड्याच्या खुमारीची तुलना एखाद्या फक्कड लावणीशीच होऊ शकेल. पापलेट हे ‘शुक्रतारा’ टाइप भावगीत आहे, तर बांगडा ‘ऐक्का..’ असं म्हणत ढोलकीच्या तालावरच पावले टाकीत येणारी लावणी हाय! बाकी मुडदशे, निवटे, मांदेळ्या, मोत्कं हे झिलकरी!

पापलेटला जे ग्लॅमर आहे, ते बांगड्याला नाही की सुरमईलाही नाही. हा जगाचा न्याय आहे, अमिताभ बच्चनपेक्षा नवाजुद्दिन सिद्दिकी काय कमी चांगला अभिनेता आहे? कांकणभर सरसच असेल; पण तरीही बच्चनजीच महानायक आहेत. सुरमईला भले ‘किंग फिश’ म्हणा, पण खरा राजा पापलेटच!

येथे एक सावधानतेचा इशारा देणे आवश्यक आहे. पापलेटाचा आव आणून समुद्रात पोहणारा काळसर रंगाचा हलवा नावाचा एक मत्स्य गंडवागंडवी करत असतो. हलवा हादेखील एक चांगला मासा असला, तरी तो पापलेट नव्हे! काही लोक हलवा आणून पापलेट आणल्याचे ठोकून सांगतात! हे गैर आहे! हलव्याला राज्य मासा हे पद मिळालेले नाही, हे लक्षात घ्यावे. हंस तो हंस, आणि बदक ते बदक!!

वाचकहो, सागराच्या पोटात अपरंपार माया आहे. त्या मायेचा पूत म्हणजे आपला राज्य मासा पापलेट. राजा हा राजा असतो, ‘तुला कुणी राजा केला रे?’ असे त्याला विचारू नये. हा गादीचा मान आहे. तो पापलेटाला मिळाला, त्याला आमचा कुर्निसात!

तळटीप : प्रस्तुत लेखक स्वभावाने (आणि खिश्यानेही) बांगडावादीच आहे, पण ‘उगाच पापलेटाला नावे का ठेवा? या नेमस्त विचारांतून उपरोक्त ‘पापलेटायन’ उमटले. समुद्रार्पणमस्तु.

pravintokekar@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT