संवाद
वैभव चाळके
vaibhav.b.chalke@gmail.com
गेले काही दिवस समाज माध्यमांवर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करावा की नाही, याबाबत चर्चा रंगली आहे. या उत्सवाच्या वेळी होणारे ध्वनिप्रदूषण, उत्सवांसाठी रस्त्यांवर मंडप घातल्याने होणारी अडचण आणि तिथेच काही कार्यकर्त्यांकडून खेळला जाणारा जुगार, नशापाणी इत्यादी कारणे विरोध करणाऱ्यांकडून चर्चिली जात आहेत. त्या अनुषंगाने ज्येष्ठ अभ्यासक ‘कालनिर्णय’चे जयराज साळगावकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सर्वच सार्वजनिक उत्सव सुरू राहायला हवेत, अशी ठाम भूमिका मांडली. सार्वजनिक उत्सव अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
आपल्या समाजात श्री गणेशाची आराधना शेकडो वर्षे होत आली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अठरा ओव्यांमध्ये ओंकारस्वरूप गणेशाचे वर्णन केले आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजनाने करण्याचा प्रघात आहे. स्वातंत्र्यचळवळीत जेव्हा ब्रिटिशांनी जमावबंदी आदेश लागू केला होता, तेव्हा लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. तेव्हापासून गेली तब्बल सव्वाशे वर्षे महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. प्रथम स्वातंत्र्यचळवळीसाठी सुरू झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने पुढे सामाजिक अभिसरणाचे, कलागुणांच्या वाढीचे, छोट्या-मोठ्या उद्योगांना प्रोत्साहन देऊन कोट्यवधी हातांना काम देण्याचे उद्दिष्ट साध्य केलेले दिसते. गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले आहे. या उत्सवाला भव्यपण आले आहे. श्री गणरायांच्या आगमन सोहळ्यापासून विसर्जन मिरवणुकीपर्यंत कितीतरी कार्यक्रम मोठ्या उत्साहात, मोठ्या गर्दीत पार पडताना दिसतात. या बदलत्या स्वरूपातील काही बाबींवर दरवर्षी काही प्रमाणात आक्षेप घेतले जातात. अर्थातच आक्षेप घेणाऱ्यांपेक्षा या उत्सवात सहभाग घेणाऱ्यांचे प्रमाण नेहमीच अधिक राहिलेले आहे आणि उत्तरोत्तर वाढते आहे. अलीकडच्या काळात मराठी माणसाच्या या सणात इतर भाषक आणि इतर धर्मीयसुद्धा मोठ्या उत्साहाने सहभागी होत असताना दिसतात.
जयराज साळगावकर याबाबत म्हणाले, मोठमोठे उत्सव ही समाजाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. आपल्या देशात गणेशोत्सव, दुर्गापूजा, नवरात्रोत्सव, दहीहंडी, दिवाळी असे मोठमोठे सण दरवर्षी साजरे केले जातात. ते साजरे करताना समाजात मोठा उत्साह पाहायला मिळतो. केवळ आपल्या देशातच असे सण होतात असे नाही, अमेरिकेत, युरोपातसुद्धा मोठमोठे सण साजरे केले जातात. जगभरातील सर्वच देशांमध्ये सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. कारण माणूस हा उत्सवप्रेमी आहे आणि त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली समाजरचना उत्सवातून उभी राहिलेली दिसते. हे मोठे उत्सव म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणाच आहे. उत्सवांमुळे होणारी मोठी आर्थिक उलाढाल पाहता अर्थव्यवस्थेला सणांचे मॉडेल स्वीकारणे सोपे गेले आणि मग त्यातूनच अर्थव्यवस्था उत्सवांवर चालत असलेली पाहायला मिळते. अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून मला मोठ्या उत्सवांमध्ये हा अर्थव्यवस्थेचा भाग अत्यंत महत्त्वाचा वाटतो.
आदिम काळापासून माणूस उत्सव साजरे करीत आलेला आहे. समाज जेव्हा शेतीवर अवलंबून होता तेव्हा शेतीत धनधान्य पिकले म्हणजे माणूस उत्सव साजरा करीत असे. त्याच्या नव्या गरजा, त्याच्या नव्या आशाआकांक्षा पूर्ण करण्याचा तोच कालावधी असे. नव्या वस्तू खरेदी करण्याची संधी माणसाला याच काळात मिळत असे. त्यामुळे या काळातच सगळे उत्सव साजरे केले जात असल्याचे पाहायला मिळते. आपल्या सगळ्या मोठ्या सणांकडे पाहिलेत म्हणजे तुम्हाला माणूस आपल्या नवनव्या गरजा या सणांच्या काळातच पूर्ण करीत असल्याचे दिसते. बाजारात नव्या गाड्या, नव्या फॅशनचे कपडे, नवे तंत्रज्ञान या सणांच्या पार्श्वभूमीवरच दाखल होत असते. कारण सणांच्या निमित्ताने माणूस अधिक पैसे खर्च करायला तयार होत असतो. नवनव्या गोष्टी खरेदी करण्यास तयार असतो. त्यामुळे आपल्याकडील सर्व उत्पादनस्रोत हे कोणत्या ना कोणत्या सणाशी जोडून असलेले आणि आपले अनेक उद्योग-व्यवसाय सणांच्या संदर्भात आखणी करून चालवले जात असलेले दिसतात. त्यामुळे मोठ्या भव्य स्वरूपात साजरे होणारे आपले सार्वजनिक उत्सव छोट्या-मोठ्या कारणासाठी बंद करणे योग्य नव्हे! ती अर्थव्यवस्थेला धक्का पोहोचवणारी, समाज रचनाच कोलमडून टाकणारी गोष्ट ठरेल. शेकडो उद्योग-व्यवसायातील लाखो-करोडो लोकांना बेरोजगार करणारे ठरेल. केवळ आपला सार्वजनिक गणेशोत्सव उदाहरण म्हणून घेतला, तरी मूर्तीपासून देवपूजेच्या साहित्यापर्यंत आणि नैवेद्यापासून मनोरंजनाच्या क्षेत्रापर्यंत कितीतरी व्यवसायांना या काळात यानिमित्ताने चालना मिळालेली दिसते.
मूर्तिकलेचा उद्योग वर्षभर सुरू असतो. कितीतरी कारागीर वेगवेगळ्या कलावस्तूंवर गणेशोत्सवासाठी वर्षभर मेहनत घेत असतात. आपल्याकडे चित्रपटांसाठी सेट उभारणारे जे लोक आहेत, त्यांच्यात कोकणातील आणि बंगालमधील कलावंतांचा सहभाग अधिक आहे. कारण या दोन प्रांतांत अनुक्रमे सार्वजनिक गणेशोत्सव आणि सार्वजनिक दुर्गा उत्सव यांची शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्या परंपरेत हे कलावंत घडलेले आहेत. सार्वजनिक उत्सवांनी कितीतरी कला जगवल्या आहेत. वाढवल्या आहेत आणि आजच्या समाज रचनेत महत्त्वाचे योगदान दिले आहे. चित्रपटाचा विषय निघाला म्हणून सांगतो, आपल्या चित्रपटांनी आपल्या सणांना देशात सर्वदूर मान्यता दिली आहे. आपल्या समाजावर हिंदी चित्रपटांचा मोठा प्रभाव आहे. चित्रपटांमधून आपल्या सणांची कितीतरी गाणी सर्वत्र पोहोचली. लोकप्रिय झाली आणि त्यातून सण सार्वत्रिक झाले, असे दिसते.
जगभरात उत्सव
आपले अनेक उत्सव हे धर्माशी जोडलेले आहेत. जगभरात अशीच स्थिती दिसते. युरोप-अमेरिकेत अनेक चर्च मोठे उत्सव साजरे करतात. अन्य धर्मीयसुद्धा आपापले उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करताना दिसतात. याचे कारण समाजाला मोठ्या उत्सवांची गरज आहे आणि एकूण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे मोठ्या सणांची शक्ती निर्विवाद आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन अलीकडे ऑनलाइन पद्धतीने सामग्री विकणाऱ्या अमेझॉनसारख्या मोठ्या कंपन्या मोठमोठे शॉपिंग फेस्टिवल आयोजित करीत असतात. त्यांचा आकार पाहिला म्हणजे फेस्टिवल अर्थात उत्सवांचे अर्थकारणातील महत्त्व सहज लक्षात येईल.
समाजधुरिणांनी आवाहन करावे!
उत्सवांमध्ये होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाबाबत जयराज साळगावकर म्हणाले, विविध सार्वजनिक उत्सवांत ध्वनिप्रदूषण होते हे खरे आहे. त्यावर उपाययोजना करता येऊ शकतात. करायला हव्यात. सरकारने डीजेवर याआधीच बंदी आणली आहे. गणेशोत्सवातील कार्यकर्त्यांमध्ये जनजागृती करून आपण ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण आणू शकतो. ती मोठी अवघड गोष्ट नाही. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपात जुगार खेळणे, नशाबाजी करणे या मुद्द्यांबाबत ते म्हणाले, की सध्या अशा प्रकारे कोणी गैरवर्तन करत असेल, असे वाटत नाही. १९८०च्या दशकात हे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत होते. ती गोष्ट लक्षात आल्यावर आमचे बाबा, ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी विविध व्यासपीठांच्या माध्यमातून जनजागृती केली. गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले. त्यानंतर या वाईट गोष्टींना उत्तम प्रकारे पायबंद बसला. आजही कोठे जर अनुचित गोष्टी घडत असतील, तर समाजातील धुरिणांनी पुढे येऊन आवाहन करायला हवे. अशा प्रकारच्या आवाहनाला कार्यकर्ते आणि तरुण चांगला प्रतिसाद देतात, हे यापूर्वीच लक्षात आले आहे. रस्त्यावर मंडप घालून रस्ता अडवला जातो, असा एक आक्षेप घेतला जातो. याबाबत ते म्हणाले, नागरिकांना उत्सव हवा असतो. त्यामुळे नागरिक एकत्र येऊन उत्सव करतात. काही ठिकाणी जागेअभावी रस्त्यावर मंडप घातला जातो, हे खरे आहे; मात्र रस्त्याच्या एका बाजूला मंडप घालून दुसऱ्या बाजूने वाहनांसाठी जागा सोडली जाते. त्यातून सामंजस्याने लोक आपली वाहने बाहेर काढत असतात, असे अनेक ठिकाणी पाहायला मिळते. बहुतांश ठिकाण लोक वाद न घालता समजुतीने मार्ग काढत असतात. अनेक जण तर स्वतःच या उत्सवात सहभागी झालेले असतात. सार्वजनिक उत्सवांमध्ये सहभाग घेणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे.
सामाजिक अभिसरणाचे व्यासपीठ
सार्वजनिक उत्सवाबाबतच्या चर्चेदरम्यान जयराज साळगावकर यांनी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दासुद्धा अधोरेखित केला. ते म्हणाले, सार्वजनिक सण-उत्सव हे सामाजिक अभिसरणाचे एक अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ आहे. दिवाळी, रंगपंचमी, होळी अशा सणांमध्ये धर्म-जात विसरून लोक एकत्र येत असतात, याचा विचार केला जात नाही. या अर्थाने समाज म्हणून एकत्र राहण्यासाठी सण-उत्सव अत्यंत महत्त्वाचे आहेत.
मुंबई पोलिसांची कार्यक्षमता मोठी!
मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे यानिमित्ताने साळगावकर यांनी आवर्जून कौतुक केले. ते म्हणाले, मुंबईतील सार्वजनिक उत्सवांदरम्यान मुंबई पोलिसांची कामगिरी नेहमीच वाखाणण्यासारखी राहिली आहे. मुंबई पोलिसांच्या या कार्यक्षमतेचे कौतुक करायला हवे. मोठे उत्सव समाजाला विविध अंगांनी उपयोगी पडत असतात, हे आपण पाहिलेच; पण ते उत्सव सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडण्यासाठी पोलिस जे नियोजन करतात, जी मेहनत घेतात, ती अत्यंत महत्त्वाची आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.