Tennis Competition sakal
सप्तरंग

गवतालाही असतो इतिहास…

लंडनच्या चर्च रोडवरल्या ‘ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लब’च्या शानदार वास्तूपलिकडे पसरलेल्या सेंटर कोर्टच्या हिरवळीची शताब्दी यंदा साजरी झाली.

प्रवीण टोकेकर pravintokekar@gmail.com

लंडनच्या चर्च रोडवरल्या ‘ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लब’च्या शानदार वास्तूपलिकडे पसरलेल्या सेंटर कोर्टच्या हिरवळीची शताब्दी यंदा साजरी झाली.

If you can dream—

and not make dreams your master;   

If you can think—

and not make thoughts your aim;   

If you can meet with Triumph and Disaster

And treat those two impostors just the same;   

-‘इफ-’ या कवितेतील ओळी, कवि : रुडयार्ड किपलिंग, थोर ब्रिटिश लेखक, कवी. (१८६८- १९३०)

लंडनच्या चर्च रोडवरल्या ‘ऑल इंग्लंड लॉन टेनिस क्लब’च्या शानदार वास्तूपलिकडे पसरलेल्या सेंटर कोर्टच्या हिरवळीची शताब्दी यंदा साजरी झाली. हिरवळीलाही देदीप्यमान इतिहास असतो. तृणपात्यांचीही एक बखर असते, त्यांना गतस्मृतींचा गंध असतो. टेनिस जगतामध्ये गेल्या रविवारी तसाच तृणगंध दरवळला. विम्बल्डनच्या कोर्टवर या हिरवळीची आगळीच मिजास आहे. एरवी पायदळी तुडवली जाणारी हरळी इथे लाडाकोडात वाढवली जाते. तिला इजिप्शियन गालिच्यापेक्षाही मोठा मान मिळतो. टेनिसजगताची ही काशी, पंढरी, मक्का, व्हॅटिकन…काहीही म्हणा. विम्बल्डन, विम्बल्डन आहे.

आधुनिक टेनिसचा इतिहास तसा एकोणिसाव्या शतकातला. या खेळाचं कूळ आणि मूळ फ्रेंचांकडे बोट दाखवत असलं तरी त्याला आधुनिक बाज दिला तो वॉल्टर विंगफिल्ड नामक एका ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यानं. त्यानं काही खेळाचे नियम तयार केले. रॅकेटची ठेवण, चेंडूचा प्रकार, कोर्टमधल्या जाळ्याची उंची हे ठरवलं. हा खेळ लौकरच लोकप्रिय झाला, सामान्यांपर्यंत पोचला. अर्थात तो पहिल्यापासून बहरला हिरवळीवरच.

पुढे मातीचं कोर्ट, हार्ड कोर्ट, कार्पेट कोर्ट किंवा लाकडी कोर्ट असे प्रकार आले, पण हिरवळ आणि तीही विम्बल्डनचीच, याला काहीएक विशेष अर्थ आहे. १८७७ पासून ‘विम्बल्डन लॉन टेनिस स्पर्धा’ भरवली जाते आहे. सुरुवातीच्या काळात या लढती पैजांवर लढल्या जायच्या. एखादी गिनी, शिलिंग डावावर लावून गडी कोर्टमध्ये उतरायचे. थोडाफार पैका, आणि भरपूर टाइमपास! पण पुढे विंगफिल्डसाहेबाच्या प्रयत्नामुळे या लढतींना चांगलं स्पर्धेचं रुप आलं. शुभ्रधवल कपड्यातल्या धुवट जंटलमनांचा कोर्टवर वावर सुरु झाला. क्रिकेट हा जसा जंटलमन लोकांचा खेळ होता, तसाच टेनिसही झाला.

लंडनमध्येच तेव्हा वॉर्पल मार्गावर आधी ‘ऑल इंग्लंड क्रॉकेट अँड टेनिस क्लब’च्या स्पर्धा भरायच्या, पण १९२२ साली या स्पर्धेनं आपलं बस्तान आत्ताच्या चर्च रोडवरच्या शानदार संकुलात हलवलं. तिथं मस्त ग्रासकोर्ट आच्छादलेलं होतं. स्पिनी गिअर म्हणून कुण्या विजेत्यानं १९२२ साली विम्बल्डन स्पर्धेतले एकेरीचे विजेतेपद जिंकल्याची पहिली नोंद या हिरवळीवर झाली आहे. कालौघात एक मध्यवर्ती कोर्ट, आणि आजूबाजूला आणखी काही कोर्ट उभी राहिली. मध्यवर्ती म्हणून सेंटर कोर्ट म्हणायचं. सेंटर कोर्ट वेगळं, आणि कोर्ट क्र. एक वेगळं! या कोर्टाची पायरी चढण्यासाठी माणसानं शहाणं असण्याची पूर्वअट आधी नव्हती, ब्रिटिश राजघराण्यानं आपली मायेची पाखर टेनिस या खेळावर केली, तेव्हापासून मात्र शहाण्यासारखं वागणं क्रमप्राप्त झालं असावं. प्रारंभी कविवर्य रुडयार्ड किपलिंगच्या कवितेतल्या ओळी दिल्या आहेत, त्यातल्या शेवटच्या दोन ओळी तर विम्बल्डन सेंटर कोर्टच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आल्या आहेत. जय-पराजय या दोघा शिरजोरांना भेटलात तर एका मापात मोजा, असं सुचवणाऱ्या या ओळी आहेत.

१९२२ सालच्या अशाच एका जून महिन्यात इथल्या सेंटर कोर्टचा शुभारंभ झाला होता, त्याला पुढल्या शंभर वर्षात टेनिसमधल्या पवित्र तीर्थस्थळाचा मान मिळाला. वास्तविक तो काळ तसा कठीण होता. पहिल्या महायुद्धाची धग जाणवत होतीच, पण आणखी दीड दशकानंतर सगळं जग दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत होरपळलं गेलं होतं. त्याही काळात विम्बल्डनच्या स्पर्धा हट्टाने चालू ठेवण्याकडेच क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा कल होता. लंडनवर बॉम्बिंग चालू होतं, तेव्हा नाटकंही चालू होतीच. ‘आम्हाला थोडं मोठ्या आवाजात ओरडावं लागत होतं इतकंच’ अशी तिरकस मल्लिनाथी एका जुन्या ब्रिटिश नटानं केलेली आठवते. १९४० साली ऐन युद्धकाळात, एक बॉम्ब सेंटर कोर्टच्या कोपऱ्यावर येऊन आदळला, आणि नंतर चार-पाच वर्षे या स्पर्धा झाल्याच नाहीत. त्यानंतर मात्र स्पर्धेत कधीही खंड पडला नाही- अपवाद अर्थात दोन वर्षापूर्वीच्या कोरोनाच्या साथीचा. २०२० मध्ये मात्र स्पर्धा बंद ठेवावी लागली होती.

ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा, विम्बल्डन, फ्रेंच खुली स्पर्धा आणि अमेरिकन खुली स्पर्धा या चार ग्रँड स्लॅम स्पर्धा. एकाच वर्षात या चारही स्पर्धा जिंकल्या की ‘ग्रँड स्लॅम’ पूर्ण झाला असे म्हणायचे. टेनिसमधली ही चारधाम यात्राच जणू. त्यातही विम्बल्डनचं हिरवळीचं कोर्ट सर्वांचं सर्वात लाडकं!

या टेनिसतीर्थाच्या इतिहासाची पाने थोडीशी आणखी चाळली की समजतं: या हिरवळीने केवढे काय काय पाहिलंय, पचवलंय, भोगलंय ! ‘जंटलमन’ आणि ‘लेडीज लोकां’ च्या शौकापासून ते आजकालच्या कोट्यानुकोटी उड्डाणे करणाऱ्या आर्थिक उलाढालींपर्यत. एक शिलिंग देऊन लढती बघायला येणाऱ्या हौश्यानवश्यांपासून जगभरातल्या दिग्गज व्यक्तिमत्त्वापर्यंत. बेसलाइनच्या संथ खेळापासून सणसणत जाणाऱ्या बिनतोड सर्व्हिसेसच्या पॉवर गेमपर्यंत…केवढी तरी स्थित्यंतरं या इथल्या गवताच्या पात्यांनी पाहिली आहेत.

विम्बल्डन स्पर्धा जिथे होतात, ते संकुल आता खूपच विस्तारलं आहे, आधुनिक झालं आहे. अगदी दर्शनी भिंतीवर हिरव्यागार वेलींचा ताटवा फुलला. एक सुंदरसं वस्तुसंग्रहालय पर्यटकांना बोलावू लागलं. सेंटरकोर्टवर काही मिनिटात आच्छादलं जाणारं छप्परही आलं. इतकंच काय ‘विंबलवर्ल्ड’ नावाचा ग्राफिक खेळही बाजारात आला.

पूर्वी पावसाच्या सरी आल्या की खेळ थांबत असे. बघावं तेव्हा इथली हिरवळ ओलीकच्च असायची. लंडनचं हवामान आधीच लहरीपणाबद्दल बदनाम. त्यात इथे नैसर्गिकरित्या, काळजीकाट्याने वाढवलेली आणि खुल्या आभाळाखाली राखलेली हिरवळ. आता वेगवेगळ्या प्रकारच्या हरळी, त्यांचं ठरावीक प्रमाण, मातीतली आर्द्रता, सगळं कसं शास्त्रोक्त पद्धतीनं होत असतं. तंत्रज्ञान सुधारलं, तसं वनस्पतीशास्त्रही पुढं गेलंच. वास्तविक बऱ्याच खेळाडूंना इथल्या ग्रासकोर्टवर खेळणं जड जातं. इवान लेंडलसारखा दिग्गज टेनिसपटू एकदा वैतागून ओरडला होता की, ‘हे गवत जीव नकोसा करतं, यापुढे अजिबात खेळणार नाही इथं.’ पण पुढल्या वर्षी पुन्हा रॅकेट परजत गडी कोर्टावर हजर होता!

जूनअखेर जवळ आली की जगातल्या टेनिस चाहत्यांना विम्बल्डनची चाहूल लागते. तारखा आधीच ठरलेल्या असतात. त्यानुसार पर्यटनाचे कार्यक्रम ठरतात. कार्यालयातल्या सुट्ट्या निश्वित होतात. मनात इथली हिरवळ दाटू लागते. साहेबाच्या देशात रांगेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. दोन इंग्रज एकत्र आले की, आपोआप रांग धरतात म्हणे! विम्बल्डनची तिकिटे मिळवण्यासाठी अनेक चाहते आदल्या रात्रीच येऊन क्लबच्या परिसरात मुक्काम ठोकतात. बाकायदा घरुन तंबू वगैरे आणून मजा करतात. विम्बल्डन पार्क फुलून जातं. फेसाळणारी बिअर वाहात असते. हास्यविनोदाची कारंजी एडत असतात. रात्र अशी जागवून मंडळी सकाळी उठून रांगेत उभी! यंदाही हे चित्र दिसलं. कोरोनाकाळात तिकिटे ऑनलाइन विकली गेली होती, त्यामुळे तंबूतला मुक्काम आणि रांगा नव्हत्या.

स्ट्रॉबेरीज विथ क्रीम, पांढऱ्याशुभ्र रंगाचं अधिपत्य आणि तिथलं ‘पिम्स’चं जगप्रसिध्द पेय या तीन गोष्टी विम्बल्डनच्या टेनिस सोहळ्याशी कायमच्या जोडल्या गेल्या आहेत. विम्बल्डन पार्कांतल्या त्या तंबूतल्या मजेदार रात्रींमध्ये कित्येक मनेही जुळल्याच्या प्रेमकहाण्या ऐकू येतात. त्यांना स्ट्रॉबेरीचा स्वाद असतो, पांढऱ्या रंगाचा परंपरागत सभ्य बाज असतो, आणि हिरवळीचा गंधही असतो.

त्या ऐतिहासिक हरिततृणांच्या मखमालीच्या या शताब्दीपूर्तीखातरच कित्येक दिगंत कीर्तीचे विम्बल्डन विजेते गेल्या रविवारी आपुलकीने येऊन रांगेत उभे राहिले होते. त्यांच्यापैकी अनेकांच्या झगझगीत कारकिर्दींचा परमोच्च क्षण इथेच साकारला होता, टेनिसच्या इतिहासाच्या बखरीतली नोंद म्हणून अजरामर झाला होता. त्यात ८३ वर्षांचे वयोवृद्ध विजेते रॉड लेवर होते. सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपदे जिंकण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर होता. टेनिसविश्वातले ते डॉन ब्रॅडमनच. अंतर्बाह्य ऑस्ट्रेलियन असलेल्या रॉड लेवर यांनी रविवारच्या समारंभात सेंटर कोर्टवर एण्ट्री घेतली, तेव्हा तिथे उपस्थित असलेले पंधरा हजार प्रेक्षक थरारुन उठून उभेच राहिले. महिला टेनिसची पताका अभिमानाने फडकती ठेवणाऱ्या ७८ वर्षांच्या बिली जीन किंग अवतरल्या, तेव्हा आपलं परीटघडीचं साहेबीपण सोडून प्रेक्षकांनी त्यांना दिलखुलास मानवंदना दिली. ‘म्हारी छोरियां छोरों से कम है के…’ हा फिल्मी डायलॉग साठी-सत्तरीच्या दशकातच या बाईंनी आपल्या कर्तृत्त्वाने उच्चारुन दाखवला होता. तब्बल वीस विम्बल्डन जेतेपदं बिली जीन किंगच्या कपाटात आहेत.१९७०च्या सुमारास महिलांचं टेनिस लाडाकोडापुरतं ठीक आहे, पण टेनिस खेळावं तर पुरुषांनीच, असा सूर एकमुखाने आळवला जात होता. तेव्हा बिली जीन किंगने ‘बॅटल ऑफ सेक्सेस’ या नावाने गाजलेल्या स्त्रीशक्तीच्या टेनिस चळवळीत बॉबी रिग्ज या पुरुष विजेत्याला तीन सेटमध्ये हरवून बोलभांडांची तोंडं बंद केली होती.

विम्बल्डनच्या हिरवळीशी जिचं अतूट नातं निर्माण झालं होतं, त्या नऊ वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मार्टिना नवरातिलोवाला कोरोनाचा ताप आल्याने या समारंभात सामील होता आलं नाही, पण तिची पारंपरिक प्रतिस्पर्धी, क्रिस एव्हर्ट मात्र आवर्जून उपस्थित होती. मार्टिना हिंगिस, सेरेना विल्यम्स यादेखील होत्याच. स्टेफी ग्राफ येऊ शकली नाही. १९९६ साली अचानक विजेतेपदाची माळ गळ्यात पडलेला पॅट कॅश आला होता. ‘आता माझं काय व्हायचं ते होवो, मी आयुष्यभरासाठी माजी विम्बल्डन चँपियन तरी झालो’ हे पठ्ठ्यानं खुल्या मनानं तिथल्या तिथंच कबूल करुन टाकलं होतं तेव्हा! जगज्जेत्या इव्हान लेंडलचा पाडाव त्याने करुन खळबळ उडवली होती. विम्बल्डनवर ज्याने इतिहास घडवला, तो बियॉ बोर्ग अवतरला तेव्हा लोकांना उचंबळून आलं होतं. बियाँ बोर्गचा तेव्हाचा कडवा प्रतिस्पर्धी जॉन मॅकेन्रो हाही उपस्थित होता, पण तो सूत्रसंचालक म्हणून. १९८० सालची या दोघांमधली लढत म्हणजे ‘ जणू जिंकाया गगनाचे स्वामित्त्व, आषाढघनांशी झुंजे वादळवात’ या कुसुमाग्रजांच्या ओळीतल्या वर्णनासारखीच होती. चार तास चाललेली ती भयानक लढत बोर्ग जिंकला, पण पुढल्याच वर्षी मॅकेन्रोनं बोर्गचा पाडाव करत वचपा काढला होता. भडक डोक्याचा मॅकेन्रो त्याच्या वर्तनामुळे नेहमी वादात अडकायचा. याउलट थंड डोक्याचा बोर्ग. आइसबर्ग (हिमखंड) असंच म्हणायचे त्याला. रविवारी मात्र दोघेही कडकडून एकमेकांना भेटले.

विम्बल्डनचे कौतुक ब्रिटिशांना खूप असलं तरी ७७ वर्षे हा किताब ब्रिटिश टेनिसपटूच्या वाट्याला आला नव्हता. ब्रिटिश लोकांमध्ये त्यावरुन बरेच विनोद होत. २००६ साली अँडी मरेनं विम्बल्डनचा करंडक जिंकून महाराणीला एकदाचा नजर केला, आणि हा दुष्काळ संपला. म्हणून त्याचंही या सोहळ्यात अपरंपार कौतुक झालं. याशिवायही अनेक टेनिस सितारे त्या हिरवळीवरील कार्यक्रमाला हजर होते. अर्थात मारिया शारापोवा नव्हती. रशिया आणि बेलारुसशी नातं सांगणारे कोणीच नव्हते. युध्दमान देशांच्या खेळाडूंना विम्बल्डनला बोलावत नाहीत. त्यातून रशिया तर बहिष्कृतच आहे सध्या.

सेंटर कोर्टच्या हिरवळीवर पार पडलेल्या या छोटेखानी कार्यक्रमात फ्रिया रायडिंग्ज या तरुण गायिकेने पांढऱ्याशुभ्र पियानोवर बोटे फिरवत सुंदरसं भावगीत म्हटलं. तेव्हा या दिग्गज नायक-नायिकांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं होतं. साध्या गवताच्या पात्याशीही आपलं नातं किती जोडलं जातं, याचंच ते प्रत्यंतर होतं. अर्थात त्यांच्यासाठी हे निव्वळ गवत नाहीच, ती इतिहासाची तृणपाती आहेत.

हरळीचं आयुष्य असंच. तीर्थस्थळी पडली की तिच्या अस्तित्त्वाचं सोनं होतं. भगवंताच्या चरणी विसावली की दुर्वा, आणि बांधावर उगवली की तिचं तण होतं. विम्बल्डनची हिरवळ शंभर वर्षाची झाली, तरी अजून हिरवीगार आहे, ती उगाच नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT