Maharashtra Politics Sakal
सप्तरंग

सुसंगती घडो...

महाराष्ट्रातील सत्तांतराच्या राजकीय नाट्याचा सर्वसामान्यांच्या अनुभूतीवर काही परिणाम जाणवत नाही, असे जरी वरवर वाटत असले, तरी खरी परिस्थिती तशी निश्चितच नाही.

राहुल गडपाले

महाराष्ट्रातील सत्तांतराच्या राजकीय नाट्याचा सर्वसामान्यांच्या अनुभूतीवर काही परिणाम जाणवत नाही, असे जरी वरवर वाटत असले, तरी खरी परिस्थिती तशी निश्चितच नाही.

माझ्याकडे कुणी काम घेऊन आले, तर मी कागदावर शेरा मारत बसणार नाही. थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून काम करण्याचे निर्देश देईन, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पहिल्याच भाषणात सांगितले; तर शिंदे लोकांमध्ये रमतात, पण मुख्यमंत्री झाल्यावर असे करून चालत नाही. आता त्यांना त्यांच्या कामाचे आणि वेळेचे नियोजन करावे लागेल, असा प्रेमळ सल्ला देवेंद्रांनी विधानसभेतच एकनाथ शिंदेंना दिला. त्यामुळे दोघांनाही एकमेकांची काम करण्याची क्षमता आणि पद्धतीचा अंदाज आहे. त्यातही हा प्रेमविवाह आहे, त्यामुळे एकमेका साह्य करू... अशी सामंजस्याची भूमिका घेण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. शिंदेंनी आपल्या पहिल्याच भाषणाच्या ओघवत्या आणि रंजक शैलीने सभागृहात हास्याचे फवारे उडवले असले, तरी देवेंद्र मात्र हसताना अनेकदा आपल्या कपाळावर हात मारून घेत होते. अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत देवेंद्रांनी भल्या पहाटे शपथविधी उरकला होता. मात्र त्या सकाळी नेमके काय झाले होते, हे फडणवीस यांनी आजही कुणाला कळू दिले नाही. याच देवेंद्रांना आता मनातलं सर्व काही अत्यंत मोकळेपणाने सभागृहाच्या पटलावर सांगून टाकणाऱ्या एकनाथ शिंदेंसोबत सरकार चालवायचे आहे...

महाराष्ट्रातील सत्तांतराच्या राजकीय नाट्याचा सर्वसामान्यांच्या अनुभूतीवर काही परिणाम जाणवत नाही, असे जरी वरवर वाटत असले, तरी खरी परिस्थिती तशी निश्चितच नाही. मुळात अशा प्रकारच्या नाट्यांवर सर्वसामान्य माणूस विशेषत्वाने व्यक्त होत नसला, तरीदेखील तो अपादमस्तक थरारला आहे, हे नाकारता येत नाही. पुढच्या राजकारणाची दशा आणि दिशा काय असेल, याबाबत तो संभ्रमात आहे. झालेल्या घटनांचा त्याच्या मनावर परिणाम झाला आहे. त्यातून त्याच्या मनात राजकारणाबद्दल आणि विशेषत्वाने सरकारबद्दल अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजप आणि नवशिवसेनेच्या दृष्टीने सर्वसामान्य माणसाच्या मनातला विश्वास परत मिळवणे, हे पुढील काळातले सर्वात मोठे आव्हान असेल. त्यासाठी सरकारला थेट लोकांमध्ये जाऊन काम करावे लागेल. ज्या शिंदेंच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब ठाकरेंच्या पुत्राला सत्तेतून खाली खेचून नवशिवसेना आणि भाजपचे समीकरण आकारास आले आहे, त्या शिंदेंच्या खांद्यावर आता मोठी जबाबदारी असणार आहे. शिंदे हे मुळातच लोकांमधील नेते आहेत, तर देवेंद्र फडणवीस हे संघटनात्मक बांधणीपासून ते सरकारी धोरणांच्या आखणीपर्यंत प्रत्येक गोष्टीत काटेकोर नियोजन असणारे, प्रत्येक गोष्ट पारखून घेणारे पाहणारे नेते आहेत. एकंदरीतच दोघांच्याही कार्यपद्धतीत कमालीची तफावत दिसते.

माझ्याकडे कुणी काम घेऊन आले तर मी कागदावर शेरा मारत बसणार नाही; थेट जिल्हाधिकाऱ्याला फोन करून काम करण्याचे निर्देश देईन, असे शिंदेंनी आपल्या पहिल्याच भाषणात सांगितले. तर, शिंदे लोकांमध्ये रमतात, पण मुख्यमंत्री झाल्यावर असे करून चालत नाही. आता त्यांना त्यांच्या कामाचे आणि वेळेचे नियोजन करावे लागेल, असा प्रेमळ सल्ला देवेंद्रांनी विधानसभेतच एकनाथ शिंदेंना दिला. त्यामुळे दोघांनाही एकमेकांची काम करण्याची क्षमता आणि पद्धतीचा अंदाज आहे. आता त्या दोघांचाही सरकारमधला खेळ कसा रंगतो, हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यातच या दोघांची घडी कशी विस्कटेल, याकडेदेखील त्यांच्याच स्वकीय विरोधकांचे विशेष लक्ष असणार आहे. त्यामुळे दोघांनाही ‘एकमेका साह्य करू...’ अशी सामंजस्याची भूमिका घेण्याशिवाय पर्याय नाही. विधानसभेतील पहिल्याच पत्रकार परिषदेत आमदार बांगर कोणत्या पक्षातून आले, या प्रश्नाच्या उत्तरावर गांगरलेल्या शिंदेंच्या बचावासाठी देवेंद्र मोठ्या हिरिरीने धावले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पुढ्यातील माईक खेचला आणि पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर दिले. उद्धव ठाकरे यांनी मात्र नेमक्या याच घटनेचा अत्यंत चाणाक्षपणे वापर करीत आपले राजकीय चातुर्य दाखवून दिले. शिंदे मुख्यमंत्री झाले असले, तरी त्यांना या सरकारमध्ये किती महत्त्व आहे, यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न ठाकरे यांनी यानिमित्ताने केला. भविष्यातही या दोघांच्या भूमिकेवर आणि त्याच्या कार्यपद्धतीतील विसंगतीवर बोट ठेवण्याचा वारंवार प्रयत्न होईल; आता त्याचा त्या दोघांवर आणि त्यांच्या संबंधांवर किती आणि कसा परिणाम होतो, यावर पुढील अनेक गोष्टी अवलंबून आहेत.

विधानसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात शिंदेंनी सर्वांची मने जिंकली. त्यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलणाऱ्या अनेक नेत्यांनी शिंदे अत्यंत कमी बोलतात, असा वारंवार उल्लेख केला. शिंदेंनी मात्र आपल्या पहिल्याच भाषणात स्वत:वर लागलेला प्रेमळ आरोप आपल्या चौफर फटकेबाजीने अक्षरश: धुऊन काढला. शिंदे कमी बोलतात, हा आरोप जरी त्यांनी धुतलेला असला, तरीदेखील ते बोलायला लागले तर काय बोलतील, याचा नेम नाही, हेदेखील यानिमित्ताने अधोरेखित झाले.

भाषणादरम्यान शिंदे यांनी शाब्दिक फटकेबाजी करतानाच आपल्या राजकीय डावपेचांचे चातुर्य अवघ्या महाराष्ट्रासमोर उघड केले. नुसते उघडच केले नाही तर या सर्व घटनांमागच्या खऱ्या कलाकाराचा सभागृहाला परिचय करून द्यायलादेखील विसरले नाहीत. त्यांच्या भाषणाच्या ओघवत्या आणि रंजक शैलीने सभागृहात हास्याचे फवारे उडवले असले, तरी देवेंद्र मात्र हसताना अनेकदा आपल्या कपाळावर हात मारून घेत होते. त्यावरून या दोघांच्या स्वभाववैविध्याचे अगदी सहज आणि सोपे दर्शन घडते. राजकीय परिस्थितीतून हे दोघे एकत्र आले. त्या प्रसंगामधील राजकीय आणि तांत्रिक जटीलता अजूनही संपलेली नाही. सरकार स्थापन झाले असले आणि विश्वासदर्शक ठराव पार पडला असला, तरी तेवढ्याने भागत नाही. आता त्यांना सर्वसामान्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.

शिंदेंसोबत गेलेल्या अनेक आमदारांवर भाजपचे सत्कर्मी नेते किरीट सोमय्या यांनी अनेक आरोप केले होते. आता त्या आरोपांचे नेमके काय होणार, याबाबत पदोपदी त्यांच्याकडे लोक विचारणा करतील. अलीकडेच एका वाहिनीच्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना सोमय्यांची दमछाक झालेली पाहायला मिळाली. सोमय्यांना यापुढेही अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत; मात्र सरकारमध्ये सामील असलेल्या नेत्यांवर सत्तेतील पक्षाच्याच नेत्याने आरोप केलेले असताना त्यांनाच मंत्रिमंडळात संधी मिळाल्यास लोकांमधील सरकारच्या प्रतिमेला धक्का लागण्याची दाट शक्यता असते. आपल्याकडे लोक व्यक्त होण्यासाठी फक्त आणि फक्त मतपेटीचाच वापर करतात. त्यामुळे निदान पुढील अडीच वर्षे तरी सरकारला धोका असण्याचे कारण नाही; पण विश्वाससंपादनासाठी शिंदेंना त्यांच्या वेगवान कामकाजाच्या कार्यपद्धतीचा चांगला फायदा होऊ शकतो. फक्त त्यांच्या वेगाचे आणि देवेंद्राच्या धोरणांची गती समान असायला हवी.

देवेंद्र फडणवीस हे अत्यंत चाणाक्ष नेते आहेत. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यापासून आतापर्यंत त्यांनी अनेक वेळा आपल्या कामाच्या धडाक्यातून स्वत:चे कौशल्य वारंवार सिद्ध केले आहे. अडीच वर्षांपूर्वी त्यांचे मुख्यमंत्रिपद हुकले. त्यामुळे त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशीच काहीशी स्थिती होती. मात्र तीन बलाढ्य पक्ष एकत्र असतानादेखील अनेक निवडणुकांमध्ये देवेंद्रांनी तीनही पक्षांसमोर मोठे आव्हान उभे केले. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी अडीच वर्षांत एकही दिवस सत्ताधारी पक्षाला स्वस्थ बसू दिले नाही. अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत त्यांनी भल्या पहाटे शपथविधी उरकला. शरद पवार यांनी वेळेतच परिस्थिती सावरली; मात्र त्या सकाळी नेमके काय झाले होते, हे आजही देवेंद्र फडणवीस यांनी कुणाला कळू दिले नाही. याच देवेंद्रांना आता मनातलं सर्व काही अत्यंत मोकळेपणाने सभागृहाच्या पटलावर सांगून टाकणाऱ्या एकनाथ शिंदेंसोबत सरकार चालवायचे आहे. नुसते देवेंद्रच नाही, तर भारतीय जनता पक्षाच्या धाटणीतच असा उघडपणा कुणाला मानवणारा नाही.

गेल्या काही दिवसांमधील घटनांवरून भाजप आणि त्या पक्षातील नेत्यांचा त्यांच्या अंतर्गत घडामोडींवर किती आणि कसा प्रभाव असतो, हे एव्हाना सर्वांच्या लक्षात आले आहेच. शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय, देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय, विधानसभा अध्यक्षपदासाठी तुलनेने नवख्या राहुल नार्वेकरांना संधी देण्याचा निर्णय पाहता भाजप इतरांना सुचेल, असे सहज आणि सोपे काहीच करीत नाही, हे आपल्या लक्षात आले आहेच. प्रत्येक निर्णयात ते धक्कातंत्राचा वापर करून समोरच्याला अचंबित करतात. अशा परिस्थितीत सरकार चालवताना शिंदे-फडणवीस या जोडीला बरीच काळजी घ्यावी लागणार आहे. फडणवीस अत्यंत संयत नेते आहेत; तर शिंदे अत्यंत मोकळेढाकळे आहेत. शिवाय शिंदे जेवणाच्या ताटावरही एकटे बसत नाही. त्यांच्याभोवती सदा सर्वकाळ कार्यकर्त्यांचा गराडा असतो. त्यांच्या उपस्थितीने आता मंत्रालयाचा सहावा मजला गजबजेल. या गजबजाटात सरकारी कामांकरिता लागणारा वेगदेखील त्यांच्या गाठी आहे. आता त्या वेगाची आणि भाजपच्या धाटणीची सांगड घालणे हे त्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाचे आव्हान असेल. शिवाय सोबतीला साक्षात देवेंद्र असल्यामुळे त्यांना कदाचित पुढेदेखील अनेकदा माईक खेचण्याची गरज भासल्यास त्यात वाईट वाटण्याचे कारण नाही. कदाचित देवेंद्रांनी मंत्रिमंडळात असण्यामागे हीच नेमकी भाजपच्या पक्षश्रेष्ठींची भूमिका असावी. शिवाय शिवसेनेचा क्षतीग्रस्त झालेला वाघदेखील पुढील काळातही शिंदेंना डिवचण्याची एकही संधी सोडणार नाही.

कुणी कितीही अमान्य केले असले, तरी देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय भाजपमध्ये फारसा कुणाच्या पचनी पडलेला दिसत नाही. अगदी परवा नागपुरात फडणवीसांची विजयी मिरवणूक काढण्यात आली, त्या मिरवणुकीत पक्षादेशासाठी त्याग करणारा नेता म्हणून अनुयायांनी त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळली; मात्र नागपुरातील देवेद्रांना देवमाणूस म्हणणाऱ्या आणि त्यांचे अभिनंदन करणाऱ्या जाहिरात फलकांवर अमित शहांचा फोटो दिसत नव्हता. यावरूनच शहांच्या या निर्णयाने सर्वसामान्य भाजप कार्यकर्ता नाराज असल्याचे जाणवते. निदान फडणवीस समर्थकांना तरी अजूनही हा निर्णय पचनी पडलेला दिसत नाही. एकंदरीतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात एकप्रकारे शहांचा फोटो टाळून या प्रकारचा मूक निषेधच केला जातोय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही; पण उद्या मंत्रिमंडळाची यादी मंजूर करून घेण्यासाठी देवेंद्रांना याच अमित शहांसमोर जाऊन बसावे लागणार आहे. त्यातच शिंदेंसोबत आलेले अनेक नेते बक्कळ अपेक्षा घेऊन आलेले आहेत.

१०६ आमदार असलेल्या भाजमध्येदेखील इच्छुकांची भाऊगर्दी होणार, यात शंका नाही. त्यातले किती पक्षादेश शिरोधार्य मानणारे आहेत, हे वेळच सांगेल. अशा वेळी सर्वांचे समाधान करणे निव्वळ अशक्य आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांची पुढच्या काळात बरीच दमछाक होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आपण भाजपच्या सोबत हातमिळवणी केली असल्याचा दावा शिंदे करतात. आपण बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जात असल्याचेही ते सांगतात. मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकरांपासून ते सावरकरांपर्यंत सर्व शक्तिस्थळांना भेटी दिल्या, हे पाहता त्यांनी आपले सरकार सर्वसमावेशक असणार आहे, असा संकेत दिला आहे. त्यांच्यावर शिवसेनेत अन्याय झाल्यामुळे ते बाहेर पडल्याचेही त्यांनी वारंवार सांगितले. सत्यासाठी आपण बाहेर पडलो, अशी त्यांची भावना आहे. त्यांच्या या सत्याच्या लढाईला आता सुसंगतीचे बळ मिळो, याच सदिच्छा!

rahulgadpale@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT