Prime Minister Narendra Modi visit to Pune roadmap and development urbanization sakal
सप्तरंग

शहरीकरणावर मुक्त चिंतन आणि विकासाचा रोडमॅपही...

संभाजी पाटील

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात जोरदार राजकीय फटकेबाजी होईल, राज्य सरकारसोबत ताणलेल्या संबंधांवर भाष्य होईल, असे वाटले होते. पण मोदी यांनी राजकीय वक्तव्य टाळत केंद्र सरकारकडून शहरांसाठी करण्यात येणाऱ्या विकासकामांचा रोड मॅप सादर केला. वाढत्या शहरीकरणाला सामोरे जाताना भविष्यात सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, हे सांगून नागरीकरणावर मुक्त चिंतन केले.

पाच राज्यांतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील भाषणेही राजकीय स्वरूपाची होती. महाराष्ट्र सरकारवर त्यांनी केलेली टीका वादग्रस्त ठरली. या पार्श्वभूमीवर प्रथमच महाराष्ट्रात आलेले मोदी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मेट्रोचा शुभारंभ आणि इतर विकास प्रकल्पांचे भूमीपूजन करून ते भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडतील असे वातावरण तयार करण्यात आले होते. पण मोदी यांनी संसदेत करावे असे भाषण करून शहरी विकास, भविष्यातील आव्हाने आणि केंद्र सरकारचे प्रयत्न यावर सविस्तर विवेचन केले.

पुणे महापालिकेत बसविलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करून राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वातावरणावर फुंकर घातली. त्यानंतर त्यांनी पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. मोदींनी यावेळी तिकीट काढून आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी युवा विशेषतः दिव्यांग मुला-मुलींशी संवादही साधला. यावेळी त्यांनी पुणेकरांना मेट्रोने प्रवास करण्याची सवय लावून घ्या, असं आवाहन केलं. तसेच स्वच्छतेचे महत्त्वही पटवून देत केंद्र सरकारने सुरू केलेला विकासाचा रोडमॅप मांडला. विकासकामांच्या भूमीपूजनावरून काँग्रेसला चिमटे काढतानाच मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोसाठी घेतलेल्या परिश्रमाचे मोदींनी कौतुक करण्यास ते विसरले नाहीत. मोदींनी आजच्या भाषणात काँग्रेसचा एक अपवाद वगळता राजकीय भाष्य करणे टाळले.

मेट्रो, नदी संवर्धन, जायका या प्रकल्पांबाबत भाष्य करताना मोदींनी देशात वेगाने होणाऱ्या शहरीकरणाची कल्पना दिली. २०३० पर्यंत आपली शहरी लोकसंख्या ६० कोटींच्याही पुढे जाईल. शहरांतील वाढती लोकसंख्या अनेक संधी निर्माण करतेय. पण त्यासोबतच आव्हानेही वाढताहेत याची जाणीवही त्यांनी केली.

पुण्याने शिक्षण, संशोधन, आयटी, बिझनेसमध्येही आपली ओळख मजबूत केलीय. अशात आधुनिक सेवा सुविधा पुण्याच्या लोकांची गरज आहे. आमचं सरकार पुण्याची गरज ओळखून काम करते आहे. मेट्रो पुण्यातील मोबिलिटी अधिक सोपी करेल. प्रदूषण आणि वाहतूककोंडी कमी करेल. ईज ऑफ लिव्हिंग वाढवेल, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

देशातील वाढत्या शहरीकरणाचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून , सरकार अधिकाधिक हरित वाहतूक, इलेक्ट्रिक बसेस, इलेक्ट्रिक मोटार आणि इलेक्ट्रिक दुचाकी त्याचप्रमाणे प्रत्येक शहरात अत्याधुनिक वाहतूक सुविधा, सार्वजनिक वाहतुकीच्या सर्व सुविधांसाठी नागरिकांना एकच कार्ड प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे ,अशा प्रकारच्या उपक्रमांची पंतप्रधानांनी यादी सांगितली. सुविधा अत्याधुनिक करण्यासाठी प्रत्येक शहरात एकात्मिक कमांड आणि कंट्रोल केंद्र असावे. चक्रीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी प्रत्येक शहरात आधुनिक कचरा व्यवस्थापन यंत्रणा असायला हवी. प्रत्येक शहराला अतिरिक्त पाणी मिळावे या अनुषंगाने पुरेसे आधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असावेत तसेच जलस्रोतांच्या संवर्धनासाठी चांगली व्यवस्था केली पाहिजे, या गरजांवर पंतप्रधानांनी भर दिला. कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करण्यासाठी अशा शहरांमध्ये गोबरधन आणि बायोगॅस प्रकल्प असावेत , एलईडी बल्बचा वापर यांसारखे ऊर्जा कार्यक्षम उपाय हे या शहरांचे वैशिष्ट्य असले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

अमृत मिशनला यशस्वी करण्यासाठी सरकारने मोहीम हाती घेतली आहे. रेरासारखा कायदा आम्ही आणला. अर्बन प्लानिंगशी जोडलेल्या सगळ्या गोष्टींशी कसे नियोजन जोडले आहे, यावरही त्यांनी भर दिला. प्रदूषणातून मुक्ती, कच्च्या तेलाची निर्भरता कमी करणं, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी इथेनॉलवर भर. पुण्यात यासाठी सुरू असलेले प्रयत्न, इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही होणारा फायदा सांगत त्यांनी शहरांकडे सरकारचे कसे लक्ष आहे हे सांगितले.

मुळामुठेची साफसफाई आणि सुशोभिकरणासाठी केंद्र मदत करतेय. नद्या पुन्हा जिवंत झाल्या तर पुणे शहरालाही नवी जान येईल. वर्षातून एक दिवस नदी उत्सव साजरा केला पाहिजे. नदीच्या प्रती श्रद्धा आणि महात्म्य वाढविण्यासाठी ते उपयुक्त होईल असे सांगत त्यांनी पुणेकरांना कार्यक्रमही दिला. प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी पीएम गतीशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन बनवला आहे. त्यामुळे प्रकल्प वेळेत होतील, लोकांची गैरेसोय टळेल. देशाचा पैसा वाचेल, असे सांगून मोदी यांनी शहरांसाठी सरकारचे प्रयत्न स्पष्ट केले.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोदी काय बोलतात याकडेही सर्वांचे लक्ष होते. सिम्बॉयसिस येथे झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसमोर बोलताना युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांची शिताफीने सुटका करण्यात भारत कसा यशस्वी झाला हे त्यांनी आवर्जून सांगितले. मोदींचा दौरा राजकीय कारणांसाठी असला तरी शहरीकरणाची व्हिजन त्यात पाहायला मिळाली.दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांची थेट पंतप्रधानांकडे तक्रार करीत अचूक लक्षवेध साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT