Gokhale Bridge Mumbai Sakal
सप्तरंग

इच्छामरण मागणाऱ्या गोखले पुलाची चित्तरकथा

गुजरातमधील झुलता पूल कोसळल्याने उडालेले पाण्याचे शिंतोडे थेट मुंबईतल्या कचेरीत बसलेल्या काही टाळक्यांवर उडाले असावेत.

राहुल गडपाले

गुजरातमधील झुलता पूल कोसळल्याने उडालेले पाण्याचे शिंतोडे थेट मुंबईतल्या कचेरीत बसलेल्या काही टाळक्यांवर उडाले असावेत.

गुजरातमधील झुलता पूल कोसळल्याने उडालेले पाण्याचे शिंतोडे थेट मुंबईतल्या कचेरीत बसलेल्या काही टाळक्यांवर उडाले असावेत. ते अचानक झोपेतून जागे झाले आणि त्यांनी गोखले पूल बंद करण्याचा निर्णय घेतला; पण तरीही त्याचा मृत्यू झाला नाहीये अजून. त्याचे नातेवाईक जमवाजमव करताहेत इतर सामानाची. बाप मरायला आल्यावर जशी मुले शेवटच्या क्षणी त्याच्याजवळ बसण्याऐवजी, त्याला शांती लाभावी, यासाठी प्रार्थना करण्याऐवजी हिस्सेवाटपावर चर्चा करतात, अगदी तशाच चर्चा सुरू आहेत. उद्या झालाच मृत्यू तर पुढच्या खर्चाचे काय, अशा एक ना अनेक विवंचना असाव्यात गोखल्यांच्याही नातेवाईकांना. त्यामुळे ते अजूनही वेळ काढताहेत, गोखलेबुवा मात्र शेवटच्या घटका मोजताहेत...

‘तुम्ही कुठे राहता..? अंधेरीला... अरेरे... आरआयपी... आम्ही तुमच्या दु:खात सहभागी आहोत’’, अशा कळकळीच्या स्वरात लोक अंधेरी परिसरातल्या नागरिकांबद्दल बोलतात हल्ली. तुमच्या घरात कुणाचे निधन झाले असेल, परिसरातला एखादा लाडका नेता निवर्तला असेल, तेव्हा जसे नैराश्यपूर्ण वातावरण तयार होते, अगदी तसे उदास-भकास वातावरण अलीकडच्या काही दिवसांत अंधेरी परिसरात तयार झाले आहे. निमित्त आहे शेवटच्या घटका मोजत असलेल्या एका पुलाच्या मृत्यूचे. तसे पाहिले तर अजून मृत्यू झाला नाहीये, अत्यवस्थ वगैरे म्हणतात अशी त्याची अवस्था आहे. गोखले उड्डाणपूल असे त्याचे नाव. जन्म असेल १९७४-७५ दरम्यानचा. मृत्यू म्हणाल तर सध्या तो ब्रेनडेड किंवा कोमात वगैरे म्हणावा अशा स्थितीत आहे. एखाद्या वार्धक्याने कंटाळलेल्या, खाटेला खिळलेल्या आणि आयुष्यात काहीही उरलेले नसतानाही विनाकारण दिवस ढकलायची वेळ आलेल्या म्हाताऱ्यासारखी त्याची अवस्था आहे. या पुलाचा दोन वर्षांपूर्वी अपघात झाला होता. त्याची एक बाजू पांगळी झाली; पण तरीही असहाय वेदनांच्या कळा सहन करत तो तसाच उभा होता.

तासन् तास, हजारो टनांचे वजन खांद्यावर झेलत, नाकातोंडात जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या धुराचे भपकारे घेत तो आयुष्य कंठत आहे. त्याच्या पालकत्वाची जबाबदारी असलेल्यांना त्याच्याशी काही विशेष देणे-घेणे नसावे बहुधा. कारण अलिकडे पालकत्व तसे नकोच वाटते कुणाला. म्हणून त्यांनी फायली रंगवण्यात वेळ घालवला. गोखले पूल मात्र इच्छामरणाची मागणी करत असावा. तो इतका जीर्ण झाला, तरी त्याच्या उरलेल्या शरीरावरून वाहने दामटवत त्याची घुसमट केली जात होती. अखेर गुजरातमधील झुलता पूल कोसळल्याने उडालेले पाण्याचे शिंतोडे थेट मुंबईतल्या कचेरीत बसलेल्या काही टाळक्यांवर उडाले असावेत. ते अचानक झोपेतून जागे झाले आणि त्यांनी गोखले पूल बंद करण्याचा निर्णय घेतला; पण तरीही त्याचा मृत्यू झाला नाहीये अजून. त्याचे नातेवाईक जमवाजमव करताहेत इतर सामानाची. बाप मरायला आल्यावर जशी मुले शेवटच्या क्षणी त्याच्याजवळ बसण्याऐवजी, त्याला शांती लाभावी, यासाठी प्रार्थना करण्याऐवजी हिस्सेवाटपावर चर्चा करतात, अगदी तशाच चर्चा सुरू आहेत. उद्या झालाच मृत्यू तर लाकडांचा खर्च कोण करणार, येणाऱ्या पाहुण्यांच्या जेवणावळी कोण सांभाळणार, तेराव्याचा मांडव माझ्या अंगणात घालावा की धाकट्याच्या, मग त्याला जास्त जागा दिलीये बापाने तर मी का जास्त खर्च उचलायचा, आईची जबाबदारी कोण घेणार, पुढच्या खर्चाचे काय, अशा एक ना अनेक विवंचना असाव्यात गोखल्यांच्या नातेवाईकांना. त्यामुळे ते अजूनही वेळ काढताहेत, गोखलेबुवा मात्र शेवटच्या घटका मोजताहेत. कधी या त्रासातून आपली सुटका होते आणि कधी श्वासांमधून जीव मोकळा होतोय या विवंचनेत आहे बिच्चारा. आता अंगाखांद्यावर खेळणारी वाहनेही नाहीत, त्यामुळे अंगही जड झाले असावे. पण कुणाला काय त्याचे? असो... तर अशी आहे

गोखल्यांची चित्तरकथा…

२०१८च्या जुलै महिन्यात गोखले पुलाचा अपघात झाला. पुलाचा काही भाग कोसळला त्यात दोन जणांचा मृत्यूही झाला. मग सरकारी यंत्रणा हलल्या. जाग्या वगैरे होण्यासाठी आपल्याकडे दोन-चार जीव जाऊन काहीच होत नसतं. त्यामुळे त्या केवळ हलल्या. एखाद्या कचेरीतले बडे बाबू तुम्ही कुठलेसे काम घेऊन गेल्यावर आपले महाकाय ढेरपोट आणि बुडही न हलवता चश्म्याच्या वरच्या काचेतून तुच्छ नजरेने तुमच्यावर कटाक्ष टाकतात, तेव्हा त्यासाठी त्यांना जेवढे अविश्रांत कष्ट घ्यावे लागतात, तेवढे कष्ट घेऊन या अत्यंत गंभीर प्रकरणाचा अहवाल का काय तो तयार करायला लागले. अगदी महिनाभरातच म्हणजे ऑगस्टमध्येच अहवाल आला आणि त्यात गोखले पुलाला इच्छामरण द्यावे, असा निकाल देण्यात आला; पण माणसांना इच्छामरण देण्यास आपले सरकार आणि न्यायव्यवस्था अनुकूल नसल्यामुळे बुचकळ्यात पडलेल्या यंत्रणांना अजूनही गोखल्यांच्या पुलाला इच्छामरण देण्याचे धारिष्ट्य होत नसावे बहुधा. त्यामुळे त्यांनी पुलाला फक्त टेकू देऊ केला. त्यासाठीही एप्रिल २०१९ उजाडावे लागले. बरं, या ठिकाणी यंत्रणेने अतिजलद, कार्यक्षम आणि अत्यंत पारदर्शी प्रक्रियेद्वारे कुठलीही निविदा न काढता एका संस्थेला टेकू देण्याचे काम दिले. एवढे करूनही इतक्या लोकाभिमुख काम करणाऱ्या यंत्रेणेला डोक्यावर घेऊन नाचण्याऐवजी ‘कॅग’नामक संस्थेने त्यावर ताशेरे ओढले म्हणे. गोखल्यांचे पालकत्व तसे महापालिका आणि रेल्वे अशा त्यांच्या दोन पालकांवर आहे.

त्यामुळे गोखले निम्मे इकडे आणि निम्मे तिकडे असतात. महापालिका नावाच्या पालकाने म्हणे २०२० मध्येच नवीन पुलाचे काम करण्याचे योजले होते. त्यात चुलत्यानेही मलाही शेताचा हिस्सा हवाय, असा ट्याहा करावा, तसा वाहतूक विभागाने काम सुरू करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र द्यायला सहा महिने वेळ काढला. इकडे म्हातारं जातंय जीवानिशी आणि तिकडे नातेवाईकांची निराळीच तऱ्हा. प्रत्येक जण आपलाच हट्ट घेऊन बसलेला. इकडे चुलता ना-हरकत देईना आणि तिकडे रेल्वेकडे अपेक्षेने पाहावे, तर ते लहान भावालाच महापालिका म्हणतेय की माझ्या अंगणातला पण तूच बांध. तसाही धाकटा कधीच ऐकत नसतो. महापालिकेने नोव्हेंबर २०२१ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली; मात्र रेल्वेच्या विनंतीवर काही कुणी बोलेना. अखेर रेल्वेने जून २०२२ मध्ये झालेल्या भावकीच्या बैठकीतही आपल्या अंगणातले काम महापालिकेनेच करावे, अशी पुन्हा एकवार विनंती केली. पालिकेच्या सल्लागाराने ऑक्टोबर २०२२ मध्ये दोन्ही टप्प्यातील काम एकत्र करावे, असा विकतचा सल्ला दिला. चकटफू आपल्याकडे कुणीच काही करीत नसतं. त्यामुळे पुन्हा एकदा वाहतूक विभागाकडे ना-हरकतीसाठी अर्ज केला. तोच गेल्या महिन्यात गुजरातमधला झुलता पूल कोसळला आणि त्याचे शिंतोडे उडाल्याने जाग्या झालेल्या आमच्या शूरांनी तातडीने गोखले पूल बंद करण्याचे आदेश दिले. अचानकपणे त्यांना हा पूल केव्हाही कोसळू शकतो, याची जाणीव झाली. तोपर्यंत हजारो वाहने रोज गोखले जराजर्जर झालेल्या गोखले पुलाला तुडवत होती. गोखले बुवा अत्यंत कष्टाने मुंबईकरांना सेवा देत होते. आजही तो तसाच उभा आहे. इच्छामरणाच्या प्रतीक्षेत. नातेवाईकाच्या वाटाघाटी संपतील, ते आपल्याला मोकळं करण्याचा विचार करतील, तिथे नवा गोखले उभा करतील, या प्रतीक्षेत तो निपचित पडलाय. अंगाखांद्यावर वाहनांचे ओझे नसले, तरी आपल्या शरीराखालून लाखो मुंबईकर रोज लोकल गाड्यांमधून प्रवास करतात, याची त्याला जाणीव आहे. म्हणून आपले पांगळे, अर्धमेले शरीर अजून त्याने धरून ठेवलेय.

हे मात्र जळणाची लाकडे आणि टाळूवरच्या लोण्याच्या हिशेबात व्यग्र आहेत.

दुसरीकडे गोखले पूल पडण्याच्या धक्क्याने अंधेरीवासीय जणू शोकमग्न झालेत. इतक्या वर्षांपासून गोखल्यांमुळे त्यांचे जीवन सुकर होते. पार वर्सोव्यापासून ते जोगेश्वरी, जुहू, पार्ले वगैरे परिसरातील लोकांसाठी गोखले पूल म्हणजे जणू जीवनवाहिनीच. त्याचाच आधार घेऊन कायम कोंडीच्या दृष्टचक्रात अडकलेले लोक पश्मिम द्रुतगती मार्गावर पोहोचून मोकळा श्वास घेत असत. तिकडेही काही फार बरी स्थिती आहे, असे म्हणायची सोय नाही; पण दगडापेक्षा वीट मऊ म्हणत रेटत राहायचे. आधीची कोंडी भयंकरच होती, तर आता गोखलेच्या जाण्याने त्यात भलतीच भर पडली आहे. अत्यवस्थ झालेल्या एखाद्या रुग्णाला खाटेवरून काढून जमिनीवर ठेवल्यावर जसे लोक खिन्न मुद्रेने त्याच्या जाण्याची वाट पाहतात, त्याच्या आठवणींनी रात्र जागून काढतात, त्याच्या किस्से-कहाण्यांमध्ये रमतात, मध्येच डोळ्याला कुणी पदर लावतात, कुणी हमसुन-हमसुन तर कुणी ओक्साबोक्शी रडतात, तसे अंधेरीवासी कावरेबावरे झालेत.

त्यात गोखले पूल पाडण्यात येणार आहे, यापेक्षाही मोठे दु:ख त्यांच्या वाट्याला आले, ते म्हणजे यंत्रणांनी आणखी दोन वर्षे नवा गोखले उभा करायला लागणार असल्याचे सांगितल्यामुळे. अवघ्या चार दिवसांपूर्वी गोखल्यांच्या पुलाच्या प्रवेशद्वारावर कुलूप लावण्यात आले. आधीच काम सुरू असलेल्या भागाला पत्रे लावून झाकण्यात आले होते. त्यामुळे काम नेमके कुठवर आले, याचा काहीच अंदाज लागत नाही. त्यातच आता कामाला दोन वर्षे लागतील, असे सांगणारी सरकारी गर्जना प्रत्यक्षात आणखी कितीही वेळ घेऊ शकते. प्रत्यक्ष काम सुरू व्हायला आणि ना-हरकत घ्यायला जर वर्षे, सहा महिने लागू शकतात, तर आम्हाला या हयातीत गोखले पुलावरून पुन्हा प्रवास करायला मिळेल की नाही, असा प्रश्न येथील नागरिकांना सतावतोय. या परिसरातील वाहतूक कोंडी आता इतकी भयंकर झाली आहे, की जुहू सर्कलपासून ते पश्चिम द्रुतगती मार्गापर्यंत येण्यासाठी जेवढा वेळ लागतो, तेवढ्या वेळात मुंबईचा माणूस पुण्यात पोहचू शकतो. कितीतरी वेळ गाड्या जागच्या हलत नाहीत. नाही म्हणायला पोलिस वाहतुकीचे नियोजन करायचा प्रयत्न करताना दिसतात; पण वाहनांची संख्या आणि पर्यायी मार्ग तोकडे असल्यामुळे त्यांचाही नाईलाज होतो.

सकाळी घरातून बाहेर पडलेल्या व्यक्तीला आपण आजच घरी येऊ की नाही, याचीही आता खात्री वाटत नसावी, इतकी ही कोंडी भीतीदायक आहे. सरकारी यंत्रणांचा कारभार मात्र आजही तितकाच ढिलाईने सुरू आहे. सरकारला तर काही बोलण्याची सोयच नाही; पण तरीही त्यांना हवे तर त्यांनी अफझल खानाच्या कबरीभोवतालचे अतिक्रमण काढल्यावर केले, तसे सेलिब्रेशन करून श्रेय घ्यावे हवे तर; पण अंधेरीकरांची या अंधारातून मुक्ती करावी, अशी विनंती करायला काहीच हरकत नाही. अंधेरीवासीयांच्या दु:खाचे शब्दात वर्णन करणे तसे कठीणच आहे; पण अंधेरीतून बाहेर पडताना त्यांच्या मनात यापेक्षा पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानात अवैध मार्गाने जाणे, अधिक सोपे असावे असे प्रत्येकाला वाटत असावे. हा पूल लष्कराकडून बांधून घ्यावा, अशी मागणी अंधेरीच्या काही लोकांनी केली आहे. ती मागणी खरेच रास्त आहे. महापालिकेसारख्या बलाढ्य, पारदर्शी, कामसू, कर्तव्यतत्पर व्यवस्थेवर विश्वास नाही म्हणून नव्हे, तर देशहितासाठी ही मागणी केलेली आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. आज जेवढा वेळ या परिसरात वाहनांचा खोळंबा होतो, प्रचंड इंधन जाळले जाते, गाड्यांच्या धुराने प्रदूषण वाढते, पर्यायाने पर्यावरणाची हानी होते. एकंदरीतच काय, तर राष्ट्रीय संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तमाम अंधेरीवासी देशहिताच्या नात्याने ही मागणी करीत आहेत, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. देशासाठी आणि देशभक्तीसाठी रांग लावायला काहीच हरकत नसावी; पण ती रांग जर वाहनांची असेल तर त्यातून देशाचेच नुकसान होते, असे भक्तिसंप्रदायच आपल्याला सांगतोय, असे मानून तरी या जीवांची कुणी काळजी वाहावी, असे वाटते. बाकी आम्हा पश्मिमेकडे राहणाऱ्यांचे ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ असे झाले आहे. त्यातून इतक्यात सुटका होईल, असे वाटत नाही. बाकी गोखले पुलोबा कायम स्मरणात आणि आमच्यात होते, आहेत आणि राहतील... ओम शांती... शांती... शांती!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT