वेस्ट इंडिजमध्ये एकेकाळी क्रिकेटमधल्या देवदेवता राहात होत्या. गॅरी सोबर्सला बघायला इंग्लंड-ऑस्ट्रेलियाहून पर्यटक यायचे. विव रिचर्ड्सचं घर लांबूनच बघायचे. मायकेल होल्डंगचा तो बॉलिंग रनअप आठवून गालफडावर हात ठेवून ओठांचे चंबू करायचे. क्रिकेटचं माहेरघर होतं ते; पण कुणाची तरी जोरकस दृष्ट लागली. भरतीच्या लाटेनं वाळूचा किल्ला जमीनदोस्त व्हावा, तसं वेस्ट इंडिज बेटांवरचं क्रिकेटचं साम्राज्य विलयाला गेलं...
निळ्याशार कॅनव्हासवर कुणीतरी कुंचला झटकावा आणि हिरवे ठिपके पडावेत, तशी उत्तर अटलांटिक आणि कॅरिबियन समुद्रातली ही बेटं आहेत. चिमुकल्या बेटांवरचे चिमुकले देश. मस्त समुद्रकिनारा, लगातार नारळीची बनं, हसरी-नाचरी माणसं आणि... पोटात भुकेचे भलेमोठे खड्डे. राहायला खलाटी आणि पोट खपाटी. आपल्या कोकणासारखीच अवस्था.
खिशात पैसा नसला, तरी इथली माणसं जिंदादिल. जरा कुठं कुणी ठेका धरला की उभ्या जागी पाय नाचायला लागतात कुणाचे. समुद्राचा शेजार लाभलेली माणसं मनातून नारळपाण्यासारखी गोड असतात. आडदांड, तरीही हसरी. अठराविश्व दारिद्र्य असलं तरी जमेल तितक्या मजेत जगणारी. ही कॅलिप्सो संस्कृती इथं किती तरी युगं नांदते आहे. कोलंबसानं त्यांना शोधून काढलं, आणि मग त्यांचं दैव फिरलं.
या इथंच एकेकाळी क्रिकेटमधल्या देवदेवता राहात होत्या. गॅरी सोबर्सला बघायला इंग्लंड-ऑस्ट्रेलियाहून पर्यटक यायचे. विव रिचर्ड्सचं घर लांबूनच बघायचे. मायकेल होल्डिंगचा तो बोलिंग रनअप आठवून गालफडावर हात ठेवून ओठांचे चंबू करायचे. क्रिकेटचं माहेरघर होतं ते.
पण कुणाची तरी जोरकस दृष्ट लागली.
भरतीच्या लाटेनं वाळूचा किल्ला जमीनदोस्त व्हावा, तसं वेस्ट इंडिज बेटांवरचं क्रिकेटचं साम्राज्य विलयाला गेलं. दोन आठवड्यांपूर्वीच त्यावर शिक्कामोर्तब झालं. एकेकाळी अजिंक्य मानलं जाणारं इथलं क्रिकेट आता बहुधा कधीच मान वर करणार नाही. एकेकाळी याच क्रिकेट संघाचा तो खास ध्वज दिमाखानं फडकत असे.
आमसुली रंगाच्या पार्श्वभूमीवर एक चिमुकलं बेट, त्यावर ताडाचं गगनचुंबी झाड आणि आभाळात मृग नक्षत्र... असं चिन्ह दिसायचं. मृग नक्षत्र म्हणजे ओरायन... हा ओरायन (ब्रिटिश) सिंहाला घाबरत नाही, असं ठणकावून सांगणारा हा ध्वज पुढे रद्द झाला. नव्या ध्वजावर मृगाच्या तारामंडळाऐवजी स्टंप आले; पण ते ध्वजचिन्हही आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
कळवण्यास अत्यंत दु:ख होते की वेस्ट इंडिज क्रिकेटचं नुकतेच निधन झाले. ते एकशे तेहेत्तीस वर्षांचे होते. त्यांना शांतपणे झोपेतच मृत्यू आला. त्यांच्या पश्चात असंख्य कर्तबगार मुला-मुलींचा, नातवंडांचा, पतवंडांचा मोठा परिवार आहे; परंतु अंतसमयी त्यांच्यासोबत कोणीही नव्हते.
ना कुणी अश्रू ढाळले, ना कुणी श्रद्धांजलीपर प्रार्थना केली. ‘अजूनही ते आपल्यातच आहेत, आणि कधीही उठून बाहेरच्या खोलीत येतील, असा भास होतो. आठवणींच्या स्वरूपात ते कायम आपल्याजवळ राहतील,’ असे भावपूर्ण उद्गार त्यांचे एक सुपुत्र जोएल गार्नर यांनी काढले. आमेन.
ज्या वेस्ट इंडिजच्या तेज गोलंदाजाच्या चौकडीला क्रिकेटविश्व टरकून होतं, त्या विंडीजची ही दैन्यावस्था. एकेकाळी अजिंक्य समजला जाणारा हा संघ यंदा विश्वकरंडकाला पात्रदेखील ठरू शकला नाही. पात्रता फेरीत नऊपैकी फक्त तीन सामने त्यांना जिंकता आले. नेपाळ, संयुक्त अरब अमिरात आणि स्कॉटलंडसारख्या नवख्या संघांनी त्यांना हरवलं. काय हे? पहाडासारखा हिंदकेसरी केळीच्या सालावर घसरून पडला, आणि जायबंदी झाला? शेंबड्या, शाळकरी पोरानं गल्लीतल्या आडदांड भाईचा गेम केला? ऐसा क्यूं हुआ?
वेस्ट इंडिज हा काही एक देश नाही. अनेक छोट्या स्वायत्त देशांचं ते कडबोळं आहे. बार्बाडोस, गयाना, अंटिगा, लीवर्ड आणि त्यांचे पुत्रपौत्र अन्य बेटे, अशा आठेक संघांच्या वेगवेगळ्या क्रिकेट संघटना. त्या संघटनांचा एक महासंघ. तो विंडीजचा कसोटी चमू निवडणार. या लोकांमध्ये अंतर्गत भांडणं भरपूर आहेत, हे वेगळं सांगायला नको. या बेटांवर एकेकाळी ब्रिटिश सत्ता होती. अनेक वर्षं साहेब इथं विरंगुळा म्हणून क्रिकेट खेळला.
भारतात घडलं तसंच इथंही झालं. साहेब सोडून मायदेशी निघून गेला; पण क्रिकेटचे स्टंप आणि बॅट इथंच विसरला. स्थानिकांनी हा खेळ आपला मानला. पुढे तिथं क्रिकेट रुजलं. पण बव्हंशी गोरेच खेळायचे. कृष्णवर्णीय एखादाच. १९३९च्या सुरुवातीला वेस्ट इंडिजचा एक संघ इंग्लंडमध्ये पोचला. तिथं जिंकलाही!
पण तेव्हा दुसऱ्या महायुद्धाचे सायरन वाजू लागले होते. धुमश्चक्रीला सुरुवात होत होती. मग दहाएक वर्षं काही घडलं नाही. ही वादळापूर्वीची शांतता होती. नंतरची दशकं वेस हॉल, गॅरी सोबर्स प्रभृतींनी गाजवली. विंडीजचे काळेकभिन्न गोलंदाज देशोदेशीच्या फलंदाजांना घाबरवू लागले. सोबर्ससारखे फलंदाज आपली बॅट परजू लागले. १९६२च्या सुमाराला आपला भारतीय संघ कॅरिबियनमध्ये गेला होता.
विंडीज गोलंदाजांची जबरदस्त दहशत होती. तिथं नरी काँट्रॅक्टरच्या डोक्यावर चार्ली ग्रिफिथचा चेंडू आदळला. कवटीलाच मार बसला. नरी यांचं करिअरच तिकडे संपलं. नशिबी चाकाची खुर्ची आली. दैत्यासमान विंडीज गोलंदाजांनी नंतर अक्षरश: भयाचं वातावरण पसरवलं.
सत्तर ते नव्वदीचं दशक या वीस-पंचवीस वर्षांच्या काळात विंडीज ही क्रिकेटमधली अजेय ताकद ओळखली जाऊ लागली. वेस हॉलनं तर भारतात येऊन पदार्पणात हॅटट्रिक घेऊन दाखवलेली. सर गॅरी सोबर्सनंतर नामचीन खेळाडूंची रांग लागली. लान्स गिब्ज, जॉर्ज हेडली, क्लाइव लॉईड, विव्ह रिचर्डस, अँडी रॉबर्टस, वॉलकॉट, कालीचरण, ग्रीनीज, होल्डिंग, मार्शल, लारा... किती नावं घ्यायची?
सत्तरीच्या दशकात उत्तरार्धामध्ये आपल्याकडे क्लाइव लॉइडचा विंडीज संघ आला होता. आत्ता जे पन्नाशीत आहेत, त्यांना ती मालिका नक्की आठवत असेल. विंडीजच्या खेळाडूंचे नुसते ‘साइज’ बघून आपल्या लोकांची छाती दडपली होती. तो काळ ब्लॅक-व्हाइट टेलिव्हिजनचा होता. घरोघरी टीव्ही बोकाळलेही नव्हतेच.
जे काही चित्र दिसायचं ते लाटालाटांनी वाहून जायचं. गच्चीवरची अंटेना योग्य दिशेला फिरवणं हा कौशल्याचा भाग होता. पडद्यावरचं चित्र हलायला लागलं, रेघोळ्यांनी भरायला लागलं की टीव्हीच्या कानफडात मारली जायची, मग आल्विन कालिचरण वगैरे दिसायला लागायचे. अँडी रॉबर्ट्स समोरून धावत यायचा. पुढ्यात बिचारा गुंडाप्पा विश्वनाथ किंवा सुनील गावस्कर.
विश्वनाथनी सुंदर अर्धशतक केलं म्हणून लॉइडनं त्याला भर मैदानात चक्क कडेवर घेतलं होतं. हे विंडीजचे असुर मनानं भारी आहेत हे भारतीय मनांना भावलं होतं. मैदानात भारतीय गोलंदाजीची पिसं काढणारे आणि फलंदाजांची तंतरवणारे विंडीजचे क्रिकेटपटू भारतीयांचे दुश्मन वगैरे कधीच नव्हते. पाकिस्तानी संघानं कितीही चांगला खेळ केला, तरी त्यांच्याबद्दल नाही म्हटलं तरी एक अढी असतेच.
जावेद मियांदाद, इंझमाम, शहीद आफ्रिदी यांच्या तर मातापित्यांचे उद्धार व्हायचे; पण विंडीजच्या खेळाडूंबाबत मात्र भारतीय क्रिकेटवेडी मनं नेहमीच पार्श्यालिटी करायची. दैत्यासमान दिसत असूनही त्यांच्याबद्दल प्रेम आणि कौतुक होतं. अर्थात हे फक्त भारतातच होतं असं नव्हे, विंडीजची क्रिकेटमधली ताकद वादातीत होती.
१९८३च्या प्रुडेन्शियल विश्वकरंडकात आक्रित घडलं. अंतिम लढतीत कपिलदेवच्या भारतीय संघानं विंडीजचा पाडाव करत जगज्जेतेपद पटकावलं. डेव्हिड विरुद्ध गोलायथ असाच हा संघर्ष होता. या पराभवाचा धक्का एवढा जबर होता की बरीच वर्षं विंडीज त्यातून सावरला नाही. खरं तर कधीच नाही सावरला. १९८७ पर्यंत विंडीजचा तसा दबदबा राहिला; पण पायाचे चिरे हलू लागले होते...
हा संघ वाटतो तितका अजेय नाही, त्याला हरवता येऊ शकतं, हे सिद्ध झालं. सिंह कितीही सिंह असला तरी सर्कशीत त्याला रिंगमास्तराच्या हंटरची भीती वाटतेच. नवं सहस्रक उजाडलं आणि विंडीजच्या क्रिकेटविश्वाला जणू ग्रहणच लागलं.
आयपीएलचा उदय होत होता. कसोटी क्रिकेटच्या दीर्घ लढती कंटाळवाण्या वाटून मामला एका दिवसात आटोपण्याचं युगही जुनं झालं होतं. क्रिकेट आणखी स्मार्ट व्हायला हवं, अशी मागणी होत होती. मुळात पटापट गल्ला ओढण्याची घाई सुटली. त्यातून टी-ट्वेंटीच्या साखळ्या उभ्या राहू लागल्या. भारतात तर आयपीएलनं क्रिकेटचा चेहरामोहराच पालटायला घेतला.
क्रिकेटचा परिपोष उत्तम प्रकारे होईल, यासाठी भारतात पद्धतशीर एक व्यवस्था काम करत होती. तिला यशही येत होतं. आज तर ही व्यवस्था पूर्णत: कॉर्पोरेटाइज झाली आहे. नफा-तोट्याची अचूक गणितं, विक्रयतंत्राचे नवनवे आयाम, व्यवस्थापनातल्या खाचाखोचा... एक नवंच विश्व साकारत गेलं.
भारतात हे शक्य झालं, कारण इथं क्रिकेटचं वेड लागलेला प्रेक्षक आधीच तयार होता. त्यात जागतिकीकरणाचा रेटा आला. क्रिकेटची नवी जैविक व्यवस्था उभी राहण्यात काहीच अडचणी उरल्या नाहीत. उलट ज्यांच्या हातात देशाची सूत्रं होती, ते राजकारणीच क्रिकेटमध्ये रस घेऊ लागले होते. अगदी याच्या उलट वेस्ट इंडिजमध्ये घडत होतं...
क्रिकेटची व्यवस्था जवळपास उद्ध्वस्त झाली होती. छोटी छोटी कॅरिबियन बेटं ती. त्यांची अर्थव्यवस्था असून असून किती सुदृढ असणार? क्रिकेटच्या संवर्धनासाठी पैका उधळणं त्यांना परवडण्याजोगं नव्हतंच; पण त्यात ठिकठिकाणच्या क्रिकेट संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापले रंग दाखवायला सुरुवात केली.
दोन वर्षांपूर्वी कोलकात्यातला टी-ट्वेंटी विश्वकरंडक वेस्ट इंडिजनं जिंकला, तेव्हा त्यांचे क्रिकेटपटू अक्षरश: विपन्नावस्थेत भारतात खेळायला आले होते. त्यांच्यापाशी धड ना जोडे होते, ना घरचे चांगले कपडे. हे सगळं त्यांना भारतीय आयोजकांनी जमा करून दिलं होतं. त्याच सुमारास विंडीजचा महिला संघही जगज्जेता ठरल्याची बातमी आली होती; पण सेलिब्रेट करायला त्यांच्याकडे फारसे पैसेच नव्हते. त्यांच्या क्रिकेट मंडळानं त्यांना जणू वाऱ्यावर सोडलं होतं.
भारतात क्रिकेटचा विकास होत होता आणि तिकडे ते विश्व ढासळत चाललं होतं. वेस्ट इंडिजमधली क्रिकेटची गुणवत्ता अचानक आटली, असं काहीही झालेलं नाही. आजही तिथं उत्तम दर्जाचे क्रिकेटपटू तयार होतात; पण त्यांचं देशाकडून खेळायचं मनच नसतं. आयपीएलच्या फ्रँचायझी आता पुढल्या टप्प्यावर गेल्या आहेत.
उदाहरणार्थ, मुंबई इंडियन हा संघ भारतातला; पण आता एमआय एमिरेट्स, एमआय लिस्बन, एमआय... असेही नवे संघ स्थानिक साखळ्यांमध्ये खेळू लागले आहेत. तिथं पैसा मिळतो. खेळाडू आपापत: तिथं ओढले जातात. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाकडे ना पैसा, ना काही नवं करण्याची उमेद. तिथं जीव जाळण्यापेक्षा पोटापुरतं कमवावं, हा उदात्त हेतू फक्त विंडीज क्रिकेटपटूंकडे उरला!
अर्थव्यवस्थेचं किरटेपण, प्रशासकीय अनास्था आणि क्रिकेटच्या वाढीसाठी लागणाऱ्या साधनसामग्रीची वानवा ही काही ढोबळ कारणं वेस्ट इंडिज क्रिकेटच्या अस्ताला कारणीभूत ठरली. यातून पुन्हा विंडीज सावरेल का? खरं तर याचं उत्तर नकारार्थी आहे. नाही सावरणार. कारण तसं ते सावरायला हवंय कोणाला? विंडीजच्या क्रिकेट गुणवत्तेची आता मार्केटला फारशी गरज उरलेली नाही.
ते जगलं काय, खुरटलं काय, नि मेलं काय... कुणाला पर्वा आहे?
काहीतरी चमत्कार व्हावा, आणि विंडीजचा तो लौकिक पुन्हा मिळावा. तो सुवर्णकाळ परत यावा. क्रिकेटच्या विश्वात पुनर्जन्म वगैरे असतो का? असला तर बरंच.
pravintokekar@gmail.com
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.