श्रद्धास्थानांचा विषय भारतीयांसाठी खरं तर अत्यंत महत्त्वाचा; पण या श्रद्धास्थानांच्या भिंतींना आता भ्रष्टाचाराची कीड लागलीय. काही उफराट्या काळजाचे लोक भक्तांची संपत्ती लुटून खाण्याच्या बेतात आहेत. काहींनी आपली पोटं भरलीत. त्यांचं अपचन आता इतकं वाढलंय, की आता ते तुमच्या पैशाचे तूपही फेकून द्यायला निघालेत. त्यामुळे गाडगेबाबा म्हणायचे तसा देव माणसात शोधायला लागा. कारण देव देवळात राहत नाही, देव आपल्या मनात राहतो, देवळात फक्त पुजाऱ्याचे आणि विश्वस्तांचे पोट राहते, हे गाडगेबाबांचे विचार पुन्हा पुन्हा सिद्ध होताना दिसतात.
एखाद्या सरकारी प्रकल्पाप्रमाणेच आता मंदिरेही भ्रष्टाचाराचे कुरण व्हायला लागली आहेत. शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानने अलीकडेच २१८ क्विंटल तुपाचा लिलाव करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. या तुपाची मुदत ४ ऑक्टोबर २०२१ रोजीच संपली होती. सुरुवातीला काढण्यात आलेल्या निविदेत या तुपाची मुदत संपल्याचा उल्लेख करण्यात आला असला, तरीदेखील ते ‘एफएसएसएआय’च्या (भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण) निकषांप्रमाणे असल्याचा उल्लेख करण्यात आला.
जेव्हा माध्यमांनी याबाबतच्या बातम्या प्रकाशित केल्या, त्यानंतर मात्र हे तूप मानवी सेवनासाठी योग्य नाही, अशी सुधारणा केलेले शुद्धिपत्रक काढण्यात आले. आता तुम्ही मूळ निविदा शोधायला गेलात, तर ती तुम्हाला सापडत नाही. केवळ शुद्धिपत्रक पाहायला मिळते. याआधी २०१८ मध्येसुद्धा येथील अधिकारी व विश्वस्तांवर तूप खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतरदेखील इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी केलेले तूप आता खाण्यास अयोग्य असल्यामुळे अत्यंत कमी किमतीत विकावे लागणार आहे. यातून संस्थानला जवळपास ७५ लाख रुपयांचा तोटा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारच्या ताब्यात असलेल्या मंदिरांमध्ये बसलेल्या पोटभरू सरकारी अधिकाऱ्यांच्या खाबूगिरीवर सरकार काही भूमिका घेणार का, हे तपासावे लागेल. शिवाय यानिमित्ताने मंदिरांच्या नावाखाली भ्रष्टाचाराचे कुरण चालवणाऱ्या आणि भक्तांच्या भावनांचा भ्रष्टाचार करणाऱ्या विश्वस्तांचा समाचार घेण्याची वेळ आली आहे. हे विश्वस्त नेमके मंदिर चालवणारे आहेत, की सरकार चालवणारे, हेही भक्तांना शोधावे लागणार आहे; त्याशिवाय तुमच्या भावनांच्या भ्रष्टाचारातून तूप-रोटी खाणारा बोका सापडायचा नाही.
भक्त आणि भक्ती हा शब्द अलीकडे जरा बदनाम झालाय. या शब्दाला भावना आणि श्रद्धेचे अधिष्ठान आहे. अठरापगड जाती आणि कोसा-कोसावर बदलणाऱ्या भाषेच्या लहेजात इथे पावलागणिक बदल जाणवतात. नुसते जाणवतच नाहीत, तर त्या जाणिवेच्या आतच त्यांचे भौगोलिक, राजकीय आणि सामाजिक संदर्भ बदलतात. राष्ट्राच्या संकल्पनांवर येथे रोज चर्चा झडतात, विचारांच्या लढायांमध्ये रोज समाज-जीवनाच्या भिंती पडतात. ज्या सर्वसमावेशक आणि जाती-धर्माच्या बंधुभावाचे आपण जगासमोर भांडवल करतो, तेथे बंधुभावाची संस्कृती मात्र भौगोलिक सीमांमध्ये कैद झालेली असते. सर्वांचे एकमत होईल, सर्व रेषा एकत्र येतील, असे विषयच मुळात निवडक. त्यात खरे पाहिले तर इथल्या माणसाचे एका विषयाशी इमान आहे. तो म्हणजे त्याची श्रद्धा. जेव्हा त्याच्या श्रद्धास्थानांचा विषय येतो, तेव्हा जातींच्या भिंती उभ्या राहत असतीलही; पण श्रद्धेचा सूर एकच असतो. तेव्हा कधी जर या श्रद्धास्थानांची मालकी नेमकी कुणाची असा प्रश्न उपस्थित झालाच, तर त्या प्रत्येक सात-बाऱ्याचा मालक हा केवळ आणि केवळ भक्त ठरतो. तो भक्त जो एक सर्वसामान्य माणूस आहे आणि या सार्वभौम देशाचा नागरिकदेखील आहे. त्यामुळेच त्याच्या भावनांशी जर कुणी खेळणार असेल, तर तो गुन्हाच ठरतो.
श्रद्धास्थानांच्या मान्यता, अमान्यतांच्या विषयात प्रत्येकाची मते असू शकतात. ती असायलाही हवीत; पण देव, देवळे, श्रद्धा आणि भक्तिभाव हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे, भारतीय समाजमनाचा आधार आहे हे विसरून चालत नाही. प्रत्येक जण आपापल्या कुवतीप्रमाणे आपल्या श्रद्धास्थानाची निवड करतो. तो कुठल्याही धर्मात जन्मलेला असो, त्याला त्याच्या मर्जीनुसार धर्म स्वीकारण्याचा अधिकार आहे. किंबहुना, घटनेनेच त्याला तो अधिकार बहाल केला आहे. आपण इतिहासाची पाने उलटून पाहिली तर लक्षात येते, की धर्माच्या अवतीभवतीच आपले संपूर्ण जग फिरत राहिले आहे; पण जातीधर्मांच्या कुठल्याही भांडणांमध्ये कुठल्याही धर्माचा देव कधीच डोकावला नाही. तेथे खेचून आणला जातो तो खोटा धर्माभिमान. कारण ती त्या लोकांची राजकीय गरज असते. देव आणि त्याचा भक्त या शर्यतीत कधीच नसतो. कुणाला त्याच्या अस्तित्वाबद्दल शंका असते; तर कुणी कधीही न पाहिलेला आणि न पावलेला देवदेखील मनापासून पुजतो. त्यामुळे एकंदरीतच श्रद्धास्थानांचा विषय भारतीयांसाठी किती महत्त्वाचा आहे हे आपल्या लक्षात येते, पण या श्रद्धास्थानांच्या भिंतींना आता भ्रष्टाचाराची कीड लागलीय. काही उफराट्या काळजाचे लोक भक्तांची संपत्ती लुटून खाण्याच्या बेतात आहेत. काहींनी आपली पोटं भरलीत. त्यांचं अपचन आता इतकं वाढलंय, की आता ते तुमच्या पैशांचे तूपही फेकून द्यायला निघालेत. त्यामुळे गाडगेबाबा म्हणायचे तसा देव माणसात शोधायला लागा. कारण देव देवळात राहत नाही, देव आपल्या मनात राहतो, देवळात फक्त पुजाऱ्याचे (किंवा विश्वस्तांचे) पोट राहते, हे गाडगेबाबांचे विचार पुन्हा पुन्हा सिद्ध होताना दिसतात.
धार्मिक विषयात चर्चा करण्यात लोकांना प्रचंड स्वारस्य असते. अनेक जण खुल्या दिलाने चर्चा करायला पुढे येतात; तर काही जण अदम्य विषाद आणि क्रोध घेऊनच चर्चेत उतरतात. धर्म म्हटला, की विषाद आणि क्रोध असावाच लागतो, जणू सक्ती केल्यासारखा. हे लोक भक्तीच्या संप्रदायातले नसतात. ते प्रतिनिधित्व करतात कुठल्या तरी राजकीय विचारांचे. वाद-विवाद आणि चर्चांमधून धर्मांचे अधिष्ठान किती मजबूत आहे, यावर वारंवार दावे-प्रतिदावे केले जातात; पण ज्या धर्मावर आपण बोलतोय, त्या धर्मसंकल्पनेच्या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी असलेल्या देवळांबाबत आणि तेथे होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत मात्र कुणी राजकीय व्यक्ती फारशी बोलताना दिसत नाही. भक्तमंडळीही या विषयाकडे जरा कानाडोळाच करतात; पण आपल्या अधिष्ठानांनाच जर कीड लागली, तर समाजजीवनाचा पाया पोखरला जाईल, याची फिकीर कुणाला आहे?
आपल्या देशातली अनेक मंदिरे ही सरकारच्या ताब्यात आहेत. मध्य प्रदेश, राजस्थानसारख्या राज्यांमध्ये मंदिरांवर सरकारचे थेट नियंत्रण आहे; तर आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटकसारख्या राज्यांमध्ये काही मंडळांमार्फत मंदिरांच्या कारभारावर लक्ष ठेवले जाते. महाराष्ट्रातली काही मंदिरे ही सरकारने नेमून दिलेल्या विश्वस्तांच्या ताब्यात आहेत; तर पाच प्रमुख मंदिरांवर सरकारचे थेट नियंत्रण आहे. ही मंदिरे सरकारच्या ताब्यात असूनही या मंदिरांच्या कारभाराबाबत मात्र कायम प्रश्न उपस्थित केले जातात. अनेकदा या मंदिरांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उजेडात आली आहेत; मात्र त्यावर फार कठोर कारवाई झाल्याचे मात्र ऐकिवात नाही. पंढपूरचे विठ्ठल मंदिर म्हणजे तर महाराष्ट्राची शान आहे. येथे येणाऱ्या भाविकांची संख्या पाहिली, तर हे मंदिर कदाचित देशातल्या पाच सर्वांत मोठ्या मंदिरांपैकी एक ठरू शकेल; मात्र या मंदिरालाही भ्रष्टाचाराच्या किडीने पोखरायला सुरुवात केली आहे. या मंदिरातील बडव्यांच्या संदर्भात अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे काही वर्षांपूर्वी सरकारने या मंदिरातल्या प्रकरणांचा छडा लावण्यासाठी नाडकर्णी आयोगाची नेमणूक केली. १९७० मध्ये नाडकर्णी आयोगाने आपला अहवाल सरकारला सादर केला. या अहवालात मंदिरांच्या संपत्तीत हेराफेरी होत असल्याचा आणि मंदिराचे व्यवस्थापन नीट होत नसल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर १९७३ मध्ये नव्याने कायदा करून सरकारने हे मंदिर आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर काही लोक याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गेले; मात्र निकालानंतर सरकारने मंदिराचा ताबा घेतलाच. १९८५ पासून हे मंदिर सरकारच्या नियंत्रणात आहे.
एक हजार वर्षांची परंपरा असलेल्या या मंदिराला मोठी पार्श्वभूमी आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अनेक भक्तांनी या मंदिराला दान दिले आहे. या दानामध्ये सोने-चांदीच्या आभूषणांसह शेकडो एकर जमिनींचाही समावेश आहे; मात्र यातील बहुतेक जमिनी या सरकारच्या ताब्यातच नसल्याचे खूप उशिरा लक्षात आले. विशेष म्हणजे पूर्वी तर या मंदिरातील दानपेटीत येणाऱ्या दानाचीही खूप दिवस मोजदाद केली जात नव्हती. लोकांनी पुण्यभावनेने अर्पण केलेली ही रक्कम पोत्यांमध्ये साठवून ठेवली जात असे. त्यामुळे यातले नेमके किती दान योग्य कामी लागले आणि किती इतरांनी पळवले याचा हिशेबही ठेवला जाणे कठीण होते. या मंदिराची स्वतःची गोशाळादेखील आहे; मात्र या गोशाळेतील अनेक गाईंचा पूर्वी मृत्यू झाला. काही कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकारातून मृत्यू झालेल्या गाईंचे पोस्टमार्टम रिपोर्ट मागवल्यानंतर प्लास्टिक खाल्ल्यामुळे गाईंचा मृत्यू झाल्याचे कारण समोर आले. हे प्रकरण उजेडात आल्यामुळे मंदिर प्रशासनाने गोशाळेत अनेक बदल केले. एवढ्यावरच हे थांबले नाही, तर काहींनी मंदिराच्या पैशांतून काही रिसॉर्ट ताब्यात घेतले होते. लेखापरीक्षण अहवालात यातील अनेक गोष्टींवर आक्षेपही घेण्यात आला आहे. लेखापरीक्षकांनी दानपेटी उघडण्यासंदर्भात एक नियम ठरवण्याबाबत सांगितले होते. त्यानंतर पंचनामा करूनच दानपेटी उघडावी असे सांगण्यात आले; मात्र त्यातही येथील मंडळी कुचराई करताना दिसतात. बरेचदा अंतर्गत लेखापरीक्षण केले जात नाही. दान देणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पावती पुस्तकाच्या पावत्यांच्या नीट नोंदी ठेवल्या जात नाहीत. बनावट पावती पुस्तके छापली जातात. अशा एक ना अनेक तक्रारी आहेत.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीअंतर्गत अनेक मंदिरे येतात. त्यापैकी साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबाचे मंदिर अशा अनेक मोठ्या मंदिरांचा यात समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.